Wednesday, June 17, 2020

सहेतूक गोळीबार


हिंदी-चिनी सैनिकात लडाख सीमेवरील गलवन भागात झडलेल्या गोळीबाराच्या फैरीत आपल्या लष्कराचा एक कर्नल आणि २ सैनिक ठार झाले. ठार झालेल्यांचा आकडा कमीजास्त असू शकतो. ह्या गोळीबारात चीनी सैनिकही ठार झाले. कोणाचे किती सैनिक ठार झाले हा मुळी महत्त्वाचा मुद्दा नाहीच. गलवन भागात शांतता राखण्याच्या संदर्भात दोन्ही देशात मेजर जनरल पातळीवर चर्चा झाल्या. चर्चेत ठरल्यानुसार चीनी सैनिक थोड मागेही हटलेही. गेल्या ७५ वर्षांत भारत-चीन सीमेवर गोळीबार केला जाण्याची ही पहिलीच घटना आहे. सीमेवर असे काय घडले की ज्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांत परस्परांवर गोळीबार करण्याची वेळ यावी? भारत-चीन सीमा सुमारे ४ हजार किलोमीटर्स लांबीची आहे. भारत-पाकिस्तान-चीन ह्यांच्या सीमा या फक्त ७६ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या सियाचीन ट्राय-जंक्शनला येऊन मिळतात. ह्यापूर्वी भूतानला लागून असलेल्या डोकलाम परिसरात चीनने रस्ता बांधायला घेतला होता. रस्ता बांधण्याच्या कामी सहकार्य देण्यास  भारताने नकार दिला होता. रस्त्याच्या बाबतीत भारताने चीनला सहकार्य देण्याऐवजी हिमालय परिसरात केदारनाथजवळून जाणारा रस्ता बांधण्याचे काम भारताने सुरू केले. ह्या रस्त्यात गौरीकुंड होत्याचे नव्हते झाले! हा रस्ता चीनहून थेट युरोपला जाणा-या रस्त्याला जाऊन मिळणार आहे म्हणे!
युरोपच्या बाजारपेठेत आपला माल पाठवता यावा म्हणून रस्ते बांधण्याचे चीनने मनावर घेतले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप ह्यांच्या अमेरिका फर्स्टधोरणाचा चीन-अमेरिका व्यापारावर विपरीत परिणाम झाला. अमेरिकेच्या धोरणाची चीनला झळ बसू नये म्हणून दक्षिण आशियाई व्यापार धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणला. नेपाळ, श्रीलंका, माले आणि पाकिस्तान ह्या भारताच्या शेजारी देशांशी आर्थिकव्यापारी आणि राजकीय संबंध नव्याने प्रस्थापित करण्याचा जोरदार प्रयत्न चीनने चालवला आहे. मालेमध्ये सत्ता बदलताच चीनच्या नादी न लागण्याचे मालेने ठरवले. ह्याउलट नेपाळने प्राचीन काळापासून चालत असलेले भारताचे संबंध बाजूला सारून भारताबरोबर सीमातंटा उपस्थित केला. भारताच्या ताब्यात असलेल्या कालापानी, लिपुलेख आणि लिंफीयादुरा  या ३९७ चौ.किमीच्या 'ट्राय-जंक्शन' भूभागावर नेपाळने अवैध दावा केला आहे. नेपाळला चीनची फूस आहे  हे उघड आहे
भारतानेही लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देऊन पूर्व लडाख भागात लष्करी वाहनांना जाणअयायेण्सोयाच्या दृष्टीने  सोयिस्कर ठरतील असे रस्ते बांधण्याचा  कार्यक्रम हाती घेतला. भारताच्या ह्या कार्यक्रमात व्यत्यय आणणे हा चीनचा उद्देश असू शकतो. त्याखेरीज दक्षिण आशियात राजकीय आणि आर्थिक वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेत खोडा घालणे हाही चीनचा सरळ सरळ हेतू आहेच. दक्षिण आशियातील वर्चस्वामुळे वृध्दिंगत होणारे भारत-अमेरिका संबंघांनाही थोडेफार बळ प्राप्त होणार आणि हेच नेमके चीनला नको आहे. काही वर्षांपूर्वी भारत-अमेरिका ह्यांच्यात झालेला पॅसिफिक करारही चीनच्या नजरेतून सुटलेला नाही.
१९६२ साली झालेल्या भारत-चीन सीमायुद्धाची दोन्ही देशातल्या नेत्यांची आठवण पुसली गेली असली तरी जनमानसातली आठवण मात्र अजूनही  पुसली गेलली नाही! दोन्ही देशात युद्ध  सुरू होण्यापूर्वी  भारत चीन मैत्रीचे नारे लावले जात होते. खुद्द पं. नेहरू आणि चौ एन लाय ह्या दोघांच्या वैयक्तिक संबंधांबद्दलही त्या काळात खूपच गाजावाजा झाला होता! जगभऱातल्या अनेक देशाशी व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनीअनेक देशांचे दौरे केले.चीनचाही तीन वेळा दौरा केला. त्या दौ-यात आणि जागतिक संघटनांच्या निरनिराळ्या बैठकीनिमित्त  भाग घेण्याच्या निमित्ताने चीनी नेते क्षी ह्यांची मोदींनी जवळ जवळ १८ वेळा भेट घेतली! क्षी ह्यांच्याशी वैयक्तिक संबंध निर्माण करण्यासाठी असलेले आणि नसलेले सारे कौशल्य मोदींनी पणाला लावले. क्षींसमवेत झोपाळ्यावर बसून हिंदोळे घेतले. दक्षिणेत क्षींच्या मुक्कामांची सोय करून त्यांच्यासमवेत काही तास घालवले. परंतु क्षींबरोबरच्या वैयक्तिक संबंधांचे फळ काय? गलवन भागात गोळीबार! नेहरूंनी जागतिक  राजकारणात हिरीरीने भाग घेतला. सोविएत रशिया किंवा अमेरिकेच्या कळपात सामील न होता तटस्थ राष्ट्रांचा वेगळा  गट स्थापन केला. कितीतरी देशांशी परस्पर आर्थिक, सांस्कृतिक व्यापारी मैत्रीचे करार नेहरूंच्या काळात भारताने केले. त्या करारांचे यशापयश जोखण्याचा मुद्दा वेगळा! रशिया, क्युबा किंवा पॅलेस्टाईनच्या नेत्यांबरोबर वैयक्तिक संबंध निर्माण करण्यात इंदिराजीही कमालीच्या यशस्वी झाल्या. ह्या दोघांशी पंतप्रधान मोदी बरोबरी करू शकतील का असा प्रश्न विचारल्यास वावगे ठरणार नाही. लडाख सीमेवर झालेल्या गोळीबारामुळे परिस्थिती चिघळत जाऊन त्याची परिणती थेट भारतचीन युद्धात  होईल असे नाही. चीनलाही भारताबरोबर सध्या तरी युध्द कुठेहवे आहे ? कोरोनाशी झुंजत असलेल्या भारताला सहज जाता जाता चिमटा काढावा एवढाच माफक उद्देश चीनचा असू शकतो. कोरोना प्रकरणावरून चीनच्या विरोधात जागतिक लोकमत तयार होत असताना चीनविरोधी आवाज उठवण्याच्या भानगडीत भारताने पडू नये असा जणू इशारा तर  भारताला चीनने दिला नसेल?
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: