Saturday, February 12, 2022

कृतीशूर राहूल बजाज

 

टू व्हीलर आणि  टो रिक्षा तसेच लाईट कमर्शिअल व्हेहिकल ह्या क्षेत्रात क्रांतीकारक कार्य करणा-या बजाज ऑटो कंपनीचे अध्यक्ष राहूल बजाज ह्यांचे निधन झाल्याचे वृत्त ऐकून देशभरातील वाहनचालक हळहळले असतीलभारत ही टू व्हीलर्सची जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असून २०२० साली दर महिन्याला - ते . दशलक्ष युनिट्स भारतात नोंदली जातात. २०२१ साली कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे ह्या व्यवसायास फटका बसला खरा: परंतु तिस-या तिमाहीत टू व्हीलर्सची नोंदणी पूर्ववत्झाली. दुचाकी वाहन क्षेत्रात बजाज उद्योगसमूह पहिल्या क्रमांकावर नसला तरी त्यांनी उत्पादित केलेली स्कूटर हे लोकप्रिय वाहन ठरले. रोज कामावर जाण्यासाठी  करावा लागणारा ४-५ किलोमीटरचा प्रवास सुखकारक  होण्यासाठी स्वतःचे दुचाकी वाहन खरेदी करण्याची ‘कनिष्ठ मध्यमवर्गियां’ची स्वप्नपूर्ती बजाज ह्यांनी तर केलीच; शिवाय दूध, भाजीपाला आणि फळं आणण्यासाठी बजाज टेम्पोचा ग्रामीण आणि निमशहरी भागातही चांगला उपयोग झाला.  बजाजच्या ऑटो रिक्षामुळे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, आफ्रिका खंडातही गरीब माणसांना वाहनसुख मिळवून दिले.

१९५०-१९६० च्या दशकात ’बिर्ला आणि टाटा ह्या दोनों ने आधा आधा भारत बाटा’ असा संवाद सामान्य व्यापा-यांच्या तोंडात खिळलेला होता. परंतु तालुक्यांच्या आणि जिल्ह्यांच्या क्षेत्रात बजाज टेंपोला प्रतिष्ठा होती. टेंपोचे रूपान्तर प्रवासी वाहनात करण्याचाही उपक्रम सुरू झाला. बजाज रिक्षामुळे तर निमशहरी भागात क्रांतीच झाली. ग्रामीण भारतात टाटा-बिर्ला ह्यांच्यापेक्षा बजाज ह्यांचा ’वाटा’ अधिक होता ! हे सत्य कदाचित्‌ आकडेवारीने सिद्ध होणार नाही. वाहनउद्योगात बजाज समूहाने आपली स्वत:ची स्पेस हेरून  स्वतःचे स्थान निर्माण केले. अर्थात्‌ कर्तबगारीचा हा  वारसा राहूल ह्यांच्याकडे आजोबा जमनालाल बजाज ह्यांच्याकडूनच आला होता. महात्मा गांधींच्या इच्छेनुसार जमनालाल बजाजांनी विनोबाजींना शेतजमीन दिली आणि हवे ते प्रयोग करण्याचे स्वातंत्र्यही दिले. गांधीजींनाही पवनार येथे आश्रम स्थापन करण्यास गांधींजींच्या अटीवर सहाय्य केले. सहाय्य करताना बजाज कुटुंबियांनी  ’मी हे करतोय्‌’ असा अभिमानही बाळगला नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात गांधीवादी अर्थरचनेवर भर न देता नेहरूंनी औद्योगिक भारताचे ध्येय पाहिले. बजाज कुटबंबियांनीही भारताच्या नव्या धेयानुसार औद्योगिक क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी आयर्न आणि वाहन उद्योग क्षेत्राचा पदार्पण केले. अर्थात हे नवे पदार्पण करत असताना बजाज कुटुंबाने शिक्षण क्षेत्रातही पदार्पण केले. मेडिकल, मॅनेजमेंट इत्यादि विद्याशाखात बजाज समूहाने प्रवेश केला. राहूल बजाज ह्यांनी स्वतः हॉर्वर्ड विद्यापीठात प्रवेश करून एमबीएची पदवी मिळवली होती. राजकारणही बजाज कुटुंबियाने वर्ज्य मानले नाही. त्यांच्या कुटुंबातील एक जण तरी लोकसभेत निवडून आलेला आहे. गतानुगतिकतेत अडकून न बसता त्यांनी परंपरेत नवा अर्थ भरला ! हे करत असताना नीतीमूल्यांशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही. बजाज कारखान्याचा विस्तार करताना पुण्याखालोखाल त्यांनी सातारा आणि औरंगाबाद ह्य दोन शहरांची निवड केली. सातारा येथील स्कूटर उत्पादन प्रकल्प नीटसा चालला नाही. परंतु औरंगाबादचा प्रकल्प मात्र शिस्तीत चालला. यशस्वी झाला. राहूल बजाजांच्या मार्गदर्शनाखाली मधुर बजाज ह्यांनी चोख कामगिरी बजावली.   मधुर बजाजांची मुंबईला गरज निर्माण होताच राहूलनी त्यांना मुंबई कार्यालयात बोलावून घेतले. दरम्यानच्या काळात हिस्सेवाटणीच्या प्रश्नात लक्ष घालण्यासारखी परिस्तिती निर्माण झाली. बंधू शिरीष आणि राहूल ह्यांच्यात थोडा वाद झाला. परंतु शरद पवारांच्या मध्यस्थीने तो मिटवण्यात राहूल बजाज यशस्वी झाले. नंतरच्या काळात संजय आणि राजीव ह्या दोन्ही मुलात निर्माण झालेली सत्तेची समस्याही त्यांनी समाधानकारकरीत्या सोडवली. एका मुलाकडे ऑटो इंडस्ट्री तर दुस-याकडे फायनान्स कंपनी सोपवून राहूल बजाज स्वतः होल्डिंग कंपनीचे प्रमुख झाले. स्वत:चे स्थान कायम ठेऊन तिढा मिटवण्यात राहूल बजाज हे नेहमीच  यशस्वी ठरले होते.

स्पष्टवक्तेपणा  हा त्यांचा स्वभावविशेष होता. कोणत्याही पुढा-यांशी स्पष्ट शब्दात ते बोलू शकत होते. बिल गेटस्च्या भाषण प्रसंगी विंडो सॉफ्टवेअर हे फक्त ऑफिस चालवण्यासाठी ठीक आहे. पण हाताने काम केल्याखेरीज कुठलेही काम होत नाही असे त्यांनी बिल गेट्सच्या निदर्शनास आणून दिले. अर्थात त्या काळात रोबोटिक्स विकसित झालेला असता तर विंडोतली उणीव दाखवणयाच्या भानगडीत ते पडलेच नसते. अर्थात उणीव दाखवताना त्यांनी जीभ चालवून पुढचे वाक्य उच्चारले नाही तो भाग वेगळा!

राहूल बजाज ह्यांचे व्यक्तिमत्त्व पुरोगामी किंवा प्रतिगामी ह्या साचेबंद  विशेषणांत बसणारे नव्हते.ते कधीच पलीकडे गेलेले होते. वाचीवीरापेश्रा कृतीशूर उद्योगपती असेच त्यांचे वर्णन योग्य ठरेल.

रमेश झवर


No comments: