Thursday, October 1, 2020

बाबरी खटल्याचा इत्यर्थ

६  डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या बाबरी मशीद उध्दवस्त करण्याचा गुन्हा घडला होता. ह्या गुन्ह्याचा तपासानुसार भरण्यात आलेल्या खटल्याचा निकाल २८ वर्षांनी लागला. ह्या खटल्यातीला सा-याच्या सा-या ३२ आरोपींना दोषमुक्त करण्यात आले!  बाबरी मशीद ही सोळाव्या शतकातली वास्तू. ही ऐतिहासिक वास्तू उध्दवस्त करण्यात आली हीदेखील घटना खरे तर, तितकीच ऐतिहासिकविशेष म्हणजे ज्या कटाच्या आरोपावर ह्या खटल्यात भर देण्यात आला होता तो आरोप सिध्द करण्यासाठी आवश्यक असलेला बळकट पुरावा सीबीआय कोर्टात सादर करू शकली नाही. म्हणून न्यायाधीश यादव ह्यांनी सर्व आरोपींना दोषमुक्त केले. तपासात अपयश ही सीबीआयची नाचक्की काही पहिल्यांदाच झाली असे नाही. ह्यापूर्वी अनेक खटल्यात सीबीआयची नाचक्की झाली आहे. सीबीआय हे पंतप्रधानांच्या हातातले बाहुले असल्याचा आरोप भाजपासह देशातले तमाम काँग्रेसविरोधक करत आले आहेत. भाजपाचा पंतप्रधान सत्तेवर आल्यानंतर सीबीआय बहुधा सत्तेचे बाहुले राहिले नसावे! आधीच्या सरकारने भरलेला खटला मागे घेणे सीबीआयला आणि राज्यकर्त्यांना केवळ अशक्य असल्याने तो खटला चालू राहिला इतकेच!

छायाचित्रे आणि व्हिडिओ हे साक्षीपुराव्याच्या कायद्यानुसार महत्त्वाचा पुरावा असू शकत नाही; किंवा असलाच तर तो दुय्यम दर्जाचा पुरावा आहे. कोरोबरोटिंग पुरावा ह्यापलीकडे त्याला न्यायालये महत्त्व देत नाहीत हे सामान्य वकिलासही माहित आहे. सीबीआयच्या उच्चपदस्थ अधिका-यांना हे माहित नसेल तर त्यांना त्यांच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही तसेच वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांचा आधार सीबीआयने घेतला. परंतु प्रत्यक्षात वृत्तपत्रांची कात्रणे कोर्टाला सादर करण्याची तसदी सीबीआय तपास अधिका-यांनी घेतील नाही. बाबरी मशीद पाडणारे हजारो कारसेवक मशिदीच्या घुमटावर चढलेले दूरदर्शनवरून देशभरातल्या अनेका लोकांनी पाहिले.

बांधकाम जुने असले तरी हाताशी अवजार किंवा स्फोटक दारू गोळा असल्याखेरीज ते कोणालाही सहजासहजी पाडता येण्यासारखे नाही हे लहान मुलासही माहित आहे. ह्याचा अर्थ बाबरी मशीद पाडण्याचे निवडक कारसेवकांनी आधीच ठरवले असावे. त्यांना अवजारे अथवा स्फोटके पुरवण्यात आली असली पाहिजे हे उघड होते. अवजारा-स्फोटकांविना त्यांना मशीद पाडणे शक्य नव्हते. कटाचाच आरोप सीबीआयला ठेवायचा होता तर मशीद प्रत्यक्ष मशीद पाडणा-या कारसेवकांची धरपकड करून त्यांच्याकडून सत्य वदवून घेण्याचे काम सीबीआयने का केले नाही? तसा थातूरमातूर का होईना प्रयत्न सीबीआयने केला असता तर सीबीआयला कटाचे धागेदोरे मिळआले असते. ह्याउलट निरनिराळ्या पुढा-यांची वक्तव्ये मात्र सीबीआयने पुरावा म्हणून सादर केली. किंबहुना हा खटला आपण हरायचाच असा निर्धार तर सीबीआयने केला नसेल? केवळ तत्कालीन सरकारचा आदेशानुसार सीबीआयने यांत्रिक पद्दतीने ३२ जणांवर खटला भरला.

बरे, ह्या ख़ल्यातील अनेक तपास अधिकारी निवृत्त झालेले असू शकतात किंवा काहींचे निधन झालेलेही असू शकते. कोणत्याही पोलिस तपासात सातत्य आसावे लागते. ते सातत्य हा खटला भरण्यापूर्वीच्या काळात मुळीच ठेवण्यात आलेले नाही. हा खटला आपण का हरलो ह्याची सविस्तर कारणमीमांसा सीबीआय प्रमुखाने स्वतः करणे अपेक्षित आहे. तशी ती त्यांनी अजून तरी केलेली नाही. तुरळक मीमांसा केलीच असेल तर ती प्रामाणिक आहे असे म्हणता येईल काह्या खटल्यात सीबीआयने उच्च न्यायालयात धाव घेतली नाही तर आरोपी आणि सीबीआय कोर्ट ह्यांच्यापुरता हा खटला संपल्यात जमा आहे. परंतु सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीने सीबीआयचे तपास अधिकारी आरोपांचा घे-यात कायम राहतील! निवृत्त झाल्यानंतर अनेक अधिका-यांना कंठ फुटतो. तसा त्या ह्या ख़ल्यातील अधिका-यांनाही फुटण्याचा संभव आहे. कदाचित जाहीर वक्तव्य करण्यापेक्षा आठवणीवजा पुस्तके लिहण्याचा मार्गही त्यांच्याकडून अवलंबला जाण्याचा संभव आहे. निर्दोष सुटलेले ३२ आरोपीही क्वचित सत्यकथन करू शकतील परंतु ती शक्यता फारच धूसर आहे. किंवा त्यांनी सत्यकथन केलेच तरी त्याला सांगोवांगीच्या गोष्टी ह्यापलीकडे किंमत देता येणार नाही.

बाबरी मशीद उध्वस्त झाली आणि ह्या प्रकरणी भरण्यात आलेल्या खटल्यातील सारे आरोपी दोषमुक्त झाले एवढेच निखळ सत्य भावी इतिहासांत शिल्लक राहील. बाकी शिल्लक राहतील त्या थापा, गप्पा आणि कल्पक अफवा! त्यावर कथाकादंब-याचे लिहण्यासाठी भरपूर मसालाबाबरी मशीद खरोखरच पाडली गेली. कोणी पाडली हे माहित नाही. का पाडली गेली ह्याचे कारण मात्र त्यांच्याकडे तयार आहे. धार्मिक आणि राजकीय चळवळीच्या नेत्यांच्या मनात आले आणि त्यांनी जोर लावला म्हणून मशीद पाडण्यात आली एवढेच सत्य ऐतिहासिक सत्य मिरवत राहील. ते जाणू घेण्यात नव्या पिढीला कितपत स्वारस्य राहील हेही सांगता येणार नाही. फक्त संबंधितांच्या कुटुंबाखेरीज कोणाला त्यात स्वारस्य राहील की नाही ह्याबद्दल शंका आहे. संसारसाक्षी रामाला तर त्याच्याशी घेणेदेणे नाही. बाबरी खटल्याचा हाच इत्यर्थ आहे.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार


No comments: