Thursday, November 10, 2016

अध्यक्षपदी भन्नाट ट्रंप

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रंप ह्यांच्यासारखी भन्नाट व्यक्ती विजयी झाली. डेमाक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन ह्यांनी दोन लाख लोकप्रिय मते मिळवली तरी अमेरिकन निर्वाचनक्षेत्रातून त्यांना कमी मते पडल्याने त्यांचा पराभव झाला. ट्रंप ह्यांच्या विजयामुळे खुद्द हिलरी क्लिंटननाही बसला नसेल एवढा धक्का जगभरातील राजकीय पंडितांना बसला. अमेरिकन प्रसार माध्यमे स्वतःला अतिशय हुषार समजतात. टेक्नालॉजीत त्यांचा हात कुणी धरणार नाही. परंतु ट्रंप ह्यांच्या विजयाने मिडियाला चकवले! अमेरिकेतील सामान्य मतदारांचे मत मिडियाला ओळखता आले नाही. संगणकावर धडाधड येणा-या आकडेवारीने त्यांना चकमा दिला. बेछूट जागतिकीकरणामुळे अमेरिकेतही अनेक गो-यांच्या जीवनात अस्थिरता आली आहे हे काही त्यांना उमगले नाही. बहुरंगी-बहुढंगीपण मान्य असलेल्या प्रगतीशील विचारसरणीच्या डेमाक्रॅटिक पार्टीच्याही ती ध्यानात आली नाही असे म्हणणे भाग आहे. काही महिन्यांपूर्वी ब्रिटनमध्येही नेमके हेच घडले होते. युरोपीय संघातून बाहेर पडण्याच्या प्रश्नावर घेण्यात आलेल्या सार्वमतात ब्रिटनच्या स्वतःच्या सवत्यासुभ्यावरच ब्रिटिश जनतेने शिक्कामोर्तब केले होते.
हिलरी क्लिंटन ह्यांना स्त्रियांची जास्त पडली खरी; परंतु अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्याइतपत ती उपयोगी पडली नाही. हिलरींपेक्षा ट्रंप ह्यांना लोकप्रिय मते कमी मिळाली तरी त्यांचे त्या वाचून काही अडले नाही. निर्वाचन क्षेत्रनिहाय मते त्यांना रिपब्लिकनांच्या बालेकिल्ल्यात भरभरून मिळाली. दहशतवाद, जागतिक व्यापार, अमेरिकनांना नोक-या, मेक्सिकी स्थलान्तरिताचा प्रश्न इत्यादिसंबंधी ट्रंप हे गेली वर्षभर टोकाची मते मांडत राहिले. शेवटी त्याच मतांनी त्यांना अध्यक्षपद मिळवून दिले. ट्रंप ह्यांच्या विजयाने अमेरिका करीत असलेल्या जागतिक राजकारणात बदल होऊन चीनविरोधी नवी फळी तयार होईल असे एकूण चित्र आहे. ह्या संदर्भात ट्रंप रशियाशी मैत्री करणारे एक पाऊल पुढे टाकतील अशीही अनेकांची अटकळ आहे. पाकिस्तानबद्दलही ट्रंप ह्यांचे मत चांगले नाही. हीच बाब भारताच्या पथ्यावर पडणार आहे.
इस्लामी दहशतवादाचा बंदोबस्त ट्रंप कसा करतात ह्यावर अमेरिकेच्या भावी राजकारणाची दिशा नक्कीच ठरणार.
मुंबई, पुणे आणि दिल्ली येथील व्यापारी तसेच निवासी प्रकल्पात ट्रंप ह्यांचा सहभाग आहे हे लक्षात घेता त्यांच्या काळात भारताबद्दलचे त्यांचे धोरण अनुकूल राहील ह्यात शंका नाही. मुंबईत लोढा बिल्डरने बांधलेल्या सर्वात उंच इमारतीला ट्रंप टॉवरनाव देण्यात आले ते अध्यक्षपदावर त्यांची निवड होण्याच्या खूप आधी! व्हिसा प्रकरणी ट्रंप ह्यांची काहीही मते असली तरी भारताकडून सॉफ्टवेअर सेवा तसेच बिझनेस आऊटसोर्स सेवा घेणा-या कंपन्यांच्या हिताच्या ते फारसे आड येतील असे वाटत नाही. राजकारण्यांकडे जी लवचिकता आवश्यकता असणे अपेक्षित आहे ती लवचिकता ट्रंप ह्यांच्याकडेही असेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. व्हिसाचा कोटा ठरवताना त्यांनी उदार दृष्टिकोन बाऴगावा एवढीच भारतातल्या आयटी क्षेत्राची अपेक्षा आहे. ही तारेवरची कसरत ट्रंप सहज करतील असे म्हणायला हरकत नाही.
अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीबद्दल भारतातात मोठ्या प्रमाणावर औत्सुक्य होते. अर्थात त्याला कारणही आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातली अनेक मुले, लेकीसुना अमेरिकी कंपन्यात नोकरीला आहेत. त्याखेरीज  घाटोकापर-मालाडमधल्या अनेक गुजराती माणसांनी अमेरिकेत छोटीमोठी दुकाने सुरू केली आहेत. त्याखेरीज नाना प्रकारचा माल भारतातून अमेरिकेला निर्यात होत असतो. अमेरिकेतल्या राजकारणात आफ्रिकी अमेरिकनांच्या तुलनेने भारतीयांचा वाटा फारसा नाही हे खरे; परंतु भारतीय माणूस अलीकडे अमेरिकेत राजकीयदृष्ट्या नक्कीच दखलपात्र झाला आहे.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीसाठी जेव्हा पक्षान्तर्गत प्रचाराच्या फेरी झडल्या तेव्हा ट्रंप ह्यांना कोणी मोजत नव्हते. परंतु त्यांना रिपब्लिकन पक्षाने उमेदवारी दिली तेव्हा प्रचारसभातून त्यांनी डेमॉक्रॅट पक्षाच्या धोरणाचे वाभाडे काढताना सनसनाटी विधाने केली त्यांच्या जिभेला हाड नाही असे घरी बसून टीव्ही पाहणा-यांना पडला असेल! परंतु सर्वसामान्य गो-या माणसांच्या मनातली भावनाच ते शब्दबध्द करत होते हे आता लक्षात येत आहे. अमेरिकेच्या राजकारणात बदल घडवून आणणारा गोरा माणूस हा मूक नायक ठरला! प्रचारसभातून भाषण करताना ट्रंप ह्यांनी अनेकदा खालची पातळी गाठली. प्रचारादरम्यान दोन्ही उमेदवारांची दोन्ही उमेदवारांची लफडीकुलंगडी बाहेर आली. हिलरी ह्यांचे अनधिकृत ईमेल प्रकरण काढून त्यांच्याविरूध्द ट्रंप ह्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली होती. परंतु ट्रंप ह्यांच्या विजयाने हे सारे संपुष्टात आले आहे. आता अमेरिकी जनतेचे सगळे लक्ष लागले आहे ते प्रत्यक्षात ट्रंप काय करतात इकडे. मेक्सिकन स्थलान्तरितांची समस्या ते कशी हाताळतात, ‘चलनात गडबड करणारा देशहे विशेषण ते खरोखरच चीनला लावतील का, मेडिकेअरला जास्तीत जास्त सूट-सवलती देणार-या ओबामा प्रशासनाचे हुकूम ते रद्द करून टाकतील का, ओबामा प्रशासनाने अन्य देशांशी केलेले व्यापारी करार रद्द होतील का इत्यादि अनेक प्रश्न काही दिवस तरी अमेरिकेच्या मनात घोळत राहतील. मात्र भाबड्या अमेरिकन माणसांना हे प्रश्न पडणार नाहीत. अमेरिकेच्या अध्यक्षपदावर येण्यास खाखुरा लायक व्यक्ती हीच, असे ट्रंपभक्तांना वाटत राहील!
निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना हिलरींना आपल्या पराभवाची जाणीव होताच त्यांना ट्रंपना फोन करून पराभवाची कबुली दिली. ट्रंप ह्यांनीही क्लिंटननी दिलेल्या केलेल्या लढाईबद्दल त्यांचे कौतुक केले. अर्थात हा सगळा लोकशाही शिष्टाचाराचा भाग आहे. अमेरिकेचे स्वप्न साकार करण्याच्या बाबतीत संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही हिलरींनी ट्रंपना दिले. डेमाक्रॅटिक पक्षाचा पराभव पुसून काढण्यासाठी कंबर कसून काम करण्याची ग्वाही त्यांनी डेमाक्रॅटिक अनुयायांना दिली. परंतु अमेरिकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा त्यांचा ऐतिहासिक मान मात्र त्यांना मिळू शकला नाही! आपला पराभव त्यांनी लीलया स्वीकारला हे महत्त्वाचे. डेमाक्रॅटिक पक्षाची चर्चा काही काळ सुरू राहणार ह्यात शंका नाही. त्याच वेळी आगामी चार वर्षे ट्रंप ह्यांना वेळोवेळी विरोध करण्याचा जोरदार प्रयत्न डेमाक्रॅटिक पार्टी करतच राहणार हे उघड आहे. दरम्यानच्या काळात निडणूक ज्वर संपून अमेरिकेचे राजकीय चित्र लौकरच सौम्य होणार आणि 'बिझनेसलाईक पीपलहे नेहमीचे चित्र दिसू लागेल ह्यात शंका नाही.

रमेश झवर
www.rameshzawar.com

No comments: