मराठी माणसांनी टिळकांचा कित्ता गिरवण्याऐवजी अडकित्ता घेतला! साहजिक आहे. टिळकांसारखी योग्यता फारच कमी लोकांकडे होती. ईश्वरनिष्ठेच्या बाबतीत त्याही काळात टिळकांसारखी माणसे दुर्मिळच होती. १९१५ साली गांधी जेव्हा दक्षिण आफ्रिकेतून भारतात परत आले तेव्हा त्यांनी गोपाल कृष्ण गोखल्यांची भेट घेतली. अर्थात त्यापूर्वी गोपाल कृष्ण गोखले जेव्हा दक्षिण आफ्रिकेला गेले तेव्हा त्यांनी गांधीजींची भेट घेतली होती. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या गांधींच्या कार्यामुळे गोखले प्रभावित झाले होते. साहजिकच जेव्हा भारतात परत आल्यावर गांधीजी गोखल्यांना भेटायला गेले तेव्हा देशात सर्वत्र फिरून आधी लोकांचे प्रश्न समजावून घेण्याचा सल्ला गोखल्यांनी गांधीजींना दिला. त्या सल्ल्यानुसार गांधीजी देशभर फिरले. चंपारण्यामध्ये जेव्हा ते गेले तेव्हा शेतक-यांसाठी त्यांनी उत्स्फूर्त सत्याग्रह केला. गांधीजी गोखल्यांना मानत होते हे खरे असले तरी प्रत्यक्षात गांधीजींची मानसिकता टिळकांच्या जहाल राजकारणाशी मिळतीजुळती होती. पुढे साकार झालेल्या गांधीजींच्या राजकारणातून गांधीजींचे निर्भयत्व दिसून आले. जहालत्व म्हणजे अर्जविनंत्यांचा मार्गाला विरोध तर न घाबरता सत्याग्रहाच्या मार्गाने ब्रिटिश सत्तेला आव्हान देणे. त्यासाठी लागणारे निर्भयत्व गांधीजींकडे पुरेपूर होते. दोघेही लोकोत्तर पुरूष ठरण्यास ईश्वनिष्ठा हे समान कारण होते.
गांधीजींचे
भारतात आगमन झाले तेव्हा सुरूवातीला गांधीजी आणि टिळक ह्यांच्यात दुरावा निर्माण
होतो की काय अशी भीती टिळक अनुयायांत थोडी चलबिचल निर्माण झाली. जेव्हा गांधीजी
भारतात आले तेव्हा टिळक त्यांच्या निकटवर्तियांना म्हणाले, गांधीजींना साधा माणूस समजू
नका! स्वतःला
टिळकभक्त समजणारे तर ‘हा बनिया देशाला काय स्वातंत्र्य मिळवून देणार?’ असे उघड उघड म्हणू लागले होते! परंतु पुढे गांधीजींची पिंड प्रकृती
टिळकांपेक्षा यत्किंचितही वेगळी नव्हती हेच स्पष्ट झाले.
‘स्वराज्य
हा माझा जन्मसिध्द हक्क आहे’
ह्या एका वाक्यातच स्वातंत्र्य लढ्यासंबंधीची टिळकांची
भूमिका स्पष्ट दिसली. तर सत्याग्रहाची घोषणा करताना गांधीजींना तुरूंगवासाचे भय वाटेनासे झाले. सरकारविरूध्द
टिळकांनी कोर्टात अनेक वेळा लढा दिला. ह्या उलट गांधीजींनी वेळोवेळी कोर्टात दिली जाणारी
शिक्षा हसत हसत मान्य केली. कारण, सत्याच्या मार्गावर गांधीजींचा अढळ विश्वास
होता. त्यातूनच पुढे सत्यग्रहाच्या मार्गाला देशव्यापी स्वरूप प्राप्त झाले. टिळक
हे तेल्या तांबोळ्यांचे नेते म्हणून ओळखले गेले तर देशभरातले शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी
इत्यादि असंख्य लोक गांधीजींच्या मागे उभे राहिले. सत्य हाच ईश्वर असे गांधींजींना
वाटत होते तर टिळकांची गीतारूपी ईश्वरावर दृढ निष्ठा होती. ह्याच ईश्वरनिष्ठेच्याच
जोरावर टिळकांना कारावासाचे कधीच भय वाटले नाही. पाच वर्षांपूर्वी जानेवारी
महिन्यात गांधींजींच्या भारतात परतण्याच्या दिवसाचा शताब्दी सोहळा साजरा झाला. बरोबर
५ वर्षांनंतर ऑगस्ट महिन्यात आज टिळक स्मृती शताब्दी दिन उगवला आहे.
मुंबई
उच्च न्यायालयात न्यायमूर्ती डावर ह्यांच्यासमोर चाललेल्या खटल्यात बचावार्थ
टिळकांनी केलेले भाषण हा केवळ अफाट बुध्दिमत्तेचा आविष्कार नव्हता तर त्या भाषणात तर्कशुध्द
विचारसरणी, कायद्याचा अभ्यास, राष्ट्रप्रेम आणि स्वतः स्वीकारलेली तात्त्विक
मूल्ये जपण्यासाठी वाटेल ती शिक्षा भोगण्याची तयारी हे सारे सारे प्रकर्षाने दिसून
आले. किंबहुना ईश्वराने जे ताट आपल्यासाठी वाढून ठेवले आहे ते आनंदाने
स्वीकारण्याचा दृढ निश्चयच त्यांच्या भाषणात होता! म्हणूनच त्यांचे मन विलक्षण शांत होते.
टिळकांना
ज्युरींनी दोषी ठरवले. ज्युरींच्या निर्णयावर निवेदन करण्याची संधी न्या. डावर
ह्यांनी टिळकांना दिली. टिळकांनीही त्या संधींचा पुरेपूर उपयोग केला. ते म्हणाले,
तुम्ही भले मला दोषी ठरवले असले तरी मी निर्दोष आहे. आदिभौतिक जगावर सत्ता
गाजवण्याचा तुम्हाला अधिकार असला तरी ईश्वराची सत्ता तुमच्या सत्तेहून मोठी आहे.
मी तुरूंगवासाची शिक्षा भोगावी अशीच जर ईश्वराचीच इच्छा असेल तर मला ती मान्य आहे.
टिळकांच्या
मनःशांतीचे आणखी एक कारण होते. शेगावच्या गजाननमहाराजांनी टिळकांना शिक्षा होणार
ह्याचे भाकित खापर्डेकरांकडे केले होते. इतकेच नव्हे तर, गजाननमहाराजांनी त्यांना
भाकरीचा प्रसादही पाठवला होता. गजाननमहाराजांनी पाठवलेला प्रसाद आनंदाने खाल्ला.
खटला चालू असताना त्यांना शिक्षेचे भय असे नव्हते ह्याचे कारण ईश्वनिष्ठेपुढे सर्व
तुच्छ वाटत होते. शिवाय तुरूंगात त्यांच्या हातून महान ग्रंथ लिहला जाईल असेही
भाकितही गजाननमहाराजांनी केले होते. गीतेवर विस्तृत ग्रंथ लिहण्याचा विचार त्यांच्या
मनातून घोळत होताच. पण त्यांना फुरसद मिळत नव्हती. मंडालेच्या तुरूंगवासाने त्यांना
ती फुरसद मिळवून दिली!
टिळकांचाच
ईश्वरनिष्ठेचा मार्ग गांधीजींनी वेगळ्या प्रकारे अनुसरला. गांधीजींचा ‘आतल्या आवाजा’वर पुरेपूर विश्वास होता! त्यांचे पाऊल आणखी पुढे पडले. टिळकांप्रमाणे कोर्टात
बचाव करण्याची भूमिका न घेता शिक्षा भोगण्याची गांधीजींची सदैव तयारी होती. देशात
घडणा-या अनेक घटना जेव्हा त्यांना क्लेशदायक वाटत तेव्हा त्यांनी उपोषणाचा मार्ग
पत्करला. आत्मक्लेशात्मक उपोषणआच्या मार्गामुळे समोरच्या माणसाचे ह्रदय परिवर्तन
होते ह्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांच्या निर्भयतेमुळे अनेकदा न्यायाधीशांची
पंचाईत व्हायची! गांधीजींना
काय शिक्षा द्यायची असा प्रश्न न्यायाधीशांना पडत असे. देशद्रोहाच्या कायद्याला
आव्हान देण्यऐवजी टिळक आणि गांधी ह्या
दोघांनीही ब्रिटिस सत्तेलाच आव्हान दिले. स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे आणि
तो मी मिळवणारच असे सांगणारे टिळक आणि ‘भारत छोडो’ ही गांधीजींची घोषणा ह्या एकाच नाण्याच्या दोन
बाजू होत्या.
लोकमान्य
टिळकांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त टिळकांना वंदन!
रमेश
झवर
No comments:
Post a Comment