चीनच्या ६७ अप ब्लॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने उशिरा का होईना घेतला टिक टॉक,
शेअरईट, वुईचॅट कॅमस्कॅन, युसी
ब्राऊजर इत्यादि अप ब्लॉक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला. विशेष
म्हणजे ब्लॉक करण्यात आलेले अप चीनी आहेत असा उल्लेख करण्याचे माहिती तंत्रज्ञान
मंत्रालयाने हुषारीपूर्वक टाळले! ते काहीही असले तरी उशिरा का होईना सरकारला
शहाणपण सुचले! चीनची ही डिजिटल घुसखोरी गेल्या काही वर्षांपासून बिनदिक्कत सुरू
आहे. चीनी अप जास्त चांगले चालतात म्हणून मोबाईधारक ते सर्रास वापरतात. परंतु फेसबुक
आणि इतर सामाजिक माध्यामांप्रमाणे चीनी अपदेखील भारतातली सारी माहिती चीनला पाठवत
असतात. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्याची गतिमान यंत्रणाही चीनमध्ये
अस्तित्वात आहे. खरे तर, गलवान खो-यातील
घुसखोरीपेक्षाही चीनची डिजिटल घुसखोरी गंभीर आहे
अवकाशात उपग्रह सोडण्याची चढाओढ सुरू झाली
तेव्हा चीननेही उपग्रह सोडले. बरे, सोडले तर सोडले,
पण उपग्रह सोडताना अन्य देशांच्या भ्रमणमान उपग्रहांपासून सुरक्षिततेच्या
दृष्टीकोनातून किमान अंतर राखले पाहिजे ह्याचीही चीनने फारशी फिकीर केली नाही.
भारताशी आधी ‘नकाशा युध्द’ सुरू
करून झाल्यावर चीनची मजल १९९३ साली प्रत्यक्ष भारताच्या सीमेवर युध्द करण्यापर्यंत
गेली. दरम्यानच्या काळात माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातही चीनने जोरदार मुसंडी मारली.
नव्वदच्या दशकात जेव्हा जेव्हा विंडोच्या नव्या नव्या आवृत्त्या अमेरिकन
बाजारपेठेत आल्या तेव्हा तेव्हा चीनच्या बाजारात विंडोच्या पायरेटेड आवृत्त्या
मिळू लागल्या. फार काय, त्या काळात अमेरिकेत वापरल्या जाणा-या
शंभर सॉफ्टवेअर्सचा समावेश असलेली एक सीडीच चीनने काढली. ती सीडी मुंबईत लॅमिंग्टन
रोडवर मिळू लागली!
गेल्या वर्षींच चीनचे अध्यक्ष क्षींनी
भारताला भेट दिली होती. त्यांनी केवळ भारतालाच भेट दिली असे नव्हे तर अर्जेंटिना,
ब्राझील, जर्मनी, किर्गीलस्तान,
फिलिपाईन्स, स्पेन, ताजिकीस्तान,
उबेकीस्तान आणि व्हिएतनाम ह्याही देशांना क्षींनी दोन वेळा भेट दिली.
फ्रान्स, भारत आणि इंडोनेशिया, कझाखस्तान
आणि दक्षिण आफ्रिका ह्या देशांना त्यांनी तीन वेळा भेट दिली तर अमेरिकेला ४ वेळा
भेट दिली. रशियाला क्षींनी तब्बल ८ वेळा भेट दिली. क्षींच्या परदेश दौ-यांमागे
सुनियोजित तंत्र आहे. जगातल्या अनेक देशात आपला माल कसा खपवता येईल ह्याचे नियोजन
करूनच क्षींनी निरनिराळ्या देशाचे दौरे केले. क्षी भारतात आले तेव्हाही भारता-चीन
ह्यांच्यात मोठाले व्यापारी करार झाले. २०१९ साली ऑक्टोबरमध्ये भारतात चीनची एकूण
गुंतवणूक ५.०८ च्या घरात गेली.
अनेक देशात व्यापारविस्तार करण्यासाठी
चीनने नक्कीच संगणकीय विश्लेषणाची मदत घेतली असणार. माहितीतंत्रज्ञान क्षेत्रात आज
घडीला चीनची धडाकेबाज आगेकूच सुरूच आहे. जगात इंटरनेट वापारात चीन पहिल्या
क्रमांकावर आला असून भारत दुस-या क्रमांकावर आहे. अमेरिका तिस-या क्रमांकावर आहे.
२०१७ पर्यंत जगभरात ऑनलाईन राहणा-यांची संख्या ४९ टक्क्यांवर गेली. सध्या
जागतिक इंटरनेट वापरदारांपैकी १२ टक्के वापरदार भारतात आहेत. चीनमध्ये २१ टक्के
इंटरनेट वापरदार आहेत तर अमेरिकेत इंटरनेट वापरदारांची संख्या केवळ ८ टक्के आहे.
गूगलच्या मदतीने भारतात २०१६ पासून रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सेवा सुरू झाली.
व्होडाफोनच्या ‘सुपरवायफाय’बरोबर
रिलायन्सनेही ४ जी इंटरनेटमध्ये पदार्पण केले. परिणामी भारतात ब्राडबँड सेवा
स्वस्त झाली. ट्रायच्या मते भारतात वायरलेस म्हणजेच मोबाईल वापरदारांची संख्या
१.१६ अब्जाच्या घऱात गेली आहे.
सध्या भारतात लोक कितीतरी अधिक वेळ
मोबाईलवर घालवतात खरा, पण तो वेळ गेम खेळण्यात आणि सिनेमा
पाहण्यात अधिक खर्च होतो. सोशल मिडियावर वावरणा-यांची संख्या तर इतकी वाढली की
तुलनेने प्रत्यक्ष वावरायला लोकांना वेळ नाही. मोबाईलसकट माणसेच मोठ्या प्रमाणावर ‘हॅक’ झाली आहेत! म्हणूनच फेसबुकसारख्या
माध्यमांचा ताबा जाहिरातदारांनी घेतल्यात जमा आहे. सायबर सिक्युरिटीचे तीनतेरा तर
कधीच वाजले आहेत! करीअरसाठी धडपड करण्याची उमेद संपल्यामुळे बेकारीत वाढत
चालली आहे. भारतातली ही परिस्थिती चीनला लाभदायक ठरली असून ह्या परिस्थितीचा नेमका
फायदा चीन उचलत आहे.
निर्यातीत चीन अग्रेसर होण्यामागे
संगणकाचा चोख वापर हेच कारण आहे, चीनच्या मोबाईल
शार्टफॉर्म व्हिडियोमुळे व्यापारवृध्दीस चालना मिळाली. चीनने तयार केलेले अनेक
अप्स अमेरिकेच्या इन्स्टाग्रॅम किंवा स्नॅपचॅटपून सरस आहेत. ह्याचे कारण कुठलीही
गोष्ट चांगल्या प्रकारे आणि झटपट करण्याचे तंत्र चीनने आत्मसात केले आहे. भारताने
बंदी घातली तरी येत्या काही वर्षात चीनी अपचा धंदा वाढता राहील असा अंदाज आहे.
बाईटडान्स अधिक प्रभावशाली होण्याच्या मार्गावर आहे. अलीबाबा आणि जेडी कॉम ह्या
दोन दोन्ही ई कॉमर्स कंपन्यांचा पसारादेखील खूपच वाढला. पेमेंट बँकात चीनचा पैसा
मोठ्या प्रमाणावर आला आहे. मनकी बातपेक्षा काम की बात हेच चीनचे वागण्याचे खरे
सूत्र आहे! अपच्या निर्मिती आणि मार्केटिंग ह्या दोन्हीत अमेरिकेशी स्पर्धा
करण्यात चीन यशस्वी झाला त्याचे रहस्य हेच आहे.
दक्षिण आशियातील चीन, भारत आणि इंडोनेशिया ह्या देशांत इंटरनेट आणि अप हे दोन्ही बिझिनेस
चांगलाच वाढला आहे. ब्राझिल, मेक्सिको आणि
फिलिपाईन्स ह्या देशांतही हा व्यवसाय वाढता राहील हे बनियाबुध्दी चीनच्या
लक्षात यायला वेळ लागला नाही! चीनची ही आघाडी अर्थात दैनंदिन
व्यवहारापुरती आहे असा समज करून घेण्याचे कारण
नाही. लष्करी ताकद वाढवण्यासाठी चीनवे संगणक वापराचा धडाका लावलेला असू
शकतो. मात्र, ते कुणाच्याही लक्षात येणार नाही. कारण,
संरक्षण गरजांसाठी जगभर सर्फेस इंटरनेटऐवजी ‘डीप
इंटरनेट’चा वापर केला जातो. चीनकडूनही संरक्षण गरजांसाठी
डीप इंटरनेटचा वापर केला जात असेल तर ते जगाला कळणारही नाही. गलवान खो-यातली
घुसखोरी गंभीर आहेच. परंतु चीनची विधीनिषेधशून्य संगणकीय प्रगतीदेखील तितकीच गंभीर
आहे. भारत-चीन संबंधांच्या ह्या नव्या परिमाणांकडे दुर्लक्ष करणे परवडणार नाही.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार