नाथ परंपरेचे मूळ शैव परंपरेतज्ञानेश्वरांच्या संजीवनी समाधीचे ७२५वे वर्षे सुरू झाले. अलीकडे ज्ञानेश्वरी ग्रंथाला ७२४ वर्षे पुरी होऊन ७२५ वे वर्ष लागले. ज्ञानेश्वरांच्या समाधीला ७०० वर्षे पुरी झाली झाली तेव्हा लोकराज्याचा विशेषांक निघाला होता. ह्या अंकासाठी त्यावेळचे संपादक दिवाकर गंधे ह्यांनी गुरूवर्य गजानन महाराज अटक ह्यांना लेख लिहायला सांगितले. लेखाचा मुद्दाही त्यांनीच सुचवला होता. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ ७०० वर्षे पुरी झाली तरी तो कां टिकून आहे? सातशे वर्षांनंतरही ज्ञानेश्वरीची लोकप्रियता कमी कां झाली नाही? मी अटकमहाराजांच्या शिष्यवर्गापैकी एक होतो. साहजिकच लेख लिहण्याचे काम माझ्याकडे ओघाने आले. हा लेख लिहण्यापूर्वी मी महाराजांना विनंती केली की त्यांची मुलाखत मी टेपरेकॉर्ड करून घेऊन रेकॉर्डिंग ऐकेन. मगच प्रत्यक्ष अनुलेखन करीन. अशा प्रकारचे लेखनसाह्य पत्रकारांना नेहमीच करावे लागते. मात्र, हे काम सोपे नाही. ह्या कामासाठी पत्रकार आणि वक्ता ह्या दोघांचे चांगले सूत जुळावे लागते.
ज्ञानेश्वरीचे वाचकांच्या मनातले स्थान ७०० वर्षे कां टिकून राहिले असा विषय संपादकांनी दिला होता. त्या अनुरोधाने मी अटकमहाराजांना प्रश्न विचारत गेलो. त्यामुळे माझे काम सोपे झाले. ह्या वेळी वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे असा लौकिक असलेल्या ज्ञानेश्वरांच्या तात्त्विक विचारसरणीचा पाया शोधण्याचा मुद्दा मी निश्चित केला आहे. लेखही माझ्याच संकतेस्थळासाठी लिहीत आहे. माझ्या मते, ज्ञानेश्वरांना मिळालेली नाथ संप्रदायाची दीक्षा हाच ज्ञानेश्वरांच्या तात्त्विक विचारसरणीचा पाया आहे ! ह्याचा अर्थ ज्ञानेश्वरांनी शंकराचार्य, मध्वाचार्य किंवा अन्य भाष्यकारांचा अभ्यास केला नाही किंवा त्यात त्यांना गम्य नव्हते असा कुणीही करू नये. ‘भाष्यकारांचे वाट’ पुसतच त्यांनी गीतेवर भावार्थदीपिका लिहीली ह्याचे अनेक अंतर्गत पुरावे ज्ञानेश्वरीतच आहेत. ज्ञानेश्वरी लिहीली म्हणण्यापेक्षा नेवासे येथे खांबाजवळ बसून श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी धर्मसंकीर्तन केले. ह्याच ह्या धर्मसंकीर्तनाचा सच्चिदानंदबाबा आदरेकरून लेखकु झाला !
ज्ञानेश्वरांनी अठराव्या अध्यायात त्यांची गुरू परंपरा दिली आहे. ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालताना वाघाची डरकाळी ऐकू आली. निवृत्तीनाथांची आणि त्यांच्या आईवडिलांची चुकामूक झाली. ध्यानीमनी नसताना निवृत्तीनाथ गहिनीनाथांच्या गुहेत गेले. गहिनीनाथांनीही निवृत्तीनाथांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ‘ये. मी तुझीच वाट पाहात होतो’ असे सांगून त्यांनी निवृत्तीनाथांना नाथपरंपरेचा अनुग्रह दिला. जणू ते निवृत्तीनाथांना अनुग्रह देण्यासाठीच त्या गुहेत बसले होते! निवृत्तीनाथांसारखा शिष्य आपल्याला मिळेल आणि आणि त्याला अनुग्रह देऊ हे गहिनीनाथांना कसे कळले? खरे तर, वाघांच्या डरकाळीमुळे त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांशी ताटातूट झाली हा निव्वळ योगायोग होता. परंतु मानवी आयुष्यात घडणारे योगायोग विनाकारण घडत नाही. खरे तर, सुटी घटना ह्या एका मोठ्या कार्यकारणभावाची साखळी असते. सुट्या घटनेकडे पाहिले तर ती साखळी त्यावेळी लक्षात येत नाही. सर्वसामान्यांना जे सहज लक्षात येते ते केवळ बुध्दीवर भरवसा ठेवणा-या बुध्दिवाद्यांना मात्र लक्षात येत नाही! ह्याचे कारण घटनांचा कार्यकारण भावाचा त्यांना नकळत विसर पडतो. घटना अनपेक्षित घडून गेलेली असते. त्यामुळे कार्यकारणभाव शोधण्याच्या भानगडीत तो पडत नाही. मानवी आयुष्यात अनेकदा अकल्पित घटना घडतात. त्या घटनांमुळे माणसाचे आयुष्य बदलून जाते.
अनुग्रहानंतर नाथ संप्रदायाच्या परंपरेतील साधूच्या वेषात निवृत्तीनाथ जेव्हा त्र्यंबकेश्वरला मुक्कामाच्या जागी परतले तेव्हा सगळ्यांना आनंद झाला. चिमुकल्या मुक्ताईने ‘हे काय तुझे ध्यान’ असा प्रश्न निवृत्तीदादांना विचारला. साहजिकच निवृत्तीनाथांकडे मुक्ताईच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. म्हणून निवृत्तीनाथांनी नाथपरंपरेचा पेहराव टाकून दिला आणि मुकाट्याने नेहमीचा पेहराव केला. तरी आतून नाथसंप्रदायाच्या दीक्षाप्रसंगी मिळालेला उपदेश त्यांच्या अंतःकरणात रूजला होताच. अनुग्रहाचा त्यांना बिल्कूल विसरला पडला नाही. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नुसताच मंत्र दिला नाही तर नाथसंप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचीही थोडक्यात ओळखही करून दिली. निवृत्तीनाथांनी त्यावर चर्चा केली असावी. त्यांच्या सा-या शंकाकुशंकाही गहिनीनाथांनी अगदी सहजपणे दूर केल्या असाव्यात. गहिनीनाथांना भविष्यात काय घडणार ह्याची थोडीफार कल्पना असावी. नाथसंप्रदायांच्या बहुतेक साधूंना भूतभविष्याचा थोडाफार अंदाज असतो. दुसरे म्हणजे कुठल्याही बाबतीत ‘च’ लावून चालायचे नाही हा नाथ संप्रदायाचा अलिखित संकेत आहे.
नाथ संप्रदायाच्या परंपरेला काश्मिरी शैव संप्रदायाची पार्श्वभूनी आहे. अनेक प्रांतात शैव परंपरा आहेत हे खरे असले तरी कर्नाटकात ती लिंगायत संप्रदायाच्या स्वरूपात अवतरली आहे. कर्नाटकात तर शैव-वैषणव हयांच्यात दंगली उद्भवल्या. ह्या उलट महाराष्ट्रात नाथ संप्रदायाच्या स्वरूपाचे रूपान्तर वारकरी संप्रदायात झालेले दिसते. ह्या संप्रदायात शैव, वैष्णव असे व्दंद्व मुळीच उद्भवले. उलट त्यात जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ ह्यांच्याकडे आलेला दत्त संप्रदायदेखील वारकरी संप्रदायातअगदी सहज मिसळून गेला. दत्त संप्रदायात आणि नाथ संप्रदायप्रणित शैव संप्रदाय ह्यात मुळात व्दंद्व नाहीच. पंढरपूर येथील मंदिरात विठ्ठलाच्या डोक्यावर कैलास राणा आहे. तो सहज कोणालाही दिसतो. एक मात्र खरे की महाराष्ट्रातील शैव वैष्णव संप्रदायात दंगली झाल्या नाही. त्यानंतर रामदास आणि तुकारामाच्या काळातही दंगली अशा घडल्या नाहीत ह्याचे कारण हे सगळे संप्रदाय मूळ भागवत संप्रदाय म्हणूनच ओळखले जातात.
नाथ परंपरेचे रूपान्तर वारकरी संप्रदायात झाले ह्यामागे निवृत्तीनाथ आणि मुक्ताई कारणीभूत आहेत. त्या परंपरेचा ज्ञानेश्वरांनी विस्तार केला. ज्ञानदेवे रचिला पाया हा अभंग सुप्रसिध्द आहे. त्याच बरोबर महाराष्ट्रातील बहुतेक देवळांचे पुजारी गुरव समाजातले आहेत. अन्य देवळात ब्राह्मण पुजारी असतात तसे ह्या देवळांचे नाही. हेच गुजरात, मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातही आहे. गुरव समाजाच्या पुजा-यांनी ग्रंथरचना वगैरे केलेली नाही. परंतु त्यांचा सेवाभाव मात्र सर्वत्र आहे.
वारकरी संप्रदायात ब्राह्मणेतर समजाचा भरणा अधिक आहे असा काहीसा जातीमूलक प्रचारही करण्यात आला. परंतु हा प्रचार बिनबुडाचा आहे. वस्तुस्थिती फारच वेगळी आहे. साधे उदाहरण द्यायचे झाले तर लोकमान्य टिळक हयांच्या गीतारहस्य ह्या ग्रंथात ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या अभंगांचेच दाखले दिले आहेत. वारकरी संप्रदायाला मामासाहेब दांडेकरांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीमुळे आणि त्यांनी केलेल्या कीर्तन-प्रवचनामुळे सर्वाधिक प्रतिष्ठा मिळाली. त्यांचे गुरू जोगमहाराच ह्यांनी आळंदीत स्थापन केलेल्या वारकरी शिक्षण संस्थेत अनेक वारकरी घडले. अभ्यासक्रमात उत्तीर्ण झालेल्या वारक-यांना विचारले जाते, वारक-याला कीर्तनप्रवचनाचा मार्ग चोखाळायचा असेल तर तशी परवानगी दिली जाते. ज्यांना संसारी जीवन जगायचे असेल त्यांना त्यांच्या इच्छेनुसार वागण्याची अनुमती असते. इतके औदार्य अन्य सांप्रदायिक शिक्षण संस्थेत दुर्मिळ आहे. विशेष म्हणजे सर्व जातीजमातीच्या लोकांना संप्रदायात सामावून घेतले जाते. विशेष म्हणजे अनेक मुस्लिम संतही ह्या वारकरी संप्रदाय स्वीकारला असून काही जण संतपदवीपर्यंत गेले आहेत.
गोरक्षनाथ, भर्तृहरी, ज्ञानेश्वर वगैरेंचा अपवाद वगळता अन्य नाथांनी ग्रंथ रचना अशी केली नाही. शिष्याबरोबर संवाद हेच ज्ञानदानाचे मुख्य साधन नाथपंथाने मानले आहे. त्यानंतर शिष्य दीर्घ काळ त्यांच्या सहवासात असेल तर त्याचे शंकासमाधान अनायासे होते. हया काळात क्वचित् शिष्याची परीक्षा पाहण्याचीही लहर गुरूला येते. शिष्याला त्यावेळी गुरूबरोबर वैचारिक संघर्ष करावा लागतो. बस्स एवढेच! हा ‘गुरूसंघर्ष’ सर्रास होतोच असे नाही. कधी कधी प्रसंगच असा येतो की शिष्याच्या मनात किंतुपरंतु येतो. त्यातून गुरूशिष्यात संघर्ष उद्भवतो. पण त्या संघर्षात कितीही चर्चा झाल्या तरी परस्परांबद्दलचा आदरभाव नष्ट होत नाही. उलट असा संघर्ष स्वागतार्ह समजला जातो. अशा प्रसंगातून मार्ग काढण्याची बुध्दी शिष्याला सुचते. गुरूकडून घेण्यात आलेल्या परीक्षेचे स्वरूप मेडिकल स्टुडंटचा परीक्षकांबरोबर होणा-या ‘व्हायवा’सारखे असते. मेडिकल स्टुडंटच्या परीक्षेला जसे महत्त्व असते तसेच महत्त्व नाथ परंपरेतल्या गुरूसंघर्षांलाही असते ! चतुर शिष्य गुरूसमोर नतमस्तकच असतो. त्याच्यातला विनम्रभाव सतत जागरूक असतो. मेडिकलचे विद्यार्थीदेखील सहसा परीक्षकाशी वाद घालत नाहीत. कारण, व्हायवा हा अतिशय निष्णात डॉक्टरांबरोबर होतो. तज्ज्ञाबरोबर चर्चा करताना मतभेद व्यक्त करणे वाटते तितके सोपे नसते. नाथपंथीय गुरू प्रत्यक्ष अनुभवसंपन्न असून त्याच्या कृपेखेरीज आपण समर्थ शिष्य होणार नाही हे शिष्याच्या मनात पक्के ठसवण्यात आलेले असते. शास्त्रवचन आणि प्रचिती ह्याचा मेळ बसल्याखेरीज खरा वारकरी संप्रदाय स्वीकारत नाही. गळ्यात तुळशीमाळ हा निकष नाही. नाक आणि घसा ह्यांच्या बारा अंगुळे अंतरात येणारा जाणारा वारा हीच वारी ह्यावर वारक-यांची दृढ श्रध्दा असतेच असते. ‘डोळे मोडित राधा चाले वारियाने कुंडल हाले‘ ह्या एकनाथाच्या गवळणीचा अर्थ सुष्णुमा नाडीतून ब्रह्मरंध्रातपर्यंत प्रवास करणा-या चित्शक्तीचा हा सांकेतिक उल्लेख आहे.
आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी दिलेल्या आदेशानुसार विठ्ठलपंतांना देहत्याग केला. नंतरच्या काळात निवृत्ती, ज्ञानेश्वर सोपानदेव आणि मुक्ताई ही चारी भावंडे कोरड्या भिक्षेवर जीवन कंठत होती. आजही समाजातील अनेक जण हुषार विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च उचलणारे आहेत. संन्यासाची मुलं म्हणून ज्ञानेश्वरादी भावंडांच्या वाट्याला आलेली उपेक्षा सहन करत असताना आळंदीच्या ब्रह्मवृंदांनी ह्या भावंडांना पैठण पीठाकडे जाऊन अनुकूल आदेश मिळवण्याचे सुचवले होते. पैठण पीठाचा अनुकूल आदेश आल्यास तो आपण शिर्षावंद्य मानू असेआळंदीच्या ब्रह्मवृंदांनी जे सांगितले त्यावर जेव्हा सगळ्या भावंडांची आपापसात चर्चा झाली तेव्हा निवृत्तीनाथांनी पैठणला जाण्याची जरूर काय, असा प्रश्न विचारून पैठणला जाण्यास नकार दिला. त्यासंबंधीचा नामदेवांनी लिहलेल्या अभंगात निवृत्तीनाथांचे मनोगत अतिशय चांगल्या प्रकारे व्यक्त केले आहे. निवृत्तीनाथांच्या तोंडी नामदेवांनी पुढील अभंग टाकला आहे. निवृत्तीनाथ म्हणतात,
नाही जाती कुळ वर्ण अधिकार। क्षेत्री वैश्य शूद्र व्दिज नव्हो॥
ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट। निजबोध इष्ट स्वरूप माझे॥
नव्हों आप तेज वायू व्योम मही। महतत्त्व तेंही विराट नव्हों॥
नव्हे मी सगुण नव्हे मी निर्गुण।अनुभूती भजन होउनी नव्हे॥
निवृत्ती म्हणतसे ऐके ज्ञानेश्वरा। माझी परंपरा ऐसी आहे॥
निवृत्तीनाथांच्या ह्या उत्तरात नाथसंप्रदायाचे सारगर्भ आले आहे. ज्ञानेश्वरांची भूमिका थोडी वेगळी होती. विश्व हे मोहरे लावावे अलौकिक नोहावे लोकांप्रती असे त्यांचे मत होते. शेवटी त्यांचे मत मान्य करून निवृत्तीनाथ त्यांच्याबरोबर पैठणला जायला तयार झाले. ही घटना वारकरी संप्रदायाच्या जन्माचे मूळ कारण ठरली. त्यावेळी त्याची कुणाला कल्पनाही नव्हती. वस्तुस्थिती पाहून पुढे जाणे हेही एक नाथपरंपरेचे वेगळे वैशिष्ट्य आहे. विनाकारण वाद घालत बसण्याची त्यांना जरूर वाटत नाही.
ज्ञानेश्वरीतही वेगवेगळ्या श्लोकांवरील भाष्य लिहीताना नाथ संप्रदायाच्या अनेक खुणा ज्ञानेश्वरीत आल्या आहेत. सहाव्या अध्यायात तर योगमार्गाचे सविस्तर वर्णन करण्याची संधी ज्ञानेश्वरांनी घेतली. मुद्रा, बंध आणि आसनांची माहिती ज्ञानेश्वरांनी अगदी थोडक्यात दिली आहे. त्याशिवाय योगाची खरी किल्ली गुरूस्मरणातच असते हे मोठ्या मार्मिकरीत्या दाखवून दिले आहे. गुरूखेरीज नाथसंप्रदायाला काही महत्त्वाचे वाटत नाही. गीतेत श्रीकृष्णाने योगाबरोबर अन्य विषयांचाही परामर्ष घेतला आहे. गीतेचा भावानुवाद करण्याची भूमिका ज्ञानेश्वरांनी घेतल्याने योगाला जो न्याय दिला तोच न्याय अन्य विषयांनाही दिलाय् मात्र, प्रत्येक प्रकरणात गुरूंचे मनसोक्त स्मरण करायला ते विसरलेले नाही. बाराव्या अध्यायात तर भक्त तोचि योगी असे ज्ञानेश्वरांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
ज्ञानेश्वर हे कवी प्रकृतीचे म्हणून त्यांचे भाष्य उपमा, उत्प्रेक्षा, अर्थान्तरन्यास इत्यादी अलंकारांनी विनटलेले आहे. तर्क कर्कशतेमुळे ते बिल्कूल डागळलेले नाही. पारायण करणा-यांच्या मनात ज्ञानेश्वरांना अभिप्रेत अर्थ ओवीगणिक सहज मनात प्रवेश करत जातो. ज्ञानेश्वर शब्दांना महत्त्व देत नाही. किंबहुना संपूर्ण अर्थ व्यक्त करण्यास शब्द कधीच समर्थ नसतो. ह्यासंदर्भात दुस-या अध्यायातल्या एका महत्त्वाच्या ओवीकडे मी लक्ष वेधू इच्छितो
बिंब बचकेयेवढे प्रकाशा त्र्यैलौक्य थोकडे। शब्दांची व्याप्त्ती अनुभवावी तेणे पाडे॥
अमृतानुभवात तर शब्दावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. शब्द मह्त्त्वाचा खरा! परंतु आत्मतत्त्वाची ओळख करून देण्यापुरतेच त्याला महत्त्व असते. ओळख करून दिली की तो निघून जातो ! त्यानंतर तो तेथे थांबत बसत नाही. तेराव्या अध्यायात तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या जे उलट तेच अज्ञान अशी सोपी सुटसुटीत व्याख्या केली आहे. एकदा ज्ञानाची ओळख करून दिली की अज्ञानाची ओळख करून देण्याचे कारण उरत नाही, असे ज्ञानेश्वरांचे मत आहे. नाथ संप्रदायात अनुभूतीला महत्त्व, शास्त्रीय काथ्याकूट करण्यास मुळीच महत्त्व नाही. मुळात नाथ संप्रदायात योगावर गोरक्षनाथांनी काव्यरचना केली. पतंजलीचे योगसूत्रही लहानसेच आहे. ह्याचे महत्त्वाचे कारण असे की योग शिकण्यासाठी प्रत्यक्ष योगासने करणे महत्त्वाचे! साबरीकवच हे चित्शक्तीचे व्यक्तीकरण तर नाथसंपर्दायात जगत्कारण मानले जाते. स्त्री पुरूषांचे सामरस्य होणे महत्त्वाचे. स्वसंवित्ती, सच्चिदानंद, सिध्दयोग ह्या शब्दातून नाथसंप्रदायाचा मथिथार्थ व्यक्त होते. आत्मसाक्षात्काराखेरीज अन्य कशालाही नाथसंप्रदायात महत्त्व नाही. मौनाची अक्षरे भली ह्याचाही अर्थ तोच आहे. जिसने पाया उसने छिपाया सारखी वचने रूढ आहेत. योगशास्त्रावर गोरक्षनाथांचे ग्रंथांचे स्वरूप मूलभूत असून ते आजही अजोड आहेत. गोरक्षनाथ हे सगळ्या योग्यांचे परात्पर गुरू आहेत. ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी तो ग्रंथ जरूर वाचावा. पण त्याचे स्वरूप ॲकेडेमिक आहे. सगळ्यांनी तो वाचलाच पाहिजे असे काही नाही.
नाथसंप्रदायाचे तत्तवज्ञान आणि शंकराचार्यांचे किंवा अन्य आचार्यांचे भाष्य ह्यात तसे पाहिल्यास फारसा फरक नाही. फरक एकच. अन्य भाष्यात दृष्टांतांनी सिध्दान्त पटवून दिला जातो. सिध्दसिध्दान्त पध्दत, कुलार्णव तंत्र, अथवा शरीरातील नाड्या, पंचप्राण वगैरे नाथसंप्रदयातल्या संज्ञा आध्यात्मशास्त्रालाही मान्य आहेत. गीता लिहीण्यासाठी ज्ञानेश्वरांनी गीतेचीच निवड कां केली? त्याचे कारण उघड आहे. गीतेचे स्वरूप उपनिषदासारखे असले तरी त्यात योगावर भर दिला आहे. गीतेच्या पुष्पिकेत योगशास्त्रे असा निर्देश आहे. त्याखेरीज नाथ संप्रदायातील सगळे नऊ नाथ हे नारायणाने घेतलेले विविध अवतार आहेत. जीवदशेला प्राप्त झालेल्या सगळ्यांना मोक्षाचा सारखाच अधिकार दिला आहे. वर्णभेद वर्णवर्चस्वाला त्यात बिल्कूल थारा नाही. हीच आध्यात्मिक लोकशाही! तेराव्या शतकात अवतरलेल्या ज्ञानेश्वरांनी लिहलेली भावार्थदीपका ही आधात्मिक लोकशाहीची ‘घटना’च आहे. गजाननमहाराज अटक असं सांगत असत की, बाबासाहेब आंबेडकारांनी देशाला घटना दिली. भगवान श्रीकृष्णाने मनुष्यमात्रास गीतेच्या रूपाने घटना बहाल केली. तुमची आदिभौतिक आणि आधिदैविक उन्नतीची फिकीर करत बसण्यापेक्षा जीवनाच्या समरांगणावर लढा असा गुरूवर्य श्रीकृष्णाचा निरोप ज्ञानेश्वरांनी मराठी माणसांपर्यंत पोहचवला आहे. निरूपण हा शब्द निरोपानिदर्शकच आहे. नुसतीच आदिभौतिक नव्हे, तर तुमचा योगक्षेम चालवण्याची हमी चौथ्या अध्यायात कृष्णाने दिली आहे.
गीता आणि नाथसंप्रदाय ह्यांच्यात विलक्षण साम्य आहे म्हणूनच निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना गीतेवर भाष्य करण्याचा ‘आदेश’ दिला. ज्ञानेश्वरांनीही तो तंतोतंत पाळला. त्यानंतर ब्रह्मवस्तुचे निरूपण करण्याचा आदेश त्यांनी ज्ञानेश्वरांना दिला. हा ग्रंथ ब्रह्मस्वरूपाचे स्वतंत्र विवेचन करणारा आहे. तरीही त्यात नाथसंप्रदायांच्या तत्त्वज्ञानाचे अनुसरण ज्ञानेश्वरांनी सोडलेले नाही. दुसरे म्हणजे ज्ञानेश्वरानी केलेल्या अभंगांच्या रचनेतही हे नाथ संप्रदायाचे सूत्र सोडलेले नाही. अवुभवाविण ज्ञान नाही हा नाथ संप्रदायाचा निष्कर्ष ज्ञानेश्वरांनी एक अभंगात सांगितला आहे. अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, चांगदेवपासष्ठी आणि स्फुट अभंगात व्यक्त झालेल्या तत्त्वज्ञानात एकच सूत्र आहे: अव्दैत सिध्दान्त आणि नाथ संप्रदायाच्या सिध्दान्तात फरक नाही. फरक आहे तो भाषेचा. शंकराचार्यांचा सिध्दान्त संस्कृत भाषेत आहे तर ज्ञनेश्वरांनी प्रतिपादन केलेले तत्त्वज्ञान हे मराठीत आहे. विशेषतः तेराव्या शतकात कर्मकांडाचे प्रस्थ माजले होते. ज्ञानेश्वरांच्या मते गीता ही कांड त्रयिणी आहे. त्यात ज्ञानकांड, कर्मकांड आणि ईश्वरकांड ह्या तिन्ही कांडांचे ज्ञानेश्वरांनी यथायोग्य वर्णन केले. म्हणूनच काही श्लोकांवर विवेचन करताना भरपूर ओव्या लिहल्या आहेत तर काही श्शोकांचा अर्थ लावताना एकदोन ओव्यातच संपवला आहे.
रमेश झवर
No comments:
Post a Comment