Wednesday, September 9, 2020

उद्योगचक्र फिरायला सुरूवात

कोविड १९ मुळे उद्योग चक्र थांबले होते हा इतिहास झाला। परंतु हा इतिहास मागे टाकून हे चक्र गतिमान करण्याचे प्रयत्न जोरात सुरू झालेले दिसतात. उद्योग चक्र फिरण्यासाठी प्रथम मोठे चक्र फिरावे लागते. एक चक्र फिरू लागले की त्यावर आधारित अन्य लहान चक्रे फिरू लागतात. गेल्या मार्चअखेरपासून जारी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे जीडीपीत घट येणार हे उघडच होते. जून अखेर संपलेलल्या तिमाहीत उणे २३ टक्के जीडीपी नोंदवला गेला ह्यात खरे तर आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. ह्या संदर्भात महत्त्वाचा मुद्दा असा की जीडीपी कमी झाला किंवा वाढला ह्याचे मोजपमाप करण्याची भारतात जी पध्दत आहे त्यानुसार आताच्या जीडीपीची तुलना गेल्या वर्षांच्या जीडीपीशी केली जाते तर अमेरिकेत ती फक्त गेल्या तिमीहीशी केली जाते.

एक मात्र खरे आहे. कोविडनंतरच्या उपाययोजनेचा भाग म्हणून देशात टाळेबंदी जारी होताच सा-याच क्षेत्रातली मागणी संपली. परिणामी कारखान्यांचे उत्पादन ठप्प झाले. ह्या पार्श्वभूमीवर उणे जीडीपी नोंदवला जाणार हे अपेक्षितच होते. परंतु काहीही झाले तरी देशात सर्व काळ टाळेबंदी राहू शकत नाही. हळुहळू व्यापारधंदा सुरू करण्याचे प्रयत्न झाले. अन्नधान्य, खते, औषधे वगैरेंचा व्यापार कुणी थांबवू म्हटले तरी तो थांबू शकत नाही. हा सगळा व्यापार सुरू होण्यासाठी सर्वप्रथम वाहतूक सुरू होणे गरजेचे होते. सुरूवातीला काही दिवस अचानक बंद झालेली वाहतूक हळुहळू सुरू झाली. निरिराळ्या राज्यात धान्य पुरवठा सुरू झाला. मालवाहतुकीच्या बाबतीत रेल्वेनेही आपला वाटा उचललाच. त्याचा दृष्य परिणाम असा झाला की लोकजीवन पूर्ववत् होण्यास थोडीफार मदत झाली. विशेष म्हणजे ह्या प्रयत्नांना जूनपासून चालू झालेल्या पावसाने चांगली साथ दिली. ह्या वर्षी पर्जन्यराजाने साथ दिल्यामुळे कृषीक्षेत्राचा जीडीपीतला वाटा ३-४ टक्क्यांच्या घरात जाऊ शकतो. शेतमालाच्या दमदार उत्पादनाचे चित्र खूपच आशादायक आहे, विशेष म्हणजे साखर आणि तांदूळ निर्यातही सुरू झाली. जागतिक धान्य  व्यापारात बासमती तांदूळ आणि साखर ह्या मालाच्या बाबतीत भारताचे चांगले नाव आहे. गेल्या  ४ महिन्यात टाळेबंदी असूनही तांदूळ आणि साखऱेच्या निर्यातीत २३ टक्क्यांनी वाढ झाली. कोविड काळातही भारताची ही निर्यात गेल्या वर्षांच्या तुलनेने ४८१८ कोटी रूपयांनी वाढली,

आंतरराष्ट्रीय व्यापार कसा चालतो हे अनेकांना माहित नाही. जी जहाजे माल घेऊन येतात ती रिकामी परत जात नाहीत. जाताना ती जहाजे आपला माल परदेशात घेऊन जातात. फक्त बंदरापर्यंत माल पोहोचवण्याची खबरदारी आपल्य़ाला घ्यावी लागते. खरीप हंगाम आता तोंडावर आला आहे. तो येताच भाजीपाला, कांदा वगैरेची निर्यात सुरू होईल ती संपते न संपते तोच रब्बी हंगामाचे वेध लागतील. ह्याचाच अर्थ अन्नधान्याच्या व्यापाराला तोटा नाही. शेतीमालाच्या हंगामावर भारतीय अर्थव्यवस्था पुष्कळ अंशी अवलंबून आहे. ह्याचा अर्थ उद्गोग चक्र पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने वातावरण अनुकूल व्हायला सुरूवात झाली आहे. कोविडमुळे जगातल्या अन्य देशांप्रमाणे आपल्या देशातलेही उद्योग चक्र थांबले हे खरे. पण हे तेवढेसे खरे नाही. कारखान्यांचे उत्पादन चक्र सतत फिरत कसे राहील ह्याची काळजी कंपनीच्या संचालक मंडळाला नेहमीच घ्यावी लागते. कंपनीला होणारा वित्त पुरवठा सुरू राहण्यासाठी कंपनीचे हिशेब चोख ठेवावे लागतात. वेळच्या वेळी लेखापरीक्षण व्हावे लागते. बॅलन्सशीट्स तयार व्हावे लागतात. ते सर्टिफाय करावे लागतात. सुदैवाने भारतातल्या औद्योगिक कंपन्या ह्या बाबतीत खूपच दक्ष आहेत. आपले भांडवल कमी होणार नाही ह्यादृष्टीने कंपनी कार्यालयातील कामाचे चक्रदेखील सतत फिरत राहावे लागते.

टाळेबंदीच्या काळात अकाऊंटस् आणि ऑडिट सेवेतीली मंडळी घरी बसून काम करत होती. त्यामुळे उत्पादन ठप्प झाले तरी कोणत्याही क्षणी ते सुरू करण्याच्या दृष्टीने कंपन्या सज्ज झालेल्या आहेत. टाटा, जिंदल, बिर्ला ह्या उत्पादन क्षेत्रातील अनेक कंपन्या आणि मोतीलाला ओसवाल ह्यासारख्या वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांनी असा नियमच करून टाकला की ज्या कर्मचा-यांकडे स्वतःचे वाहान असेल त्यानेच कार्यालयात यावे, बाकीच्यांनी घरी बसूनच काम करायचे! त्याचा इष्ट परिणाम म्हणजे टाळेबंदी संपून पुनश्च हरिओम सुरू झाले तेव्हा ह्याही कंपन्या उत्पादन सज्ज झाल्या आहेत. स्टॉकमार्केटमध्ये नेहमीची उलाढाल करून बहुसंख्य कंपन्यांनी त्यांचे भांडवल सुरक्षित ठेवले. मोठ्या कंपन्यांतले उत्पादन चक्र सुरू झाल्याखेरीज लहान कंपन्यांचे चक्र सुरू होत नाही असा अनुभव आहे. पुनश्च हरिओममुळे मोठ्या कंपन्यांना सिग्नल मिळाला आहे. त्यांचे उत्पादन चक्र सुरू झाले की लहान कंपन्यांचे उत्पादन चक्र सुरू होण्यास वेळ लागणार नाही. दुसरे म्हणजे तंत्रज्ञानात्मक गुंतवणुकीच्या बाबतीतही आपल्या कंपन्यांनी आघाडी मारली आहे. अनेक कंपन्यांनी परदेशी कंपन्यांशी तंत्रज्ञानात्मक सहाकार्याचे करार केले आहेत. थोडक्यात, गेल्या ४ महिन्यांचा काळ ह्या कंपन्यांनी फुकट घालवला असे नाही. त्याचे फळ पुढच्या तिमाहीत दिसेल असे एकूण उद्योग जगाचे चित्र मला तरी दिसत आहे.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार


No comments: