दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ह्यांनी गेल्या वर्षभरात त्यांचे सरकार पाडण्यासाठी भाजपाने लढवलेल्या त-हे त-हेच्या क्लृप्त्चांचा यथास्थित समाचार घेतला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत ह्यांनी मोदी सरकारची भलामण करत चीनपेक्षा देशाची ताकद वाढवण्याचा अप्रत्यक्ष सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना दिला. शिवसेना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्या दोन्ही संघटनांच्या दसरा मेळावा भरवण्याच्या प्रथेचे यथायोग्य पालन केले. अर्थात ते करताना दोन्ही संघटनांनी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन केले. मेळाव्याच्या स्वरूपात बदल करून दोन्ही संघटनांनी त्यांच्या उत्साहाला आवर घातला. मोहन भागवत आणि उध्दव ठाकरे ह्या दोघांचीही भाषणे त्यांच्या नेहमीच्या कोटिक्रमाला साजेशी होती. अभाव फक्त इतमामाचा होता. शिवसेनेच्या मेळाव्यात ‘जय शिवाजी जय भवानी’च्या घोषणा देत शिवाजी पार्क मैदानावर जमण्याचा प्रघात पाळला गेला नाही तर संघाने स्वयंसेवकांच्या शिस्तबध्द कवायतीला फाटा दिला.
देवळे उघडण्याची मागणी भाजपा नेत्यांनी केली होती. त्या संदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्राचा शेलक्या शैलीत समाचार घेतला. विशेषतः हिंदुत्वासंबंधी भागवतांचे विचार उध्दव ठाकरेंनी उध्दृत करून राज्यपालांना घरचा अहेर केला. विरोधी राज्यांची सरकारे पाडण्यासाठी केंद्रातील नेत्याकडून सुरू असलेल्या कारवायामुंळे देशात अराजकाचा धोका संभवतो हे स्वतःचे राजकीय परिस्थितीचे आकलन ठाकरे ह्यांनी तडाखेबंद पध्दतीने मांडले. महाराष्ट्रात शिवसेनेच्या तर हरयाणात विष्णोईच्या आणि आता बिहारमध्ये नितिशकुमारांच्या पाठीत वार करण्याच्या भाजपाच्या राजकारणाचा कठोर समाचार ठाकरेंनी घेतला. मुंबईचा लचका तोडून महाराष्ट्राचे तुकडे करू देणार नाही ह्या शब्दात ठाकरेंनी भाजपाचा समाचार घेतला. त्यांच्या शब्दांना स्वतंत्र विदर्भाच्या भाजपाच्या मागणीचा संदर्भ आहे हे उघड आहे.
संघाला व्यापक हिंदुत्व अभिप्रेत असल्याचे सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी प्रतिपादन केले. त्यामागे अधुनमधून होणारी मोदी सरकारची राजकीय कोंडी फोडण्याचा प्रयत्न आहे. मोदी सरकारच्या धोरणाला व्यापक अधिष्ठान उभे करण्याचा भागवतांचा प्रयत्न भाषणापुरता का होईना, नक्कीच यशस्वी झाला आहे. मागेही त्यांनी नेहरूंवर घसरण्याच्या मोदींच्या सवयीवर बोट ठेवले होते. त्याचा फायदा असा झाला की मोदींची नेहरूविरोधी रेकॉर्ड जवळ जवळ बंद झाली! लडाख सीमेवर गलवान भागात चीनने केलेल्या घुसखोरीचा जशास तसे ह्या न्यायानुसार मोदी सरकार समाचार घेतील अशी मोहन भागवतांना आशा वाटत आहे. खरे तर त्यांच्या आशावादात मोदी सरकारला गर्भित उपदेश आहे! त्यांच्या भाषण ऐकताना त्याची कदाचित श्रोत्यांना प्रचिती आली नसेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ह्यांचे ताजे वक्तव्य पाहता मोदी सरकारला केलेल्या उपदेशाची प्रचिती यायला हरकत नाही. वेळ आल तर चीनच्या भूमीत प्रवेश करून त्यांच्या लष्कराला आपले लष्कर मागे रेटण्यास कमी करणार नाही अशी भाषा संरक्षण मंत्र्यांनी केली. ही भाषा आपोआप बदलली नाही. सरसंघचालकांच्या भाषणात व्यक्त झालेल्या आशावादाचेच प्रतिबिंब संरक्षण मंत्र्यांच्या वक्तव्यात पडले आहे. आता हा आशावाद मोदी सरकार किती प्रमाणावर प्रत्यक्षात आणणार हे प्रसंग येईल त्याच वेळी लक्षात येईल! ‘सामदामदंडभेद’ ही चतुःसूत्री एरवी बोलताना ठीक असली तरी बलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणातली गुंतागुंत पाहता त्यानुसार चालणे मुळीच सोपे नाही.
मोळाव्याच्या भाषणांच्या बाबतीत एक मान्य करायला पाहिजे की मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी भाजपाला प्रथमच सणसणीत तडाखा हाणला. दसरा मेळाव्यातल्या त्यांच्या भाषणाचे वर्णन ‘सौ सुनारकी एक लुहारकी’ ह्या शब्दात करावे लागेल. मोहन भागवातांच्या भाषणाने मोदी सरकारच्या ‘थिंक टँक’चे काम केले आहे. उध्दव ठाकरेंनी जीएसटीवर झोड उठवली. जीएसटीची अमलबजावणी जमत नसेल तर जीएसटी रद्द करून टाका अशी रोखठोक मागणी ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या ह्या मागणीला देशभरात कसा किती प्रमाणावर प्रतिसाद मिळतो ते पाहायचे. सरसंघचालकांचा आशावादवजा उपदेशाचे मोदी सरकारकडून किती पालन होते हेही नजीकच्या काळात दिसेलच! तूर्त तरी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. त्यात राजकीय वा-यांची दिशा स्पष्ट होईल, कदाचित होणारही नाही. राजकारणाची दिशा खरे तर, पुढच्या वर्षी होणा-या तामिळनाडू, आंध्र पश्चिम बंगालच्या विधानसभांच्या निवडणुकीतच स्पष्ट होईल.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment