काल मी ठाणे महापालिकेच्या गांधीनगर केंद्रावर सपत्नीक जाऊन लसीकरण करून घेतले. हे केंद्र घरापासून फार लांब नाही. ते गांधीनगरातल्या झोपडपट्टीवजा गल्लीत असल्यामुळे तेथे रिक्षावाले जायला तयार नसतात. रस्ता इतका अरूंद आहे की तेथे कारने जाणे अशक्य आहे. समोरून दुसरी रिक्षा आली तर आपल्या रिक्षावाल्यास कसरत करावी लागते. ह्याच कारणासाठी दादापुता केल्याने मला रिक्षावाल्याने मला विशिष्ट वळणावर सोडले. पुढे जाण्यास मात्र त्याने ठाम नकार दिला. चालत चालत दुकानदारांना विचारत विचारत मी कसाबसा आरोग्य केंद्रापर्यंत पोहचलो. आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत पाहून मी आश्चर्यचकित झालो. मी समजत होतो तितकी ही इमारत लहान नव्हती!
गेल्या गेल्या काऊंटरवरच्या नर्सबाईने आम्हाला
टोकन दिले आणि तेथल्या बाकाखुर्च्यांवर बसण्यास सांगितले. आमचा नंबर आल्यावर
नर्सबाईला आधारकार्ड सादर केले. मोबाईलवर
ओटीपी येईल तो मला सांगा, नर्सबाईंनी फर्मावले. एरव्ही ओटीपीसाठी हमखास रुसणा-या
मोबाईलवर ओटीपी आला. ओटीपी येण्यासाठी त्यांनी अर्थात त्यांचा मोबाईल वापरला होता.
मोबाईलवर आलेला मोबाईल त्यांना सांगताच त्यांच्याकडील मोबाईलने माझे रजिस्ट्रेशन
केले. मला पुढे सरकण्याचा आदेश दिला. ज्योतीच्या मोबाईलवरही रजिस्ट्रेशन
प्रक्रियेची पुनरावृत्ती झाली. खुर्च्यांवर बसलेली लसेच्छुकांची भलीमोठी रांग
पाहून माझी तर छाती दडपून गेली. माझ्या हिशेबाप्रमाणे पावणेदोन तासात आम्ही मोकळे
होणार असा माझा अंदाज होता. परंतु त्या ठिकाणी बसलेले अनेक जण अस्वस्थ असल्याने
त्यांनी कामाचे वेगळेच प्लॅनिंग करून ठेवले होते. त्या प्लॅनिंगनुसार ते नंबर
सोडून बाहेर गेले होते. ४० नंबरचा पुकारा झाला. तो हजर नव्हता. साहजिकच ४१
नंबरवाल्याची लॉटरी लागली. बेचाळीस,
त्रेचाळीस असा एकामागून एक असा पुकारा सुरू होता. पण कोणीही हजर नव्हता. पत्नीचा
नंबर ५५ तर माझा नंबर ५६!
‘आली लग्नघटिका सावधा ssन.....’ ह्या गजराच्या वेळी मांडवातले वधुवरांसह सगळे सावध होतात.
आम्ही दोघेही सावध झोलो. भराभर पंचाssवन...छप्पन्न नंबर पुकारले गेले.आम्ही
पुढे सरकताचा प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला. सॅनिटायझएशन, ऑक्सीजन आणि ताप
तपासून पाहताच ‘ ओके
‘ असे
सांगताच तिस-या टप्प्यांसाठी आम्ही पुढे सरकलो! स्मरणिकेतला एक एक मणी पुढे सरकतो तसा
एकेक मिनीट पुढे सरकत होतात. दरम्यान ‘वर्किंग मील’ घेण्याचा कर्मचा-यांनी उत्स्फूर्त
निर्णय घेतला. त्यांच्या जेवणालाबद्दल आमच्या मनाने बिल्कूल कटकट केली नाही. जेवण
झाल्यानंतर लगेच सगळे कामाला लागले, आम्हा दोघांना दुस-या टप्प्यातल्या प्रमुख
नर्सबाईंनी खुणेने बोलावले. पुन्हा मोबाईलवर ओटीपी आणि लसीकरणाची नोंद संपूर्ण!
आता
प्रत्यक्ष लस टोचण्याचा तिसरा टप्प्यांवर आम्हो पोहोचलो. आता लाईनीत आम्ही तीनजण
राहिलो. क्रमाक्रमाने आम्हा आता बोलावण्यात आले. हात सैल ठेवा अशा सूचना देत बाईंनी
लसची सिंरींज दंडात खुपसली. झालं! लगेच दुस-या बाईने हातावर
पॅरासिटामॉलच्या दोन दोन गोळ्या हातावर ठेवत आम्हला निरीक्षणाच्या खोलीत
पाठलण्याचा ‘आदेश’ झाला! दरम्यान माझ्यातला पत्रकार जागा झाला.
मी विचारलं, ‘ सहज कुतूहल म्हणून विचारतो... तुमची चीम किती जणांची आहे?’
‘ २२
जणांची!’ माझी
ओळख जाणून न घेता बाईने उत्तर दिले. असा हा लसीकरणाचा सोहळा संपन्न झाला. ह्या
सव्वाजोन अडीच तासांच्या बैठकीत माझ्या लक्षात आले आपण विनाकारण अस्वस्थ होतो. आपलं
मन मिसइन्फर्मेशन नकळतपणे नोंदवत असतं.
कोरोनांची भीती, लस टोचताना आपल्याला काही त्रास झाला तर? नाना प्रकारच्या शंकाकुशंकांनी मनाला घेराव
घेतला होता. त्या घेरावच्या वेळी तार्किक विचाराला आपण फाटा देतो आणि अतार्किक
विचारसरणीच्या आहारी जातो. कोरोनाच्या जाहिरातीने कोरोनाची भीती वाढली की कमी झाली? लसीकरणानंतरही सरकारी प्रचाराचा धोशा
कायम आहे. लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्रदेखील ह्या धोशातून सुटले नाही. त्या
प्रमाणपत्रातही राष्ट्रऋषीचा फोटो आणि घोषणेचा समावेश करण्यात आला असल्याचे पाहून
मी कपाळाला हात मारून घेतला. कीर्तनप्रवचनाचा सोस असलेल्या ह्या नव्या आसारामबापूंना कोण आवरणार? कोरोनाच्या
घोषणा आणि कोरोनाच्या जाहिरातीची गरज आहेच असे त्यांच्या वतीने सांगितले जाईल! परंतु प्रत्यक्षात जाहिरातीच्या प्रत्येक शब्दामुळे सामान्य
लोकांच्या मनावर भयाचेचओरखडे उठतात! सरकारी जाहिराती ‘मंत्र’ खरा! बंदुकीच्या नळीतून गोळ्या सोडल्या तरच
त्या लक्ष्यभेद करतात, अन्यथा नाही! हाताने काडतूस फेकून उपयोग होत नाही. कोरोनापासून
बचाव करणारा मंत्र एखाद्या डॉक्टरने दिला तर तो प्रभावी ठरू शकतो. अन्यथा सरकारची
ही सगळी जाहिरातबाजी सरकार आणि जनता ह्यांच्यात दो हजार गज दूरी निर्माण करणारी
ठरते!
कोरोनाचे
हे उत्तरायण समजून घेण्याची वेळ आली आहे.
रमेश
झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment