Saturday, September 19, 2020

.कोरोनाच्या लाटा

रोज समोर आलेल्या कोरोनाबाधित, कोरोना मृत्यू आणि कोरोना उपजारानंतर बरे होऊन गेलेल्यांच्या तौलनिक आकडेवारीमुळे कोरोनासंबंधीचे संपूर्ण सत्य उघड होते का? ह्या प्रश्नाचे होकार्थी उत्तर देता येण कठीण आहे. कोरोना बळी, कोरोना रूग्ण आणि कोरोना चाचण्या इत्यादि आकडेवारी आपल्याकडेही जागतिक आरोग्य यंत्रणेच्या धर्तीवर केंद्राकडून दिल्या जातात. महाराष्ट्र सरकारही केंद्राचाच कित्ता गिरवत आहे. केंद्रीय यंत्रणेने दिलेली आकडेवारी बनावट आहे असे कोणीही म्हणणार नाही. परंतु त्या आकडेवारीवरून कोरोनाची भली मोठी लाट उसळली आहे का असा प्रश्न निश्चितपणे उपस्थित होतो. अनेक तज्ज्ञांच्या मते दसरादिवाळीपर्यंत कोरोनाच्या बाबतीत अमेरिकेला मागे टाकून भारत पहिल्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे! भारतात कोरोना संक्रमितांची संख्या आणि मृत्यू पावणा-यांची संख्या जगातील देशांच्या तुलनेने कमी असल्याचे सरकारी प्रवक्ते आवर्जून सांगत असत! आता ती स्थिती बदलू शकते असे चित्र दिसू लागले आहे. कोरोना लाटेने पर्वतप्राय उंची गाठली का? की अजूनही कोरोना शिखऱ लांबच आहे? तज्ज्ञांना नेमके काय वाटते?

महाराष्ट्राच्या संदर्भात जी आकडेवारी जाहीर होत आहे ती चिंताजनक आहे ह्याबद्दल वाद नाही. परंतु महाराष्ट्राचा कोरोना आकडा का वाढला ह्याचे स्पष्टीकरण आतापर्यंत कुणी दिले नव्हते. सुदैवाने महाराष्ट्राचे भूतपूर्व आरोग्य महासंचालक आणि सध्याचे आरोग्य सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे आणि टास्कफोर्समधील त्यांचे सहकारी डॉ. रवी दुग्गल, डॉ. शशांक जोशी ह्यांनी ते नुकतेच दिले. डॉ. अनंत भान वगैरेसारख्या स्वतंत्र तज्ज्ञांनीही राज्यातील कोरोना परिस्थितीची अधिक सखोल विचार करून त्यांनी त्यांची मते जाहीर केली आहेत. मतभिन्नतेमुळे सर्वसामान्य जनतेचा गोंधळ वाढणार हे खरे. पण कोरोना साथीच्या रोगांसंबंधी मतभिन्नता स्वागतार्ह मानली पाहिजे. गेल्या दोन दिवसात तर भारतात केल्या जाणा-या चाचण्यांच्या संख्येतही थोडी घट झाली आहे. शिवाय ऑक्सिजनची टंचाई, व्हेंटिलेटर्स उपलब्ध नसणे, अँब्युलन्सचे दर ह्या सगळ्या अडचणींचे निराकरण झालेले नाही.

राज्यात विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे ही शहरे तुलनेने मोठी असून ह्या तिन्ही शहरांची लोकसंख्या दाट आहे. दाट लोकसंख्या हेच कोरोनाच्या फैलावाचे प्रमुख कारण असल्याचे मत डॉ. रवी दुग्गल ह्यांनी व्यक्त केले. लोकांच्या बेशिस्तीचा  मुद्दा विचारात घेतला नाही तरी सर्वसामान्यपणे सुरक्षित अंतर ठेऊन दैनंदिन काम उरकणेही ह्या गतिमान शहरात शक्य नाही. डॉ. दुग्गल ह्यांच्या मते दुसरे कारण मुंबई ही आर्थिक राजधानी असून कडक टाळेबंदीच्या काळातही ह्या शहरात आर्थिक व्यवहार सुरूच होते! विशेष म्हणजे मुंबई शहरातील बँका किंवा अन्य वित्तीय संस्था बंद राहिल्या नाही. हे सगळे वातावरण कोरोना संक्रमणाच्या वाढीस कारणीभूत ठरले. डॉ. भावे ह्यांनी तर न्यूयॉर्क शहराचा मुंबईशी असलेले साम्य दाखवून दिले. अमेरिकेतल्या कुठल्याही शहरापेक्षा न्यूयॉर्क शहरातील कोरोना रूग्णसंख्या अधिक आहे. मुंबई आणि दिल्ली शहरातील कोरोनारूग्णांच्या संख्या देशातल्या कोणत्याही शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. मुंबई आणि न्यूयॉर्क ही दोन्ही शहरे गर्दीची आहेत हे त्यांनी दिलेली कोरोना वाढीचे कारण चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. दाट लोकसंख्येमुळे महाराष्ट्रात दररोज १० लाख लोकांपैकी ४५५१५ जणाच्या कोरोना चाचण्या करणे आवश्यक असल्याचे डॉ. शशांक जोशी ह्यांनी सांगितले. दिल्लीत तर १० लाख लोकांमागे १ लक्ष २० हजार ६४२ चाचण्या केल्या गेल्या. राज्यातील आरोग्य यंत्रणेच्या पायाभूत सुविधाही मुळात कमी आहेत इकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. महत्त्वाचे म्हणजे लोकांचा आमच्यावरचा विश्वास उडाल्याचे डॉ. भावे ह्यांनी प्रामाणिकपणे मान्य केले. न जाणो चाचणीत आपण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले तर..., ह्या भीतीने बहुसंख्यांच्या मनात घर केले आहे. लोकांचा विश्वास संपादन करणे मह्त्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. दुग्गल ह्यांच्या मते खासगी इस्पितळे आणि पॅथाल़ॉजिकल लॅबोरेटरी ह्यांचे साटेलोटे असून रूग्णांकडून भरपूर पैसे काढण्याचा प्रकार सुरू असल्याचे लोकांना वाटू लागले आहे. महाराष्ट्रात कॉर्पोरेट क्षेत्रात जास्तीत जास्त इस्पितळे असून त्यांच्याविषयी लोकांचे मत फारसे चांगले नाही. रूग्ण मेडिकल पॉलिसीधारक असो ना नसो, कॉर्पोरेट क्षेत्रातील इस्पितळांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारणी केली जात असल्याची तक्रार सर्रास ऐकायला मिळते. अर्थात कॉर्पोरेट इस्पितळांच्या हा दुर्लौकिक जुन्या स्थापना काळापासूनच आहे.

डॉ. सुभाष साळुंखे ह्यांनी महाराष्ट्राच्या प्रामाणिकपणाकडे लक्ष वेधले आहे. राज्यात रूग्णांचा आकडा वाढला हे राज्य सरकारने कधीच नाकबूल केले नाही, असे सांगून डॉ. साळुंखे म्हणाले, अन्य राज्यातील सरकारे मात्र खरा आकडा लपवून पाहतात, असेही निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे! डॉ. साळुंखे सर्वोच्च पदावर विराजमान झालेले होते. ते आळंदीच्या किसनमहाराजांचे शिष्य आहेत. त्यांची ही पार्श्वभूमी अवश्य विचारात घेतली पाहिजे.

देशाची अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि कुटुंब व्यवस्था नष्ट होण्याचा अभूतपूर्व धोका उत्पन्न झालेला असताना देशातील खासगी आणि सरकारी आरोग्य यंत्रणा एकमेकांवर कुरघोडी करण्यात मग्न आहेत हे खेदजनक आहे. ह्या सा-या पार्श्वभूमीवर उपरोक्त डॉक्टरमंडळींची मते निश्चितपणे सत्यशोधनास मदत करणारी आहेत. व्यावसायिक अहंकार बाजूला सारून डॉक्टरांचे अशा प्रकारचे विचारमंथन होत राहिले पाहिजे. नव्हे, ते आयोजित करण्यासाठी सरकारच्या आरोग्य यंत्रणने पुढाकार घेण्याची वेळ आली आहे. अन्यथा  कोरोनाच्या लाटा देशावर आदळत राहतील आणि त्या मोजण्यापलीकडे सरकारी आरोग्य यंत्रणेला काही कामच शिल्लक उरणार नाही.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: