Monday, May 16, 2022

जगाचा मार्गदर्शक भगवान बुध्द

भगवान गौतम बुध्दाचा काळ हा इसवीसनपूर्व ५६३ ते ४८३ हा असावा. असावा म्हणण्याचे कारण प्राचीन काळासंबंधी संशोधकांत एकवाक्यता नाही. वैदिक काळ किंवा बुध्द-महावीराच्या काळासंबंधी काथ्याकूट करण्यापेक्षा त्यांच्या तत्त्वज्ञानाकडे लक्ष देणे, ते समजून घेणे जास्त चांगले! वैदिक काळानंतर उपनिषदांचा काळ सुरू झाला. जे ऋगवेद काळात सूर्य, वरूण ह्यांच्या निव्वळ प्रार्थनेमुळे मिळत होते ते उपनिषद काळात यज्ञयाग करून पदरात पाडून घेण्याचा समाजाचा कल वाढला. अर्थात सुरूवातीला यज्ञामुळे ते मिळालेही होते. मात्र त्यातून एक अभेद्य वर्णव्यवस्था निर्माण झाली. नेमक्या ह्या वर्णव्यवस्थेला छेद देण्याची वेळ आली. तसा प्रयत्न महावीरानेही केला होता. तरीही अत्यंत विज्ञानवादी बुष्दिवादी दृष्टीकोनामुळे सर्वसामान्य लोक त्यापासून लांब राहिले. गौतम बुध्द हा लिच्छवी घराण्याचा राजपुत्र होता! विद्वानांच्या मते, लिच्छवी हे शकांपैकी क्षत्रियांचेच एक कुळ! सर्व राजवैभवाचा त्याग करून गौतम राजवाड्याबाहेर पडला. जीवनाचा अर्थ काय असा त्याला प्रश्न पडला होता. मत्यूनंतर काय होते? मोक्ष कसा मिळेल? अशा प्रश्नांचा शोध गौतमानं घेतला. एक चळवळ ह्या दृष्टीने बुध्दाने जीवनाकडे पाहिले. सारनाथ येथे पिंपळवृक्षाखाली बसून त्याने केलेल्या तपश्चर्येचे फळ म्हणजेच त्याला जीवनाचे तत्त्वज्ञान लक्षात आले. ते तत्त्वज्ञान म्हणजेच बौध्द धर्म ! सर्वांविषयी अपार करूणा हे त्याच्या तत्त्वज्ञानाचे सार. त्याला अनुयायी मिळाले. त्यांची निष्ठा बुध्दाप्रती तर होतीच. शिवाय त्याच्या तत्त्वज्ञानाप्रतीही होती. सेवा हे बौध्द धर्माचे अधिष्ठान होऊन बसले. प्रत्येक अनुयायाला जे जमेल ते त्याने केले. अनेकांनी लेणी खोदली. भिख्खूंचे संघ स्थापन केले. भिख्खूंचे संघ भारताबाहेरही गेले. त्याग, अहिंसा, करूणा ह्या मूल्यांचा त्यांनी निव्वळ शाब्दिक प्रसार केला नाही तर आचरणानेही केला. गौतम बुध्द हा जगाचा मार्गदर्शक बनला. बौध्द तत्त्वज्ञानापुढे सनातन वैदिक धर्म फिका पडतो की काय अशी परिस्थिती भारतात निर्माण झाली. सनातन वैदिक धर्माचे पुनरूत्थान करण्याचे काम भारतातील आचार्यांना करावे लागले. त्या कार्यात शंकराचार्यांचा वाटा मोठा आहे. त्यानंतर नाथ संप्रदायाचा वाटा शंकराचार्यांच्या वाट्याइतकाच मोठा आहे. तेवढ्यानेही वंचितांना न्याय मिळेनासा झाला. निदान वंचितांची तशी भावना झाली. स्वातंत्र्योत्तर काळात बौध्द तत्त्वज्ञानाने पुन्हा उचल खाल्ली. बाबासाहेब आंबेडकारांनी त्यांच्या लाखो अनुयायांसह बौध्द धर्माचा अंगीकार केला. सारनाथच्या स्तंभावरील त्रिसिंहाला तर भारत सरकारचे अधिकृत चिन्ह म्हणून मान्यता मिळाली. अहिंसेच्या तत्त्वज्ञानालाही लोकजीवनात मानाचे स्थान मिळाले !

रमेश झवर



No comments: