Saturday, October 17, 2020

हॉस्पिटलांचा बाजार

निम्म्या पगारात तर निम्म्या पगारात! नोकरी मिळतेय् ना घ्या, अशी आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टर्स  योगतज्ज्ञ वगैरेंची अवस्था आहे. आयुष मंत्रालयामुळे त्यांच्यावर ही पाळी आली. गोमूत्रप्राशनाने अनेक व्याधी दूर होतात किंवा होमिओपॅथीच्या आम्ही सांगतो त्या गोळ्या घेतल्या की कोरोनाला दूर ठेवता येते असा प्रचार करणा-यांवर ही पाळी केव्हा न केव्हा येणारच होती. ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत होमियोपॅथी आणि आयुर्वेद पदवीधऱांनी गेल्या १५ वर्षांत मजल मारली होतीच. अलीकडे मोठ्या शहरातील खासगी हॉस्पिटलांच्या बाजारातही त्यांना मागणी वाढली आहे. त्यांच्या मागणीचा आणि त्यांच्या ज्ञानाशी काडीचाही संबंध नाही. ही संधी त्यांना मिळण्याचे एकमेव कारण म्हणजे ४० हजारांच्या खाली एमबीबीएस डॉक्टर नोकरी करायला तयार नाहीत. ह्याउलट १८-२० हजार म्हणजे निम्मा पगार स्वीकारायला हे नवडॉक्टर्स तयार आहेत. म्हणून त्यांना नोकरी द्यायला कॉर्पोरेट हॉस्पिटल्स तयार झाले आहेत. केसपेपर्स तयार करण्यासारखी सटरफटर कामे करण्याची त्यांची जबाबदारी आहे. पण ती फक्त कागदोपत्री! प्रत्यक्षात आयुर्वेद आणि होमिओपॅथी डॉक्टरांना वेळप्रसंगी ईमरजन्सीवॉर्डमध्ये रात्रपाळीही करावी लागते. रूग्णांना दाखल करून घेऊन सलाईन लावणे, एखादे इंजेक्शन देणे वगैरे प्राथमिक उपचार ते सुरू करतात. अर्थात सिनियर डॉक्टरांकडून फोनवर मिळालेल्या सुचनेनुसारच ते ही कामे करतात! ही सारी कामे पूर्वी नर्सेस करत असत! आता ती कामे नवडॉक्टरांकडे आली आहेत. ह्या डॉक्टरांचे नेमके क्वालिफिकेशन्स रूग्णांना माहित असण्याचे कारण नाही.

मुंबई, पुणे, बंगळूर, भोपाळ, इंदूर ह्यासारख्या शहरात गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेले हॉस्पिटल्स ह्या डॉक्टरांना नोकरी देण्यास पसंती देतात. क्लिनिकल ड्युटीजसारखी कामे त्यांच्याकडे सोपवण्यात येतील ह्या अटीवर खासगी हॉस्पिटल्स त्यांना नोक-या देतात. ही जबाबदारी कागदोपत्री असली तरी प्रत्यक्षात रात्रपाळीत ईमरजन्सी वा कॅजल्टी वॉर्ड सांभाळण्याची कामेही त्यांच्यावर सोपवली जातात. रूग्णांकडून ३-४ लाखांपासून १०-१२ लाखांपर्यंत रुपये खासगी हॉस्पिटल्स उकळतात. कोरोना रूग्णांकडून उकळण्यात आलेली रक्कम तर २०-३० लाखांच्या घरात गेल्याची उदाहरणे आहेत! कॅशलेस मेडिक्लेमचे पेशंट आले तर खासगी हॉस्पिटल्सच्या चालकांना अत्यानंद होतो!  अनेक डॉक्टरांना ह़ॉस्पिटल चालकांनी ८-१० बेडचा कोटा दिला असून तो कोटा कसाबसा पुरा करण्याचे काम तज्ज्ञ डॉक्टरांना करावी लागते! अर्थात ह्या गोपनीय अटीचे पालन करावेच लागते हे तज्ज्ञ डॉक्टर्स खासगीत मान्य करतात. बरे रूग्णाकडून उपचाराचा भरमसाठ आकार लावला जातो. प्रत्यक्षात डॉक्टरांच्या हातात बिलाप्रमाणे पुरी रक्कम मिळत नाहीच.

बहुतेक हॉस्पिटलातली बिलिंग यंत्रणा डॉक्टरांऐवजी म्रॅनेजरच्या सल्ल्याप्रमाणे काम करते. त्याबद्दल खळखळ करण्यात अर्थ नाही हे एव्हाना डॉक्टर्स आणि रूग्ण ह्या दोघांनाही उमगले आहे. पण आता परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेली आहे. आणखी एक गैरप्रकार खासगी हॉस्पिटलात सर्रास सुरू आहे. कमकुवत घटकातल्या रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्याता नियम आहे. घाईघाईत पेशंटच्या नातेवाईकाची इकॉवनॉमी वॉर्डसाठी असलेल्या फॉर्मवरही सही घेतली जाते. त्या जोरावर इकॉनॉमी वार्डमध्ये पेशंटना सामावून घेण्याचा नियम तंतोतंत पाळला जातो!

सरकारी हॉस्पिटले आणि काही बड्या ट्रस्टच्या हॉस्पिटलांविरूध्द बदनामीची मोहिम खूप वर्षे राबवली जात होती. म्हणून कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये हॉस्पिटले सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली होती. अनेक प्रकारचे इंप्लांट, स्टेंट वगैरे खरेदीही सुरू असते. विक्रीकरातून सूट मिळवण्यासाठी वेगवेगळया प्रकारचा फंडा अवलंबला जातो. अनेक हॉस्पिटल्स मुंबई स्टॉक एक्स्चेंजवर सूचिबध्द आहेत. परिणामी त्यांना भागभांडवलाचा दर घसरणे परवडणारे नाही.

खासगी हॉस्पिटल सुरू करणा-या कंपन्यांवर नॅशनल अक्रिडिएशन बोर्ड फॉर हेल्थकेअर- नाभा’ – कडून मान्यता  घेण्याचे बंधन आहे. त्यांना मान्यता देताना आयुष मंत्रालयाकडून मान्यताप्राप्त संस्थांतून डॉक्टर्स घेण्याचीही विनंती केली जाते. क्लिनिकल काम देण्याची अट घालून त्यांना नोक-या देण्यास खासगी हॉस्पिटल्स तयार होतात. हा सगळा प्रकार थक्क करणारा आहे! पुष्कळ गाजावाजा करून २००३ साली नोव्हेबर महिन्यात आयुष मंत्रालय स्थापन झाले. भारताच्या प्राचीन परंपरेचा अभिमान बाळगण्याच्या भावनेतून त्या वेळी विरोधी पक्षाची मागणी होती. ती पंतप्रधान मनमोहनसिंगाच्या काळात मान्य झाली. २००४ साली तेव्हाचा विरोधी पक्ष सत्तेवर आला. मग काय विचारता! आयुष मंत्रालयातील मंडळींत उत्साह सळसळू लागला. पूर्वी आरोग्य मंत्रालयाचा एक भाग असलेला एक विभाग आज स्वतंत्र मंत्रालय झाल्याने भारतीय संस्कृतीच्या अभिमानी अतिउत्साही मंडळींना आवर कसा घालायचा हा प्रश्न आहे. ह्या परिस्थितीचा खासगी हॉस्पिटल कंपन्यांनी फायदा उचलला नसता तरच नवल ठरले असते. ह्यावरून एकच दिसून आले, हॉस्पिटलचा बाजार प्रभावशाली आहे.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: