दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि नरसिंह राव ही दोन नावे माझ्या पत्रकारितेच्या करीअरशी
निगडित आहेत. दोन्ही नावांशी माझ्या ‘न्यूज करीअर’चा विलक्षण संबंध आहे! इंदिरा गांधी
ह्यांच्या दौ-याबरोबर माझे न्यूज करीअर सुरू झाले आणि नरसिंह रावांबरोबर केलेल्या
ओमान दौ-यानंतर माझ्या न्यूज करीअरची अखेर झाली आणि सहसंपाद म्हणून माझे नवे करीअर
सुरू झाले. सहसंपादक असतानाच्या काळात अग्रलेख लिहणा-यांच्या टीममध्ये माझा समावेश
झाला. दोन्ही दौ-यात कर्तृत्वान पंतप्रधानांसमवेत झालेल्या प्रत्यक्ष वार्तालापाच्या
आठवणी ही माझ्या आयुष्याची ठेव आहे.
इंदिरा गांधींच्या आठवणींवर मी मागे
लिहलेच होते. गेल्या रविवारी पंतप्रधान नरसिंह राव ह्यांच्या ९९व्या जन्मदिनी
झालेल्या कार्यक्रमप्रसंगी हे वर्ष नरसिंह राव जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे
करण्याची घोषणा तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष एन. उत्तमकुमार ह्यांनी केली. आपल्या
सरकारनियंत्रित अर्थव्यवस्थेचा मोहरा फिरवणआरा पंतप्रधान नरसिंह रावांना कमालीचे
यश मिळाले. ही अवघड कामगिरी पाड पाडण्यासाठी रावांनी अर्थतज्ज्ञ मनोमोहनसिंगांचा
केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. मनमोहनसिंगांना नरसिंह रावांनी केवळ
अर्थमंत्रीपदच दिले असे नाही तर त्यांना संपूर्ण स्वातंत्र्यही दिले. नरसिंह
रावांच्या रूपाने देशाला एक कर्तृत्ववान आणि जमिनीवर चालणारा समंजस पंतप्रधान
लाभला.
नरसिंह रावांना मी समंजस हे विशेषण
लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील! परंतु
नरसिंह रावांच्या समंजसपणाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. 27 वर्षांपूर्वी त्यंच्याबरोबर ओमानचा दौरा करण्याची संधी मिळाली. टिकेरांनी
कंपनीचे अध्यक्ष विवेक गोएंका ह्यांना माझ्या नावाचा प्रस्ताव पाठवला. विवेक गोएंकांनी
माझ्या नावाला लगेच मंजुरी दिल्याचे त्यांचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी राजा राव
ह्यांनी टिकेरांना आणि मला फोन करून कळवले.
ठरल्याप्रमाणे दौ-यात सहभागी होण्याच्या दृष्टीने व्हिसा, तिकीट वगैरे औपचारिकतेची
पूर्तता करण्यासाठी मी दोन दिवस आधी दिल्लीस गेलो. वेगवेगळ्या वर्तमानपत्रांचे
प्रतिनिधी मिळून आम्ही पंचवीस पत्रकार दौ-यात सहभागी झालो होतो. ह्या तीन
दिवसांच्या दौ-यात पहिल्या दिवशी नरसिंह रावांना भेटण्याचा तर सोडाच त्यांची
दृष्टीभेट होण्याचाही योग आला नाही. पत्रकारांना माहिती देण्याचे काम परराष्ट्र
खात्याचे प्रवक्ते प्रसाद ह्यंच्याकडे होते. चर्चेत कोणत्या विषयावर बोलणी झाली
ह्याची माहिती प्रसाद हे स्वतः शेरेटन हॉटेलात खास स्थापन करण्यात आलेल्या मिडिया
सेंटरमध्ये हजर होऊन देत होते. त्यानंतर बातम्या डेडलाईनच्या आधी ऑफिसला
पाठवण्यासाठी आम्हा सगळ्यांची खूपच तारांबळ उडायची. मस्कतचे घड्याळ मुंबईच्या
घड्याळापेक्षा अडीच तास मागे असल्यामुळे प्रत्यक्षातली साडेनऊची डेडलाईन सात
वाजेवर आली!
दुस-या दिवशी नरसिंह राव ओमानमधील भारतीय
उद्योपतींच्या मेळाव्यासा उपस्थित राहणार होते. त्या मेळाव्यास मात्र पत्रकारांना
उपस्थित राहण्याची परवानगी होती. त्यानुसार आम्ही सगळे पत्रकार मेळाव्यास हजर
झालो. मेळाव्यात उपस्थित असलेले उद्योगपती आणि पत्रकार ह्या सा-यांनी ओळीने उभे
राहून स्वतःच स्वतःचा परिचय नरसिंह रावांना करून दिला. ह्या कार्यक्रम सुरू असताना
नरसिंह रावांना तेथल्या उद्योगपतींनी अडीअडचणी कथन केल्या. त्यांच्या अडीअडचणी
पंतप्रधान लक्षपूर्वक ऐकून घेत होते. त्या अडचणी ऐकण्यात पत्रकारांना अर्थात रस
होता. त्याहीपेक्षा पंतप्रधनांच्या प्रतिसादाकडेच पत्रकारांचे जास्त लक्ष होते.
परंतु रावांचा प्रतिसाद ‘नॉनकमिटल’ स्वरूपाचा होता. बोलघेवडेपणाही
त्यांच्या स्वभावात नव्हता हे त्यावेळी माझ्या लगेच लक्षात आले.
परतीच्या प्रवासात मात्र ज्याची मी
आतुरतेने मी वाट पाहात होतो तो प्रसंग समोर उभा राहिला. विमानाच्या मागच्या बाजूस
प्रेसच्या आसनांपाशी पंतप्रधान नरसिंह येऊन उभे राहिले. क्षणभरात पत्रकारात शांतता
पसरली. पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याची हीच संधी असते हे सगळ्यांना माहित असते.
योगायोगाने माझ्या आसनाशेजारीच आकाशवाणी प्रतिनिधीचे आसन होते. नरसिंह रावदेखील
माझ्या आसनापाशी थांबताच आकाशवाणी प्रतिनिधीने पोर्टेबल टेपरेकॉर्डर ऑन केला. मी
जवळच उभा असल्याने प्रश्न विचारण्याचा पहिला चान्स मीच घेतला!
‘ओमानच्या सुलतानांबरोबर चर्चा करताना
पाकिस्तानचा, विशेषतः काश्मिरचा प्रश्न निघाला का?’
मराठीतून विचारलेला माझा प्रश्न कितपत
योग्य-अयोग्य ह्याची मला कल्पना नव्हती. इम्प्रॉम्टू प्रेसकॉन्फरन्समध्ये पहिलाच
प्रश्न विचारणे म्हणजे कॅरमचा स्ट्राईकर हातात घेऊन बोर्ड फोडण्यासारखे असते!
प्रश्न योग्य की अयोग्य ह्याचा विचार करत बसलो तर पत्रकाराला कुठलाच
प्रश्न विचारता येणार नाही. शिवाय प्रश्न विचारण्याची पुन्हा संधी मिळेल की नाही
ह्याचीही शाश्वती नसते.
माझ्या प्रश्नाचे नरसिंह रावांनी मजेशीर
उत्तर दिले. ते म्हणाले, ‘असे प्रश्न चर्चेत
निघत नसतात!’ थोडं थांबून ते म्हणाले, ‘असे प्रश्न काढायचेही नसतात!’
त्यांचा सूर कमालीचा समजूतदारपणाचा होता...
मुलाला एखादी गोष्ट समजावून सांगताना प्रेमळ वडिलधा-या व्यक्तीचा सूर जसा असतो तसाच
सूर नरसिंह रावांचा होता. कुठेही चीडचीड नाही की अगांतुक शहाणपणाची झाक नाही. दोन
देशांच्या संबंधाविषयी नेत्यांत होणा-या चर्चेचे एक महत्त्वाचे सूत्रच नरसिंह रावांनी
जाता जाता सांगून टाकले! एखादा विषय काढण्याची गरज असेल तरच तो
विषय काढायचा असतो. अन्यथा तो काढायचाही नसतो हेच त्यांनी मला हसत हसत सांगितले.
माझा प्रश्न मराठीत असल्यामुळे
आकाशवाणीच्या प्रतिनिधीखेरीज तो कुणालाही समजला नाही. रावांनी माझ्या प्रश्नाला
काय उत्तर दिले हे तर मुळीच समजले नाही. पत्रकारांत सुरू झालेली कुजबूज थांबली आणि
नरसिंह रावांनी अनेक पत्रकारांच्या प्रश्नाला जवळ जवळ १० मिनीटे उत्तरे दिली. नरसिंह
राव निघून गेल्यानंतर मी काय प्रश्न विचारला हे जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी माझा
पिच्छा पुरवला. त्यावर त्यांनी काय उत्तर
दिले हेही सगळ्यांनाच जाणून घ्यायचे होते. नरसिंह रावांनी दिलले उत्तर थेराटिकल
असल्याचे लक्षात आल्यावर पत्रकारांनी माझा पिच्छा सोडला!
ऑफिसमध्ये रुजू झाल्यावर नरसिंह रावांचे
निर्णय, त्यांनी केलेली वक्तव्ये ह्यावर मी अनेकदा अग्रलेख लिहले. दिल्लीचे
पत्रकार नरसिंह रावांना मौनी हे विशेषण लावायचे. मीही एकदोनदा नरसिंह रावांना ‘मौनमूर्ती’ हे विशेषण लावले, माझे सहकारी शरद
कारखानीस ह्यांनीही नरसिंह रावांना ‘मौनभूषण’ हे विशेषण लावण्यास सुरूवात केली! एके
दिवशी टिकेकरांना नरसिंह रावांचे खासगी सचिव राम खांडेकर ह्यांचा फोन आला. त्यांचे
फोनवर काय बोलणे झाले मला कळले नाही. टिकेकरांनी मला फक्त एवढेच सांगितले की
तुम्ही लावलेले मौनमूर्ती हे विशेषण नरसिंह रावांना बहुतेक आवडले नसावे. पुन्हा
जेव्हा नरसिंह रावांच्या कुठल्या तरी निर्णयावर अग्रलेख लिहण्याची पाळी माझ्यावर
आली तेव्हा मी अग्रलेखाचे सुरूवीतीचेच वाक्य लिहले,‘योगशास्त्रात
मौन दोन प्रकारचे असते. एक
आकारमौन आणि दुसरे काष्ठमौन! आकारमौनाचा अर्थ
असा की मनात बोलायचे तर खूप आहे पण ते ओठांवर येऊ द्यायचे नाही. काष्ठमौनाचा अर्थ
असा की मनात बोलायचे काहीच
नसते. तेव्हा ते ओठांवर येण्याचा प्रश्नच नाही. नरसिंह रावांचे मौन हे काष्ठमौन
आहे!‘ त्यानंतर पुढे वेगवेगळे मुद्दे लिहून मी
अग्रलेखाचा शेवट केला.
नरसिंह रावांच्या स्वभावात रागाचा लवलेश
नव्हता. वचा वचा बोलत राहण्याचाही त्यांचा स्वभाव नव्हता! जास्त
बोलल्याने कार्यनाश होतो असे अनुभवान्ती त्यांचे मत झाले होते. त्यांचे स्वीय सचिव
राम खांडेकरांनी लोकसत्तेत २०१८ साली लेखमाला लिहीली होती. ती खूपच आवडली हे
कळवण्यासाठी राम खांडेकरांना मी ईमेल पाठवला. त्यात एका मेलमध्ये मी त्यांनी
टिकेकरांना केलेल्या फोनचा विषय काढला. त्यावर खांडेकरांनी मला उत्तर पाठवले,
नरसिंह रावसाहेबांना मी लावलेल्या मौनमूर्ती विशेषणाचा मुळीच राग आला नव्हता. फक्त
कार्यनाश होऊ नये ह्या दृष्टीने कमीत कमी बोलण्याचा त्यांचा स्वभाव होता.
खांडेकरांच्या उत्तराने माझे समाधान झाले.
एका पत्रात खांडेकरांनी दिल्लीतल्या ‘पेड पत्रकारिते’चाही उल्लेख केला. नरसिंह राव, यशवंतराव चव्हाण ह्यासारखे अनेक कर्तबगार
नेते ‘पेड पत्रकारितेचे शिकार’
झाल्याचे मत
खांडकरांनी मला लिहलेल्या एका पत्रात व्यक्त केले. राजधानीत काम करणारे पत्रकार
म्हणजे काय चीज आहे हे स्पष्टपणे सांगणारी खांडेकरांइतकी दुसरी अधिकारी व्यक्ती
मला तरी दिसत नाही.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment