उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्रीपदाच्या
मुद्द्यावरून वाटाघाटी मोडून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बहुसंख्य
उमेदवारांची स्थिती शोचनीय आहे. कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही तर पुनश्च ‘वाटाघाटीं’चा रगडा फिरणार हे
आता ठरल्यासारखे आहे. मात्र ह्या वाटाघाटी कोणाच्याही बरोबर होऊ शकतात! जाहीर सभांना
गर्दी जमवण्याचे हातखंडा तंत्र पूर्वींच्या काळात काँग्रेसने यशस्वीरीत्या राबवले
होते. तेच तंत्र सामाजिक माध्यमांवरील प्रचार आणि डिजिटल तंत्रज्ञानासकट विधानसभा
निवडणुकीसाठी राबवण्याच्या बाबतीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी ह्यांच्या
नेतृत्वाखालील भाजपाने कोणतीही कसूर ठेवलेली नाही. फक्त एकच उणीव आहे. स्वतःच्या
हिंमतीवर गुजरातचा ‘विकासपुरूष’ अशी प्रतिमा
निर्माण करणा-या नरेंद्र मोदींच्या तोडीचा ‘महाराष्ट्राचा विकास पुरुष’ मात्र विधानसभा निवडणुकीत अजून तरी कोणी दिसत नाही. मुख्यमंत्री म्हणून
ज्यांची नावे पुढे आली आहेत वा मिडियात चर्चिली जात आहेत त्यापैकी कोणाकडेही डिजिटल
तंत्रज्ञान वा सामाजिक माध्यम वापरण्याची कुवत नाही. हे सगळे जण नेते म्हणून मोठेच
आहेत. त्यांच्याबद्दल त्यांच्या अनुयायांत आदराचीही भावना आहे. मग घोडे कुठे पेंड
खातेय्?
आपल्या घटनेत पंतप्रधानपदासाठी वा मुख्यमंत्रीपदासाठी थेट निवडणुकीची
तरतूद नाही. समजा, अशी तरतूद असती तरी बहुरंगी लढतीत एकाच नेत्याच्या बाजूने कौल
कसा पडणार? तो पडला तरी तो निर्विवाद कसा मानला जाणार? पृथ्वीराज चव्हाण,
नारायण राणे, अशोक चव्हाण ह्या तीन जणांनी ह्यापूर्वी मुख्यमंत्रीपद भूषवले आहे. ह्या तिघांखेरीज पतंगराव कदम
मुख्यमंत्रीपदाचा पतंग उडवण्यास एका पायावर तयार आहेत! ह्या सगळ्यांची
नेतृत्व वादातीत असले तरी कोणाचाही पक्षातला आणि पक्षाबाहेरचा लौकिक जोरदार आहे
असे म्हणता येत नाही. पृथ्वीराज चव्हाण ह्यांचा स्वभाव धीरगंभीर आहे. परंतु शिस्त
मोडून केबिनमध्ये घुसणा-यांचा आणि त्यांच्यावर फाईलीवर सही करण्याची सक्ती करणा-या
आमदारांना ते दणका देऊ शकले नाहीत. त्यांच्याकडे प्रशासनकौशल्य असले तरी राज्यांत
फक्त फायद्यासाठी आसुसलेल्या आमदारांचे ते समाधान करू शकत नाहीत. अशोक चव्हाण हे मंत्रिमंडऴांचे
‘हेडमास्तर’ म्हणून ओळखले
गेलेल्या शंकरराव च्व्हाणांचे चिरंजीव. परंतु शंकरराव चव्हाणांच्या निम्म्यानेही
त्यांचे कर्तृत्व नाही. परंतु राहूल गांधींपेक्षा त्यांचे कर्तृत्व निश्चितच उजवे
ठरावे. निदान त्यांनी स्वतःची आणि शेजारच्या मतदारसंघातली लोकसभा सीट तरी जिंकून
दाखवली! ह्यावेळी त्यांच्यावर मराठवाड्यातल्या काँग्रेस
प्रचाराची सूत्रेही सोपवण्यात आली आहेत. नारायण राणेंच्या स्वतःबद्दलच्या फाजील
आत्मविश्वासाबद्दल काँग्रेस नेतृत्वास सुरूवातीपासून शंका होती. दिल्लीचे नेतृत्व
बदलले तरी त्यांच्याबद्द्लची शंकेची भावना मात्र बदलली नाही. शिक्षणसम्राट पतंगराव
कदम हे बुजूर्ग आहेत. परंतु भारती विद्यापीठ उभारताना त्यांनी जे कष्ट उपसले तसे
कष्ट ते राज्याला वर काढण्यासाठी उपसू शकतील की नाही ह्या प्रश्नाचे उत्तर
त्यांनाही देता येणार नाही.
राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलही फारसे काही बोलण्यासारखे नाही. मंत्री
झाल्यापासून अधिकारी वगळता सगळ्यांशी तूरट वागण्याची सवय अजितदादा पवारांना आहे.
ते मुख्यमंत्री झाले तर ही सवय त्यांना नडणार! अलीकडे ते हसून बोलायला लागले आहेत. पण हसून बोलण्याचे हे शिक्षण त्यांना
फक्त निवडणुकीच्या काळापुरतेच उपयोगी पडणारे आहे. छगन भुजबळ आणि जयंत पाटील
ह्यांची योग्यता कितीही थोर असली तरी त्यांच्यावर विभागीयतेचा शिक्का बसला आहे.
भुजबळ हे फक्त ओबीसीचे नेते तर जयंत पाटील हे सहाकार नेते! भुजबळांना फक्त
नाशिकच्या विकासात रस तर जयंतरांना सांगलीपलीकडे काही दिसत नाही.
भाजपाकडील मुख्यमंत्रीपदाचे ‘योध्दे’ म्हणून चार जणांची
नावे घेतली जातात! अर्थात सुरूवातीला
तीनच नावे होती. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे! आता गोपीनाथ मुंडे
ह्यांच्या कन्या पंकजाचे नाव नरेंद्र मोदींच्या सभेनंतर घेतले जात आहे. त्याखेरीज ‘डार्क हॉर्स’ म्हणून खुद्द
नितिन गडकरी आणि प्रकाश जावडेकर ह्यांची नावे कधीही पुढे केली जाण्याची शक्यता
आहेच. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे हे दोघेही संसदपटुत्वाच्या बाबती उजवे आहेत.
पण त्यांची अवस्था सुषमा स्वराज आणि अरूण जेटली ह्यांच्यासारखीच आहे. मेहनत करो,
मेहनतका फल मिठा होता है, ह्या इंदिरा गांधीकालीन मंत्र्याप्रमाणेच त्यांची स्थिती! पंकजाचे नाव पुढे
करण्यामागे केवळ राजकीय हूलबाजी असावी असे वाटते. शिवसेनेकडे उद्धव ठाकरे ह्यांच्याखेरीज
कोणाचेच नाव नाही. शिवसेनेत प्रमुख हे एकच नेतेपद! खुद्द उद्धव ठाकरे हे सध्या प्रमुख आहेत.
त्यामुळे त्यांना आव्हान देण्याचा प्रश्न नाही. मनोहर जोशींना आता त्यांनी
सर्वार्थाने बाद केले आहे. शिवसेनेची राजकीय कोंडी होत असेल तर ती फोडणारी एकच
व्यक्ति शिवसेनेकडे आहे. ती म्हणजे संजय राऊत! सत्ता स्थापन करण्याइतपत बहुमत मिळाले तर धक्का देण्याचे तंत्र म्हणून
उद्धव ठाकरेंनी त्यांचे नाव पुढे केले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ‘खळाळ...ख्याट् फेम’ राज ठाकरे
ह्यांच्याकडेही मुख्यमंत्री म्हणून पाहिले जाते. त्याचे कारण त्यांचे फर्डे
वक्तव्य!
पण! निवडणुकीच्या
जुगारात हा ‘पण’ मोठा आहे. भाजपाला
बहुमत मिळेल म्हणावे तर 50 हून अधिक ‘बाहेर’च्या उमेदवारांना
भाजपाने उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना भाऊंदकीला तोंड द्यावे लागत
आहे तर राष्ट्रवादीच्या उमेदवारांशी मतदार नेहमीच सावध राहतात. वचकून वागतात! परळी, उस्मानाबाद,
निलंगा, तिवसा, काटोल, वरोरा ह्या मतदारसंघात लढती आपापसातील आहेत. म्हणजे
नातेसंबंधातील आहेत. शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमी हा काही निवडणुकीच्या राजकारणात
गुन्हा मानला जात नाही. ह्या सगळ्या उमेदवारांपैकी कोण निवडून येईल, कोण निवडून
येणार नाही ह्याबद्दल ठामपणे सांगता येत नाही. जे कोणी ठामपणे मते मांडत असतील
त्यांच्याबद्दल फक्त आदर व्यक्त करण्यापलीकडे आपल्या हातात काय आहे?
महाराष्ट्राची सर्कस सांभळणे हे एक दिव्य ठरणार आहे, ह्याची सगळ्यांना कल्पना
आहे. पक्षान्तर कायद्याची फारशी धास्ती नाही हे खरे; पण ‘बाहेरून पाठिंबा’, ‘मतदानाच्या वेळी
सभात्याग’, ‘डिव्हिजनच्या मागणी’वरून ठराव संमत
झाला आहे की नाही हेच मुळी कळू द्यायचे नाही इत्यादि नव्या प्रकारच्या वैधानिक कामकाजात
प्रत्येक जण अलीकडे तरबेज झाला आहे. कारण म्युनिसिपालिटीच्या आणि झेडपीच्या
राजकारणाचा ह्या सगऴ्यांनी ‘डिप्लोमा’ मिळवला आहे.
गेल्या पंधरा वर्षात सोपी असलेली युत्या-आघाड्यांची निवडणूक यंदा युत्या-आघाड्यांचे
विसर्जन झाल्यामुळे गुंतागुंतीची झाली आहे. स्वबळावर निवडणूक लढवण्यास आपला पक्ष
तयार आहे असे सांगत असताना प्रत्येक नेता वाटाघाटींसाठी फोनफोनी करत बसला होता.
आता एकमेकांवर धुवांधार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. हे सगळे भयग्रस्ततेचे लक्षण
आहे. कोणत्याही प्रकारच्या भवितव्याची शाश्वती नसण्याचा हा त्यांचा पहिलाच अनुभव
आहे. त्यात कार्यकर्त्यांची मारामार, निवडणूक लागली तरी ‘स्व-बळा’वर द्रव्य उभे
करण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. गुजरातमधून थोडी मॅनेजर माणसे भाजपाने आयात केली
आहेत हे खरे असले तरी बेरकी कार्यकर्त्यांबद्दल त्यांचा अंदाज चुकण्याचा पुरेपूर
संभव आहे. ह्या वातावरणात ‘उपरसे शेरवानी और
अंदरसे परेशानी’ अशी स्थिती झाली
असेल तर सगळे भावी मुख्यमंत्री भयभीत राहणारच!
रमेश झवर
No comments:
Post a Comment