कोरोना आणि ढासळलेली अर्थव्यवस्था हा अजूनही चिंतेचा विषय आहे. दिवसेंदिवस देशात कोरोनाबाधितांची, कोरोना मृत्यूची संख्या वाढत असून ती कमी होण्याची चिन्हे दृष्टिपथात नाही. महाराष्ट्रावरचे कोरोना संकटही मुळीच ओसरलेले नाही. भीषण परिस्थिती असूनही महाराष्ट्रात कंगना आणि रिया ह्यांच्यावरून उसळलेल्या राजकारणाने कोरोना चिंतेलाही मागे टाकले. त्यात ऑक्सिजन टंचाईची भर पडली आहे. त्यातल्या त्यात राज्याचे सुदैव म्हणजे कोरोनाप्रतिबंधक लशीचे थांबवण्यात आलेले उत्पादन पुन्हा सुरू झाले आहे. लंडनमध्ये ह्या लशीच्या चाचणीनंतर एक जण आजारी पडल्याने तिकडे चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. त्या पुनश्च सुरू करण्याचा निर्णय तेथे नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर घेण्यात आल्याने पुण्यातील कारखान्यातही लशीचे उत्पादन पुन्हा सुरू झाले.
कोरोना आपत्तीमुळे निर्माण झालेल्या ह्या धोकादायक वातावरणात देवळे पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षाने रेटा लावला होता. तिरूपतीसारखे देवालय पुन्हा सुरू होऊ शकते तर मग पंढरपूरच्या विठ्ठलाने आणि प्रभादेवीच्या सिध्दीविनायकाने काय घोडे मारले असा विरोधकांचा सवाल आहे. शेवटी विरोधकांच्या मागणीपुढे मान तुकवण्यास सरकार तयार झाले. ई तिकीटानुसार रांगा लावून तसेच सुरक्षित अंतर राखण्याची हमी देवळे देत असतील तर त्यांना परवानगी देण्याची महाराष्ट्र सरकारची तयारी आहे. राज्य शासनाच्या टास्क फोर्सने अशी शिफारस केली आहे. देवळे सुरू झाली की ‘देवाला मिळाली ओसरी हळुहळू हातपाय पसरी’ असा प्रकार सुरू व्हायला वेळ लागणार नाही असी भीती राज्य सरकारला आहेच. ‘देवाचिये व्दारी उभा क्षणभरी तेणे चारी मुक्ती साधियेल्या’ ह्या ज्ञानेश्वरमाऊलीचा अभंगावर विश्वास ठेवावाच लागेल असा विचार करून राज्य सरकार धोका पत्करण्यास तयार झाले हे ठीकच आहे.
ह्या संदर्भात लौकरच राज्य शासनाकडून घोषणा अपेक्षित आहे. देवळे उघडण्यास सरकारची तयारी असली तरी लोकल गाड्या पुन्हा सुरू करण्यास मात्र सरकार तयार नाही. ह्याचे कारण सुरक्षित अंतर राखून रेल्वे स्टेशनात प्रवेश देणे रेल्वे यंत्रणेला जमण्यासारखे नाही हे संबंधितांना माहित आहे. ह्याउलट बाहेर गावी जाणा-या येणा-या गाड्यांची संख्या मात्र वाढवण्यात आली आहे. राज्यात ऑक्सिजन, मास्क, व्हेंटिलेटर्स आणि पीपीई किट्सच्या पुरवठ्याची समस्या उद्भवली असून त्यातून मार्ग कसा काढायचा ह्या समस्येशी राज्य सरकार झुंज देत आहे. त्याबद्दल केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारशी सहकार्य करण्यास विरोधक तयार नाही असे चित्र निर्माण झाले. हे चित्र राज्याला फारसे भूषणावह नाही. राज्यातले उद्योग सुरू करण्यास बडे उद्योग सिध्द आहेत. पण ते सुरू होण्याच्या दृष्टीने परिस्थिती अजून तरी फारशी अनुकूल नाही हे वस्तुसत्य आहे.
अर्थव्यवस्था पुन्हा जोमाने सुरू करायची तर मजूरवर्गाला जगवण्यासाठी त्यांना सर्वप्रथम नक्त रक्कम आणि धान्य वाढवून देणे गरजेचे आहे. जगात गरीब जनतेला, विशेषतः कामगारवर्गाला सुमारे ७०० डॉलर्सची रक्कम दिली जाते. खरे तर, आपल्याकडे टाळेबंदी जितकी सक्तीची कण्यात आली होती तितकी ती अन्य देशात सक्तीची नव्हतीच. एकूण जीडीपीच्या दहापाच टक्के रक्कम जगभऱातील सरकारांनी जनतेला पोसण्यासाठी खर्च केली. आपल्याकडेही थोडी रक्कम मजूरवर्गाला देण्यात आली. मात्र, नव्याने गरीब होत चाललेल्या मध्यमवर्गियास वा-यावर सोडण्यात आले. त्यांना धान्यही महाग भावाने घ्यावे लागत आहे. जीवघेण्या महागाईला सर्वांना तोंड द्यावे लागत आहे. २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज, कर्जसवलती वगैरे मदत आपल्याकडेही जाहीर करण्यात आली. तरी प्रत्यक्षात लोकांच्या हातात किती रक्कम पडली हा चौकशीचा विषय नक्कीच आहे. वास्तविक आपापल्या मतदारसंघात ह्याविषयीची आकडेवारी आमदार-खासदारांनी गोळा करून सरकारला रोजच्या रोज पुरवली पाहिजे. किंबहुना ह्या कामाची त्यांना सक्ती केली पाहिजे. पण तसे काही करण्याची बुध्दि देशातील केंद्र आणि राज्य सरकारांना अजून तरी झालेली दिसत नाही.
कोरोनाची आकडेवारी आणि आकडेवारीचे पृथःकरण मात्र रोजच्या रोज दिले जाते. विशेष म्हणजे किती तरी पोलिस आणि मेडिकल डॉक्टर्स आणि त्यांचे साह्यक ह्यांना कोरोनापायी जीव गमवावा लागला. त्यामुळे जनतेच्या मनातील धाकधूक वाढली. ह्या परिस्थितीत लोक ज्योतिषाच्या आहारी गेले असतील तर त्यात नवल नाही. आकाशताले ग्रहतारे शांत आणि प्रसन्न झाल्याखेरीज कोरोना आटोक्यात येणार नाही. त्यांना शांत करण्याचा एकच मार्ग ज्योतिषी मंडळी दाखवत आहेत. रविवारी सकाळी १० ते १२ ह्या काळात ‘वृश्चिक लग्न’ असून गेल्या पाचशे वर्षात असा उत्कृष्ठ योग आला नव्हता आणि पुढील ५०० वर्षात येणार नाही; मात्र लोकांनी आपापल्या श्रध्देनुसार मनोभावे विष्णूसहस्रनाम, हनुमानचालीसा, रामरक्षेची पारायणे केली पाहिजे अशा आशयाची पोस्ट गेले दोन दिवस व्हॉट्स अपवर फिरत आहे. सध्या लोकांची मनःस्थिती ठीक नाही एवढाच त्याचा अर्थ. सध्या मनोबल कमी पडत आहे. ते उंचावण्यासाठी भक्तीमार्गाचा अवलंब करत असतील आणि त्यामुळे कोरोनाशी दोन हात करण्याचे सामर्थ्य मिळणार असेल तर ते स्वागतार्हच मानावे लागेल! शेवटी इष्ट परिणाम होण्याशी कारण!
ईश्वर कुठे आहे ह्या प्रश्नाते उत्तर गीतेतल्या अठराव्य अध्यायात दिले आहे- ईश्वरः सर्वभूतानां ह्रद्देशेSर्जुन तिष्ठति। भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया।। ‘देवाचिये व्दारी’ ह्या अभंगांच्या चरणात ‘देहाचिये व्दारी’ असा बदल करून हा अभंग म्हणून पाहा असे वारकरी मंडळांच्या खासगी बैठकीत आवर्जून सांगितले जाते! ‘देहाचे व्दार’ ह्याचा अर्थ नासारंध्र ! नासारंध्रावर क्षणमात्र दृष्टि स्थिर करा असेच खरे तर संतांना सुचवायचे होते! देववादाला पुरूषार्थाची जोड हवी असेच संतांना सुचवायचे होते. कर्तृत्व दाखवण्याच्या बाबतीत माणसाने बिल्कूल मागे राहू नये अशीच संतांची अपेक्षा आहे. सध्या कोरोना विरूध्दची लढाई निकाराने लढणे आवश्यक असून ह्या लढाईत सरकार आणि समाजधुरिणांनी नागरिकांना प्रत्यक्ष वित्तसाह्य, औषधपाणी, अन्नधान्याची मदत केली पाहिजे.
आजघडीला तरी सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक संघटनांकडून सर्वतोपरी मदत हीच अपेक्षा आहे. किंबहुना हाच देशापुढे तरणोपाय आहे!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment