योगशास्त्रावरील सर्वोत्तम ग्रंथ कोणता असा प्रश्न कुणी विचारला तर त्या प्रश्नाचे उत्तर ‘पतंजली योगसूत्र’ असे बहुतेक योगमतानुयायी देतील. गोरक्षनाथ वगैरैच्या
पुस्तकांची नावेही कुणी सांगतील. रूढ अर्थाने ते बरोबरही आहे. भगवद्गीतेतील अठराच्या
अठरा अध्यायाच्या समाप्तीनंतर जी पुष्पिका दिलेली आहे. ती पुष्पिका अशीः ‘ओम तत्सदिती ‘श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्यु
ब्रम्हविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे -----नाम ....अध्यायः ’ ह्या शब्दरचनेत अध्याय क्रमांक आणि त्या अध्यायाचे नाव समाविष्ट करण्यात
आलेले आहे. गीतेचे मुद्रण करणा-या कुठल्याही मुद्रकाने वा संपादकाने पुष्पिका
वगळलेल्या नाही! पुष्पिकेत श्रीकृष्णार्जुन संवाद हा गीतेच्या
मुख्य विषयाचा क्रम पहिला आहे. संवादात आलेल्या वेगवेगळ्या प्रश्नोत्त्तरानुसार
अध्यायांना वेगवेगळी नावे देण्यात आली असून ती अत्यंत समर्पक आहेत. तरीही
महत्त्वाचा मुद्दा असा की नैराश्यातून ऐन वेळी अर्जुनाला आलेले खोटे वैराग्य
घालवण्याच्या दृष्टीने केलेला प्रयत्नात योगेश्वर कृष्णाला शंभऱ टक्के यश मिळाले
आणि युध्द करण्यास अर्जून प्रवृत्त झाला. श्रीकृष्णाने केलेल्या युक्तिवादाला
ब्रह्मविद्येअन्तर्गतल्या योगशास्त्राचा आधार आहे.
कोणते आहे ते ब्रह्मविद्येतले योगशास्त्र?
थोडक्यात सांगायचे तर ईश्वरी शक्तींशी युक्त होणे हा अध्यात्म विद्येतील
योगशास्त्राचा गाभा आहे.
सातशे श्लोकांच्या गीतेत धृतराष्ट्राच्या
तोंडी १ तर संजयच्या तोंडी ४१ श्लोक आहेत. अर्जुनाच्या तोंडी ८४ तर श्रीकृष्णाच्या
तोंडी ५७४ श्लोक आहेत. वरवर ही माहिती सामान्य वाटली तरी ती तितकी सामान्य मुळीच
नाही. अदिती जमखंडीकरांनी ‘गीताप्रश्नोत्तरी’ ह्या छोटेखानी पुस्तकात ती दिली आहे. गीतेचा उपदेश शिष्य झालेल्या
अर्जुनाला केला असला तरी तो सामान्य माणसाचे शंकासमाधान करणारा आहे.
ज्ञानेश्वरीतील ‘स्वदेहा नाव अर्जुनु परदेहा नाव स्वजनु’ ह्या चरणाचा अर्थही नेमका हाच आहे.
ज्ञानेश्वरांना योगमार्गाची दीक्षा नाथ
परंपरेने मिळाली होती. आदिनाथ, मत्यस्येंद्रनाथ, गोरक्षनाथ गहिनीनाथ आणि
निवृत्तीनाथ अशी संक्षेपात त्यांची गुरूपंरपरा आहे परंपरेचा हा उल्लेख
ज्ञानेश्वरांनी अठराव्या अध्यायात केला आहे. पैठण येथील ब्रह्मवृंदांच्या पीठाकडून
शुध्दिपत्र मिळालेले असूनही ‘तीव्र अनुतापें
करावे भजन। गो खर आणि श्वान वंदुनियां’ ह्या आदेशानुसार आयुष्य
व्यतित करायचे चौघा भावंडांनी पैठणमधून बाहेर पडतानाच ठरवले. त्यानुसार त्यांनी
आयुष्याची वाटचाल सुरू केली. परत येताना नेवासे येथे आल्यावर निवृत्तीनाथांनी
ज्ञानेश्वरांना गीतेच्या भावार्थाचे विवेचन करण्याचा ‘आदेश’ दिला. त्यातूनच ९ हजार ओव्यांचा भावार्थदीपिका हा ग्रंथराज सिध्द
झाला.
मूळ गीतेत ७०० श्लोकच असताना
ज्ञानेश्र्वरांनी गीतार्थांचा विस्तार ९००० हजार ओव्यात का केला असावा? ह्याचे साधे कारण नाथपरंरेतून
त्यांना मिळालेल्या अमाप समाधीधनाशी गीतेची भूमिका मिळतीजुळती होती ! तांत्रिकदृष्ट्या पाहिल्यास गीतेतला फक्त सहावा अध्याय योगावर आहे. ह्या
अध्यायात श्रीकृष्णाने स्वतःहून योग म्हणजे काय ते समजावून दिले. अर्जुनाने
विचारलेल्या शंकांचे समाधानही केले आहे. सहाव्या अध्यायातील २७ शलोकांचा ४९४
ओव्यात विस्तार करताना ज्ञानेश्वरांच्या रसवंतीला बहर आला. अनेक अध्यायावरील विवेचन
त्यांनी थोडक्यात आटोपते घेतले. ज्ञानेश्वर असे मानतात की गीता ही ‘कांडत्रयिणी’ आहे. ज्ञानकांड, कर्मकांड आणि ईश्वरकांड
हीच ती तीन सुप्रसिध्द कांडे! ज्ञानेश्वरांच्या
मते, नवव्या अध्यायात गीतेचा प्रतिपाद्य विषय संपला. मग पुढचे अध्याय कां असा
प्रश्न पडतो!
त्या प्रश्नांची उत्तरे योगसामर्थ्य
प्राप्त करून घेत असताना आणि घेतल्यानंतरही योग्यांना मिळावी म्हणून पुढचे अध्याय
लिहलेले असावेत असे वाटते. योगभूमिकेवर आरूढ होण्यापूर्वी आणि आरूढ झाल्यानंतर
योग्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. योगी आपल्या मूळ प्रवृत्तींच्या आहारी
जाण्याचा धोका असतो. तो धोका टाळण्यासाठी विशेष गुणसंपत्तीची गरज असते. त्या
गुणसंपत्तीचे विवेचन करण्यासाठी १० पासून १७ पर्यंतच्या अध्यायांची रचना झाली आहे.
ह्या अध्यायांचे स्वरूप नवव्या अध्यायातील श्लोकांची पुरवणी म्हटली तरी चालेल. त्यांचे स्वरूप appendix सारखे -– पुरवणीसारखे--
आहे. ‘योगभूमीरूढ’ आरूढ
होऊ इच्छिणा-यांच्या दृष्टीने हे अध्याय महत्त्वाचे आहेत. ‘भक्तु तोचि योगी’
वगैरेंनी कुणाचेही शंकासमाधान व्हावे अशा काही मार्मिक ओव्या जागोजाग
विखुरल्या आहेत. योगसाधना काळात त्या ओव्या मार्गदर्शक ठरू शकतात. शेवटी गुरूरूपी ईश्वरच
योग्यांचा योग सिध्दीस नेतो असा महत्त्वाचा सिध्दान्त ज्ञानेश्वरांनी मांडला आहे.
एरव्ही दांभिकपणाखेरीज काही साध्य होत नाही
असे ज्ञानेश्वरांना वाटत असले पाहिजे. ‘योगयाग
विधी तेणे नोहे सिध्दी वायाचि उपाधी दंभ’ असा स्पष्ट इशारा त्यांनी
हरिपाठाच्या अभंगात दिला आहे.
ज्ञानेश्वरीचे पारायण हे समूह शिक्षणाचे
अतिशय महत्त्वाचे आहे. वारकरी शिक्षणसंस्थेत ज्ञानेश्वरी, तुकारामगाथा, नामदेव
गाधा आणि एकनाथी भागवत ह्या चार ग्रंथांच्या अभ्यासास अतिशय महत्त्व आहे. शिक्षणानंतर
पंढरपुरची वारी आलीच! विठ्ठलमूर्ती ही उभी असली तरी ती योग
प्रकारातील आहे असे मूर्तीशास्त्राचे मत आहे. शंकराचार्यांनी तर पंढरपूरला योगपीठच
संबोधले आहे. अहंता आणि ममता सोडल्याखेरीज योगाची प्राप्ती नाही असा स्पष्ट आशय ज्ञानेश्वरांना
अभिप्रेत आहे. ज्ञानेश्वरांना संपूर्ण ईश्वरनिष्ठा अभिप्रेत आहेच. नुसत्या
गुरूस्मरणाने ‘बैसता क्षणी’
समाधीस्थिती प्राप्त होते असे त्यांनी सहाव्या अध्यायातील एका ओवीत म्हटले आहे.
ह्याचाच अर्थ गुरूकृपेखेरीच योगाचा खटाटोप
व्यर्थ ठरतो असे संतांचे म्हणणे आहे. गेल्या अनेक शतकात गुरूसंस्थेला जितकी महती
प्राप्त झाली तितकीच ती बदनामही झाली. परंतु ती संपूर्ण लुप्त कधीच झाली नाही. तुकाराममहाराजांना
बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात अनुग्रह दिला. नामदेवांना विसोबा खेचरांनी दीक्षा दिली
तर मुक्ताईंनी चांगदेवांना दीक्षा दिली. ज्ञानेवरांना मिळाली तशी दीक्षा आधुनिक
काळातही अनेकांना मिळाली. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, नारायणतीर्थांसारख्यांनी त्याच
प्रकारची दीक्षा अनेकांना दिली. अक्कलकोट स्वामी, साईबाबा, गजाननमहाराज,
शंकरमहाराज अशी सिध्दयोग्यांची अनेक उदाहरणे आहेत. स्वरूपानंद, गुळवणीमहाराज
इत्यादि अलीकडची उदाहरणे आहेत. जोगमहाराज, बंकटस्वामी, मामासाहेब दांडेकर,
निवृत्तीबुवा देशमुख, स. के. नेऊरगावकर ह्या सगळ्यांना ज्ञानेश्वरांच्या परंपरेतील
दीक्षा मिळाली होती. योगानंदांनाही अशीच दीक्षा मिळाली. योगानंदांनी वर्धा
मुक्कामी गांधींजींना स्वतः योगमार्गाची दीक्षा दिली.
फार पुरातन काळापासून भारतात सुरू झालेला
योगाचा प्रवाह अजूनही अखंड सुरू आहे. बाबा रामदेवांचा योग हा फक्त हटयोगावर आधारित
आहे. स्वास्थ्यलाभ हा त्यांच्या योगपध्दतीचा फायदा म्हणता येईल. आर्ट ऑफ लिव्हिंग
शिकवणारे श्रीश्री रविशंकर ह्यांचा शिष्य परिवार मोठा आहे. योगदिनानिमित्त
सुचलेले विचार मी ह्या लेखात मांडले आहे. ब-याचशा गोष्टींचा ह्यात समावेश झालेला
नाही ह्याची मला जाणीव आहे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment