‘कौल’
सिनेमा पाहिला. काय आहे ह्या सिनेमात? थ्रिल, सायकी, श्रुतीतला नेति नेति आदेश,
आणि सद्यकालीन जगातील भिन्न भिन्न, परंतु फोलपणाने
झाकोळून गेलेल्या विचारसरणी, मनाच्या ठिक-या झालेला क्षुद्र मनुष्य-जीव! पात्रे?
तीन. आणि नायकाच्या आणि जीवनाचे रहस्य ज्याला समजले आहे तो म्हातारा आणि त्यांच्या
सोबतीला बहुतेक वेळी हजर असलेला एकुलता एक डोंगर!
ह्या सिनेमात पात्रांना महत्त्वच नाही. कथेलाही महत्त्व नाही. पटकथेचr ताकद मात्र खूपच मोठी. प्रेक्षकांना
भिववून सोडणार छायाचित्रण! कोकणातल्या
कुठल्याशा गावात नेमका रात्रीच्या वेळी पावसाबरोबर धिंगाणा घालणारा आवाज. हा सिनेमा
सबटायटल आणि फोटोग्राफीच्या मदतीने समजून घ्यायचा. अंगावर शहारे उठले असतील तर
समजायचे की आपण सिनेमा नकळत एन्जॉय करतोय्. मला वाटतं, दिग्दर्शक आदीश
केळुस्करचीही बहुधा हीच अपेक्षा असावी.
‘कौल’मध्ये
अंधारलेले गूढ वातावरणही आहे. पण ते ओढूनताणून आणलेले नाही. ‘वह कौन थी?’सारख्या सिनेमातले थ्रिल आहे. यशवंत
रांजणकरांच्या कादंबरीतला थरार आहे. कदाचित् दिग्दर्शक आदीशला सिनेमाचे माध्यमच वाकवायचे
असेल. नसेलही. हा सिनेमा खळाळणा-या नदीसारखा स्वतःचा अकृत्रिम आकार घेऊन येतो. ‘कौल’ सिनेमा सर्व रूढ आकाराला डावलून स्वतःचा
आकार घेऊन आला आहे. अभिव्यक्त होण्याला महत्त्व. प्रेक्षकांना तो भावलाच पाहिजे
असा अट्टहास नाही. त्याला दिग्दर्शकाच्या लेखी महत्त्व नाहीय्ये. सिनेमा
माध्यमातले हे धाडसच. आदीशने ते केले आहे. वेस्ट एंड कवितेबद्दल टी. एस. इलियट म्हणतो, ह्या कवितेचा तुम्हाला
समजेल तो अर्थ! आदीशचीही भूमिका जवळ जवळ तशीच आहे.
लिहण्याची उर्मी आल्यावर कवी कविता लिहतो.
आदीशला झटका आला. त्याने सिनेमा केला. सुचणे, ह्रिदम, स्टोरी, आयडिया, थीम,
कन्टेंट, स्टोरी, प्लॉट, पटकथा, संवाद, कास्टिंग, लोकेशन, शूटिंग, साऊंट इत्यादि
अंगाने सिनेमा पुढे जात गेला. नॅरेशनबद्दल फारसा विचार केला नाही की बीटनडाऊन तथाकथित
नॅरेशन फॉर्मच्या भानगडीत तो पडला नाही. स्फुरलेले आवश्यक तेवढे संवाद प्रेक्षकांच्या
मनात छिन्नीसारखे घुसत राहतात. कॅमेरादेखील प्रेक्षकांच्या डोक्यात अतिशय वेगाने घुसत
राहतो. मुंबईत खून करून कोकणात आलेला तरूण शिक्षकाची नोकरी पत्करतो. शिकवण्यात मन
नसते. वर्गात मात्र वरवर शिकवत राहतो. खरं म्हणाल तर त्याचे मन मुळीच था-यावर
नसते. एकदा तर चालू वर्ग बंद केल्याचे तो जाहीर करतो. मुलं मुली निघून जातात. तो
सुन्न होऊन बसून राहतो. ठिक-या झालेले मन घेऊऩ हा शिक्षक रात्रीच्या वेळी भटकत राहतो.
त्या भटकन्तीत त्याला एका म्हातारा भेटतो. विडी शिलगावण्यासाठी माचिस मागतो. ओलसर
हवेमुळे माचिसवर काडी घासली तरी ती पेट घेत नाही. विडी लौकर शिलगत नाही हे ओघाने
आले. सोबतीला पाऊस आणि सुंसाट वारा!
तो मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टरच्या
सल्ल्यावरून पूर्वी भेटलेल्या म्हाता-याला भेटण्यासाठी तो पुन्हा त्या ठिकाणी
जातो. आधी तर मी तुला भेटलोच नाही असे जेव्हा तो सांगतो तेव्हा त्याची गोची होते.
परंतु हादेखील हट्टाला पेटतो. तेव्हा कुठे तो बोलू लागतो. त्या दोघातला विलक्षण
संवाद प्रेक्षकांना थेट जे कृष्णमूर्ती, रजनीश, श्रुतीतल्या ‘नेति नेति’ इत्यादि नाना विषयांपर्यंत घेऊन जातो.
काय सत्य आणि काय सत्य नाही ह्याबद्दल शंकांचे काहूर माजावे असा हा दोघांचा संवाद.
बराचसा एकतर्फी. आदीशने तो ताकदीने लिहलाय्! कथा
म्हणाल तर एवढीच.
ह्या कथेला रूढ अर्थाने कथाही म्हणता येत
नाही. मग आदि, मध्य किंवा अंत शोधण्याचा प्रश्नच नाही. ती थेट सुरू होते. 25-30
मिनीटे प्रेक्षकांच्या मनात भिनत जाते. नंतर टोकदार उत्सुकता वाटू लागते, काय शेवट
होणार आहे ह्याचा? म्हाता-याच्या
तोंडची संवादांची फेक क्वचित प्रेक्षकांच्या डोक्यावरून जाणाराही असतो. ऑडिओ
व्हिज्युअल माध्ममातला हा ऑडिओ ऐकता ऐकता प्रेक्षकांना देवाचे विश्वरूप
पाहण्यासाठी कृष्णाकडे दिव्य दृष्टी मागणा-या गीतेतल्या अर्जुनाची आठवण व्हावी.
हिंदीत साँगलेस सिनेमे निघाले. समान्तर सिनेमांची तर मोठी चळवळ उभी झाली. उभी
राहिली तशी संपलीदेखील. ‘यादे’सारखा एकपात्री सिनेमाही निघाला. मराठी रंगभूमी तर
प्रयोगासाठीच ओळखली जाते. मराठी सिनेमा मात्र प्रयोगासाठी फारसा ओळखला गेला नाही. ‘कौल’ सिनेमा मात्र प्रयोगाच्या दिशेने निघाला
आहे असे वाटते. प्रत्येकाने पाहावा असा हा सिनेमा.
रमेश झवर
www.rameshzawar.com