Monday, May 16, 2022

हुसेन दलवाई

 काँग्रेसचे  माजी  खासदार हुसेन दलवाई ह्यांनी सोमवारी ह्या जगाचा नरोप घेतला. ९९ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या दलवाईंची आणि माझी ओळख होण्याचे कारण नाही. त्यांच्याशी संबंधित बातम्या रिपोर्टरने माझ्या चेबलावर आणून दिल्यावर त्या फक्त शुध्दलेखनाच्या चुका तपासून कंपोजला पाठवणे एव्हढेच माझा काम. परंतु त्यांच्याविषयी माझ्या मनात मात्र एक प्रकारचे कुतूहल होते. एके दिवशी चर्चेत भाग घेणअयाचे निमंत्रण मला आले. तेही चर्चेत सहभागी झाले होते. चर्चेचा विषय काय होता हेही मला आठवत नाही. एक मात्र लक्षात राहिले की त्यांचा मुद्दा संपल्यावर तोच धागा पकडून मी माझे मत मांडत राहिलो!

चर्चा संपल्यावर सगळ्यांचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. दुस-या दिवशी मला फोन आला. दरम्यान त्यांनी कुछून तरी माझा नंबर मिळवला असावा.

मी दलवाई बोलतोय्. तुम्हाला वेळ असेल तर या एक दिवशी गप्पा मारायला.

केव्हा? आज आलो तर चालेल? ‘

या ना.

त्याच दिवशी मी दुपारी चारच्या सुमारास मी त्यांच्या चर्चगेट निवासस्थानी हजर झालो. त्यांनी हातात हात घेऊन माझे सप्रेम स्वागत केले. उत्कृष्ट  मराठीत त्यांनी जुन्या आठवणींचा पट उलगडला. माझ्यासाठी टिपीकल स्वीट डिश- खुर्मा- मागवला. वास्तविक त्या दिवशी सण वगैरे नव्हता. ह्याचा अर्थ त्यांनी ती डिश माझ्यासाठी बनवायला सांगितली असणार!

दलवाईंना संसदीय कामकाजाचा अफाट अनुभव होता. तारांकित आणि अतारांकित प्रश्न, अल्पमुदतीची चर्चा, स्थगन प्रस्ताव ह्या सर्वांचा उद्देश एकच: सरकारने माहिती दडवण्याचा प्रयत्न करू नये. कितीही अडचणीचा प्रश्न असला तरी मंत्र्यांनी लोकप्रतिन लोकप्रतिधींपासून सार्वजनिक हिताची माहिती दडवून ठेऊ नये!  माझे आणि त्यांचेही घड्याळाकडे लक्ष नव्हते. नंतर माझ्या लक्षात आले दोन तास झाले तरी आपण अखंड गप्पा मारतोय्!

असे माझे गप्पांचे सत्र महिन्यातून एकदा तरी चालायचे. एक दिवशी त्यांना मला विचारले, तुम्ही कुठे राहता? मी ठाण्याला राहतो हे त्यांना धक्काच बसला.

`मला वाटलं, तुम्ही जवळपास म्हणजे गिरगाव वगैरे ठिकाणी राहात असाल.’

नाही हो, गिरगावला राहणा-या पत्रकारांचा जमाना आता संपला. १९६५ नंतर मुंबईला आलेल्या पत्रकारांना बांद्रा-कुर्ल्याच्या पलीकडे राहायला मिळालं तरी खूप झालं! ‘

नंतर नंतर त्यांच्या आणि माझ्या भेटी कमी होत गेल्या. आज त्यांच्या मृत्यूची बातमी जेव्हा ऐकली तेव्हा लक्षात आलं आता काळ स्वतः अनंत असला तरी शरीरधर्म सोडायला तो कोणालाही परवानगी देत नाही.

रमेश झवर

No comments: