Thursday, July 9, 2020

कोरोना घेतोय् सत्वपरीक्षा !


कोरोना विषाणू हवेतून पसरतो का? हा विषाणू हवेतूनही पसरतो, असे मत ३२ देशातील ३६ संशोधक डॉक्टरांच्या एका गटाने जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना लिहलेल्या पत्रात व्यक्त केले आहे. कोरोना विषाणू केवळ शिंकेतून हवेत उडालेल्या पाण्याच्या लहानशा तुषारातूनच ४-५ फूटांपर्यंत पसरतो ह्या आपल्या मतावर जागतिक आरोग्य संघटना ठाम आहे. चीनविरूध्द कारवाई करण्यास जागतिक आरोग्य संघटना धजावत नाही असा आरोप करून अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या सभासदत्वाचा राजिनामा ह्याच दोनतीन दिवसात दिला! सभासदत्वाच्या  वर्गणीचा वाचलेला पैसा चांगल्या आरोग्य प्रकल्पांवर खर्च करण्याचेही अमेरिकेने जाहीर केले! दि. ८ जुलै रोजी कोरोनाग्रस्तांची आणि कोरोना मृतांची संख्या कमी झालेली नाही. कोरोना रूग्णसंख्या १ कोटी १६ लक्ष ६९ हजार २५९ झाली तर मृतांची संख्या ५३०९०६ झाली हा आकडा जागतिक आरोग्य संघटनेनेच जाहीर केला. भारतात मृतांची संख्या सांगताना आता १० लाखात अमुक इतकी माणसे मृत झाल्याचे आरोग्य संघटनेने सांगायला सुरूवात केली आहे!
कोरोना विषाणूमुळे बाधित तसेच मृत झालेल्यांच्या संख्येमुळे जगभरातले डॉक्टर्स, साथीच्या रोगांचे तज्ज्ञ आणि भारतातले तज्ज्ञ ह्यांच्या मनात गोंधळ उडालेला नसेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु वरून आलेल्या आदेशांची आणि घालून दिलेल्या उपचार पध्दतीनुसार प्रत्यक्ष काम करणारे देशभरातले डॉक्टर्स, नर्सेस आणि अन्य सहायक कर्मचारी ह्यांच्या मनात गोंधळ उडू नये अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्ष कामाच्या बोजामुळे ह्या सगळ्या मंडळींना वर्तमानपत्रे वाचायला वेळ मिळत नसेल म्हणा! हे एका अर्थाने उपकारकच म्हटले पाहिजे.
आपण लिहलेल्या पत्रावर विचार करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी पत्रलोखक तज्ज्ञांनी केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पत्रलेखक म्हणताता त्याप्रमाणे बैठक बोलवावी की नाही जागतिक आरोग्य संघटनेच्या धुरिणांचा प्रश्न आहे. भारताच्या शीर्षस्थ आरोग्य संशोधन संस्थेने तज्ज्ञ डॉक्टरांची स्वतःपुरती बैठक बोलवायला हरकत नाही. ह्या बैठकीत प्रत्यक्ष उपचारात गुंतलेल्या निवडक तज्ज्ञांचा समावेश केल्या त्यांना प्रत्यक्षात येणा-या अडचणींची माहिती होऊ शकेल. अमेरिकेत सुरक्षित अंतरांचे पालन करूनही कॅफे, रिझॉर्ट वगैरे खुली झाल्यानंतर तेथेही रूग्णसंख्या वाढल्याचे वृत्त आहे. भारतात अन्लॉक-१ मध्ये लोकांनी सुरक्षित अंतर वगैरे नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे दिसले. काढे, गरम पाणी, आणि स्वतःच्या प्रतिकारशक्तीवर पूर्ण भरवसा मोठ्या शहरातील अनेक लोकांना आहे, त्यामुळे नियमांचे उल्लंघन केले तर फारसे काही बिघडणार नाही, असेही लोकांना वाटत असले पाहिजे. म्हणूनही अनेक ठिकाणी कोरोनाची लागण वाढली. शेवटी स्थानिक प्रशासनावर त्या त्या शहरात टाळेबंदी घोषित करण्याची वेळ आली. रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी झटपट चाचण्याही अनेक शहरात सुरू झाल्या.
मुंबई शहरात धारावी कोरोनामुक्त करण्यात सरकारला आणि पालिका प्रशासनाला यश आले हे खरे, पण ठाणे, डोंबिवली, कल्याण, जळगाव वगैरे शहरातली परिस्थिती बिघडत चालली आहे हेही तितकेच खरे आहे. हवेतून विषाणू पसरतो ह्या मतावर लोकांचा विश्वास बसण्याय ही परिस्थिती अनुकूल आहे. हा चिंतेचा नवा विषय होऊन बसण्याची धोका मान्य करायला हवा..
कोरोनाचे ढळढळीत सत्य दिसत आहे हे नाकारून कसं चालेल? अजून आपली सत्वपरीक्षा संपलेली नाही असाच ह्याचा अर्थ आहे! कोरोना आला म्हणून घाबरू नका, असे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. परंतु कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनेचा धडाका पाहता कोरोनाचे संकट वाटले तितके सोपे नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. कोरोना संकटातून मुक्त होण्यासाठी दिलखुलास चर्चा झडत राहिल्या पाहिजे. सद्यस्थितीत कोरोनापासून बचाव कार्याचा वेळोवेळी आढावा घेत राहणे हाच एकमेव प्रशस्त मार्ग आहे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: