स्वरसाम्राज्ञी
लता मंगेशकर हे जग सोडून गेल्या. महाराष्ट्रातीलच नव्हे तर, देशभरातील लाखो गानप्रेमींच्या कानात
साठवलेले सूर विरून गेले. अनेक पार्श्वगायक
आणि पार्श्वगायिक होऊन गेल्या. पुढील काळात अनेक होतीलही ! दुस-या लता मंगेशकर मात्र पुन्हा होणार नाही. चित्रपटांनिर्मितीचे युग सुरू झाल्यानंतर संगीत
रंगभूमीवरील गायक नटांचा जमाना हळुहळू संपुष्टात
आला. महाराष्ट्रही ह्याला अपवाद नाही.
चित्रपटांसाठी पार्श्वगायनाची
परंपरा सुरू झाली. ह्या
गानपरंपरेत लता मंगेशकरच्या रूपाने एक शिखर निर्माण झाले. ह्या शिखराइतके
उंच दुसरे शिखर दुसरे मात्र निर्माण झाले नाही. अर्थात ह्या मुद्द्यावर
गानरसिकांचे मतैक्य होणार नाही. खरे तर,
प्रत्येकाच्या मताला महत्त्व
आहे हे मान्य केल्याखेरीज हा वाद
किंवा मतभेद कधीच संपणार नाही. संपूही
नयेत !
मास्टर दीनाननाथ मंगेशकरांसारख्या पित्याच्या
छत्रछायेत लता आणि त्यांच्या भगिनी
आशा, उषा आणि मीना ह्यांच्या पार्श्वगायनाची
सुरूवात झाली. त्यामुळे स्वर सापडण्याचा, चुकण्याचा प्रश्नच कधी उपस्थित झाला नाही. `लोकसत्ते’साठी
लता मंगेशकर ह्यांची मुलाखत
घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. परंतु
त्या प्रयत्नांना दाद लता मंगेशकरने दिली नाही.
ह्याचे कारण कधीच कुणाला समजले नाही.
‘लोकसत्ते’चे जनरल मॅनेजर
रंगनाथनसाहेब ह्यांच्या मार्फत प्रयत्न करून पाहा असे कुणीतरी रविवार आवृत्तीचे
संपादक विद्याधर गोखले ह्यांना सुचवले. ‘रविवार’चे संपादक नारायण आठवले किंवा यशवंत रांजणकर
ह्यापैकी कुणीही रजेवर गेले की मला न्यूज डेस्कवरून हलवून रविवारचे काम दिले जात
असे. थोडक्यात, मी रविवार लोकसत्तेत ‘बदली
कामगार’ होतो !
‘रंगनाथन्?’
मी
`हो. ह्याचं
कारण असं की शिवाजी गणेशन् आणि लता मंगेशकर ह्यांच्यात रंगनाथनसाहेब वेळोवेळी
संवाद घडवून आणतात. त्यामुळे लता मंगेशकर कदाचित् नकार देणार नाही, ‘
‘ अच्छा ये
बात है! ‘ मी
मला नवीच
माहिती कळली. गोखलेसाहबांनी लगेच रंगनाथसाहेबांना फोन लावला. मी प्रयत्न करतो, असे आश्वासन रंगनाथसाहेबांनी दिले.
त्यानंतर तिस-या दिवशी लतादीदींवर
ह्रदयनाथ मंगेशकरांनी लिहलेला लेख रंगनाथनलाहेब गोखल्यांकडे स्वत: घेऊन आले.
अर्थात गोखल्यांनी तो स्वतः माझ्याकडे आणून दिला. मला सूचना दिल्या, लेखातला एक शब्दही कापू नका. दीड ते दोन कॉलमपेक्षा जास्त मोठा लेख
प्रसिद्ध करायचा नाही असे गोखलेसाहेबांचेच धोरण होते. ह्रदयनाथ मंगशेकरांनी
लिहलेला लेख तब्बल चारसाडेचार कॉलम होता.
मी गॅली प्रूफचा जुडगा घेऊन गोखलेसाहेबांकडे गेलो. गोखलेसाहेबांनी तो लेख
स्वतः पानात लावायला घेतला. तीन ठिकाणी कंट्युनिएशन घ्यावे लागले तेव्हा कुठे तो
लेख पानात बसला.
लता
मंगेशकरांची मुलाखत शेवटी मिळाली नाही ती नाहीच !
दुधाची तहान ताकावर भागवण्याचा हा प्रकार होता. अर्थात त्यांनी मुलाखतीची
वेळ दिली असती तर त्यांची मुलाखत घेण्याची संधी
मला मिळाली नसतीच हे मी जाणून होतो. शिरीष कणेकरांसारख्यांनाच गोखल्यांनी
पाठवले असते ! अर्थात लेख प्रसिध्द झाल्यावर दुस-याच दिवशी मला लता मंगशकरांच्या
वतीने ह्रदयनाथ मंगशकरांनी फोन केला आणि माझे आभार मानले. फोनवर मला ते म्हणाले, जरा थांबा हं… लता दीदींना तुमच्याशी
बोलायचं आहे. क्षणार्धात लता दीदींचा आवाज आला. माझ्या कानावर माझा क्षणभर विश्वास
बसला नाही. त्यांनीही ह्रदयनाथांप्रमाणे
माझे आभार मानले. फोन कॉल संपला.
माझ्या
माहितीप्रमाणे त्यांच्यापर्यंत आमचे अमरावतीचे वार्ताहर सुरेश भट पोहचू शकले. (
सुरेश भट हे लोकसत्तेचे स्ट्रिंगर होते. ) अन्य कुणी मराठी पत्रकार त्त्यांया
काळात तरी त्यांच्यापर्यंत पोहचू शकल्याचे निदान मला तरी माहित नाही. सुरेश
भटांच्या गीतांना आणि गझलांना ह्रदयनाथांनी अतिशय सुंदर चाली लावल्या. त्यांची गाणीही लताच्या आवाजात ध्वनिमुद्रित
झाली. पत्रकारांपैकी कदाचित शिरीष कणेकर आणि स्क्रीनचे संपादक पिल्ले हे लता
मंगेशकरपर्यंत पोहोचले असतील.
ब्रेबॉर्न
स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या ‘गोल्डन टोबॅको नाईट्स’च्या कार्यक्रमाची
निमंत्रण पत्रिका माझ्या नावार आली. निमंत्रण पत्रिका आणून देणा-याने मला आवर्जून
कार्यक्रमाला येण्यास सांगितले. मी सौ. ज्योतीसह त्या कार्यक्रमाला मुद्दाम गेलो.
पहिल्या रांगेवरच्या सीटवरून मला त्या कार्यक्रमात लता मंगेशकर, आशा भोसले ह्यांचे गाणी तर ऐकायला मिळालीच; शिवाय
दिलीपकुमार, मेहमूद इत्यादींचे कार्यक्रमही अगदी जवळून
पाह्यला मिळाले. शिरीष कणेकर तर पुन्हा
ऑफिसला गेले. त्यांनी दिलीपकुमारच्या भाषणाची बातमी दिली. ती बातमी दुस-या दिवशी
इंडियन एक्सप्रेसच्या अंकात छापून आली. ‘गोल्डन नाईट्स’ मात्र माझ्या कायमची स्मरणात
राहिली!
सिनेमा किंवा
संगीत हा माझा बीट नसल्यामुळे मी लता मंगशकरपर्यंत कधीच पोहोचलो नाही. पोहचण्याचा
प्रयत्नही केला नाही. लौकरच मराठी बोलपटांना ५० वर्षे पूर्ण झाली तेव्हा
पुरूषोत्तम दारव्हेकरांनी मला नामवंतांच्या मुलाखती आणण्याची कामगिरी सोपवली.
त्यानंतर भारतीय सिनेमास ७५ वर्षे पुरी झाली त्यानिमित्तही मी कार्यक्रमासाठी
मुलाखती आणल्या. लता मंगशकर सोडून मी कोणाचीही मुलाखत आणण्यास तयार आहे, असे दारव्हेकरांना स्पष्टच सांगितले.
अर्थात त्यांनाही लता मंगेशकर कुणाला मुलाखत देत नाही ह्यांची
कल्पना असावी. म्हणून त्यांनीही एखाद्या
विशिष्ट नावाचा आग्रह धरला नाही.
‘लतादीदीं’च्या निधनाने पार्श्वगायनाच्या क्षेत्रातले लता मंगशकर नावाचे पर्व संपले.
रमेश झवर
No comments:
Post a Comment