Time changes. Nay, it is the Change that denotes the time! आपण नेहमी म्हणतो, काळ बदलला. परंतु ते खरे नाही. काळ तर अनंत आहे. अनादी आहे. वस्तुस्थिती अशी आहे की अनेक बदल घडलेले आपण पाहतो. आणि म्हणतो, काळ बदलला ! हे वाक्य मी कुठे वाचलं हे मला आता आठवत नाही. अर्थात ते आठवत नसलं तरी त्या वाक्यानं मी भारावून गेलो होतो. डॉ. गिरीश जाखोटिया ह्यांची ‘बदल’ ही कादंबरी वाचताना मला ह्या वाक्याची प्रचिती आली! बजाज मॅनेजमेंट कॉलेज ह्या नामवंत संस्थेत १० वर्षे प्राध्यापकी करता करत ह्या लेखकाने मॅनेजमेंटविषयक स्वतःचे असे तत्त्वज्ञान निर्माण केले. नुसतेच तत्तवज्ञान नाही तर ते समाजाधिष्ठित कसे राहील ह्याचाही सखोल विचार केला. हा विचार प्रत्यक्षात कसा आणता येईल हे त्यांनी कादबंरीच्या माध्यमातून समर्थपणे दाखवून दिले. कादंबरीतील सगळ्या व्यक्तींच्या मनोव्यापारात चाललेली घालमेलही त्यांनी टिपली. ती टिपत असताना त्यात गुंतून न पडता मनात उमटलेल्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तरही त्यांनी शोधले. कादंबरीचे कथानक विश्वव्यापी ठेवल्याने कादंबरीला मोठेच परिमाण लाभले.
कॉर्पोरेट कंपनीपासून ते कोऑपरेटिव्ह अर्बन बँकेत काम करणा-या व्यक्ती ह्या कथेत येतात. त्यांच्या मनात सुरू झालेली घालमेल लेखकाने टिपली आहे. कथा सोलापूर जिल्ह्यातील सांडव ह्या खेड्यापासून ते न्यूयॉर्क-पॅरीसपर्यंत कुठेही उलगडते. मनोलिश्लेषणाच्या खोल पाण्यान न शिरता लेखकाने ती हळुवारपणे उलगडली आहे ! कधी ती मुंबई-पुण्यातील मोठ्या फ्लॅटमध्येही घडते. कथेचा पसारा जपानपासून इथोपियापर्यंत अनेक देशात पसरलेला आहे. ह्या कथेतील बहुतेक व्यक्तींचे प्रेरणास्थान कृष्ण, शिवाजी. किंवा फुले-आंबेडकर ह्यापैकी कुणीतरी एक आहे. शंभर वर्षांहूनही अधिक काळ महाराष्ट्रात वास्तव्य करणा-या आणि मराठी समाजात मिसळूनगेला तरी घरात थेट घूंघटमध्ये वावरणा-या मारवाडी स्त्रियांपासून ते डोईवर पदर घेतल्याशिवाय बैठकीत न येणा-या शहाण्णव कुळी मराठा स्त्रियाही ह्या कादंबरीत वावरतात. विशेषतः गेल्या पन्नास वर्षांत घडणा-या बदलास त्या कशा प्रकारे सामो-या गेल्या ह्याचे मनोज्ञ दर्शन लेखकाने घडवले आहे. मराठा, मुसलमान, आंबेडकरवादी, मारवाडी, चित्पावन इत्यादि विविध जातींधर्माच्या जन्मजात मर्यादा त्या व्यक्ती सहज ओलांडतात. स्वतःच्या स्वभावाच्या कंगो-यांना छेदही देतात. परिस्थितीतून धाडसी मार्ग काढतात आणि त्यांचे इप्सित साध्य करून घेतात! ‘बदल’ कादंबरी वाचताना असे वाटते की ‘बदलती परिस्थिती’ हीच जणू एक जगड्व्याळ व्यक्ती हीच ह्या कादंबरीतले महत्त्वाचे कॅरॅक्टर आहे !
कादंबरीत घडलेल्या घटना निव्वळ कल्पना विलास नाही. बहुतेक घटना समाजात घडलेल्या आहेत. त्या घडत असताना समाजाला धगही जाणवते. वि. स. खांडेकर, शिवाजी सावंत वगैरे कादंबरीकारांनी रूढ केलेली कादंबरी शैली बाजूला सारून लेखकाने व्यक्तीरेखांचे मन ‘नॅरेशन’च्या माध्यमातून उलगडले आहे. ‘नॅरेशन’ची ही शैली काहीशी जुनीपुराणी आहे हे खरे. पण कादंबरीची मांडणी लक्षात घेता 'नॅरेशन'ची शैली अतिशय चपखल आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मनाशी योजलेल्या हेतूशी त्या शैलीने इमान राखणारी आहे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment