मी मराठा सोडून १ नोव्हेंबर १९७१ रोजी लोकसत्तेत रुजू झालो. त्या काळात भारत-पाकिस्तान युध्दाचे वारे वाहायला सुरूवात झाली होती. खरे तर, मला दिवाळीपूर्वीच लोकसत्तेचे नेमणूक पत्र मिळाले होते. १५ ऑक्टोबरला तुम्ही रुजू व्हा असे पत्र संपादक र. ना. लाटेसाहंबांच्या सहीचे मला मिळाले होते. लोकसत्तेत जाऊन त्यांना भेटलो. १ नोव्हेबरपासून रूजु झालो तर चालेल का, असे विचारताच त्यांनी वृत्तसंपादक तुकाराम कोकजे ह्यांना बोलावले आणि माझी विनंती त्यांच्या कानावर घातली. मध्येच नोकरी सोडून येणे बरे दिसणार नाही असा माझा हेतूही त्यांना सांगितला. मराठाचे व्यवस्थापकीय संचालक व्यंकटेश पै आणि संपादक शिरीषताई ह्या दोघांच्या कानावर घालणेही आवश्यक होते. त्याखेरीज राजिनामा पत्र नोटिस पिरियड वगैरे सगळी औपचारिकता पूर्ण करणेही आवश्यक होते. कोकजेंनीही मला लगेच संमती दर्शवली.
त्यानंतर दोन आठवडे दुपारपाळी. पाळी बदलचे चक्र सुरू झाले. डिसेंबर महिन्यात मला पुन्हा रात्रपाळी लावण्यात आली. देशाच्या इतिहासात घडत असलेल्या घटनांची बातमी, भले ती पीटाआयने दिलेली का असेना, मला करायला मिळाली हे माझे भाग्यच म्हटले पाहिजे. त्यापूर्वी सांज मराठाचा संपादक ह्या नात्याने मनुष्य चंद्रावर गेल्याची बातमी लिहण्याची संधी मला मिळाली होती! त्या काळात सांज मराठाची वन मॅन शिफ्ट होती. सांजच्या ड्युटीमुळे क्रीड सॉर्ट करता करता बातम्या लिहणे, रिपोर्टरचा फोन घेणे इत्यादि सर्व कामे एकट्याला करावी लागत. यशाचे श्रेय माझे आणि अपयशही माझेच! डेस्कवर काम करणा-या उपसंपादकाचे ॲसेसमेंट एकाच वेळी वाचकांच्या आणि संपादकांच्या पातळीवर होत असते. त्या दोन्ही पातळीवरच्या ॲसेसमेंटमध्ये मला पुढे मिळत गेलेल्या संधीचे बीज पेरलेले होते. अर्थात त्यावेळी मला त्याची सूतराम कल्पना नव्हती.
पूर्व पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल ए. ए. नियाझी शरणागती पत्रावर सही करत असल्याची बातमी चीफ सब लश्र्मीदास बोरकरांनी माझ्याकडे सोपवली. ती बातमी मी मन लावून केली. ती दुस-या दिवशीची हेडलाईन होती ! अर्थात बातमी लिहताना मला थोडं टेन्शन आलंच. ते टेन्शन चांगल घरी पोहचेपर्यंत होतं. दुस-या दिवशी सकाळी मटा आणि लोकसत्ता आणि टार्इ्म्स हे तिन्ही पेपर्स घरात पडले. मी झडप घालून तिन्ही पेपर हातात घेतले. अपेक्षेप्रमाणे मटा आणि टाईम्सची हेडलाईन तीच होती. आधी मटाची बातमी वाचायला घेतली. नंतर टाईम्स वाचायला घेतला. देन्ही पेपर्सचे पहिले पान वाचल्यानंतर आपल्या लिहण्यात गडबड झालेली नाही हे पाहून मला हायसे वाटले. तरंगलेल्या अवस्थेत मी दाढी, आंघोळ उरकली आणि पुन्हा पेपर्स वाचायला बसलो.
रमेश झवर
No comments:
Post a Comment