खूप वर्षांपूर्वी काकासाहेब गाडगिळांनी एका भाषणात सांगतले होते की चीनचा
स्वभाव शेजा-याच्या अंगणात जाऊन मुती करणा-या व्दाड मुलासारखा आहे! आमचे आंगण आमचेच
आहे आणि तुम्ही जे स्वतःचे आंगण समजता ते तर आमचेच आहे, ही चीनी
राष्ट्रवादाची खरीखुरी भूमिका आहे. चौएन लाय चीनचे प्रमुख असताना एकीकडे ‘हिंदी चीनी भाई भाई’ अशा घोषणा
द्यायच्या आणि दुसरीकडे चीनकडून भारतात खुशाल सैन्य घुसवले जात होते. कालान्तराने चौनएन
लाय आणि नेहरू हे दोघे नेते निजधामास गेले. पण पन्नास वर्षे उलटली तरी चीनच्या
आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या शैलीत फरक पडलेला नाही. अगदी भारत-चीन संबंध किंवा
अमेरिका-चीन संबंध पूर्ववत् झाले तरी चीनी नेत्यांच्या स्वभावात कदापी बदल होणार
नाही. ह्या संदर्भात ग्लोबल टाईम्सनच्या अग्रलेखात चीनच्या मनोवृत्तीवर चांगलाच
प्रकाश पडला आहे. भारताने अमेरिकेच्या नादी लागू नये असा इशारा ग्लोबल टाईम्सने अग्रलेखातून
भारताला दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे चीनच्या मालकीची एक इंच जमीनदेखील चीन
गमावणार नाही असे चीनचे राष्ट्रीय निःसंदिग्ध धोरण असल्याचेही ह्या अग्रलेखात
म्हटले आहे.
चीनचे नेते क्षी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्या दोघांची भले चारपाच निवांत
भेट झाली असेल! पण भूतानला लागून
डोकलाम भागात चीनने ना त्याच्या कारवाया थांबवल्या ना पूर्व लडाख भागात घुखोरी
थांबवली! मुळात लडाखमधील नियंत्रण
रेषाच चीनला मान्य नाही. अरूणाचलच्या मालकीचा दावादेखील चीनने सोडून दिलेला नाही.
चीनचे कोणत्या देशाशी भांडण नाही? चीनी समद्रातील
अनेक बेटांच्या मालकीवरून चीनचे जपानशी भांडण आहे. अमेरिका जपानच्या पाठीशी आहे.
पूर्व अध्यक्षांच्या काळात पॅसिफिक टापूच्या संरक्षणासाठी अमेरिकेने भारतातबरोबर
लष्करी करार केला होता. हा करार अजूनही कायम आहे. अलीकडचा काळ ट्रंप-मोदी
ह्यांच्या गळाभेटीचा काळ आहे.
दरम्यानच्या काही वर्षांत पाकिस्तानच्या बाजून उभे राहण्याचे अमेरिकेने
सोडून दिले. त्याचाच फायदा घेऊन पाकिस्तानला मदत करण्यास चीन पुढे सरसावला! पाकिस्तानमध्ये
भव्य बंदर बांधण्याच्या कामात पाकिस्तानला चीनची सर्वतोपरी मदत मिळाली आहे.
श्रीलंका, नेपाळ, माले इत्यादी सार्क देशांशी राजकीय आणि व्यापारी संबंधही चीनने
प्रस्थापित केले. हा व्यापारविस्तारवाद चीनने समजून उमजून सुरू केला आहे. ह्या
बाबतीत चीनला कोणी रोखू शकत नाही. खुद्द भारतातही जबरदस्त व्यापारविस्ताराचे धोरण चीनकडून
राबवले जात आहे. भारताला हवा असलेला औद्योगिक माल अल्पावकाशात आणि अत्यंत स्वस्त
दरात उपलब्ध करून देण्याचा चीनचा मोठा उद्योग आहे. वातानुकुलित यंत्रे, रेडियो,
टीव्ही संच, मोटारींची टायर्स, मोबाईल, संगणक काय वाट्टेल ते आयटेम्स संबंधित
कंपनीच्या ब्रँडनेमसकट भारतातल्या कंपन्यांना उपलब्ध करून मिळतात. त्यामुळे ‘मेड इन इंडिया‘ची भारताची हौसही
भागवली जाते! शिवाय निव्वळ
मार्केटिंग केल्याने भारतातल्या कंपन्यांना घसघशीत नफाही होतो! पारंपरिक
बिझीनेसबरोबर पेमेंट बँका, स्टार्टअप्सना साह्य वगैरे नव्या नव्या क्षेत्रांत चीनचे
भारतात आगमन झाल्याला वर्षे उलटली. मात्र, गूगल आणि फेसबुकशी स्पर्था करणे चीनला अजून
जमले नाही. परंतु संधी मिळताच सॉफ्ट वेअर आणि इंटरनेट क्षेत्रातही मुसुंडी मारणारच.
स्वदेशीचा पुरस्कार, परकी मालावर ड्युटी आणि अमेरिका फर्स्ट ह्या
अध्यक्षपदी ट्रंप ह्यांच्या धोरणामुळे अमेरिका आणि चीन ह्यांच्यातले संबंध दुरावत
चालल्याला ४-५ वर्षे झाली. चीनच्या शेजा-यात असा एकही देश नाही की ज्या देशाबरोबर
चीनची कटकट आणि व्यापार नाही पूर्व अध्यक्षांच्या काळात अमेरिका आणि चीन
ह्यांच्यात कटकटी नव्हत्या असा ह्याचा अर्थ नाही. त्या होत्या, पण जिथे राजकारण
तिथे राजकारण आणि जिथे व्यापार तिथे व्यापार असे चीनचे खुल्लमखुल्ला धोरण आहे! तियामेन चौकीतील
मोर्चा असो की चीनी समुद्रातल्या बेटांचा विषय असो, अमेरिकेने चीनला ‘अरे’ म्हटले की चीनने
त्याला ‘कारे’ ने म्हटले नाही असे
कधीच घडले नाही!
चीनबरोबर आपल्याला आणि जगाला आलेल्या अनुभवांच्या पार्श्वभूमीवर मेजर
जनरल पातळीवर भारत-चीन ह्यांच्यात चर्चा केल्याने तोडगा निघेल ह्या भ्रमात भारताने
न राहिलेले बरे! दोन्ही अधिका-यातली ही चर्चा वास्तवात होत
आहे. अगदी खरीखुरी चर्चा आहे. विचार केला तर ह्या चर्चेला व्हर्च्युअल चर्चेपेक्षा अधिक किंमत देण्याचे कारण नाही!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment