नाशिक येथे भरणा-या ९४ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गाजलेले विज्ञान लेखक डॉ. जयंतर नारळीकर ह्यांची बहुमताने निवड झाली हे साहित्य संमेलन आयोजकांच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. साहित्य संमेलनाच्या अध्य़क्षीय निवडणुकीवरून आजवर अनेक वादंग झाले. ‘निवडणुकीत मला मत द्या’ अशा प्रकारच्या मिनतवा-या करणे लाजिरवाणे आहे हे ओळखून कुसुमाग्रज, ना. धों महानोर ह्यासारखे कवी निडणूक लढवण्याच्या फंदातच पडले नव्हते. साहित्य संमेलनाचे अधिकारशून्य अध्यक्षपद हे मराठी वाचकांच्या दृष्टीने बहुमानाचे पद आहे. ह्या पदासाठी केवळ निर्बुध्द लोकशाही पध्दतीचा अवलंब करत राहणे म्हणजे म्युनिसिपालिटीच्या निवडणुकीतली गलिच्छ राजकारणाची घाण अंगावर उडवून घेण्यासारखेच होत चालले होते ही वस्तुस्तिती आहे.. ह्या वेळी निवडणूक झाली खरी; परंतु त्या निवडणुकीला लाजिरवाणे स्वरूप आले नाही! अर्थात विज्ञान लेखक बाळ फोंडके, कथाकार भारत सासणे, डॉ. जनार्दन वाघमारे, रामचंद्र देखणे ह्यांच्यासारखे जात्याच शालिनतेचे वरदान लाभलेले आणि मनाने खरेखुरे विनम्र असलेले साहित्यिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते; त्यामुळे अनेक वर्षे सुरू असलेला प्रचाराचा लाजिरवाणा प्रकार ह्या वेळी अभावानेच दिसला.
डॉ. जयंत नारळीकर हे केवळ लेखक
नाहीत.
गुरूत्वाकर्षणाचे माध्यमदेखील लहरीच आहेत हा नवा शोध प्रयोगान्ती सिध्द
करण्यासाठी जागतिक पातळीवर जे संशोधन झाले त्यात डॉ. नारळीकरांनी पुण्यात राहून
सहभागी झाले होते. सावित्रीबाई फुले
विद्यापीठाच्या परिसरात नारळीकरांनी स्थापन केलेल्या आयुकाचाही खगोल संशोधन
संस्थेचा जागतिक पतळीवर सुरू असलेल्या संशोधानाचा निकटचा संबंध आहे. आयुकाचे मानद
प्राध्यापकपद भूषवण्यापूर्वी डॉ. नारळीकर
हे टाटा संशोधन संस्थेत संशोधक होते. त्यापूर्वी परदेशात वास्तव्य असतानाच्या काळात
अनेक संशोधनात ते सहभागी झाले होते. गणिताची पार्श्वभूमी असलेल्या डॉ. नारळीकर ह्यांच्याविषयी
सर्वसामान्य वाचकांना फारशी माहिती नाही असा समज करून घेण्याचे कारण नाही. त्यांनी
सर्वसामान्य वाचकांना रुचेल, पचेल अशा भाषेत अनेक पुस्तके लिहली. कादंबरीसारख्या ललित
लेखनाचा आकृतीबंध त्यांनी मुद्दाम हाताळला. आपल्याला समजलेले सामान्य वाचकांनाही
समजावले पाहिजे अशी त्यांची उदात्त भूमिका आहे. अंगी फार मोठी सिध्दी असूनही त्या
सिध्दीचा बडिवार माजवण्यापेक्षा ती सिध्दी
लोकांच्या कल्याणासाठी वापरता येईल असा विचार करण्याची म-हाठी परंपरा आहे ! लेखन
करण्याची नारळीकरांची भूमिका त्या परंपरेशी नाते सांगणारी आहे.
विश्वनिर्मितीचे
कोडे सुटेल तेव्हा सुटेल!
कृष्णविवराच्या टक्करीवरील संशोधनातून विश्वनिर्मितीचे रहस्य
उलगडण्यास थोडी का होईना मदत होण्याचा दृष्टीने नारळीकरांचा वाग्यज्ञ सुरू आहे. वेदोपनिषद,
कुराण वगैरे धर्मग्रंथांतून विश्वउत्पत्ती आणि विश्व विनाशाच्या
संकल्पना ख-या की खोट्या कोण जाणे! एक मात्र नक्की की जगात
सुरू असलेल्या संशोधनात आयुकाचा वाटा राहील. जगाची जबाबदारी पार पाडत असताना
नारळीकरांना मराठीभाषकांचा विसर पडलेला नाही ह्याची साक्ष त्यांनी अध्यक्षपदी निवड
होताच व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून पटते.
तंत्रस्नेही समाजात विज्ञानात ह्यापुढे विज्ञान रूजण्याची नितांत गरज आहे. एकिविसावे शतक सुरू झाले तरी समाज अंधश्रध्देला चिकटून बसला आहे. त्याला अंधश्रधेपासून परावृत्त करण्यासाठी लेखणी आणि वाणी झिजवण्याचा संकल्प डॉ. नारळीकरांनी सोडला ह्यातच त्यांच्या व्यक्तित्वाचे वेगळेपण दिसून येते. अशी व्यक्ती अध्यक्ष मराठी सारस्वतांच्या मेळाव्यात मार्दर्शनपर भाषणास पुढे आली आहे हा मराठी साहित्य संमेलनाचा भाग्ययोग्य आहे! समाजमनावर खोलवर जखम करून गेलेल्या सामाजिक-राजकीय अन्यायाच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या निरर्थक वादांमुळे अलीकडे साहित्य संमेलनांची कोंडी झाली आहे. नव्या सकारात्मक विचारांचे वारे वाहू लागल्याखेरीज संमेलनाची कोंडी फुटणार नाही. समाज अपेक्षापेक्षा अधिक तंत्रस्नेही झाला हे खरे. पण ज्या तंत्रज्ञानाचा आपण दैनंदिन वापर करतो त्या तंत्रज्ञानाच्या मुळाशी असलेल्या वैज्ञानिक संशोधनाची प्रदीर्घ परंपरा आहे हे सामान्यांच्या तर सोडाच, मोठमोठ्या लोकांच्याही लक्षात येत नाही. साधे मोबाईलचे आणि डाटा वायूवेगाने होणारे प्रेषणाचे उदाहरण पाहिले तर ते उपग्रह तंतत्रज्ञानाच्या मदतीमुळे शक्य झाले आहे हे अनेकांना माहित नाही. डॉ. नारळीकरांचे भाषण केवळ कृष्णविवरासंबंधीच्या संशोधनावरच प्रकास टाकणारे ठरेल असे नाही तर पृथ्वीवासियांच्या भवितव्यासंबमधीही दिशानिर्देश करणारे ठरेल.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. जयंत नारळीकरांचे मनःपूर्वक अभिनंदन!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment