शिवाजीमहाराजांच्या जन्मापूर्वीच्या काळात दक्षिणेत मुस्लिमांच्या सत्ता स्थिरस्थावर झाल्या. त्या काळात जी युध्दे होत ती मुस्तिम सत्ताधा-यांची आपापसात होत. विजयनगरच्या हिंदू साम्राज्याला बुडवण्यासाठी अनेक मुस्लिम शाह्या आपापसात कधी समझोता करत तर कधी एकमेकांच्या विरोधात उभ्या राहात. मराठा सरदारही कधी एका सत्तेच्या बाजूने तर कधी दुस-या सत्तेच्या बाजूने लढत ! हे सर्व पाहातच बालशिवाजी लहानाचे मोठे झाले. त्यांचे वडिल आदिलशहांच्या दरबारात मोठे सरदार होते. ब-याचदा ते निजामाच्या बाजूनेही लढले. उत्तरेचे आक्रमण परतून लावण्यासाठी झालेल्या लढायातही ते सहभागी झाले. शिवचरित्राची ही पार्श्वभूमी सामान्य लोकांना फारशी माहित नाही. प्राथमिक शाळेत पाचवी ते आठवीच्या वर्गात इतिहासात जेवढा इतिहास वाचायला मिळतो त्यापलीकडे सामान्य माणसाचे इतिहासाचे ज्ञआन जात नाही.
हिंदुस्थानावर झालेली परकी आक्रमणे रोखण्याचा पहिला जबरदस्त प्रयत्न शिवाजीमहाराजांनी केला हे मान्य करावेच लागते. खुद्द शिवाजीमहाराजांचा वंश थेट अयोध्याच्या रामाच्या सूर्यवंशापर्यंत भिडतो हे अनेकांना माहित नाही. कृष्णराव अर्जुन केळुसकर ह्यांनी लिहलेले शिवाजीमहाराजांचे चरित्र१९०६ साली प्रसिद्ध झाले. ह्या चरित्रात केळुसकरांनी शिवाजीमहाराजांच्या वंशांचा इतिहास दिला आहे. शिसोदिया वंशाचे उगम मूळ अयोध्येच्या सूर्यवंशापासून झाला. केळुसकरांनी शिसोदिया वंशाची सविस्तर माहिती दिली आहे. शिवाजीमहाराजांचा भोसले वंश हा राजपुतान्यातील मूळचा शिसोदिया वंश. सूर्यवंश आणि चंद्रवंश हे प्राचीन काळात सुप्रसिध्द राजवंश आहेत. शिसोदिया वंशांचे मूळ अयोध्येच्या सूर्यवंशी राजघराण्याचे असल्याचे कृष्णराव केळुस्करांनी दाखवून दिले. मात्र, रामाच्या इक्ष्वाकू कुळाचे संपूर्ण दैवतीकरण झाले असूनही सूर्यवंशी परंपरेबद्दल लिहताना केळुस्करांनी कुठेही ‘दैवतीकरणा’चा हवाला दिला नाही.
शिवाजींच्या आधीपासूनच्या ऐतिहासिक काळात लढाया मारून राज्ये जिंकण्यामागे प्रामुख्याने धर्म हीच प्रेरणा होती. मात्र, शिवाजी महाराजांच्या प्रेरणेत केवळ धर्म हीच प्रेरणा होती असे महणता येणार नाही. राज्य संपादन करण्याच्या त्यांच्या प्रेरणेत स्वातंत्र्याची आस ही तितकीच महत्त्वाची होती. आदिलशहाच्या दरबारात कुर्निसात करण्यासाठी हजेरी लावण्याचा त्यांना तिटकारा होता. लहान वयापासूच त्यांच्या मनात स्वातंत्र्याची आस फुलत गेली. एखादी जहागीर त्यांना स्वतंत्रपणे मिळू शकली असती. परंतु निव्वळ जहागिरीवर ते खूश नव्हते. तशी ती त्यांच्याकडे शहाजीराजांचा वारसदार म्हणून सहज चालत आली असती. किंबहुना शहाराजीराजांच्या मनाशी तो हेतू होताही. म्हणूनच त्यांनी त्यांना दरबारात नेले होते. परंतु बादशहाला कुर्नीसात करण्यासाठी ते गेलेही. तरीही त्यानंतर अगदी लहान वयात त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्यांच्या हातून स्वराज्याची मुहूर्तमेढ झाली हा इतिहास आहे. पुढे ते दुर्दैवाने औरंगजेबाच्या तावडीत सापडले. औरंगजेब बादशहाने त्यांना आग्रा दरबारात पंचहजारीही देऊ केली. परंतु मुळातच त्यांना मोगलांची गुलामी मान्य नव्हती. शककर्ता राजा होण्याचे त्यांचे स्वप्न होते. आग्र्याच्या कैदेतून त्यांनी हिकमतपूर्वक सुटका करून घेतली. मजल दरमजल करत ते स्वराज्यात परत आले.
त्यांच्या काळापूर्वीच दक्षिणेत मुस्लीम राजवटी स्थिर झाल्या असल्या तरी सोळाव्या शतकात सुरू झालेल्या मोगलांच्या आक्रमणाने हिंदुस्थानाचे राजकीय चित्र ख-या अर्थाने पालटलत गेले. ‘आसेतु हिमाचल’ पसरलेल्या हिंदुस्थानचे ‘बादशहा’ होण्याचे मोगलांचे स्वप्न होते. बंगालपासून गुजरातपर्यंतचा मुलूख जवळ जवळ मोगलांच्या ताब्यात आलेला होता. अकबराच्या काळात गुजरात मोगलांच्या ताब्यात आला. खानदेशातला असीरगडचा किल्ला अकबराने ताब्यात घेतला. दक्षिणेतील बहुतेक सर्व मुस्लिम सत्ताधा-यांबरोबर मोगलांची युध्दे झाली. परंतु शिवाजीमहाराजांकडून तीव्र प्रतिकार होईल असे मोगलांना अपेक्षित नव्हते. औरंगजेबाने तर शिवाजीमहाराजांना ‘पहाडका चूहा’ असे विशेषण बहाल केले होते! दक्षिणेतील सारेच मुस्लिम सत्ताधारी परस्परांना शत्रू समजत. त्यांच्या आपापसात लढाया होत! परंतु मोगल ह्या सगळ्याच शाह्यांचा समान शत्रू होता.
ऐतिहासिक काळात मुलूख जिंकण्याची दुर्दम्य इच्छा सगळ्याच सत्ताधा-यांना होती. अर्थात सुरूवातीला काळात धर्मप्रेरणा होती. धर्प्रेणा म्हणजे तरी काय? ‘गो, गीता आणि गंगास्नान’ ह्या तिसूत्रीला हिंदूंच्या जीवनात अपरंपार महत्त्व होते. आजही आहे. स्नानाला पाणी उरले नाही ह्या समर्थांच्या वचनाला हा संदर्भ आहे. सतराव्या शतकात पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच ह्यांना मुलूख जिंकण्यात स्वारस्य नव्हते. त्यापेक्षा त्यांना व्यापारात अधिक स्वारस्य होते. ब्रिटिशांनी भारताचा फार मोठा मुलूख पादाक्रांत केला; परंतु त्यांनी रूढ अर्थाने भारतावर ’आक्रमण’ असे केले नाही. मुळात ते व्यापार करण्यासाठी आले होते. व्यापर करता करता ब्रिटिशांना बंगालच्या नबाबाकडून मिळालेला महसूल वसुलीचा अधिकार हा भारताच्या इतिहासाला कलाटणी देणआरा ठरला. हळुहळू त्यांनी लष्करी अधिकारही मिळवले! पाहता पाहता भारतात त्यांचे साम्राज्य स्थापन झाले. ह्या पार्श्वभूमीवर शिवाजीमहाराजांचे मोठेपण उठून दिसते. महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य टिकवण्यासाठी राजाराम, ताराराणी आणि धनाजी संताजींसारखे त्यांचे शूर सरदारह्यांनी कसोशीने पर्यत्न केला. मोगलांच्या कैदेतून सुटून आलेले शाहू आणि पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ ह्यांनी शिवाजीमहाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार केला. पुढे बाजीरावादि पेशव्यांनी केलेला मराठेशाहीचा विस्तार भारताच्या इतिहासातील सोनेरी पाने आहेत.
मराठेशाहीच्या इतिहासाचे ग्रँट डफने जवळ जवळ विकृतीकरणच आहे. परंतु जदुनाथ सरकार ह्यांनी लिहलेल्या इतिहासामुळे ते विकृतीकरण पुष्कळच कमी झाले. सभासदाची बखर हा शिवशाहीच्या इतिहासाचा बहुमूल्य पुरावा मानला जातो. पुढे गो. स. सरदेसाई ह्यांनी लिहलेला मराठेशाहीचा इतिहास पुष्कळ अंशी स्वीकारला गेला.
आज तारखेनुसार शिवजयंती! शिवजयंतीच्या तिथीबद्दलचा गेल्या दोनशे वर्षांपासून सुरू असलेला वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्रा सरकारने काही वर्षांपूर्वी संशोधकांच्या मदतीने शिवाजीमहाराजांची जन्मतारीख शोधून काढली. त्यानुसार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घोषित केला. तारखेचा वाद मिटला हे खरे. एकदा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजीमहाराजांच्या लढायांची तुलना व्हिएतनाममधील संघर्षांशी केली होती. ती कितीतरी सार्थ होती. त्यानेळी अनेकांनी य़शवंतराव चव्हाणांवर टीका केली होती. परंतु चव्हाणांचा political sense फार कमी लोकांच्या लक्षात आला.
रमेश झवर
No comments:
Post a Comment