Sunday, January 17, 2021

कमल मोरारका

कमल मोरारका हे उद्योगपती होते. चंद्रशेखर ह्यांच्या मंत्रिमडळात ते पीएमओ कार्यालयात आपल्या पृथ्वीराज चव्हाणांसारखे कमल मोरारकाही राज्यमंत्री होते! मुंबईत राहूनही मरली देवरांप्रमाणे मुंबईच्या राजकारणात त्यांनी अजिबात रस घेतला नाही. परंतु मनातल्या मनात त्यांना कुठेतरी ते मुरली देवरांशी  स्वतःशी तुलना करत पण त्यांच्या मनात मुरली देवरांचा मत्सर मात्र त्यांनी कधीच केला नाही!  दोन दिवसांपूर्वी त्यांचे निधन झाले. सतत प्रसिध्दीच्या झोतात राहण्याची त्यांना इच्छा नसल्यामुळे ते कधी लोकांसमोत आले नाही. त्यांना प्रसिध्दीच्या झोतात येण्याची इच्छा नव्हती असं नाही. त्यांना इच्छा होती. त्यासाठी त्यांनी आफ्टनून कुरिअर हे सायंदैनिकही टेकओव्हर केले होते.परंतु पत्रकारांशी संबंध कसे जुळवावे आणि ते कसे राखायचे ह्याचे तंत्र त्यांना अजिबात माहित नव्हते. खरे सांगायचे तर पत्रकारांशी वागताना ते बुजत असत! त्यामुळे मुंबईच्या पत्रकारांनी त्यांची फारशी दखल अशी कधी घेतलीच नाही.
उद्योगपतींच्या जगातल्या शिरस्त्यानुसार रविवारच्या टाईम्समध्ये त्यांच्या निधनानंतर पूर्ण पान जाहिरात आली. त्या जाहिरातीत मोरारकांच्या छायाचित्राखाली म्हटले आहे, Politician by choice. Industrialist by profession. Philanthropist by heart and Humanist. ज्या कुणी कॉपीरायटरने हे लिहले असेल त्याने कमल मोरारकांविषयी मोजक्या शब्दात परंतु अचूक लिहले आहे. विशेषतः पॅलिटियन बाय चॉईस ह्या त्यांना लावलेल्या विशेषणात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही.
पत्रकारांशी संबंध जोडण्याच्या उद्देशाने त्यांनी ताजमध्ये कॅडल लाईट डीनर ठेवले. मला त्या डीनरमध्ये सहभागी होण्याची संधी योगायोगाने मिळाली. मी घरी जायला निघालो तेव्हा आमचे त्यावेळचे वृत्तसंपादक तुकाराम कोकजे मला म्हणाले, तुम्हाला अगदी वेळेवरच घरी चायचे नसेल तर चला माझ्याबरोबर! कुठे जायचे हे त्यांनी मला सांगितले नाही. टॅक्सीत बसल्यानंतर ते मला म्हणाले, आपल्याला ताजमध्ये कमल मोरारका ह्यांच्याबरोबर जेवायला जायचे आहे. तुम्ही व्यापार कॉलम लिहता. तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर आलांत तर मोरारकांना बरे वाटेल!’
ताजमध्ये  कोकजे ह्यांनी कमल मोरारकांशी माझा परिचय करून दिला. कोकजे म्हणाले, हे आमचे कमर्शियल कॉलमिस्ट आहेत. त्यांची तुमची मी मुद्दाम ओळख करून देत आहे. तुम्हाला बातमी द्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी अवश्य संपर्क साधा! 
‘ Oh! I am very glad that Marathi newspaper like Lokstta has a special person for covering commercial news!’
त्या दिवशी मोरारकांशी झालेली माझी ओळख त्यांच्या कायमची स्मरणात राहिली. नरिमन पॉईंटवर त्यांचे कार्यालय जवळ असल्याने त्यांच्याकडे जाण्याचे मला टेन्शन नव्हते. त्यांच्या केबिनमध्ये जाण्यास त्यांच्या स्टाफने मला कधीच मज्जाव केला नाही. गॅन्नन डंकर्ले ही त्यांची इंजिनीयरींग कंपनी. मोठमोठाल्या प्रकल्पांची कामे ही कंपनी घेत असे. त्याखेरीज डकर्ले ग्रुपमध्ये आणखीही इतर कंपन्या होत्या. उत्तरप्रदेशात त्यांच्या मालकीचा साखर उद्योगही होता. मुंबईत गॅसचे सिलिंडर तयार करणारी आणखी एक कंपनी त्यांची होती. राजस्थानमध्ये गांडूळापासून खत तयार करण्याचा प्रकल्प  त्यांनी सुरू केला होता. त्या प्रकल्पात गांडूळ शेती कशी करावी ह्याचे शिक्षणही देण्याची सोय होती.
आणखी त्यांचा आणखी उद्योग कोणाला फारसा माहित नव्हता. मला त्यांनी एकदा फोन केला. ते म्हणाले, 
'झवरजी! आप का मुझे सहयोग चाहिये.'
मी बुचकाळ्त पडलो! मी त्यांना कुठले सहकार्य देणार?
कहिये, सर! क्या हुकूम है?’
मैं राज्यसभा का इलेक्शन लड रहा हूं. यह खबर मै  भिजवा रहा हूं. जरा देख लो..
मोरारकांनी सांगितलेले काम रूटीन स्वरूपाचे होते. त्यामुळे त्यांनी पाठवलेली बातमी छापण्यात मला अडचण नव्हती. त्यांची बातमी लोकसत्तेसह सा-याच वर्तमानपत्रात आली. निवडणूक जवळ येत चालली होती. त्यांचा मला पुन्हा फोन आला, भेटायला याल? मलाही वेळ होता. मी चार वाजता त्यांना भेटायला गेलो. त्यांनी मला लगेच केबिनमध्ये बोलावले. मला उमेदवारी अर्ज मागे घ्यायचाय् असे सांगत त्याची बातमी तुम्ही द्या अशी विनंती त्यांनी केली. मला आश्चर्य वाटलं. थोडा विचार करून त्यांना मी म्हटलं, जरा थांबा. मी सांगेन तेव्हा तुम्ही बातमी जाहीर करा. तुम्ही आपणहून माघार घेत आहात हे मी समजू शकतो. आपणहून माघार घेण्यापेक्षा कुणाच्या तरी विनंतीवरून तुम्ही माघार घेत आहात असं चित्र निर्माण करणं राजकारणाच्या दृष्टीने योग्य ठरतं. त्यांनी माझं म्ङणणं मान्य केलं. मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत सांगतो असं म्हणून मी माझे मित्र शैलेंद्र दुबे ह्यांच्यासह सह्याद्री गेस्ट हाऊसवर एन. डी. तिवारी ह्यांना भेटायला गेलो. तिवारी ह्यांना अखिल भारतीय काँग्रेसने मुंबईला राज्याचे निरीक्षक म्हणून पाठवले होते.
सह्याद्रीवर गेल्याबरोबर दुबे आणि मी तिवारींच्या जवळ गेलो. तुमच्याशी बोलायचंय् अशी विंनंती त्यांना मी केली. बोला ते म्हणाले. सर्वांच्या समोर बोलता येणार नाही, मी सांगितले. आमच्या म्हणण्याचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी दरबारा बसलेल्या सर्वांना विनंती केली, ह्यांच्याशी मला बोलायचं आहे. सगळे जण बाहेर गेले. मला कसं तरीच वाटलं. बाहेर जाणा-यात तत्कालीन खासदार सरोजिनी खापर्डे, नरेंद्र तिडके, शंकरराव आडिवरेकर अशी मातब्बर मंडळी होती!
ह्या वेळी विधानसभेत क्रॉस व्होटिंग होणार अशी आमची माहिती आहे. माझी माहिती खरीही होती. शरद पवारांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना पाडायची खेळी सुरू केली होती. ते त्या वेळी ते समाजवादी काँग्रेसचे नेते होते. तिवारींचे कुतूहल वाढले. किती जण क्रॉस व्होटिंग करतील? ह्या त्यांच्या प्रश्नावर मी उत्तर दिले, किमान १५ जण तरी क्रॉस व्होटिंग करतील!
पुरावा काय?
अशा माहितीला पुरावा नसतो.दुबे
क्या किया जाय?’
त्यानंतर मी त्यांना सुचवलं, कमला मोरारकांनी माघार घेतली तर क्रॉसव्होटिंगचं टेन्शन कमी होईल! त्यावर ते म्हणाले, ते माघार घेतील म्हणतां?...
काँग्रेसने विनंती केली तर कदाचित घेतीलही. आम्ही दोघांनी त्यांना सांगितलं. त्यावर तिवारी म्हणाले, काँग्रेससारखा देशव्यापी पक्ष एका अपक्ष उमेदवाराला तुम्ही माघार घ्या असं सांगायला जाणार नाही. मग प्रश्नच मिटला असे सांगत आम्ही उठलो. तोच तिवारी म्हणाले, थांबा. मी तुमच्याबरोबर माझा प्रतिनिधी देतो. माझ्या वतीने तो मोरारकांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती करील. राजकमल चौधरी आमच्याबरोबर यायला उभे झाले. आम्ही तिघांनी टॅक्सीने नरिमन पाँईंट गाठलं. कमल मोरारकांना आमची वाट पाहा असं आधीच सांगितलं होतं. आम्ही सांगितल्यावंतरच तुम्ही माघार घेणारं पत्र द्यायचं असंही ठरवलं होतं. पत्राचा मसुदाही मी त्यांना डिक्टेट केला होता. त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर राजकमल चौधरींनी तिवारींची विनंती त्यांच्या कावनावर घातली. कमल मोरारकांनी सांगितलं, ठीकाय् !
त्यांनी पीएला बोलावून ट्राफ्ट तयार करायला सांगितलं. खरं तर ड्राफ्ट आधीच तयार ठेवला होता. In the interest of democratic forces I withdraw my candidature वगैरे! कमल मोरारकांचं पत्र घेऊन आम्ही तिघे पुन्हा सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये पोहचलो. राजकमल चौधरींनी मोरारकांचं पत्र तिवारींच्या हातावर ठेवलं. तिवारी खूश झाले. आम्ही तिघेही खूश!
दुस-या दिवशी सर्व वर्तमानपत्रात राज्यसभा निवडणुकीची दणदणीत बातमी छापून आली. त्या बातमीत कमल मोरारकांचं निवेदनही समाविष्ट झालेलं होतं. त्या दिवशी कमल मोरारकांचा मला आभार मानणारा फोन आला.
काही महिन्यांनी मला त्यांचा फोन आला. त्यावेळी त्यांनी मला एक वेगळीच विनंती केली. मला तुम्हाला एक कार विकायची आहे. मी थक्क झालो. माझी ऐपत मला माहित होती. त्यांनी मला जे सांगितले ते ऐकून माझ्या मनाचा गोंधळ उडाला. परंतु नंतर मी थोडा सावध झालो. त्यांच्याकडून कार खरेदी करून मी ती चंद्रशेखरना विकायची असा प्रस्ताव त्यांनी ठेवला. हा प्रस्ताव माझ्या मनाला मान्य झाला नाही. मी ताबडतोब त्यांना  नकार दिला. मनात म्हटलं, अशी मिठ्ठास भाषा मला बोलता आली पाहिजे. माझा नकार ऐकल्यावर त्यांना रागबिग आला असेल असे मला वाटते. पण त्यांना बिल्कूल राग आला नाही. मला वाटले त्यांचे माझे संबंध संपल्याच जमा आहेत. परंतु तसं घडलं नाही. महिन्याभराने त्यांचा मला फोन आला. रिट्झ हॉटेलमध्ये मी चंद्रशेखऱना भेटावं असं त्यांनी सुचवलं. त्यांच्या सूचनेला  नकार देण्याचं मला कारण नव्हतं. ठऱल्यानुसार मी चंद्रशेखरना भेटलोही. भारत यात्रा करण्याचं नियोजन त्यांनी केलं होतं. ठरलेल्या दिवशी त्यांची भारतयात्रा सुरू झाली. भारत यात्रेच्या बातम्या ठिकठिकाणांहून झळकत राहिल्या. मी  मात्र त्यांच्या भारत यात्रेपासून कटाक्षाने दूर राहिलो.
पत्रकारांनी राजकारण करण्याच्या फंदात पडायचे नाही असा संकेत आहे. कमल मोरारकांच्या बाबतीत पत्रकारितेचा हा मी संकेत मोडला.  माझ्या पत्रकारितेत हा एकमेव अपवाद! माझ्याशी नेहमीच मित्रत्वाचे नाते सांभाळणा-या कमल मोरारकांसाठी मी तो अपवाद केला.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रका

No comments: