Thursday, October 2, 2014

धर्मक्षेत्रे विधानसभाक्षेत्रे!

288 मतदानक्षेत्रासाठी साडेपाच हजार उमेदावार! असे म्हणतात की महाभारत युद्धात दोन्ही बाजूंच्या मिळून 18 अक्षौणी सैन्यापैकी कौरवांकडील अश्वत्थामा, कृपाचार्य आणि कृतवर्मा तर पांडवांकडील पाची पांडव, कृष्ण आणि सात्यकी एवढे सातच जण वाचले!  विधानसभेच्या निवडणूक  युद्धात आणि आधीच्या लोकसभा निवडणूक युद्धात अजिबात साम्य नाही. लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपा युतीत एकत्र असलेले उमेदवार विधानसभा निवडणुकीत मात्र एकमेकांविरूद्ध उभे आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीत जे एकत्र होते तेही ह्यावेळी एकमेकांविरूद्ध उभे आहेत. ह्याचाच अर्थ ह्या वेळी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात चौरंगी किंवा पंचरंगी सामना होणार आहे. ह्या सामन्यात आता स्वतःला प्रबळ म्हणवणारे उमेदवार किती विजयी होतील आणि किती गारद होतील ते पाहायला मिळेलच! वेगऴ्या अर्थाने ही निवडणूक त्या त्या उमेदवारांपुरता तरी  जनमतकौल ठरणार आहे.
ह्या सगळ्या उमेदवारांचे नेते उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत अगदी अखेरच्या क्षणांपर्यंत 288 जागांच्या निम्म्या निम्म्या म्हणजे 144 जागा मिळाव्यात म्हणून युक्तिवाद करत होते. भांडत होते. शेवटी डाव मोडून सगळे उठले. 25 सप्टेंबर रोजी 25 वर्षांची युती मोडल्याचे जाहीर करण्यात आले तर तासभराने 15 वर्षांची आघाडी मोडल्याचे जाहीर करण्यात आले. युती मोडताच आघाडीही संपुष्टात आणायचीच असे लोकांना वाटावे असाच हा द्युत  व्यवहार चालला होता! एकूण घटनाक्रम पाहता असे वाटते की वाटाघाटी चालू ठेवण्यात काही अर्थ नाही हे बहुधा चारी पक्षांच्या नेत्यांना माहीत असावे.
भाजपा नेते माथूर आणि तावडे-फडणवीस हे दिल्लीत अमित शहारूपी भोज्यास वारंवार शिवून परत येत होते. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे ह्यांना मात्र भोज्यास(मनोहर जोशींना विचारून सांगतो असं सांगण्याची सोय उद्धवजींनी स्वतःच नेस्तनाबूत केलेली होती.) शिवण्याची सोय उरलेली नव्हती. त्यामुळे उद्धवजींना संजय राऊतमार्फत भाजपाचे भीष्माचार्य अडवाणी यांच्याशी संपर्क साधण्याची पाळी आली. काँग्रेस आघाडीत मात्र एक बरे आहे. काँग्रेसकडे भोज्याचे काम सोनियाजी-राहूल ह्यांच्याकडे तर राष्ट्रवादीकडे शरद पवार ह्यांच्याकडे भोज्याचे काम सुरूवातीपासूनच आहे! त्यामुळे वाटाघाटींच्या वेळी नकार-होकार देण्याची वा वाटाघाटी फुटल्याचे खापर कोणावर तरी फोडण्याची उपयुक्त सोय मात्र आहे. राजकारणातला संवाद संपला अशी खंत व्यक्त करून भावी राजकारणात जरूर पडली तर पुनश्च संवाद साधण्याची सोय शरद पवार ह्यांनी करून ठेवली आहे!
गेल्या 15-20 वर्षांच्या काळात युत्याआघाड्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्रातल्या बहुतेक पक्षांच्या नेत्यांनी आत्मविश्वास गमावला आहे. म्हणून तर ह्या वाटाघाटींच्या काळात अधुनमधून स्वबळावाच्या गर्जना केल्या जात होत्या. पितृपक्षात निर्णय नाहीच अशाही पुड्या वर्तमानपत्रात सोडण्यात आल्या. नंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर वाटाघाटी यशस्वी होतील असाही आभास निर्माण करण्यात आला होता. मुळात स्वबळावर निवडणूक लढाईंत उतरण्याचे सक्षम नेतृत्वच मुळी कोणत्याही पक्षात उरलेले नाही. महाराष्ट्रात तर नाहीच नाही. ह्या नेत्यांत आत्मविश्वास असता तर त्यांनी वाटाघाटीत वेळ घालवलाच नसता. तरीही वाटाघाटींचा घाट घालण्यात आला दिल्लीतल्या नेत्यांना कात्रजचा घाट दाखवण्याच्या व्यूहरचनेत सगळे व्यग्र होते असाच त्याचा अर्थ होतो. महाराष्ट्र मंडळात फुकट गेलेल्या नेत्यांचे उदंड पीक आले आहे. त्यांच्या नेतृत्वाचा फेस अधुनमधून उफाळून वरती येऊ देणेही सर्वांची मानसिक गरज असावी. मिडियाही ती पुरी करत असतोच. कारण त्याविना ह्य़ा नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडत नाही.
शेजारच्या राज्यात वादळाशी झुंजत असतानाच नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत होते. महाराष्ट्रातल्या नेत्यांना मात्र वाटत होते की निम्म्या निम्म्या जागा पदरात पाडून घेतल्या की मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार झाल्यातच जमा आहे. परंतु ह्या सगळ्या स्वप्नाळूंना मोदींनी नेमके काय केले ह्याचा विसर पडला असावा. नरेंद्र मोदींनी भाजपाचे वाहन रालोआसहीत वापरायचे ठरवले होते. त्याचवेळी भाजपाला स्वतःचे बहुमत मिळवण्याचीही खूणगाठ मनाशी बांधली होती. स्वबळावर म्हणजे केवळ स्वतःच्याच बळावर! मगच ते भाजपातल्या फेरजुळवाजुऴीच्या कामाला लागले होते. राजनाथ सिंगांशी त्यांनी प्रथम जुळवून घेतले. मग संघप्रमुखांचा आशीर्वादही प्राप्त करून घेतला. आणि मगच अडवाणी, सिन्हा, नीतिशकुमार ह्यांच्याशी दोन हात करायला ते सिद्ध झाले. त्यांच्या मदतीला भारतातले दोन मोठे उद्योगसमूह आले असावे असे वाटायला आधार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रमाच्या वेळी काय? लोकसभा निवडणुकीत दोन दोन जागा जास्त मिळाल्या हा एकच मुद्दा सगळ्या  युयुत्सूंच्या हातात!  म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या जास्तीच्या वीसपंचवीस जागांच्या भरवशावर मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने सगळे बघत राहिले! अजूनही बघत आहेत. म्हणूनच निम्या निम्या जागांसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्यांचा हट्ट म्हणजे सत्तेतल्या निम्म्या वाट्यासाठीचा हट्ट! मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्याशी जास्त जागांचा मुद्दा जोडलेला आहे हे आता सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आहे. लोकसभा निवडणुकीसाठी व्यूहरचना करताना मोदींनी सोशल मिडिया, व्हॉटस् अपसारखी साधने वापरली;  कारण मध्यमवर्ग हा भाजपाचा खास मतदार. आतापर्यंत मतदानाला बाहेर न पडणारा! काँग्रेसविरूद्ध चेव त्याला पूर्वीही येत होता. मात्र ह्यावेळी त्याला इतका चेव येईल की ज्यायोगे काँग्रेस भुईसपाट होईल ह्याची कल्पना खुद्द नरेंद्र मोदींनाही आली असेल की नसेल ह्याबद्द्ल शंका वाटते!
गोरगरीबांभोवती रूंजी घालणारे आणि सेक्युलरिझमभोवती पिंगा घालणारे काँग्रेसचे सारेच राजकारण लोकसभा निवडणूक निकालाने जेव्हा संपुष्टात आणले तेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्यांना जाग आली. तोपर्यंत स्वबळ प्राप्त करून देणा-या तुळजाभवानीची आणि कमरेवर हात ठेवून चंद्रभागातीरी उभ्या असलेल्या महाविठ्ठलाची त्यांना आठवणही झाली नाही.  सत्ता मागून मिळत नाही ती हिसकावून घ्यावी लागते, असे बाळासहेब ठाकरे शिवाजी पार्कच्या सभेत गरजले होते. पण उद्धवजींना बाळासाहेबांच्या उद्गारांचा विसर पडला. राज ठाकरेंना त्याची आठवण आहे. पण खळाळ् खॅटच्या नादात त्यांना सत्ता हिसकावून घेण्याचा  विसर पडला! नाशिक आणि मुंबईच्या काही मतदारसंघात मिळालेल्या यशावर ते समाधानी राहिले. समाधानी आहेत.
ह्या पार्श्वभूमीवर अजितदादा, पृथ्वीराजबाबा,  देवेंद्र फडणवीस-तावडे, उद्धवजी, राजसाहेब ह्या सगळ्यांना पडणारी मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडत आहेत. पण नरेंद्र मोदींनी स्वतःचा जसा करिष्मा निर्माण केला तसा ह्या नेत्यांना निर्माण करता आला का?  करता येईल का? नरेंद्र मोदींसाठी प्रसंगी संसदीय अधिनियमांची पायमल्ली करून देशाची मशागत सुषमा स्वराज आणि अरूण जेटली ह्या दोघांनी करून ठेवली तशी देवेंद्र फडणीस, विनोद तावडे, उद्धव ठाकरे ह्यंनी केली कामोदींचा रस्ता जसा साफ झाला होता तसा ह्या दोघांनी आपल्या नेत्याचा रस्ता साफ केला का? त्यांच्या मदतीसाठी उभा राहणारा घरोब्याच्या उद्योगपती कोण? मोदींसाठी आयटी सेक्टरने वर्षदीडवर्षं आधीपासूनच टेहळणी बुरूज बांधून ठेवले होते. फक्त नौबती झडण्याची वाट पाहात बसणे एवढेच काम मोदींना उरले होते..
विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2014 मध्ये होणार हे शिवसेनेच्या नेत्यांना माहित नव्हते की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना माहीत नव्हते? शरदरावजी, प्रफुल्ल पटेल. नारायण राणे, अजितदादा, पृथ्वीराबाबा, उद्धवजी, फडणवीस-तावडे ही सगळी मंडळी फुटकळ वक्तव्य करण्यातच अडकून पडली आहे. त्यातून बाहेर पडायचे त्यांनी ठरवले तरी ते त्यांना आता शक्य नाही.

रमेश झवर

भूतपूर्व सहसंपादक, लोकसत्ता 

No comments: