सव्वीस फेब्रुवारी
२०१४ रोजी
‘राजकारणावर मनःपूत
भाष्य’ हा माझा ब्लॉग सुरू
झाला. ब्लॉगला कोणते शीर्षक द्यावे हा माझ्यापुढे प्रश्न होता. शेवटी असं ठरवलं की
वृत्तपत्र क्षेत्रातल्या सर्वांगिण अनुभवाची माझी स्वतःची पार्श्वभूमी लक्षात घेता
संकेतस्थळाला वेगळे शीर्षक शोधत बसण्यापेक्षा माझेच नाव, रमेश झवर, देण्याचे मी ठरवले. ह्या ब्लॉगला
अपेक्षेपलीकडे प्रतिसाद मिळाला. तब्बल ३२ देशात वास्तव्य करणा-या मराठी वाचकांनी
माझ्या ब्लॉगवर पसंतीची मोहर उठवली. अमेरिकेतील एकट्या कॅलिफोर्निया राज्यात तर
हिटची संख्या दोन हजारांवर गेली. थोडक्यात, जिथे जिथे मराठी वाचक तिथे तिथे माझ्या
ब्लॉगला हिटस्!
विशेष म्हणजे आधीच्या
गुगल ब्लॉगस्पॉटवरील माझ्या htt//rgzawar.blogspot.in/ ह्या साईटवर प्रकाशित झालेले सर्व लेख
www.rameshzawar.com ह्या
संकेतस्थळावरील अर्काईव्हमध्ये उपलब्ध करण्यात आल्यामुळे आधीच्या सर्व लेखांनाही
नवे हिटस् प्राप्त झाले. त्याशिवाय ‘फोडिले भांडार’ ह्या
सीमा घोरपडे ह्यांच्या सदरालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेस्ट एडिटर विश्वास
रानडे ह्यांच्या ‘अनुभव’ ह्या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या
लेखांनाही उदंड प्रतिसाद मिळाला. कोणत्याही राजकीय पक्षांबद्दल आकस नाही, ना पुढा-यांशी लागेबांधे! कोणाचाही मुलाहिजा
न बाळगता वस्तुनिष्ठ टीका हेच माझे धोरण. त्यामुळे माझे ब्लॉगलेखन कमालीचे यशस्वी
ठरले. हिटस् च्या संख्येने ६२ हजारांचा आकडा केव्हा ओलांडला हे माझ्या लक्षातही
आले नाही. जगभर पसरलेल्या असंख्य मराठी वाचकांच्या गुणग्राहकतेला माझे विनम्र
अभिवादन!वाचकांकडून जोरदार प्रतिसाद मिळू लागल्यानंतर एक वेगळेच संकट उभे राहिले. संकेतस्थळाला पाच वर्षे पुरी होण्याच्या सुमारास ह्या काळात अनेक विचित्र अनुभव आले. rameshzawar.com/ wordpress हे माझे पूर्णपणे हॅक झाले. ते पुन्हा कसेबसे पुन्हा सुरू केल्यानंतर ते पुन्हा दुस-यांदा हॅक झाले. दरम्यानच्या काळात गो डॅडीकडून विकत घेतलेल्या डोमेन नेमची मुदत संपली. डोमेन नेमचे नूतनीकरण करण्याचा गो डॅडीने लकडा लावला. सेवेत कुठल्याही प्रकारची वाढ न करता त्यांनी डोमेन नेमच्या दरात वाढ केली. माझे संकेतस्थळ प्रशासक सुहास झवर त्या काळात अखाती देशात होते. मुंबईला परत आले तेव्हा त्यांनी लक्ष घालून गोडॅडीच्या डोमेन नेमचे नूतनीकरण करण्यापेक्षा अन्य इंडरनेट सेवा पुरवठादार कंपनीकडून डोमेन नेम घेण्याचा सल्ला दिला. त्याची पूर्वतयारी म्हणून माझी साईट मी तूर्त वर्ड प्रेसवर स्थलान्तरित केली. रीतसर डोमेन नेमही मिळवणार आहे.
हया हॅकिंगच्या संकटावर मात केल्यानंतर पुन्हा एकदा नवा मार्ग शोधण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला आहे. ह्या कामी माझे सहकारी मला मदत करण्यास पूर्वीप्रमाणेच तत्पर आहेत. हे संकेतस्थळ सुरू करण्याची प्रेरणा मला माझे सहकारी प्रवीण बर्दापूरकर ह्यांच्यापासून मिळाली हे मी मागेही कृतज्ञतापूर्वक नमूद केले होते. आताही ते माझे प्रेरणास्थान आहेतच.
संकेतस्थस्थळाचे व्यवस्थापन करताना मला आणि माझ्या सहका-यांना कष्ट उपसावे लागले. माझे सहकारी पेजएडिटर सीमा घोरपडे, गेस्ट एडिटर विश्वास रानडे, सल्लागार मंडळाच्या अध्यक्षा ज्योती झवर आणि अन्य सभासद डॉ. विवेक कर्वे, संजय मुंदडा, सॉफ्टवेअर इंजिनियर्स सुहास झवर, निलेश लढ्ढा, निर्मल लढ्ढा आणि इतर अनेकांनी मला मदत केली. आगामी काळातही वाटेल ती मदत करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. त्यांच्या ह्या आश्वासनाने मी सुखावलो. माझ्या सहकारी आणि हितचिंतक ह्या सा-याबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्यावाचून राहवत नाही. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील शॅरलॅट येथे वास्तव्य करणा-या व्यावसायिक वेब डिझायनर मोहना जोगळेकर ह्यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. त्यांनी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यासाठी कोणतीही फी त्यांनी आकारली नाही.
माझ्या पत्रकारितेची सुरूवात १९६८ साली ‘मराठा’ दैनिकात झाली. त्या काळात हाताने खिळे जुळवून कॉपी कंपोज करण्याचं काम कंपोजझिटर मंडळी करीत असत. नाही म्हणायला ‘मराठा’कडे एक लायनो मशीनही आलं होतं. त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या काळात पत्रकारितेत खूप बदल झाले. अक्षर जुळणीपासून ते ‘पेंटिंयम 4′ संगणकावर, नंतर ट्रिलियन जीबीच्या हार्ड डिस्कच्या संगणकावर अक्षर जुळणी सुरू झाली. आता तर थेट वर्तमानपत्राच्या नेटवर्कवर पत्रकार मंडळी बातम्या, लेख, वार्तापत्रे लिहतात. मी स्वतः हा तांत्रिक बदल आनंदाने स्वीकारला.
छपाईच्या तंत्रात बदल झाले तसे वृत्त-प्रेषण आणि छायाचित्र-प्रेषण ही थेट वर्तमानपत्राच्या नेटवर्कमध्ये जाऊन पडू लागले. संपादकीय संस्कार करून हा ताजा मजकूर लगेच चालू आवृत्तीत समावेश करण्याची सुविधा उपलब्ध झाली.
संगणक तंत्रज्ञान आणि टेलिकॉम तंत्रज्ञान ह्यांचा अपूर्व मेळ झाल्यामुळे ताज्या बातम्या वाचकांना इंटरनेटवर सादर करण्याची सोय झाली. तरीही छापील वर्तमानपत्रांची घरपोच ’डिलिव्हरीची सवय जडलेल्या वाचकांचे समाधान समाधान होण्यासारखे नव्हतेच. अजूनही वाचकवर्ग अंकासाठी पूर्णपणे ट्रक-टेंपोसारख्या वाहनांवर अवंलबून होता. ह्या डिलिव्हरी यंत्रणेला गेल्या तीन महिन्यात कोरोना संकटामुळे सुरूंग लागला. पाहाता पाहता डिलिव्हरी व्यवस्था कोलमडली. त्यावरही इंटरनेटच्या मदतीने मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुमच्या डेस्कटॉपवर आणि मोबाईलवर वर्तमानपत्रांच्या ई आवृत्त्या उपलब्ध करून देण्यात आल्या. ई आवृत्तीची वर्गणी भरण्याचे आवाहन काही बड्या वर्तमानपत्रांनी केले आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळाला हे अजून स्पष्ट झाले नाही.
वर्तमानपत्रांवरचे हे संकट आतापर्यंत आलेल्या संकटांपेक्षा खूपच वेगळे आहे. गहिरे आहे, मुख्य म्हणजे वर्तमानपत्रांचे उत्पन्न थांबले. अनेक वर्तमानपत्रांना छापलेल्या जाहिरातींचे पेमेंटही मिळाले नाही. वर्तमानपत्रांचा कॅशफ्लो आटला. ही परिस्थिती अभूतपूर्व आहे. ह्या संकटातून मार्ग काढण्यासाठी देशभरातल्या बड्या वृत्तपत्र कंपन्या चाचपडत आहेत. अजूनही मार्ग दृष्टिपथात नाही.
जे प्रिंटप्रेस मिडियाबद्दल तेच रेडियो-दूरचित्रवाहिन्यांबद्दल! बातम्या घडत असताना वा लगेच त्या सॅटेलाईटवरून त्या माध्यमांच्या कार्यालयांकडे जरी पाठवण्यात आल्या तरी त्या बातम्या चालू बुलेटिनमध्ये समाविष्ट करण्याची समस्या आहेच. बहुतेक चॅनेल्समध्ये कुशल तंत्रज्ञांची वानवा जाणवू लागली आहे, काही चॅनेलना तर कार्यक्रमनिर्मिती थांबवावी लागली. ‘माध्यम क्रांती’तील चढउताराचा मी साक्षीदार आहे. मी खूश होतो. परंतु सध्या चिंतितही आहे. एकीकडे माध्यम क्रांतीत मला सहभागी होता आले ह्याचा आनंद झाला तर दुसरीकडे कोरोनामुळे माध्यमांवर कोसळलेल्या संकट निवारणार्थ आपण काहीच करू शकत नाही ह्याची खंत आहे. मात्र, माध्यम क्रांतीनंतर आलेल्या ह्या नव्याच संकटामुळे मला चिंता वाटू लागली आहे. दिवसेंदिवस ती चिंता गहिरी होत आहे!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment