मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांच्यासमवेत माझे छायाचित्र. डावीकडे वृत्त छायाचित्रकार चंदेरशेखर कुळकर्णी स्थळः मातोश्री |
सेनाभाजपाच्या
सत्ताकाळात सरकारचा ‘रिमोट कंट्रोल’ अशी बाळासाहेब ठाकरेंवर सतत टीका होत
होती. पण बाळासाहेबाचा ‘रिमोट कंट्रोल’ कसा ऑपरेट होत होता हे भल्या भल्या
पत्रकारांना शोधून काढता आले नाही. ह्या सत्ताकाळात उध्दव ठाकरे ह्यांच्यामार्फत
हा रिमोट कंट्रोल ऑपरेट होत होता हे गूढगम्य रहस्य केवळ बाळासाहेबांना माहित की
उध्दव ठाकरेंना माहित! सरकार आणि पक्ष ह्यांच्यात निर्माण होणारे तिढे
सोडवण्याच्या कामी बाळासाहेब ठाकरेंना मदत करत असताना मुंबई आणि ठाणे महापालिकेत
शिवसेनेच्या कारभारावर वचक ठेवण्याचे जिकीरीचे कामही उध्दव ठाकरेंवर सोपवण्यात आले
होते. मुंबई महापालिकेचा कारभार केरळ आणि आसाम ह्या राज्यांच्या कारभाराइतका मोठा
असून दोन्ही राज्यांच्या अर्थसंकल्पाइतकाच मुंबईचा अर्थसंकल्प मोठा आहे हे
अनेकांना माहित नाही. ही कामे चोखपणे बजावत असताना राज्यात शिवसेनेचा विस्तार करण्याची
जबाबदारी व्यवसायाने करीअर फोटोग्राफर असलेले उध्दव ठाकरे सांभाळत होते.
दुर्दैवाने उध्दव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र एवढीच त्यांची राज्याला ओळख!
सत्तेच्या राजकारणात ओव्हरसिंपलीफिकेशनलाच अवाजवी महत्त्व आले. त्यामुळे ठाकरे
कुटुंबियांची ही पार्श्वभूमी नव्या पिढीच्या लक्षातही आली नाही.
२०१९
निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा आणि शिवसेना ह्या दोघांना समसमान काळ मुख्यमंत्रीपद
देण्याचे आश्वासन अमित शहांनी दिले होते. पण भाजपाच्या पारड्यात बहुमत पडताच
भाजपाची बुध्दी फिरली आणि अमित शहांनी शब्द फिरवला. अर्थात त्याधीच्या सत्ता
काळातही भाजपा कार्यकर्ते उध्दव ठाकरे ह्यांचा पाणउतारा करण्यात गुंतलेले होते. २०१४ ते २०१९ ह्या सत्ताकाळातही मग्रूर संस्कृतीत मुरलेल्या भाजपा नेत्यांनी
शिवसेनेला दुय्यम वागणूक दिली होती. भाजपाचा मागचा सारा हिशेब चुकता करण्यात शरद
पवारांच्या मदतीने उध्दव ठाकरे यशस्वी झाले. त्यावेळी ‘इस पार की उस पार’ हे धाडस उध्दव ठाकरेंनी दाखवले. अर्थात
बाळासाहेबांचे पवारांशी स्नेहसंबंध होते. तेच स्नेहसंबंध दुस-या पिढीतही वृध्दिंगत
झाले. त्या स्नेहसंबंधांबरोबर शरद पवारांवर विश्वास ठेवणेही ओघाने आलेच! अजून तरी
राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्यांच्या संबंधांना तडा गेलेला नाही.
उध्दव
ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी त्यांच्या ऋजू स्वभावात फरक पडला नाही. अनेक
वेळा उध्दव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवर बोलले. फोनवर बोलताना उगाच
उर्मटपणाही त्यांनी केला नाही. ह्याचा अर्थ मोदींशी त्यांचे मतभेद नाहीत असा नाही.
राज्यात लॉकडाऊन जारी करताना किंवा आर्थिक विकासाचे दरवाजे खुले करताना खुल्या
मनाने शिथीलीकरणाचा स्वीकार करताना उध्दव ठाकरे मनमोकळेपणाने वागले. कठोर निर्णय
घेण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या कणखर मनोवृत्तीचेही दर्शन घडले. मुख्य सचिवांना
बदलण्याचा निर्णय काय किंवा वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्या काय, दोन्ही वेळी त्यांनी घेतलेली भूमिका
समतोलपणाची होती. विरोधी नेते देवेंद्र फडणीस ह्यांच्या टीकेला ठाकरेंनी लीलया
तोंड दिले, मात्र तोंड सोडून कधीच उत्तर दिले
नाही.
कोरोनासंकटाची
स्थिती हाताळणा-या यंत्रणेचे नेतृत्व त्यांनी डॉ. ओक ह्यांच्यासारख्या समर्थ
हातांत सोपवले आणि स्वतः आपत्तीनिवारण प्राधिकरणाचे अध्यक्षपद स्वतःकडे घेतले तरी
हडेलहप्पी केली नाही. पुणे,
मुंबई, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली ह्यासारख्या मोठ्या
शहरात रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. म्हणून ३१ जुलैपासून सरसकट
टाळेबंदी रद्द करण्याची भूमिका त्यांना मान्य नाही. ह्याचा अर्थ अर्थव्यवस्थेचे
रूतलेले चक्र पुन्हा सुरळित फिरवण्याची फिकीर त्यांना नाही असा नाही. ती फिकीर
त्यांना आहेच. कोरोना संकटाचा निःपात आणि रुतलेले अर्थचक्र पुन्हा फिरवणे ह्या
दोन्हीत जास्तीत जास्त समतोल साधण्याची मध्यमार्ग ते निवडतील असे चित्र आहे.
शक्यतो सर्वेषामविरोधेन निर्णय घेण्याचा त्यांचा प्रयत्न राज्याचे पहिले
मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हयांची आठवण करून देणारा आहे. महाविकास आघाडीचे सरकार
शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ह्या तीन
भिन्न प्रकृती आणि भिन्न संस्कृतीच्या राजकीय पक्षांचे सरकार आहे ह्याचे भान
त्यंनी सुटू दिले नाही. महाविकास आघाडीचे सरकार चालवणे मुळातच अवघड. ही अवघड
कामगिरी बजावताना अजून तरी उध्दवजींनी त्यांचा संयम सुटू दिलेला नाही. ही अवघडी
कामगिरी पेलण्याची ताकद त्यांना मिळेल अशी आशा राज्याची जनता बाळगून आहे. त्यांना
उदंड यश लाभो हीच त्यांच्या वाढदिवशी शुभेच्छा!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment