नाशिक येथील भुजबळ नॉलेज सिटीत भरलेले मराठी साहित्य संमेलन शेवटी अध्यक्षांच्या प्रत्यक्ष उफस्थितीविना पार पडले! अध्यक्ष जयंत नारळीकर ह्यांनी केलेले भाषण वाचताना काल्पनिकतेच्या जगात वावरत असलेल्या मराठी साहित्यिकांना वास्तवाबरोबर विज्ञानाचेही भान नारळीकरांनी करून दिले. इतिहासासी प्रतारणा करणारी कादंबरी ऐतिहासिक कशी असा सवाल उपस्थित केला. ह्या त्यांच्या प्रश्नाचा अक्षरशः अर्थ घेण्याची गरज नाही. समाजाचे बहुतेक पैलू ज्या भाषेत उमटत नाही ती भाषा समृध्द समजता येणार नाही असा रास्त मुद्दा त्यांनी उपस्थित केला. त्यांचा हा मुद्दा साहित्यिकातील कोणा एका गटाला उद्देशून नाही. त्यांनी दिलेला इंग्रजीचा दाखल अगदी समर्पक आहे. इंग्रजी ही भाषा म्हणून अधिक समृध्द आहे ह्या त्यांच्या प्रतिपादनाबद्दल दुमत नाही. सोळाव्या-सतराव्या शतकापासून ते थेट आजच्या एकविसाव्या शतकातल्या जीवनमूल्यांचे, पृथ्वीवर घडत असलेल्या विकासाचे, मानवी स्वभावाचे वेळोवेळी प्रतिबिंब इंग्रजी भाषेतील लेखनात पडत आले आहे.
फादर स्टीफन्सने तर ओवी छंदात ख्रिस्त पुराणही रचले. मराठीत ओवी अभंग इत्यादी छंदात तर रचना केल्या. चर्चमध्ये मद्याच्या पेला का दिला जातो ह्या प्रथेमागचे कारणही दिले. युरोपात शैत्य इतके पडते की पाणी गोठते. पिण्याचे पाणी गोठू नये म्हणून पाण्याचे रूपान्तर द्राक्षाच्या मद्यात करणे भाग पडते! हे कारण देताना युरोपात मद्यप्राशन का करतात ह्याचे वैज्ञानिक कारणही फादरनी दिले. एकदोन ओव्यात त्यांनी भारत आणि युरोपच्या हवामानातला फरक समजावून दिला. तरीही ख्रिस्तधर्माचा प्रसार-प्रचार करण्यासाठी त्यांनी खिस्तपुराण लिहल्याची टीका साहित्यिक वर्तुळात होत राहिली. अर्थात ती काही खोटी नाही. परंतु ख्रिस्तपुराणातील बारीकसारिक तपशिवाकडे मराठी वाचकांनी विज्ञान म्हणून पाहिले नाही!
ब्रिटिश भारतात आले नसते तर महाकाव्यादि काव्याच्या फॉर्ममध्येच अडकून पडलेल्या साहित्यनिर्मितीची सुटका झाली असती की नाही ह्याबद्दल शंका वाटते. परंतु मराठीच्या बाबतीत बोलायचे झाले तर कृष्णशास्त्री आणि विष्णूशास्त्रींनी इंग्रजी भाषेला वाघिणीच्या दुधाची उपमा दिली. पुढे मिल्टनसारख्या अनेक विचारवंतांच्या काळातल्या विद्वानांचे लेख वाचून आपल्याकडे गद्य लेखनाची विस्तृत परंपरा सुरू झाली. साहित्याची परंपरा किर्लोस्करांसारख्या अनेक मासिकांनी जिवंत ठेवली. पुढे ती दिवाळी अंकांपुरती आक्रसत गेली. पण क्षीण होत चाललेला हा प्रवाह दैनिकांच्या रविवार आवृत्त्यांनी साहित्य शास्त्र मनोरंजनावर भर दिला हे खरे आहे. मात्र, ह्या पुरवण्यांना विज्ञानावर पाहिजे तेवढा भर देता आला नाहीच. दरम्यान गेल्या दोन दशकात मुद्रण तंत्र आणि माहिती प्रक्षेपण तंत्रात क्रांतिकारक बदल झाल्यानंतर अनेक समस्या निर्माण झाल्या. परंतु युनिकोड फाँट उपलब्ध झाल्यापासून तीही समस्या जवळ जवळ संपुष्टात आली. साहित्याविश्वाला मात्र काही अपवाद वगळता हे बदल फारसे पचवता आले नाही ही वस्तुस्थिती आहे.
साहित्य संमेलनात पुस्तक खरेदीची झुंबड उडून २० लाखांची उलाढाल झाल्याचे वृत्त आजच्या वर्तमानपत्रांनी प्रसिध्द केले. परंतु पुस्तकांच्या किमतीच एवढ्या अफाट आहेत की २० लाखांत किती पुस्तके येतात ? कोणत्याही बातमीत हयाचा उल्लेख नाही. विव्वळ विक्रीचा आकडा सांगून उपयोग नाही. मराठीसह अन्य भारतीय भाषांतील प्रकाशन व्यवसायाची अर्थव्यवस्था इतकी हडकुळी आहे की २० लाख रुपयांचा आकडा काहीच कामाचा नाही. निव्वळ केवळ सस्केस स्टोरी बहुसंख्य प्रसारमाध्यामात प्रसिध्द होत असल्यामुळे प्रकाशन प्रकाशन व्वसायाच्या आर्थिक स्तितीचा विचार अर्थशून्य ठरतो. इतिहास नसलेल्या कादंब-या ज्याप्रमाणे ऐतिहासिक ठरत नाही तसेच पुस्तक व्यवहाराची चर्चा अर्थशून्य ठरते.
लेखन प्रक्रियेची विचार सोडून प्रकाशन व्यवसायाचा विचार करण्याचे साहित्य संमेलनाला कारण काय, असा आक्षेप ह्या मुद्द्याच्या संदर्भात घेता येईल. परंतु लेखनच नसेल तर प्रकाशन व्यनसाय संभवणार तरी कसा? साहित्याच्या परंपरेच्या गंगाप्रवाहाला भरतीओहोटी लागत राहण्याच्या ख-या कारणांचे निराकरण करायचे ठरवले तर समाजाचे सर्वांगिण प्रतिबिंब साहित्यात पडले पाहिजे. अध्यश्र जयंत नारळीकर ह्यांचे वडिल रँगलर होते. स्वतः जयंतराव हे तामवंत नैज्ञानिक तर आहेतच; शिवाय विज्ञान लेखकही आहेत. असा अध्यक्ष यंदाच्या साहित्य संमेलाला लाभल्यामुळे त्यांना आजच्या साहित्याच्या उणिवेवर बोट ठेवले.
बाकी संमेलनात कविसंमेलन, परिसंवाद, उद्घाटन.समारोपाची भाषणे शिरस्त्याप्रमाणे पार पडली. छगन भुजबळ हे कर्तृतवान नेते आहेत. त्यांच्या नॉलेज सिटीत संमेलनाची सोय केली, आलेल्या पाहुण्यांची चोख बडदास्त ठेवली. तरीही एखाददुस-या कवीने नाराजीचा सूर लावलाच. सकल मराठी साहित्य संमेलनाला शह देण्याच्या हेतूने गेल्या कित्येक वर्षांपासून विद्रोही संमेलन भरवले जात आहे. अर्थात ज्यांना जमेल त्यांनी खुशाल संमेलने भरवावी. त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. राज्यकर्त्यांच्या दृष्टीने त्यामुळे फारसा फरक पडत नाही. बहुसंख्य हा लोकशाहीचा महत्त्वाचा निकष आहे. सध्याच्या सरकारची वेगळ्याच विचारसरणीशी बांधिलकी आहे. परंतु आपल्या देशातील लोकशाही जिवंत असल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांच्या बांधलकीची फिकीर बाळगण्याचे कारण नाही. साहित्य क्षेत्रातील लोकशाही आजवर कोणत्याच राज्यकर्त्यांना नेस्तनाबूत करता आलेली नाही. न्या. नरेंद्र चपळगावकर ह्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मागणीला न्यायसंस्थेचा पाठिंबा जाहीर केला तर देशाचे मान्यवर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इच्छाशक्ती कमी पडल्याचे जाहीर मतप्रदर्शन केले. साहित्यातली लोकशाही नेस्तनाबूत होऊ न देण्याची गरज प्रतिपादन केली हे खूपच आशादायक आहे. लेखकाबद्दल नेहमी बोलले जाणारे ’टू अ पेनी’ हे वाक्य त्यांना काही विशिष्ट्य राज्याकर्त्यांनी मनावर बिबंवून ठेवले आहे ! पण जमाना बदलला आहे हे ते लक्षात घेत नाही. बदलत्या परिस्थितीत अध्यक्षांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना संमेलन पार पडले हे खरे असले तरी समारोपाचा कार्यक्रम मात्र दणदणीत पार पडला. नाशिकच्या संमेलनाने साहित्यविश्वाला नवा दिलासा दिला आहे.
ह्या संमेलनानंतर परभणीला आणखी एक संमेलन भरवण्याचा विचार मराठवाडा साहित्य महासमितीच्या धुरिणांच्या मनात घोळत आहे. कारण कोरोनामुळे एक संमेलन भरवताच आले नाही. तीन संमेवलांचा कोटा पुरा करण्याचा त्यांचा उद्देश आहे. कारण नियमाप्रमाणे आता पुढच्या तीन वर्षातील संमलेन भरवण्याची संधी मुंबईतील साहित्य महासमितीला मिळणार आहे. कोणाचा वांधा होणार नसेल तर संधीसाधूपणाचे स्वागत करायला हरकत नाही. मात्र संमेलनाचा बॅकलॉग पुरा करण्याच्या नादात विद्यमान अध्यक्ष जयंत नारळीकरांचा अश्र्यक्षीय कालवधी कमी होऊन जाईल. अर्थात त्यांनाच पुन्हा निवडून दिल्यास त्या अडचणीतून मार्ग काढता येईल !
रमेश झवर
No comments:
Post a Comment