Thursday, December 9, 2021

अपघातानंतरचे तर्कवितर्क

तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख बिपीन रावत ह्यांच्या अपघाती मृत्यूनंतर हवाई दलाच्या सेवेत असलेल्या मिग हेलिकॉफ्टर्सच्या एकूण दुरूस्तीविषयक अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. परंतु एकाही प्रश्नाचे तर्कसंगत उत्तर मिळू शकलेले नाही. अपघाताची रीतसर चौकशी झाली तरी त्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासारखी नाहीत. ह्यापूर्वी नोव्हेंबर १९६३ पासून ते डिसेंबर २०२१ पर्यंत झालेल्या अपघातात डझनो गणती सैनिक, वैमानिक, अधिकारी मारले गेले. त्या त्या वेळी अपघातांची चौकशी करण्यात आली नव्हती असे मुळीच नाही. जगातल्याप्रमाणे भारतातही चौकशीचा उपचार पाळला जातोच. विशेष म्हणजे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे अपघात स्थळी किंवा अपघात स्थळाच्या जवळपास पोहचले नाही हे खटण्यासारखे आहे. संरक्षण अधिका-यांनी पुरवलेली माहिती ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगत बसले. लंरक्षण मंत्र्याला माहिती पुरवणयाच्या बाबतीत  संरक्षण अधिकारी खोटारडेपणा करतात किंवा त्यांच्याकडून कुचराई केली जाते असे नाही. परंतु घटना स्थळी भेट दिल्यानंतर संबंधितांशी बोलून संरक्षण मंत्र्यांना जागच्या जागी माहितीची शहानिशा करण्याची संधी अनायासे मिळते. ती संधी मोदी सरकारच्या संरक्षण मंत्र्यानी गमावली असे नाईलाजाने म्हणणे भाग आहे.

ज्या रशियन बनावटीच्या मिग-१७ व्ही- हेलिकॉफ्टरला अपघात झाला ते अतिशय अद्यावत स्वरूपाचे आहे. समस्या आहे ती दुरूस्तीसाठी सुटे भाग वेळेवर उपलब्ध होण्याची. दुसरा प्रश्न आहे डोंगरावर धुक्याचे साम्राज्य पसरलेले असल्यामुळे हेलिकॉफ्टर खाली उतरवण्याची समस्या ऐन वेळी उद्भवलेली असू शकते. नेमके काय घडले हे अर्थात  ह्या अपघातावतून बचावलेला एकुलत्या एक सैनिकही सांगता येणार नाही. अपघात हा अपघातच हेच सत्य जर चौकशीअंती समजणार असेल तर त्या चौकशीचा फारसा उपयोग नाही. अर्थात्ह्याचा अर्थ चौकशीच करून नये असा नाही. चौकशी तर व्हायलाच हवी ह्याबद्दल दुमत नाही. परंतु चौकशी न्यायालयीन तंत्रानुसार व्हावी असे म्हणावेसे वाटते. हेलीकाफ्टर उड्डाणयोग्य नव्हते किंवा धुक्यामुळे हेलिपॅड दिसेनासे झाले अशी कारणे सामान्यतः सांगितली जातात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डोगराळ भागातील धुक्याचे चित्र हवामान खात्याच्या राडारवर उमटत नाही. थोडक्यात, घटनाक्रमाबद्दल काही एक निष्कर्ष काढता येणार नाही.

हे सगळ्या प्रकरणाचे गूढ उकलेले जाणारच नाही असे नाही. शेवटी अपघाताविषयी माहिती देणा-यापेक्षा चौकशी अधिका-यांच्या सदसद्विवेकबुध्दीचीच ह्यावेळी कसोटी लागणार आहे. अर्थात अपघाताची चौकशी करण्याचे तंत्र भारतात -यापैकी विकसित झाले आहे हे सगळे खरे असले तरी जनरल बिपीन रावतसारखा तिन्ही दलाचा पहिला प्रमुख देशाला गमवावा लागला हे निखळ सत्य उरतेच. व्यक्तिशः जनरल रावत ह्यांच्या कुटुबियांच्या दुःखात देश नक्कीच सहभागी झाला आहे. जनरल रावत ह्यांचा सैक्षणिक प्रवासही त्यांच्या कर्तबगारीला साजेसा आहे.  खडकवासलापासून ते अमेरिकन लष्करी महाविद्यालयापर्यंत अनेक संस्थात त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण पूर्ण झाले. त्याचाच उपयोग जम्मू-काश्मिरमधील अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्यास त्यांना उपयोगी पडला असावा. शत्रूच्या सीमेत घुसून अतिरक्यांच्या छावणीवर हल्ला करण्याचा विक्रम त्यांच्या कारकिर्दीत झाला. हा हल्ला करताना लष्कराच्या पूर्वसूरींनी बजावलेली कामगिरी नक्कीच त्यांच्या डोळ्यांसमोरून तरळून गेली असणार. अतिरेक्यांचा बंदोबस्त करण्याची त्यांनी बजावलेल्या कामगिरीचे श्रेय राजकर्त्यांनी उपटण्याचा प्रयत्न केला तो भाग वेगळा!

एक कर्तृत्ववान जनरल आपल्यातून निघून गेला. त्याला विनम्र श्रद्धांजली!

रमेश झवर

No comments: