Tuesday, December 14, 2021

गीता जयंतीनिमित्त

                                              नित्य गीतावाचन

आज गीता 
जयंती. तिथीनुसार मार्गशीर्ष शुध्द एकादशीस सांगितली. भारताचार्य चिंतामणराव वैद्य,  रा. गो. भांडारकर, लोकमान्य टिळक इत्यादींनी महाभारताचे विपुल संशोधन केले आहे. टिळकांनी तर जयद्रथवधाच्या दिवशी कंकणाकृती  सूर्यग्रहण झाले असावे  असा तर्क केला आहे. त्यांच्या मते,  सूर्यास्तापूर्वी जयद्रथाला ठार मारीन
; अन्यथाअग्नी काष्टे भक्षण करून प्राणत्याग करीन, अशी प्रतिज्ञा अर्जुनाने केली. अर्जुनाची प्रतिज्ञा पुरी झाली नाही तर फुकाफुकी  अर्जुनाचा बळी जाईल, अशी श्रीकृष्णाला काळजी वाटू लागली. त्याने जयद्ररथाची दिशाभूल करण्यासाठी सुदर्शन चक्राने सूर्यबिंब झाकून टाकले. जयद्रथाला वाटले की सूर्यादय झाल आहे ; अर्जून आपल्याला मारणाऱ नाही. उलट तोच प्राणत्याग करील. लपून बसलेला जयद्रथ बाहेर आला त्या क्षणी कृष्णाने सुदर्शन चक्र काढून घेतले. सुदर्शन चक्र काढताच सूर्य दिसू लागला !  त्याने अर्जुनला सांगितले, हा सूर्य आणि हा पाहा जयद्रथ ! अर्जुनानेही एकाच बाणात जयद्रथाचे शिर उडवले.

महाभारतकारांनी सू्र्यग्रहणाचा अतिशय कल्पकतेने उपयोग करून घेतला. लोकमान्य टिळक हे ज्योतिष गणिताचे अभ्यासक होते. कंकणाकृती सूर्यग्रहण केव्हा झाले हे त्यांनी शोधून काढले. त्यावरून महाभारत युध्द केव्हा सुरू झाले, गीता नेमकी केव्हा सांगितली इत्यादि तारखा संशोधकांनी निश्चित केल्या, भारताचार्य चिंतामणराव वैद्य ( महाभारताचा विशेष अभ्यास करणा-यांना त्या काळात शंकराचार्यांकडून भारताचार्य’ अशी पदवी दिली जात असे. ) ह्यांनी हरिवंश आणि भागवत ह्या ग्रंथांचा सखोल अभ्यास करून श्रीकृष्णाच्या चरित्रातील तारखा निश्चित केल्या. चिंतामणराव वैद्यांच्या मते अर्जुनाला गीता सांगितली तेव्हा श्रीकृष्णाचे वय सुमारे ८५ वर्षांचे तर अर्जुनाचे वय ६५ वर्षांचे होते.

चिंतामणराव वैद्यांनी ज्योतिष शास्त्राच्या आधारेच श्रीकृष्णाच्या आयुष्यातील घटनाक्रमाच्या तारखा निश्चित केल्या आहेत.श्रीकृष्णाचा जन्म इसवी सन पूर्व ३१८५ साली श्रावण वद्य अष्‍टमीस झाला.  कंसवध (इसवी सनपूर्व ३२४४),अक्रूराचे हस्तिनापुरी गमन, रूक्मिणीस्वयंवर, प्रद्युम्नाचा जन्म, द्रौपदी स्वयंवर, इंद्रप्रश्थ राज्याची स्थापना, अर्जुनाची तीर्थयात्रा, सुभद्राहरण, हस्तिनापुरी द्यूत, भारतयुध्द इत्यादि घटनांची तिथी, वर्षे वगैरे नमूद केले आहे. महत्त्वाचे म्हणजे इसवीसन पूर्व ३०६५ साली मार्गशीर्ष महिन्यात श्रीकृष्णाचे निर्याण झाले. त्या वर्षी श्रीकृष्णाचे वय ११९ वर्षे होते.

बाळशास्त्री हरदास ह्यांनीही कृष्णावर लिहलेल्या पुस्तकात कृष्णाच्या गुणविशेषांची चर्चा केली आहे. श्रीकृष्ण हा संभाषणचतुर तर होताच त्याखेरीज वक्‍ताही होता. तो स्वतः द्यूतकलेतही निपुण होता. युधिष्‍टर आणि दुर्योधना हयांच्या झालेल्या द्यूताची हकिगत जेव्हा त्याला समजली तेव्हा  मी जर त्यावेळी हजर असतो तर हे द्यूत होऊच दिले नसते. कारण, ज्याच्याशी द्यूत खेळायचे असते त्या राजांकडे द्यूत खेळू इच्छिणा-याने जायचे असते. द्युताचे निमंत्रण देण्यासाठी धृतराष्‍ट्राने हुषारीने विदुराला पाठवले. कौरव दरबारात द्यूतही होईल विदुराने सांगितले ; पण अत्यंत मोघमपणे !

कृष्णाकडे युध्दकौशल्य होते. तो केव्हा रण सोडून पळून जाईल, केव्हा शत्रूशी मुकाबला करील केव्हा माघार घेईल ह्याचा थांग कुणालाही लागू शकत नसे. मनाचा त्याला मनाचा कौल पुरेसा होता. लोकनिंदेला किंवा लोकादराला तो फारसे महत्त्व देत नसे. युक्‍तिवादपटुत्वात त्याची बरोबरी करणारा कुणीच नव्हता. समयसूचकतेच्या जोरावर तो अनेक संकटातून निभावून बाहेर पडला.

गीता ही कर्ममार्गपर  की ज्ञानमार्गपर ह्याबद्दल सगळ्याच भारतीय भाषात चर्चा झाल्या आहेत. अध्यात्मिक शास्त्रात ज्यांना रस आहे त्यांच्या मते गीता मुळात मोक्षार्थींसाठी आहे. आधुनिक मॅनेजमेंटशास्त्राचे तज्ज्ञ तर मॅनेजमेटच्या तत्त्वांशी गीतेतले प्रतिपादन मिळतेजुळते आहे ! महाभारतातील भीष्मपर्वात आलेल्या गीतेला हिंदूंचा अधिकृत ग्रंथ म्हणून मान्यता मिळाली आहे. कोर्टात साक्षीदाराच्या पिंज-यात हिंदू साक्षीदार असेल तर त्याला गीतेवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते. साक्षीदार ख्रिस्ती धर्मानुयायी असेल तर त्याला बायबलवर हात ठेवून शपथ घ्यावी लागते तर मुस्लिम धर्मियांना कुराणावर हात ठेवून शपथ घ्यावी लागते. ओथ ॲक्टनुसार कोर्टात साक्षीदाराच्या पिंज-यात उभे राहणा-यास शपथ घ्यावीच लागले. पर्याय फक्‍त एकच असतो. ईश्वर मानणारा नसेल तर त्याला सत्यप्रतिज्ञेचा उच्‍चार करून साक्ष देता येते.  बायबल हे इंग्रजी भाषेतील सर्वाधिक  खपाचे पुस्तक आहे. गीतादेखील स्रवाधिक खपाचे पुस्तक असू शकते. असू शकते म्हणण्याचे कारण आपल्याकडे गीतेच्या खपाची गणना आतापर्यंत कोणीही केलेली नाही. करून पाहिली नाही !

रमेश झवर


No comments: