Tuesday, November 8, 2016

काळा पैसावाल्यांची काळरात्र !

काळा पैसा म्हणजे काय हे अनेक लोकांना समजत नाही. व्यवहार करताना कर चुकवून केलेला वाचवलेला पैसा! विक्रीकर, आयकर, स्टँप ड्युटी इत्यादि प्रकारचे कर सरकारकडून वसूल केले जातात. ते वसूल करताना व्यवहाराचे करारपत्र, बिल, पावत्या इत्यादि आधारभूत मानले जातात. म्हणून व्यवहार करताना व्यवहार ज्या रकमेत ठरला असेल त्यापेक्षा ती रकम सोयीनुसार कमीअधिक दाखवली जाते. व्यापार, उद्योग  करायचा तर केव्हा काळ्या पैशाची जरूर पडेल ह्याचा भरवसा नाही, असेच व्यापारी आणि उद्योगपती माननून चालतात! व्यवहाराची रकम, मालाच दर-वजन कमीजास्त दाखवून पैसा कसा वाचवायचा ह्याचा विचार करणे हाच त्यांचा नित्यधर्म. हा धर्म आचरताना वाचवलेला पैसा खर्च विनाकागदपत्र अथवा कुठल्याही प्रकारची लिखापढी न करता कसा खर्च केला जातो ह्याचा अहर्निश विचार सुरू ठेवणे त्यांना भागच असते. बिल दिया दर्द लिया अशीच दुकानदाराची आणि ग्रहाकाची भावना असते.
हा वाचवलेला पैसा 500 किंवा 1000 नोटांच्या स्वरूपात साठवण्याखेरीज अन्य पर्याय नाही. रोकडा व्यवहार करायचा नाही असे एखाद्याने कितीही ठरवले तरी तो तसा करता येऊ नये ही वस्तुस्थिती आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा काळा पैसा अस्तित्वात आहे. जमाख्रर्चाच्या वह्यात गफलती करून वाचवलेले कोट्यवधी रुपये नोटांच्या पुडक्यांच्या स्वरूपात तिजोरीत, कपाटात, चोरकप्प्यात ठेऊन दिला जातो. गरजेनुसार तो खर्चही केला जातो. पंतप्रधानांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केल्यामुळे हा पैसा 50 दिवसांच्या आत त्यांना बँकेत जमा करावा लागेल. बँकेत जमा केल्याने पैसा आपोआप पांढरा होऊन जाईल ! नोटा रद्द करण्याच्या मिषाने काळा पैसा बाहेर काढण्याची ही योजना धाडसी आहे ह्यात शंका नाही.
एक मात्र खरे की, ही योजना आखणा-याने फारसे डोके चालवलेले दिसत नाही. काळा पैसा हा लोक फक्त तिजोरीत साठवून ठेवतात असे योजनाकर्त्याने गृहित धरले आहे. ते संपूर्ण खरे नाही. अनेक लोक जमाखर्चाच्या वहीत जमा रकमेच्या खोट्या नोंदी दाखवतात! अनेकदा भांडवल म्हणून मोठी रक्कम दाखवली जाते जी मुळातच नसते. कधी खर्चही फुगवून दाखवले जातात तर कधी मिळकत फुगवून दाखवली जाते. हे सगळे करण्याचा त्यांचा उद्देश काय? त्याचे उत्तर असे की बँकेकडून जास्तीत जास्त कर्ज उपटणे. कर्ज घेण्यासाठी फुगवून दाखवलेले बॅलन्सशीट सादर करणे ही गरज असते. बनावट नोंदींच्या आधाराखेरीज फुगवलेले बॅलन्सशीट तयार करता येणे जवळपास अशक्य! क्लृप्तीबाज बॅलन्सशीटमुळे जास्त पैसा उभा करता आला तरी कुठे तरी गोची होतच असते. वर्षानुवर्षे ही गोचीकायम राहते. हाच तो काळा पैसा!  त्याच्याकडचा पैसा काळा का पांढरा ह्याचा त्याला स्वतःला थांग पत्ता लागत नाही. आयकर अधिका-याला तो कसा लागेल? सरकारने केलेल्या कारवाईमुळे हा वर्ग भरडला जाणार असून त्याचा कायमचा चक्काचूर होऊन जाईल.
मोठे उद्योगपती, व्यापारी मात्र सरकारपेक्षा कितीतरी सावध अाहेत. काळा पैसा फेकून ते बागायती शेती, मळे, सोने, हिरे-माणके, अशा एकेक अजीबोगरीब चीजा घेऊन ठेवतात. हुषार माणसे बोगस कंपन्या काढून त्या कंपन्यांच्या नावे चेक पेमेंट करत राहतात!  हे पेमेंट म्हणजे राजरोस बोगस खर्चाचा प्रकार. बड्या उद्योगसमूहाचा फंडा आणखी वेगळा असतो. ते अटलांटिक किंवा प्रशांत महासागरात विखुरलेली लहान लहान बेटे विकत घेतात. ह्या बेटांवरील सरकारे खिशात ठेवण्याच्या लायकीची असतात! काही मोठ्या बेटांवर रातोरात कंपन्या स्थापन करून मिळतात. आणि त्या कंपन्यांच्या चेकबुकवरून आपलाच काळा पैसा पांढरा करून देशात परत आणतात!
सोने, ड्रग, शस्त्रास्त्रे इत्यादि अनेक प्रकारच्या मालाच्या व्यवहारात चेक वगैरेची भानगड नसते, तेथे इस हाथ में माल, उस हाथ में नोटों का बंडल अशी व्यवहाराची शैली. किंबहुना कुठलीही लिखापढी करण्याची पध्दत नाही. त्या मंडळींच्या व्यवहारावर गदा येण्याची शक्यता आहे. परंतु 50 दिवसांच्या मुदतीचा उपयोग करून नोटा बदलून घेण्याइतकी ही माणसे व्यवहारचतुर आहेत. मात्र, अगदीच बावळट ( ? ) काळा पैसेवाल्यांना नोटा रद्द कारवाईचा फटका बसेल. बँकेत जमा केलेल्या नोटा काळ्या की सफेद ह्याचा निवाडा करायला आयकर खात्याच्या अधिका-यांना किती काळ लागणार हे कोण सांगणार? काळा पैशावाल्यांची काळरात्र सुरू झाली हे मात्र खरे!

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: