Friday, November 8, 2019

महायुतीचे विसर्जन


राज्यात कोणाचे सरकार येईल, मुळात सरकार स्थापन होईल की त्याऐवजी राष्ट्रपती राजवट येईल ह्याबद्दल एक प्रकारचे अनिश्चित वातावरण आहे. सेना-भाजपाची जी महायुती तब्बल पंचवीस वर्षे चालली ती महायुती अखेर एखाद्या भागीदारी फर्मप्रमाणे विसर्जित  झाली! विसर्जन हा शब्द न उच्चारता!! महायुतीतील दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खोटे बोलत असल्याचा आरोप केला; पण तो अगदी विधानसभा भंग होण्याच्या अखेरच्या दिवशी!  विशेष म्हणजे निवडणुकीच्या दि. २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला त्या दिवसापासून ते ८ नोव्हेंबर रोजी म्हणजे विधानसभा भंग होण्याच्या आदल्या दिवसांपर्यंत दोन्ही नेत्यात सरकार स्थापनेसंबंधी ना वाटाघाटी, ना सरकार स्थापनेच्या संदर्भात राज्यपालांची भेट घेण्यात आली! हा निव्वळ डावपेचाच भाग होता. हा १४-१५ दिवसांचा काळ आखाड्यात कसे उतरावे आणि प्रतिपक्षाच्या नेत्याला कसे चीत करावे ह्याचीच तयारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची सुरू होती. आरोपांचा धूरळा उडाला तो मुख्यमंत्री कोणाचा ह्या एकाच मुद्दयावरून! तरीही युती तोडण्याचे पाप आपल्या माथी घेण्यास दोन्ही पक्षांचे नेते तयार नव्हते. आजही तयार नाही. हे सगळे लोकशाहीतील राजकीय संस्कृतीशी विसंगत असले तरी तेच वास्तव आहे. वास्तविक युती तुटल्यात जमा होती. मात्र, सगळा आविर्भाव पोपट मेला नाही असाच होता! पोपटाने मान टाकली आहे. पोपटाने चोच वर केली आहे! वगैरे!
महायुतीचे हे महाभांडण महाराष्ट्राच्या राजकारणात संस्मरणीय राहील. हे भांडण मुख्यमंत्री कोणाला मिळाले ह्यावरूनच आहे. मुख्यमंत्रीपद भाजपालाच मिळावे ही देवेंद्र फ़डणविसांची ठाम भूमिका. तर, ठरल्यानुसार पहिली अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेचेच ह्या भूमिकेवर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे ठाम. युत्याआघाड्यांतील आपापसातले भांडण महाराष्ट्राला नवे नाही. हयापूर्वी झालेल्या युत्याआघाड्या सत्तेच्या राजकारणासाठी झाल्या. अशा प्रकाच्या युत्या सत्तेच्या राजकारणासाठी असतात हेही खरे आहे. सेना-भाजपा महायुतीतही मैत्रीच्या भावनांचा ओलावा कमी, सत्ताव्यवहारातली हिस्सेदारी अधिक. हिस्सेदारीचे स्वरूपही एखाद्या लिमिटेड कंपनीतल्या भागादीरासारखेच. सत्तापदाचे आणि जबाबदारीचे हे गोंडस नाव देण्यात आले असले तरी ताकद लावून खेळण्याचा हा रस्सीखेचचा खेळ. अखिल भारतीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष ह्यांच्यातली ही रस्सीखेच संपत आली आहे. पण अजून ती निकाली ठरलेली नाही. इतक्यात ठरणारही नाही. कारण राज्यपाल ह्या खेळाचे पंच आहेत! जोपर्यंत राज्यपाल निवाडा देत नाही तोपर्यंत ह्या रस्सीखेचच्या खेळाचा निकाल लागू शकत नाही.
ह्या रस्सीखेचवरून मला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची आठवण झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळ सुरू झाली तेव्हा अखिल भारतीय काँग्रेसचे नेतृत्व काहीसे उद्दाम होऊ लागले होते. गुजरातचे नेते काँग्रेस नेतृत्वाच्या कानाशी लागले आणि महाराष्ट्राचा समावेश व्दिभाषिक राज्यात करण्यात आला. त्याची प्रतिक्रिया संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या रूपाने झाली. राज्यातील विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेसच्या नेतृत्वास आव्हान दिले. त्या काळात झालेल्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्राच्या समितीला जागा जास्त मिळाल्या तरी बहुमत मिळू शकले नाही. शेवटी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा नेहरूंनी केल्यानंतरच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संपुष्टात आली. त्यानंतर महाराष्ट्र हे काँग्रेसशासित राज्य झाले हा भाग अलाहिदा.
बदलत्या काळातला पेच नवा आहे असून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीशी किंचितही साम्य नाही. तरीही एक साम्य आहे. आहे. स्वतःला सर्वसर्वा समजणारे केंद्रीय नेतृत्वाची प्रवृत्ती हे एक साम्य आहेच. फरक इतकाच की त्यावेळी काँग्रेसचे नेतृत्व होते. सध्या भाजपाचे नेतृत्व आहे. प्रादेशिक पक्षाला कमी लेखण्याची प्रवृत्ती मात्र सारखीच! न्वाय काळात केंद्रात अखिल भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. मात्र, अखिल भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेसच्या नेतृत्वापेक्षा अधिक उद्दाम वाटते. ते उद्दाम नाही तर कावेबाजही आहे. म्हणूनच पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्ची, ओरिसाचे बिजू पटनाईक, आंध्रप्रदेशाचे चंद्राबाबू नायडू, तामिळनाडूच्या जयललिता आणि त्यांच्या सध्याच्या वारसदार ह्यांनी केंद्राच्या   सत्ताधा-यंचे मनसुबे हाणू पाडले हे राजकीय वास्तव नाकारता येण्यालसारखे नाही. महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण ते शिवसेना ठरवणार की अखिल भारतायी पक्षांचे उद्दाम नेतृत्व ठरवणार हे स्पष्ट होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भले, राष्ट्रवादीच्या मदतीने का होईना, राज्याचा मुख्यमंत्री कोण हे ठरवण्यात शिवसेनेला यश मिळाले तर उध्दव ठाकरे हे ममता बॅनर्जी, बिजू पटनायक ह्या नेत्यांच्या पंक्तीत जाऊन बसतील. उध्दव ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाच्या परीक्षेची घडी जवळ आली आहे.
रमेश झवर


No comments: