Saturday, March 28, 2020

रामायण? यह कलियुग है बाबा!


गेल्या शनिवारपासून दूरदर्शनलर रामानंद सागरनिर्मित रामायण ही लोकप्रिय मालिका सुरू झाली. सामान्यतः १३ भागांपेक्षा अधिक भागांना परवानगी न देण्याचे दूरदर्शनचे सुरूवातीच्या काळात धोरण ठरवले होते. परंतु रामायण, महाभारत आणि हमलोग ह्यासारख्या काही मालिकांच्या बाबतीत दूरदर्शनने ते धोरण शिथील करून अधिक भागांना परवानगी दिली होती. ह्या तिन्ही मालिकांनी लोप्रियतेचा उच्चांक मोडला! असो. रामायणावर हा ब्लॉगलेख मी मुद्दाम लिहीत आहे ह्याचे कारण रामाचे दैवतीकरण करण्याच्या नादात रामायणातल्या मानवात्वाच्या खुणा पुसल्या गेल्या! मी जळगावला मूळजी जेठा कॉलेजमध्ये असताना मराठी वाङ्मय मंडशळातर्फे वसंत कानेटकरांचे रामायणातील मानवत्वाच्या खुणा ह्या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ह्या व्याख्यानात लक्ष्मणाच्या तोंडी रामायणात असलेले श्लोक उद्धृत करून कानेटकरांनी असे प्रतिपादन केले की रामायणातही मानवी भावनांचे पुरुरेपूर दर्शन घडते! अर्थात ह्या त्यांच्या विवेचनाकडे साहित्यविश्वाने साफ दुर्लक्ष केले. रामायणातल्या मनुष्यस्वभावाच्या वास्तवाकडे हजारो पिढ्या दुर्लक्षच करत आली आहे. म्हणूनच रामायणातील वास्तवदर्शन ह्या विषयावर लिहणे आवश्यक आहे. पण तसा प्रयत्न करणे सोपे नाही. परंतु रामायणातील स्वभावदर्शनासंबंधी लिहण्यापूर्वी रामायणासंबंधीच्या माहितीवर लिहणेसुध्दा तितकेच आवश्यक आहे.
रामायणाचा काळ, रामायणातील प्रसंग, रामायणात आलेला भारताचा भूगोल इत्यादिसंबंधी १९ व्या शतकात आणि विसाव्या शतकात खूप संशोधन झाले आहे. त्या संशोधनाच्या निष्कर्षावर मी लिहण्याचे योजले आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे रामायण-महाभारताच्या संशोधनात निष्कर्षाच्या बाबतीत एकवाक्यता नाही. रामायण हे आर्ष काव्य खरे. पण आर्ष काळाचा पट खूप आधीपासून सुरू होतो. उत्तरधृव प्रदेशातून आर्य भारतात आले तेव्हापासून तो सुरू होतो. सप्तसिंधू प्रदेशात त्यांची वस्ती स्थिर झाली तोपर्यंतचा काळ हा आर्ष काळ आहे. म्हणजे नेमका कोणता काळ? आर्यांचे आगमन पाचसहाशे वर्षे सुरू होते. त्यांचे भारतात आगमन होण्यापूर्वी द्रविड संस्कृती भारतीय उपखंडात नांदत होती. हडप्पा-मोहेंजोदडो उत्खनात सापडलेले शहर पाहिल्यावर संशोधकांचे असे मत झाले की ह़प्पाकालीन संस्कृतीदेखील आर्य संस्कृतीइतकीच प्रगत असली पाहिजे. अंदाजे इसवी सनपूर्व २१०० ते २५०० ह्या काळात तीन युध्दे झाली. पहिले युध्द झाले राम-रावणह्यांच्यात तर दुसरे दाशराज्ञ युध्द.दाशराज्ञ युध्दचा संदर्भ ऋग्वेदातील काही ऋचात आला आहे. रामायणाचा मात्र ऋग्वेदातील ऋचात उल्लेख नाही. कारण रामायणातील घटना दाशराज्ञ युध्दापूर्वी २०० वर्षे आधी घडल्या होत्या. जनमानसात त्याच्या स्मृती चाळवल्या गेल्या असतीलही. परंतु त्यावर ग्रंथरचना झाली नाही. वैदिक ऋचादेखील स्फुरलेल्या आहेत. त्या कंठस्थ करण्यावर भर होता. रामायण महाकाव्य खूप नंतर रचण्यात आले. वैचारिक वर्चस्व कुणाचे असावे हे दाशराज्ञ युध्दाचे कारण फारच वेगळे होते. त्याबद्दल ह्या लेखात खोलावर जाण्याचे कारण नाही. फक्त एवढेच सांगतो की  लोपामुद्रा आणि नंतर अगस्ती ह्या दोघांनी विश्वामित्राची बाजू घेतल्यामुळे वसिष्ठ आणि विश्वामित्र ह्यांचे दोन गट तयार झाले. ह्या दोन्ही गटातल्या स्पर्धेत दिवोदासपुत्र सुदासच्या राजकारणाने ठिणगी टाकली गेली. त्याचीच परिणती युध्दात झाली. ह्या यध्दात आर्य समूहातील राजे आणि त्यांचे राजऋषी मिळून दहा राजांनी भाग घेतला. म्हणून ते दाशराज्ञयुध्द ओळखले गेले. दाशराज्ञयुध्दाचा महत्त्वाचा भाग असा की एका बाजूचे नेतृत्व वसिष्ठाकडे होते तर दुस-या बाजूचे नेतृत्व विश्वमित्राकडे होते!  ह्या युध्दात विश्वामित्रासह अनेक ऋषी आणि राजांसह अनेक योध्दे मरण पावले. भार्गव परशुरामाने वसिष्ठांच्या आज्ञेनुसार त्यांचे क्रियाकर्म केले. त्यानंतर ६०० वर्षांनी कौरव-पांडवांचे १८ दिवसांचे महाभारत युध्द झाले! ह्या तिन्ही युध्दांचे वर्ष नेमके कोणते ह्यावर आधी झालेल्या संशोधनानंतर मात्र फारसे संशोधन झाले नाही. लेखनही झाले नाही. ह्याउलट दरवर्षी डिसेंबर महिन्यात इंग्रजी नियतकालिकात बायबल काळावर नित्य नवे लेख प्रसिध्द होत असतात.
विशेष म्हणजे रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही युध्दांवर ब्राह्मण काळात महाकाव्ये लिहली गेली. राजे लोकांचा इतिहास सांगण्यावर सूतमंडळींची उपजीविक अवलंबून असल्याने त्यांनी रामायण आणि महाभारत सादर करण्यावर भर दिला. त्या सादरीकरणात अनेक आख्यायिकांनी रामकथेत आणि कौरवपांडवाच्या कथेत प्रवेश केला. काव्ये लिहणा-या कवींनी त्या आख्ययिकांचा उपयोग तर करून घेतलाच, शिवाय अतिशयोक्ती, उपमा-उत्प्रेक्षांनाचा वापर करून त्यंची काव्ये बहारदार केली. रामायणाची श्लोकसंख्या २४००० असून महाभारताची श्लोकसंख्या १ लाख झाली. संशोधकांच्या मते रामाचे देवतीकरण म्हणजे विष्णूचा अवतार वगैरे वर्णन असलेला पहिले कांड संपूर्ण प्रक्षिप्त आहे. खरी रामकथा तर  दुस-या कांडापासून सहाव्या कांडापर्यंतच आली आहे. ह्यानंतरचे सातवे कांड जवळ जवळ प्रक्षिप्त आहे. दोन्ही महाकाव्यात त्या काळात प्रचलित असलेली बहुतेक सारी आख्याने मोठ्या प्रमाणावर समाविष्ट झाली असून त्या आख्यावात कालविसंगती आहे हेही रचयित्यांच्या लक्षात आले नाही. बहुतेक आख्याने चमत्कारांनी भरलेली आहेत. महाभारतात तर संपूर्ण रामायण आख्यानरूपाने आले आहे. महाभारताविषयी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सारी आख्याने जणू महाभारताच्या आश्रयाला आली आहेत!
सूतमंडळींनी आख्याने घुसडल्यामुळे रामायण-महाभारत ही दोन्ही महाकाव्ये लोकप्रिय झाली. जनमानसात रामकथा लोकप्रिय आहे म्हटल्यानंतर कवी प्रवृत्तीची ब्राह्मण मंडळी पुढे सरसावली. त्यांनी त्यात नीतीकथा आणि आध्यात्मिकतेची भर घातली. मात्र, मूळ कथावस्तुला धक्का लागलेला दिसत नाही. जैन आचार्यांनी आणि बौध्द मुनींनी देखील रामायणाच्या कथेतले वेगळे दुवे त्यांच्या अनुयायांपुढे ठेवले. आणखी एका वैशिष्ट्याचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. राजांच्या वंशावळी सांगण्याचे काम मूळ सूतमंडळींचेच असल्याने त्यांनी राजांची कुळपरंपरा थेट सूर्य-चंद्र ह्या आकाशस्थ ग्रहता-यांपर्यंत भिडवली. अर्थात त्यांनी तरी ती का भिडवू नये? जर पित्यांची परंपर आकाशात दिसणा-या सप्तर्षी तारकासंपर्यंत ऋषींनी भिडवली. तेव्हा सूतमंडळींना त्यांचे अनुकरण केले असेल तर त्यांना नावे ठेवता येत नाही. सूतमंडळींनी बहुतेक राजवंशांच्या पहिल्या पिढीला देवादिकांचे स्वरूप पाप्त करून दिले. तरीही संशोधकांचे असे मत आहे की देवांची पहिली पिढी वगळता सूतमंडळींनी दिलेली वंशावळ खरी असली पाहिजे. 
भारतात मुद्रण कला आल्यानंतर रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही महाकाव्यांच्या संशोधनाला वेग आला! गोरेसिओ संपादित बंगाली प्रत, टुरीन प्रत (१८४३-६७ ). कलकत्ता प्रत ( १८५९-६० ) ह्या प्रसिध्द आहेत त्याखेरीज तीन भाष्यांसह तीन खंडात मुंबई प्रत (१८९५ ), के. पी. परबसंपादित निर्णयसागर प्रत (१९०१) पश्चिम हिंदुस्थानी प्रत ह्या प्रतीही प्रसिध्द आहेत. ऐतिहासिक काळात सर्व प्रांतातल्या कवींनी आपल्या भाषेत रामायण काव्याची रचना केली आहे. मराठीत एकनाथांचे भावार्थ रामायण प्रसिध्द आहे तर उत्तरभारतात गोस्वामी तुलसीदासांचे रामचरितमानस फारच प्रसिध्द आहे. तामिळमध्येही रामायण लिहले गेले आहे. रामायण मालिकेच्या टायटलमध्ये देशभरातल्या प्रमुख रामायणांचा रामानंद सागरांनी आवर्जून उल्लेख केला आहे. नुसाताच उल्लेख केला नाही तर काही प्रसंग त्यावर बेतलेदेखील आहेत.
मघांशी वंशावळीचा उल्लेख केला. त्या संबंधात आणखी धोडेसे! रामाचा जन्म सूर्यवंशात झाला. इक्ष्वाकू हा त्याचा पहिला पूर्वज. इक्ष्वाकूपासून सूर्यवंश आणि विदेहवंश हे दोन्ही महत्त्वाचे वंश सुरू झाले. इक्ष्वाकूची कन्या इलाच्या मुलापासून पुरूरवाचा चंद्रवंश सुरू झाला. कृष्णाचा यादववंश हा चंद्रवंशाचाच! ह्या कृष्णाचेच अनेक वंश गुजरात आणि खानदेशात पसरले आहेत. खानदेश नावाची उपपत्ती कान्हदेश अशी सांगितली गेली. कान्हदेश म्हणजे कान्हाचा देश!  रामाचे वास्तव्य नाशिक परिसरातच झाले. सीतेचे अपहरण पंचवटीच्या परिसरात झाले.
पुरूरव्याच्या पौरव वंशातले भरत आणि दुष्यंत आणि भरत हे दोन राजे झाले. दोघेही इक्ष्वाकूच्या दिलीप राजाचे समकालीन होते. इक्ष्वाकूपासून १८६० वर्षांच्या काळातल्या ९३ व्या पिढीने महाभारत युध्दात भाग घेतला होता! त्याचा सहभाग कौरवांच्या बाजूने होता की पांडवांच्या बाजूने होता ह्या प्रश्नालर संशोधकांचे मौन आहे. रामाचा भाऊ शत्रूघ्न ह्याच्या पुढच्या पिढ्यांशी यादव कुळाशी संबंध आला. त्याच्या पिढ्या चंद्रवंशात मिसळून गेल्या.
अध्योध्येचे राज्य दाशरथी रामाचे होते. रामराज्य म्हणून अयोध्येच्या राज्याचे भारतात सर्वत्र कौतुक होते. पण खुद्द रामाला मात्र त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली! ऋषींना त्रास देणा-या राक्षसांचा निःपात करण्याचे काम रामाला बालपणीच करावे लागले. त्या काळात सीतेचा रामाबरोबर विवाह होण्याचा योग रामाच्या आयुष्ता आला ही त्यातल्या त्यात चांगली घटना त्याच्या आयुष्यात घडली. पुढे अयोध्येत त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असतानाच त्याच्या नशिबी १४ वर्षांच्या वनवास आला. वनवास संपल्यावर सीतेच्या चारित्र्यावर संशय घेताला गेला. त्यामुळे अयोध्येच्या राज्याची राणी होण्यऐवजी ऋषीच्या आश्रमात राहण्याची पाळी तिच्यावर आली.
राम वनवासात गेला त्यावेळी तो २५ वर्षांचा होता तर सीता अवघी २० वर्षांची होती. वनवासात सीताहरणाचे दुःख त्याला सहन करावे लागले. त्या दुःखाने तो वेडापिसा झाला अशा आशयाचे श्लोक रामायणात आहेत. सीतेचा शोध सुरू केला तेव्हा जटायूकडून त्याला सीताहरणाचा वृत्तांत समजला. पुढे वालीला ठार मारून त्याचा सख्खा भाऊ सुग्रीव ह्याच्याशी त्याचा मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. तिथेच हनुमंताची भेट झाली आणि सीतेची सुटका करण्यासाठी सुग्रीव सैन्याची त्याला मदत मिळाली. सेतु निर्माण कामात त्याला नलनील ह्यांचे सहाय्य झाले. लंकेत प्रवेश आणि रावणाशी युध्द करण्यापूर्वी रामाला अनेक अडचणींचा सामन करालवा लागला. रावणाला ठार करून सीतेची सुटका करण्यात त्याला यश मिळाले. त्याच्यासोबत वनवासाला गेलेल्या लक्ष्मणावरही प्राणान्तिक प्रसंग आला.
अवतार कल्पनेनुसार राम हा विष्णूचा अवतार तर लक्ष्मण हा शेषाचा अवतार. मनुष्य जन्मात विष्णूबरोबर शेषालाही खूप त्रासाला सामोरे जावे लागले. ह्या संदर्भात संत नामदेवांनी मजेशीर गोष्ट सांगितली आहे. कृष्णावतार घेण्याची वेळ आली तेव्हा विष्णूने शेषाला सांगितले, ‘अवतार घेण्यास तयार हो!त्यावर शेष म्हणाला, ‘नाही बोवा! मागे मी तुझ्याबरोबर लक्ष्मणाचा अवतार घेतला तेव्हा तुझ्याबरोबर मला निष्कारण वनवासात पायपिट करावी लागली होती. त्यावर विष्णू म्हणाला, कृष्णावतारात तू माझा मोठा भाऊ बलराम हो. मी कृष्णाचा अवतार घेणार असल्यामुळे राज्यकारभाराची कटकट मी सांभाळणार. तू मोठा भाऊ असल्यामुळे तू राज्याचा प्रमुख राहशील. तुझ्या डोक्याला कुठलाच ताप होणार नाही!
एकूण रामाचे आयुष्य तसे पाहिले तर खडतर होते. पण रामायणात त्याचे चरित्र असे काही रेखाटण्यात आले आहे की लाखो लोकांना ते अतिशय प्रेरणादायक वाटते. ते इतके प्रेरणादायक आहे की भारतीय जनमानसाने रामाला देवत्वाचा दर्जा बहाल केला. देशभर त्याची देवळे उभारली गेली. अयोध्येतही त्याचे विशाल देवालय उभारले जात आहे. रामाचे चरित्र जितके स्फूर्तीदायक तितकेच कृष्णचरित्रदेखील स्फूर्तीदायक आहे. महाभारताचा बराचसा भाग कृष्णचरित्राशी संबंधित आहे. किंबहुना कृष्णाच्या साह्याविना पांडवांचा विजय झालाच नसता.
कोरोना संकटात सोशल डिस्टन्सिंग सांभाळण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकावर स्वतःच्या घरातल्या घरातच स्थानबध्द होण्याची वेळ आली आहे. ही स्थानबध्दता वनवासतुल्य आहे. सध्यातरी सोशल डिस्टन्सिंग ह्या एकाच उपायाने कोरोना विषाणूचा फैलाव थांबवता येण्यासारखा आहे हे खरे असले तरी ही अभूतपूर्व स्थानबध्दता अनेकांना झेपण्यासाररखी नाही. स्थानबध्दतेसारखी दुसरी शिक्षा नाही. ती शिक्षा भोगण्यासाठी बळ मिळावे म्हणून दूरदर्शनामधील कुणाला का होईना रामायणा मालिकेचे पुनःप्रसारण करण्याची बुध्दी झाली असावी!  असावी म्हणण्याचे कारण इंदिराजींच्या काळात अटलबिहारीच्या सभेला गर्दी होऊ नये म्हणून जिस देशमें गंगा बहती हैह्यासारखा सुपरहीट सिनेमा लावणारे डोकेबाज अधिकारी दूरदर्शनमध्येच सापडले होते. प्रकाश जावडेकरांनाही दूरदर्शनमध्ये डोकेबाज अधिकारी भेटला असावा! बाबा हे कलीयुग आहे!!
रमेश झवर

Wednesday, March 25, 2020

संचारबंद जनजीवन


एका हातात लाठी तर आणि दुसरा हात अभयदानासाठी वर!  
कालपासून जारी करण्यात आलेल्या संचारबंदीनंतरचे हे चित्र देशभरात दिसत आहे. ढुंगणावर फटके मारल्याशिवाय टग्यांना पिटाळून लावता येणार नाही अशी पोलिसांची ठाम समजूत असेल तर ती त्यात त्यांची काही चूक नाही. आतापर्यंत जारी करण्यात आलेली संचारबंदी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची खराब झालेली परिस्थिती हाताळण्यासाठीच होती. त्यामुळे वेगळा अनुभव पोलिसांच्या गाठीशी असण्याचा प्रश्नच नाही. ह्या वेळची संचारबंदी वेगळी आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून एकमेकांपासून अंतर ठेवून व्यवहार करणे जनतेला सुकर व्हावे ह्यासाठी ह्यावेळची संचारबंदी आहे. अन्नधान्य, किराणा माल, दूध, भाजीपाला, मटण, मासळी इत्यादि जीवनावश्यक मालाचा अविरत पुरवठा करण्यास मज्ज्वाव करण्यासारखे वर्तन पोलिसांकडून अपेक्षित नाही. ह्या संदर्भात मालमाहतूक संघाचे प्रवक्ते दयानंद नाटकर ह्यंच्या माझाल्याशी फनवर बोलणे झाले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत सर्वस्वी नवाच मुद्दा उपस्थित झाला.
वाहतूकदार जीवनावश्यक मालाची वाहतूक करण्यास तयार आहेत, असे सांगून नाटकर म्हणाले, आमचे ट्रक अभे आहेत. मावाची नेआण करण्यासही आम्ही तयार आहोत. पण कोरोनाच्या प्रसारमाध्यातून झालेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या प्रचारामुळे आमचे ड्रायव्हर गावी निघून गेले. त्यांची काम करायला ना नाही. पण एका गावातून दुस-या गावाला माल नेताना महामार्गावर ड्रायव्हरना महामार्गावर जेवण मिळत नाही. साधा चहासुध्दा मिळत ननाही. संचारबंदी हुकूमामुळे महामार्गावरचे सर्व ढाबे बंद करण्यात आले आहेत. अनेकांनी ते आपणहून बंद केले! ड्रायव्हर्सना कोरोनाची भीती नाही असे नाही मिळाला तर त्यांना रोजार हवाच आहे. काही निर्धारित पेट्रोल पंपावर त्यांच्यासाठी जेवण-विश्रांतीची सोय करण्याची पेट्रेल पंपचालकास सक्ती करणे संबंधित विभागाच्या पोलिस अधिका-यांना शक्य आहे. अशा सोयी करून दिल्यास राज्यातीलच काय, पण आंतरराज्य ट्रक वाहतूकही सुरू होऊ शकेल! जीवनावश्यक मालाबरोबर निर्यात माल न्हावाशेवा बंदरात पोहचवण्यासही वाहतूकदार तयार होतील. आयात-निर्यात माल ही रेसीप्रोकल तत्त्वावर चालतो. आपण आज निर्यात बंद केली तर त्या देशाकडून होणारीही आयातही बंद पडण्याचा धोका आहे. संचारबंदीमुळे व्यावहारिक प्रश्न सुटू शकत नाही.उलट ते जिकीरीचे झाले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन ह्यांनी माझ्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमका हाच मुद्दा मांडला होता. संचारबंदी अव्यवहार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते, त्यांचे हे मत केवळ मोदी सरकारवर टीका करायची म्हणून नाही. वाहतूकदार दयानंद नाटकर ह्यांनी निदर्शनास आणलेली नेमकी अडचण महाजनांचे मत किती अचूक आहे हेच दर्शवते. श्री. महाजन हे काही काळ महाराष्ट्र इकॉनॉमिक कॉऊन्सिलचे अध्यक्ष होते. प्रवक्ते म्हणून का होईना महाजनांसारख्या अनुभवी माणसांचा वावर राज्याच्या राजकारणात आहे हे सुदैव!
कोरोना विषाणू भारतापर्यंत पोहचण्याची शक्यता राहूल गांधी ह्यांनी व्यक्त केली होता. तसे त्यांनी व्टिटही केले होते. पण राहूल गांधी ह्यांची पप्पू अशी खिल्ली संघपरिवारातल्या लोकांनी उडवण्यास सुरूवात झाल्याने त्यांच्या सुचनेकडे पंतप्रधानांनी चक्क दुर्लक्ष केले. व्देषाचा विषाणू कोरोना विषाणूपेक्षा किती भयंकर असतो हेच ह्या व्टिट प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आले. राजकीय विरोधकांना सन्माने वागवायचे ही आपल्या देशाची परंपरा. कोरोना विषाणूच्या सावल्या अधिक काळसर होण्याची शक्यता लक्षात घेता सर्वपक्षीय राजकारणाच्या परंपरेला उजाळा दिला पाहिजे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

ही एकहाती लढाई नव्हे!


कोरोनाविरूध्द लढाई ही सीमेवरची लढाई नाही, ती लष्कराने लढावी अशीही लढाई नाही. ह्या लढाईत कोरोना विषाणू देशातील नागरी आणि ग्रामीण वस्तीत प्रत्येकाच्या घरात घुसण्याच्या तयारीत असून त्याला हुसकावून लावण्यासाठी सर्वप्रथम एकमेकांचा संपर्क टाळणे गरजेचे असते आणि संपूर्ण एकान्तवासात राहायची मनाची तयारी करणे महत्त्वाचे आहे ह्याबद्दल वाद नाही. परंतु हे केव्हा साध्य होईल? निव्वळ संचारबंदी जारी करून ते मुळीच साध्य होणार नाही. परंतु एकान्तवासात राहायचे तर रोजच्या जगण्यासाठी दूध-भाजीपाला, फळे आणि मटण-मासळीचा मुबलक पुरवठा होणे आवश्यक आहे. पुरवठ्याची जबाबदारी राज्यांतील कलेक्टर्स आणि पोलिस अधिक्षकांवर ढकलून चालणार नाही. वितरण व्यवस्थेत कल्पक बदल करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने भाजीविक्रते आणि धान्यविक्रेत्याच्या गाड्या मोहल्ल्यापर्यंत पोहचण्याची व्यवस्था केली तरच बाजारात अनावश्यक गर्दी होणार नाही आणि जीवनावश्यक चिजांचा सुरळित पुरवठा होऊ शकेल. लहान विक्रेत्यांना सर्वोतोपरी मदत उपलब्ध करण्यासाठी काय करता येईल ह्यासाठी प्रतिष्ठित व्यापारी आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या बैठका  कलेक्टर्सना बोलावता येतील.
भक्त आणि राजकीय कार्कर्ते थाळ्या आणि टाळ्या वाजवण्यासाठी ज्या उत्साहाने झुंडीने रस्त्यावर एकत्र आले त्या उत्साहाने लोकांना मदत करण्यासाठी मात्र पुढे आले नाही. स्वतःला केडरपार्टी म्हणवून घेणा-या पक्षाच्या एकाही नेत्याने तुम्ही फक्त आदेश द्या आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत असे पत्र पंतप्रधानांना लिहले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे हे वैयक्तिक दुर्दैवच म्हणायला पाहिजे.
पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् ह्यांनी नेहमीप्रमाणे व्यापार, उद्योग आणि बँकांना  सवलती जाहीर केल्या. त्या सवलतींचे स्वरूप बरेचसे तांत्रिक आहे. डेबिट कार्ड आणि मिनिमम बॅलन्सचे नियम तर स्टेट बँकेने निर्मला सीतारामन् ह्यांच्या घोषणेआधीच जाहीर केल्या होत्या. चलनटंचाई जाणवू नये म्हणून रिझर्व्ह बँकेने बाँड तरी आधीच विक्रीला काढले होते. ह्या सवलतींचा हेतू एकच शेअर बाजाराला सावरण्यास मदत करणे. कोरोनाच्या भीतीने पछाडलेला मुंबई शेअर बाजार सावरला गेला पण काही तासांपुरताच! ही पोस्ट लिहीत असताना मुंबई शेअर बाजाराची गटांगळी सुरूच होती. टास्क फोर्सने आपले काम केले, आता पुढचे शेअर दलालांनी पाहायचे, असे तर संबंधितांची वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे देशभरातल्या दवाखान्यांच्या ओपीडी सेवा बंद पडल्या. सामान्य दुकानदार संभ्रमित आहे. भाजीमार्केटात लोकांची तुडुंब गर्दी आहे. जे व्हायला नको तेच नेमके सुरू झाले. लहानसहान कामासाठी बाहेर जाणा-या प्रामाणिक माणसाला पोलिसांचा दांडका खाण्याची भीती वाटत आहे. ह्या सगळ्या अडचणी कुणी बघायच्या?  नेहमी गाड्या फिरवून भाजी विकणारे हॉकर्स नेमके गायब झाले आहेत. त्यांना गाड्या काढण्यास प्रवृत्त करणे हे पोलिसांचे काम नाही? नागरी पुरवठा मंत्री, गृहमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांनी ह्या बारीकरीक लक्ष घालायचे नाही तर कुणी घालायचे?
नेहमीप्रमाणे राष्ट्राला उद्देशून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी भाषण केले. कोरोनाविरूध्दच्या लढाईचे ते सेनापती आहेत. म्हणून लढाईचे रणशिंग त्यांनी स्वतः फुंकले ते ठीक. पण रणशिंग त्यांनी एकट्याने फुंकले. ते जेव्हा त्यांनी फुंकले तेव्हा केंद्रीय मंत्रिमंळातील त्यांचे सहकारी आरोग्यमंत्री, नागरी पुरवठा मंत्री. गृहमंत्री काय करत होते हे कळण्यास मार्ग नाही. मोदींच्या भाषणानंतर अधिकारीवर्गाच्या बैठका घेणे हाच त्यांचा शंख निनाद !  त्यांचा शंखनिनाद निदान वृत्तवाहिन्यांवरून ऐकायला मिळाला नाही. कलेक्टर्सनी घेतलेल्या  बैठकांच्या बातम्यांचे व्हिडिओ का नाही दाखवले गेले? देशव्यापी युध्दाचे रिपोर्टिंग करण्यास पत्रकारांनी नकार दिला का? देशभरातील अनेक शहरात स्थानिक चॅनेल आहेत. प्रश्न असा आहे की ह्या चॅनेलचा प्रशासनाने उपयोग का करून घेतला नाही? कोरोनाविरूध्दची लढाई ही पंतप्रधानांची आणि मुख्यमंत्र्यांची एकहाती लढाई नाही. त्या लढाईत प्रशासन कुढे आहे?
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Sunday, March 22, 2020

जंतूयुध्द

विश्वात १६७०००० प्रकारचे जंतू आहेत. त्यापैकी ६३१ ते ८२७ हजार जंतू माणसावर हल्ला करू शकतात. २००३ साली सार्स, २००५ साली बर्ड फ्लू, २००९ साली स्वाईन फ्लू, २०१२ साली एमइआरएस, २०१४ साली एबोला आणि गेल्या वर्षी-- २०१९ साली—सार्स एन कोरोना उर्फ कोरोना आयडी-१९ ह्या विषाणूचा हल्ला झाला! 2003 ते २०१४ ह्या १८ वर्षांच्या काळात झालेला विषाणूंचे हल्ला मर्यादित होता. कोरोना विषाणूचा हल्ला मात्र इतका मोठा आहे की हा हल्ला एखआद्या महायुध्दात शत्रूवर होण्या-या हल्ल्यापेक्षा मोठा आहे. दीडशेहून अधिक देशातली माणसे ह्या हल्ल्यात सापडली आहेत. एवढी मोठ्या प्रमाणावर हल्ला गेल्या शतकात झालेल्या दोन्ही महायुध्दातही झाला नव्हता! दोन्ही महायुध्दे १५-२० देशांपुरतीच सीमित होती. दुसरे म्हणजे ती महायुध्दे लष्करांकडून लढली गेली. कोरोना युध्द एकाच वेळी अनेक देशात लढले जात असून ते सैनिकांऐवजी हजारो डॉक्टर्स, नर्सेस, वार्डबॉईज आणि लॅबमधले असंख्य विश्लेषक लढत आहेत.
भारतात २०० जणांना कोरोनाची लागण झाली असून आपले हजारो डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत आहे. कोरोनाविरूध्द सुरू झालेल्या युध्दात केंद्र आणि राज्य सरकारांकडून यथाशक्ती मदत केली जात आहे. अजूनही कोरोनाचे उच्चाटन झालेले नाही. कोरोनाने जनजीवन तर विस्कळीत करून टाकलेच; शिवाय टेंभा मिरवणा-या अर्थव्यवस्थेचा गुमान जिरवला. मजूर आणि कर्मचारीवर्गाला कसस्पटासमान लेखण्याची प्रवृत्तीही बळावत चालली होती. काळ तर मोठा कठीण आला आहे! ही परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली क्षमता आपल्या राज्यकर्त्यांत काही अपवाद वगळता निश्चित दिसून आली. अर्थात ही क्षमता पुरेशी नाही. म्हणूनच कोरोना युध्दात मिळालेल्या यशाने आत्मसंतुष्ट राहून चालणार नाही.
जगाची लोकसंख्या एक अब्ज व्हायला तीन लक्ष वर्षे लागली. गेल्या शंभर वर्षांत ती ६ अब्जांनी वाढली. तुलनेने पाहिले तर पूर्वी माणसाची भूक भागवण्यासाठी चीनमध्ये १ अब्ज कोंबड्या कापाव्या लागत होत्या. १९६० नंतरच्या काळात माणसाची भूक भागवण्यासाठी चीनमध्ये २०अब्ज कोंबड्या कापाव्या लागतात! सांगण्याचा हेतू इतकाच की पशुपक्ष्यांचा संपर्क कमी झाल्याखेरीज व्हायरसचा प्रसार थआंगणे अवघड आहे. डीएनए १८ वा भाग हा व्हायरसमय आहे. जेव्हा व्हायरसची लागण होते तेव्हा तो डीएनएमधल्या असलेल्या कुठल्यातरी व्हायरसची हकालपट्टी करतो आणि स्वतःला अंशतः का होईना सुस्थापित करतो. ही व्हायरस सुस्थापित तर होतोच. तो इमानेइतबारे पुढच्या पिढीत संक्रमित होतो. आणि तसा तो होताना हळुहळू त्याचे इम्युनायजेशनही होत जाते. हा एक वेगळा विषय आहे. शास्त्रज्ञांच्या मते जंतूतले प्रोटिन हे त्याचे गंडस्थळ. ते फोण्यात डॉक्टर्सना यश मिळाले की जंतूविरूध्दधे युध्द मानवाने जिंकल्यासारखेच आहे. मी कोणी शास्त्रज्ञ नाही. हा ब्लॉग-लेख लिहताना माझ्या मर्यादांचे मला भान आहे. माझ्या लेखातली माहितीतल्या तज्ज्ञांनी उणीवा दाखवून दिल्या किंवा पुष्टी दिली तर मला आनंद वाटेल!
रमेश झवर  
ज्येष्ठ पत्रकार

Saturday, March 21, 2020

कोरोना लढाईतले वज्रास्त्र

कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयित रूग्णावर तूर्त तरी गोळ्या-इंजेक्शनसारखा हमखास गुण येणारा उपचार नाही. सध्या जे उपचार सुरू आहेत त्यांचे स्वरूप दमा, न्यूमोनिया, घशाचे इन्फेक्शन वगैरेवर केल्या जाणा-या उपचारांसारखे आहेत. जवळपास ती औषधे दिली जातात. पेशंट गंभीर झाला तर त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्याचा आणि मृत्यूच्या प्रांतात त्याचा प्रवेश होणार नाही ह्यादृष्टीने त्याचा प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. संभाव्य कोरोना विषाणूबाधित व्यक्तीला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा उपाय केला जातो. त्याच्यापासून इतरांना प्रादूर्भाव होऊ नये हा महत्त्वाचा उद्देश असतो. लक्षणे कमी झाली की एकमेकांशी अंतर राखून सावधगिरीपूर्वक व्यवहार करण्याच्या सूचना देऊन त्याला क्वारंटाईनमुक्त केले जाते. पण ही झाली प्रतिबंधात्मक उपाययोजना!  सध्या कोरोना विषाणूची साथ जगभर फैलावत चालली आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या हल्ल्यातून पेशंटला लौकरात लौकर म्हणजे ५-६ दिवसात आराम मिळवून देणारी औषधे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्या औषधांच्या झपाट्याने उत्पादन सुरू झाल्याखेरीज कोरोना विषाणूची साथ आटोक्यात येणार नाही असे सध्याचे चित्र आहे. म्हणूनच औषधोत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेले जगभरातले अनेक संशोधक कामाला लागले आहेत. संशोधनात कृत्रिम बुध्दीमत्ता साठवलेल्या आयबीएमनिर्मित महासंगणकाची मदत घेतली जात आहे. संशोधकांना आतापर्यंत तुलनेने ब-यापैकी यश आले आहे. औषधांच्या चाचण्यादेखील सुरू झाल्या आहेत. शुअरशॉट औषधांचे उत्पादन सुरू करण्याचे पेटंट प्राप्त करून घेण्याची संधी आपल्यालाच मिळावी ह्यासाठी अनेक नामवंत औषध कंपन्यांची त्या संशोधनावर नजर आहे.
सध्या अँटीव्हायरल आणि अंटीइन्फ्लेटरी औषधांवर डॉक्टर मंडळींची भिस्त हे. त्यातली बरीचशी औषधे फ्लयू, मलेरिया, न्यूमोनिया. डेग्यू –ह्युमॅटाईड अर्थरायटीस ह्या रोगांवर डॉक्टर मंडळी वापरत आली आहेत. ह्या रोगांची लक्षणे आणि कोरोना विषाणूबाधित रूग्णांचीही लक्षणे वरवर का होईना सारखी आहेत. कोरोना विषाणू-१९ ची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे शोधत असतानाच मुळात कोरोना विषाणू बाधाच होणार नाही अशी लस शोधून काढण्याचाही संशोधकांचा प्रयत्न सुरू आहे.
कोरोना विषाणू बाधित रुग्णावर अँटीव्हायरल, अँटीबॉडीज वा व्हॅक्सिन आणि अँटी इन्फ्लेटरीज अशी त्तिहेरी उपाय करून रोग बरा करण्याचे लक्ष्य बाळगले जाते. अँटीव्हायरल औषधात माणसाच्या शरारीतील पेशींवर हल्ला करून विषाणूंच्या जेनामच निर्मिती करून विषाणूंच्या आपोआप होणा-या वाढीला आळा घालण्याच्या दृष्टीने रासायनिक घटक असतात. अँटीबॉडीज औषधे जरा वेगळ्या प्रकारची असतात. विषाणूची ताकद असलेले प्रोटिनचे केंद्र नष्ट करण्याचा प्रयत्न ती औषधे करतात. विषाणूंची ताकद एकदाची नष्ट झाले की विषाणू नाश पावतात. अँटीइन्फ्लेमेटरी औषधांचे कार्य वेगळ्या प्रकारचे असते. माणसाच्या शरीरातली प्रतिकारशक्ती प्रभावी करण्याचा जोरकस प्रयत्न अँटी इन्फ्लेमेटरी औषधे करतात. त्यामुळे कमजोर मोल्युक्युल्सचा नायनाट होतो आणि रोग्यास बरे वाटू लागते. ही तिहेरी उपचार पध्दत एकाच गोळीत किंवा इंजेक्शनमध्ये समाविष्ट करता येणार नाही. कदाचित दोनतीन गोळ्यांच्या काँबिनेशन्सचा वापर करून औषधोपचार करणे वर्षभरात डॉक्टर मंडळींना शक्य व्हावे असा प्रयत्न आहे.  बहुसंख्य विषाणूंचे एक वैशिष्ट्य असे की ते आरएनए, प्रोटिन्स आणि लिपिड ह्या तीन घटकांपासून तयार झालेले असते. दुस-याची ताकद हिसकावून घेतल्यामुळे हे विषाणू जिवंत राहतात. माणसाच्या शरीरातल्या पेशींवर हल्ला करूनच त्यांना ताकद मिळत असते!
औषधे येतील तेव्हा येतील तूर्त तरी कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही म्हणून उपाययोजना करणेच आपल्या हातात आहे. उन्हाळा आला की कोरोना विषाणू आपोआप निघून जातील, गोमूत्र प्राशन केल्यास विषाणू मरून जातील ( आणि माणूस जगणार! ) वगैरे बकवास सध्या जोरात सुरू झाली आहे. त्यांची मानसिकता आणि पण देवी कोपली वगैरे कारणे सांगणा-या जुन्या काळातल्या मानसिकता ह्यात तत्त्वतः फारसा फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या रुग्णावर एखादा उपाय लागू होणे वेगळे आणि संशोधनावर भर देणारे सामूहिक मानवी प्रयत्न यशस्वी होणे वेगळे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र, शेण ही ढाल-तलवार तर प्रयोगशाळेत चाचणी घेऊन संशोधित केलेले औषध हे कोरोनावर वज्रास्त्र आहे!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Saturday, March 14, 2020

कोरोना पुराण


आतापर्यंत चीनमधून आलेल्या Covid-19 विषाणूच्या नावाचा उच्चार  मी चुकीचा करत होतो. चुकीचा लिहीत होतो. आतापासून कोरोना विषाणू असा बरोबर (हाही उच्चार बरोबर आहे की नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.) उच्चार करत आहे. लिहतानाही मी कोरोना असेच लिहीत आहे. लिहीत राहीन. कोरोनाची साथ आली असली तरी त्या साथीचा अवस्था प्राथमिक आहे. ह्या अवस्थेचा अर्थ असा की परदेशातून आलेल्या भारतीय किंवा विदेशी प्रवाशांच्या संपर्कामुळे कोरोना विषाणूची बाधा झालेल्याची भारतातली संख्या इटाली आणि चीन ह्या देशातल्या संख्येच्या तुलनेने खूपच कमी आहे. महाराष्ट्रात ती शंभरच्या घरात गेली आहे. अर्थात ह्या संख्येबद्दल मतभिन्नता आहे.
कोरोनाबद्दल लोकसमजुती विलक्षण आहेत. लसूण खाल्ल्याने किंवा गोमुत्रप्राशनाने कोरोना तुमच्या वटेला जाणार नाही. हा एक गोड गैरसमज आहे. तसेच कोरोना विषाणूच्या बाधेने माणूस मरतोच असेही नाही. करोनाचा फैलाव सध्या तरी संसर्गाने झाल्याचे दिसून आहे. कोरोना विषाणूपासून वाचायचे असेल तर वैयक्तिक स्वच्छतेवर मात्र भर देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे. मुख्य म्हणजे ज्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असेल त्यांनी डॉक्टरी उपायावरच भर दिला पाहिजे. त्यांनी क्वारंटाईन वार्डमध्ये दाखला करण्यास सुचवले असेल तर त्याबरहुकूम वार्डमध्ये दाखल झाले पाहिजे. विनाकारण डॉक्टरशी हुज्जत घालून नये. कोरोनाबद्दलची निव्वळ माहिती वाचून कोणी तज्ज्ञ होऊ शकत नाही. डॉक्टरांचे निदान मह्त्वाचे असते. कारण ते अनुभवावर आधारित असते. रोगाच्या विविध अवस्थांचे त्यांचे ज्ञान अद्यावत असते.
अमेरिकेत तर अध्यक्ष ट्रंप हे स्वतः कोरोना विषाणूची चाचणी करून घेण्यास तयार झाले आहेत. कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांना मदत करण्यासाठी ५० अब्ज डॉलर्सचा निधी काँग्रेसने मंजूर केला आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज न घेण्याचे बँकांनी ठरवले आहे. तसेच देशात उर्जेचा साठा करण्यचे धोरण आखले असून पेट्रोलियमचा साठा जास्तीत जास्त बाळगण्यास सुरूवात केली आहे. आपल्याकडे मात्र पेट्रोलियमवर करवाढ करण्यात आली. मोबाईलवरचा कर १८ टक्के करण्यात आला! अमेरिकेत छोटे व्यापारी आणि उद्योजक ह्यांच्याकडून कर वसूल करू नये अशी मागणी डेमॉक्रॅट पक्षाने केली आहे.
कोरोना विषआणूग्रस्तांची चाचणी करण्याच्या सोयी अपु-या आहेत अशा बातम्या न्यूयॉर्क टाईम्सने दिल्या आहेत. अमेरिकेतल्या सध्याच्या यंज्ञत्रणेमार्फत फक्त ५००० कोरोना विषाणू रूग्णांची चांचणी पार पडली. अमेरिकेतल्यापेक्षा दक्षिण कोरियात चाचणी केंद्रांची संख्या अधिक आहेत असे तेथील वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. सध्या अमेरिकेत असलेले टेस्ट कीट्स अपुरे आहेत असेही वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. आपल्याकडे टेस्ट आणि त्यानंतर रूग्णांची क्वारंटाईन वार्डमध्ये रवानगी मात्र वेगाने सुरू आहे. अर्थात मास्क आणि स्वच्छता रूमालांची विक्री अत्यावश्यक जिनसाखाली आणण्याचा हुकूम सरकारने जारी केला असला तरी दोन्ही वस्तुंचा काळा बाजार सुरू झाल्याच्या बातम्या आहेत.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार प्राथमिक अवस्थेत असून अधिक प्रसार होण्यापासून रोखण्यात संबंधित यंत्रणेला यश मिळाले आहे. अमेरिका आणि भारत ह्या दोन्ही देशात सध्या कोरोनाइतकीच व्यापारउद्योगांबद्दल काळजी वाढली आहे. दोन्ही देशात भांडवल बाजार कोसळला. युरोपमध्ये जाण्यायेण्याच्या प्रवासास ट्रंप सरकारने बंदी घातल्यामुळे वॉलस्ट्रीट कोसळले असे तेथील मार्केट तज्ज्ञांना वाटते. अमेरिकेतला बाजार कोसळ्याने मुंबई शेअर बाजार कोसळला. भांडवल बाजाराचे कोसळणे ह्याचा अर्थ देशाची अर्थव्यवस्था कोसळणे. एक काळ असा होता की मुंबई शेअर बाजाराच्या चढउतारचा देशाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याचे कारण नाही असे अर्थमंत्र्यांचे मत होते. शेअर बाजाराच्या उलाढालुद्दल अर्थमंत्र्यांचे स्वतःचे असे काही वेगळे मतच नाही.
कोरोना पुराणाच्या आजचा अध्याय एवढाच आहे! महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली. कोरोनाग्रस्तांवर आवश्य उपचार करण्याच्या दृष्टीने मुंबईतले कस्तुरबा इस्पितळ अतिशय योग्य. पण त्यापूर्वी कस्तुरबा इस्पितळाच स्च्छ करण्याची निश्चित गरज आहे. जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेली इस्पितळे स्वच्छ केली पाहिजे. प्रसंगी खासगी इस्पितळांचीही मदत घेतली पाहिजे. सुदैवाने कोरोनाचा प्रसार वाढण्यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारने मॉल. चित्रपटगृहे. क्लब, तरणतलाव इत्यादी गर्दीची ठिकाणे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अमलबजावणी सुरू झाली.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार


Friday, March 13, 2020

करूणाहीन करोना

करोना विषाणूंकडे करूणा नाही. भारतात बळी पडण्याचे प्रमाण कमी आहे हे पाहून मुंबई युरोपमध्ये विस्तार करत राज्याकर्त्यांची आणि गुंतवणूकदारांची बुध्दी पालटण्यात मात्र करोना विषाणू यशस्वी झाला. विदेशी गुंतवणूकदारांची बुध्दी फिरताच त्यांनी मुंबई शेअर बाजारात जोरदार विक्री सुरू केल्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ९ टक्के कोसळला. तशी घसरण दोनतीन दिवसांपासून सुरू होतीच. कालची घसरण मुंबई शेअर बाजारापुरतीच मर्यादित न राहता डोव जोन्स, एस अँड पी ५००, वॉलस्ट्रीट, डँक्स इत्यादि जगभरातील भांडवल बाजारही जोरात कोसळले.  पडझडीत आतापर्यंत १५ लाख कोटी रुपयांची संपत्ती फुकाफुकी नष्ट झाली. ह्या संपत्तीत अर्थात नवभांवलदारांची, विशेषतः बँकांच्या ठेवी मोडून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार-यांचाच वाटा अधिक असू शकतो. जुन्या सराईत भांडलदारांचे मात्र अशा काळात सहसा नुकसान होत नाही, कारण, म्युच्चुअल फंडातला करोडोंचा लभ्यांश त्यांनी आधीच काढून घेतलेला असतो. बाजार कोसळण्याला कारण लागत नाही हे त्यांना अनुभवाने माहित झआले आहे.  शेअरबाजार कोसळण्यासाठी जोरदार अफवा आणि गाफील सरकारची एखादी लहानशी कृती पुरेशी ठऱते ह्याचेही त्यांना कायम भान असते!
करोनाचा धोका ओळखून मिळतील त्या इमारतीत रातोरात इस्पितळे सुरू करण्याचे सोडून परदेशातून भारतात येऊ    इच्छिणा-या अनेकांचे व्हिसा रद्द करण्यात आले तर अमेरिकेत युरोपच्या प्रवासावर आणि युरोपीय प्रवासावर निर्बंध आणण्यात आले. भारतात अनेक विमान कंपन्यांच्या विमानसेवा थांबवण्यात आल्या तर अमेरिकेत अनेक शहरात रेड अलर्ट घोषित करण्यत आला. भारतात आलेल्या प्रवाशांचे क्वारंटीईन करत बसण्यापेक्षा  विमान उड्डाणास आणि उतरण्यास बंदी घातली की काम सोपे झाले असा विचार करून मोदी सरकारने तातडीने बंदी केली. चीनमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव होताच चारपाच खास इस्पितळे उभारून चीन मोकळा झाला!  आपल्याकडे मात्र लोकांना मन की बात आणि गोमुत्रोपचार पध्दती आणि हातपाय स्वच्छ धुण्याविषयी पोपटपंची ऐकावीच लागणार. असो. मुख्य मुद्दा असा की करोना विषाणू फक्त मुंबई शेअर बाजाराला धडक देऊनच थांबतो की आपली अर्थव्यवस्था खिळखिळी करून देशाला बेरोजगारी आणि मंदीच्या खाईत ढकलून मगच पोबारा करतो हे कोण सांगणार? अन्य देशांच्या तुलनेने भारतात करोना विषाणूचा फैलाव कमी आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब! अर्थात केरळमध्ये एक बळी करोनाने घेतलाच. महाराष्ट्रातही पाऊल टाकले आहे.
गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करण्याचे भले आश्वासन दिले असेल, पण अजूनही फारच कमी युनिट कार्यान्वित  झाले आहेत. तरीही भारत ही आजघडीला परदेशी मालाची मोढी उतारपेठ आहेच. एकीकडे दिवंगत अर्थमंत्री अरूण जेटलींनी जीएसटीच्या माध्यामातून औद्योगिक मालावर जबर करभार लादण्याचा धडाका लावला तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेला व्याजदरात कपात करायला लावली! स्पेक्ट्रमचे दर अव्वाच्यासव्वा वाढवून टेलिकॉम कंपन्यांचे पेकाट मोडून टाकले. बँकांचे व्याजदर कमी करण्यात येऊनही कर्जाला उठाव नाही, मालाला उठाव नाही अशी स्थिती निर्माण झाली. त्याचा व्हायचा तो परिणाम दिसलाच. जीडीपीची घसरण सुरू झाली. तो आता ३-४ टक्कंयावर आला तरी खूप झाले! शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करतो असे केंद्र सरकारने वारंवार सांगितले. प्रत्यक्षात काय झाले ते फक्त    शेतक-यांनाच माहित आहे. राजाने आणि पावसाने झोडपले तर गरीब शेतकरी तक्रार कुणाकडे करणार?  दरम्यान अमेझॉनसारख्या ऑनलाईन विक्री करणा-या कंपन्यांची आणि लहान व्यापा-यांना झोपवणारी मॉल संस्कृती मात्र उदयास आली. बरे, मॉलवाले त्यांना मालाचा पुरवठा करणा-या व्यापा-यांच्या हातावर लगेच पैसे ठेवतील का? नाही. त्यांना दीड महिन्यांची बोली करून प्रत्यक्षात ३ महिन्यांनी पैसे चुकते केले जातात ही वस्तुस्थिती. ग्राहकांकडून डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डाद्वारे लगेच पैसे घेतले जातात! देशाच्या डिजिटल प्रगतीचे हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. कामगार, छोटे दुकानदार, कसेबसे तग धरून उभे आहेत!
करोनामुळे देशाची दुःस्थिती आणखी वाढण्याचा संभव अधिक!  देशाच्या स्थितीचे सत्ताधा-यांचे तसेच विरोधकांचे आकलन आणि सामान्य माणसाचे आकलन ह्यात जमीनअस्मानचा फरक आहे! जनतेबद्दल कोणालाच करूणा वाटत नाही. देशातल्या राजकारण्यांत चर्चा सुरू आहे ती नागरिकत्व दुरूस्ती कायद्याची, लोकसंख्या रजिस्टरची, राममंदिर कसे बांधले जाईल ह्याची! करोना विषाणूपासून लोकांचा जीव वाचवण्याच्या बाबतीत सरकार यशस्वी होईलही, मात्र देशातील जनतेला त्रस्त करून सोडण्याच्या बाबतीत करोना विषाणूला अजिबात करूणा वाटण्याचा सुतराम संभव नाही. कारण, सृष्टीतला तो सूक्ष्म चीव असला तरी करूणाहीन आहे! उन्हाळा सुरू झाला की कदाचित तो निघूनही जाईल. जाताना स्मृती ठेवून जाईल!
रमेश झवर
ज्येश्ठ पत्रकार

Wednesday, March 11, 2020

राजकीय रस्सीखेच

काळ संकटाचा असो वा शांततेचा, वैयक्तिक स्वार्थाआड येणा-या बुजूर्गांविरूध्द बंडाचे बिगूल वाजवून श्रेष्ठींना अद्दल घडवण्याची रीत देशाच्या राजकारणात, विशेषतः काँग्रेसच्या राजकारणात सुस्थापित आहे. काँग्रेसबरोबरचा १८ वर्षांचा संबंध संपुष्टात आणून ज्योतिरादित्य सिंदिया भाजपात प्रवेश करण्यास भाजपाच्या दरवाजात उभे राहिले आहेत. ठरल्याप्रमाणे सारी औपचारिकत पुरी झाली की ज्योतिरादित्य सिंदियांना भाजपात प्रवेश तर मिळेलच; शिवाय भाजपाकडून खासदारकीचे तिकीट मिळेल. केंद्रीय मंत्रिपदाची झूलदेखील त्यांच्या अंगावर चढवली जाईल! काँग्रेस सोडून सरळ सरळ अन्य पक्षात जाण्याची किंवा काँग्रेस आडनाव लावलेला नवा पक्ष स्थापन करण्याची एका गढूळ परंपरा काँग्रेसमध्ये पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. ज्योतिरादित्यांचे उदाहरण हे परंपरेला शोभणारे आहे.  
संस्थानिकांच्या राजकारणात निष्ठा वगैरेला किंमत असते. अलीकडच्या लोकशाही राजकारणात मात्र निष्ठेला अजिबात किंमत उरलेली नाही. ज्योतिरादित्य हे राहूल गांधींच्या जवळचे मानले गेले होते. तरीही मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ ह्यंच्यासारख्या जुन्या खोडाची निवड करण्यात आली. दिग्विजयसिंहांनीदेखील कमलनाथांशी हातमिळवणी  करून ज्योतिरादित्यांची वाट अडवली होती. ज्योतिरादित्यांना काय लुडबूड करायची असेल ती त्यांनी दिल्लीच्या राजकारणात खुशाल करावी, राज्यातील राजकारणाच्या भानगडीत पडू नये असा मध्यप्रदेशातल्या दोघा नेत्यांचा कटाक्ष होता. ज्योतिरादित्यांचे वडिल माधवराव सिंदिया ह्यांच्यावर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्या दोघांचाही वरदहस्त होता. त्यांनी स्वतःही राज्याच्या राजकारणात वावरण्याचे टाळले होते.  
ज्योतिरादित्यांची राहूल गांधींशी जवळिक होती तरीही त्या जवळिकीचा फायदा ज्योतिरादित्यांना झाला नाही. तरी त्याचे साधे कारण काँग्रेसचे नेतृत्व राहूल गांधींना न पेलवल्यामुळे केंद्रात भाजपा आघाडी प्रचंड बहुमताने सत्तेवर आली. ह्या परिस्थितीत भाजपात प्रवेश केल्याखेरीज देशाच्या राजकारणात जनसेवा करण्याची संधी ज्योतिरादित्यांना मिळण्यासारखी नव्हतीच. जनसेवा करण्याची संधी मिळावी म्हणून तर ते भाजपात प्रवेश करते झाले आहेत! भारताला काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपाचे घोषित धोरण असल्यामुळे त्यांना प्रवेश देण्याच्या बाबतीत भाजपाला अडचण अशी काहीच नाही. मध्यप्रदेशातल्या सत्तेच्या राजकारणाचा विचार करता कमलनाथांचे सरकार टिकणार की कोसळणार ह्या प्रश्नाचे उत्तर खुद्द कमलनाथही देऊ शकणार नाही. अर्थात भाजपाला आणि ज्योतिरादित्यांना चोख उत्तर देण्याची तयारी कमलनाथांनी चालवली आहे. तयारीचा अर्थ आमदारांच्या वापसीसाठी थैल्या मोकळ्या सोडणे! अर्थात थैलीयुध्दात भाजपाही तितकाच माहीर असल्याने मध्यप्रदेशातल्या थैलीयुध्दात कोणाला जय मिळेल हे सांगता यणे कठीण आहे. थैलीयुध्दात मिळवलेल्या विजयामुळेच कर्नाटकात भाजपाला सत्ता मिळाली होती हे लक्षात घेता मध्यप्रदेशातही भाजपाला थैलीयुध्दात विजय मिळेल अशी अपेक्षा आहे.
मध्यप्रदेशात काँग्रेसला फार मोठे नसले तरी काठावर बहुमत नक्कीच आहे. शंभर दिवसांपूर्वी भाजपाला महाराष्टात बहुमत असूनही शिवसेनेला झुकवायला लावण्याच्या प्रयत्नात सत्तेच्या राजकारणात भाजपाला अपयश आले होते. भाजपाच्या विरोधात शिवसेनेला अगदी अनपेक्षितपणे शरद पवारांसारख्या राजकारणधुरंधर नेत्याची साथ मिळाली म्हणून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या त्रिवर्गाचे मिळून महाष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. मध्यप्रदेशातली राजकीय परिस्थिती मात्र वेगळी आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य आपणहून भाजपाकडे चालत आले आहेत. त्यामुळे कमलनाथांचे सरकार उलथवून टाकून तेथे शिवराजसिंह चौहानांचे सरकार स्थापन करणे शक्य होईल असे चित्र सध्या तरी निर्माण झाले. हे चित्र पुसून टाकण्याच कमलनाथांचा आटोकाट प्रयत्न सुरू असून त्यात त्यांना कितपत यश मिळते ते १२ मार्चनंतर स्पष्ट होईल. कर्नाटकात विधानसभा अध्यक्षांनी जी कायदेशीर भूमिका बजावली तशा प्रकारची कायदेशीर भूमिका मध्यप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष प्रजापतीदेखील निश्चितच बजावतील. त्यामुळे आपल्या सरकारला धोका नाही असा कमलनाथांचा दावा कितपत खरा ठरेल हे आजघडीला सांगता येणार नाही.
राजकीयदृष्ट्या मध्यप्रदेशासारखे एक महत्त्वाचे राज्य काँग्रेसच्या हातून निसटते की काय अशी परिस्थिती चालू घडीला तरी आहे. एक मात्र खरे की, राजकीय वर्चस्वासाठी भाजपा आणि काँग्रेस ह्या दोन्ही पक्षात सुरू असलेली रस्सीखेच तूर्तास तरी निकाली ठरणार नाही. कोरोना व्हायरस आणि डबघाईला आलेली देशाची आर्थिक परिस्थिती हे दोन्ही विषय कितीही गंभीर असले तरी राजकीय रस्सीखेचीपुढे दोन्ही समस्यांचे महत्त्व राजकारणांच्या लेखी ओसरल्यासारखेच आहेत!
रमेश झवर

Monday, March 9, 2020

बँकांची नासाडी!


गेल्या पाऊणशे वर्षांत देशात आणि महाराष्ट्रात बँकांचे पीक उदंड आले. बँकांच्या सबंध पिकाला लागलेली कीड इतकी भयंकर आहे की ती धोडक्या  काळात पिकाची नासडी होण्याच्या मार्गावर आहे. एक वेळ कोरोना व्हायरस आटोक्यात येईल  पण बँकांना लागलेली कीड आटोक्यात आणून त्या सुरळीत चालवणे मात्र खूपच अवघड होऊन बसले आहे. येस बँक आणि पंजाब अँड महाराष्ट्र बँक ह्या दोन बँकांतल्या गैरव्यवहाराचे मूळ दिवाण हौसिंग फायनान्स ह्या कंपनीत आहे. वरकरणी दिवाण हौसिंह फायनान्स आणि येस बँक ह्यांच्यातले रीतसर वाटाले अशआ चलाखीने ते करण्यात आले. परंतु सारे व्यवहारा रीतसर नाहीत. इतकेच नव्हे तर हे सारे व्यवहारा ठरवून केलेले अफरातफरींनी लडबडलेले आहेत. विशेष म्हणजे ह्या बँकांना वाचवण्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रयत्न रिझर्व्ह बँकेकडून सुरू आहेत. रिझर्व्ह बँकेच्या ह्या प्रयत्नांमुळे बुडू घातलेल्या बँकांना वाचवण्याच्या नादात धडधाकट बँकांचे अस्तित्व धोक्यात आले नाही म्हणजे मिळवली!
विजय मल्ल्यांनी त्यांच्या कंपनीला मंजूर झालेल्या कर्जातून मोठमोठाल्या रकम काढून अन्य कंपन्या सुरू केल्या. त्या कंपन्यांच्या नावावर अटलांटिक महासागरात बेटे खरेदी केली. येस बँकेची चित्तरकथा मल्ल्यांच्या चित्तरकथेपेक्षा वेगळी असली तर दोघांचा उद्देश येन केन प्रकारेण पैसा उभा करणे हाच आहे. येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर ह्यांनी मुलींच्या नावे कंपन्या स्थापन केल्या. दिवाण हौसिंग फायन्ससारख्या कंपन्यांकडून मुलींच्या कंपन्यांसाठी पैसा उभा केला. सुरक्षित कर्जव्यवहरासाठी लागणा-या स्थावर मालमत्तेच्या किंमती फुगवणे, त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे इत्यादि साटेलोट्यांचे व्यवहार येस बँक आणि दिवाण हौसिंग फायनान्स कंपनी ह्यंच्यात झाले. ह्या व्यवहाराचा प्रकार तुझे गूळ माझे खोबरेह्या प्रकारतला आहे.
राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा सहकारी बँका आणि निर्नियंत्रणाच्या काळानंतर स्थापन झालेल्या खासगी बँका अशी बँकांची ढोबळ विभागणी देशात झालेली आहे. ह्या तिन्ही विभागणीतील अनेक बँका ह्या नाही तर त्या संकटात सापडल्या. नुकतीच जाग आलेल्या रिझर्व्ह बँकेने त्यांना संकटातून वाचवण्याचा खटाटोप सुरू केला. त्यात रिझर्व्ह बँकेला कितपत यश मिळते ते पाहायचे. वास्तविक बँकांवर नियंत्रण ठेवणे ही रिझर्व्ह बँकेची जबाबादारी. बँकांना थकित आणि बुडित कर्जाचा विळखा घालेपर्यंत रिझर्व्ह बँक निद्राधीन होती. आयडीबीआय बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी आयुर्विमा मंडळाला सांगण्यात आले तर पंजाब अँड महाराष्ट्र बँकेत रिझर्वह बँकेच्या कर्मचारी पतपेढीचेच खाते असल्यामुळे त्या बँकेचे प्रकरण रिझर्व बँक स्वतःच हाताळत आहे. येस बँकेला वाचवण्यासाठी स्टेट बँकेला पुढे करण्यात आले आहे. येस बँकेला चांगले १० हजार करोड रुपयांचे भांडवल देण्यास स्टेट बँक तयार झाली. बुडित किंवा थकित कर्जे ह्या बँकांची समान व्यथा केवळ एरर ऑफ जजमेंट नाही. अरातफर हेही बँकांच्या संकटाच्या मुळाशी आहे. बँकिंग व्यवसायावर लक्ष ठेवणे रिझर्व बँकेकडून अपेक्षित आहे. दरमहा तपशीलवार स्टेटमेंट येत राहिले आणि ते फाईलीत ठेवले की नियंत्रणाचे काम संपले असा रिझर्व्ह बँकेचा काहीसा समज असावा. वास्तविक अगदी लाखदोन लाखांचे कर्ज मंजूर करण्याचा बँक मॅनेजर्स अधिकार वगळता बहुतेक कर्जमंजुरीत अस्टिटंट जनरल मॅनेजरपासून ते अध्यक्षांपर्यंत अधिकारीवर्गाचा बराच मोठा सहभाग असतो. त्यामुळे तंत्रशः विचार केला तर बुडित आणि थकित कर्जाला बँकांचे लहानमोठे अधिकारी जबाबदार आहेत. परंतु एकाही बड्या अधिका-यावर जबाबदारी निश्चित करून त्याला घरी पाठवण्यात आले नाही. अर्थात अपवाद असू शकतो. ह्या परिस्थितीत बँका वाचवण्याचे रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न सुरू केले हे म्हणणे निरर्थक ठरते आहे. बँकेवर प्रशासक नेमायचा आणि पैसे काढण्यावर कठोर बंधने जारी करायची एवढ्यापुरतेच नियंत्रण! आजारी बँकांना आयसी युनिटमध्ये दाखल करून घेण्यासारखे ते आहे! पेण अर्बन, सीकेपी, इत्यादि बँका अजूनही आयसी युनिट मध्ये आहेत! शंभर वर्षांच्या जुन्या सीकेपी बँकेतल्या ठेवी बहुसंख्या ७०-८० वयोगटातल्या नागरिकांच्या आहेत! थकित कर्ज वसूल सीकेपी बँकेचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही म्हणावे तितके यश बँकेला अजूनही आले नाही. संचालक मंडळाने मंत्रालयात खेटे घालून निधी मिळवण्याचा प्रयत्न केला असला तरी आश्वासनाखेरीज बँकेला राज्यशासनाकडून काही मिळाले नाही.
बँकांतील संशयास्पद कर्जव्यवहाराचे खापर काँग्रेसवर फोडण्याचा भाजपाचा धंदा मात्र बिनचूकपणे सुरू केला. अर्थात अर्थअडाणी भाजपाला ह्यापेक्षा वेगळे काय सुचणार? नाही म्हणायला बँकांच्या व्यवहारावर कर लावणे, डेबिट कार्ड क्रेडिट कार्डाच्या वापरावर शुल्क लादणे, व्याजदर कमी करायला लावणे असले उद्योग मात्र सरकारला सुचले! एकीकडे डिजिटल इंडियाचा धोशा लावायचा आणि दुसरीकडे त्यावर शुल्कवाढ आणि जीएसटी कराचा बडगा उगारायचा असा दुटप्पीपणा सध्या सुरू आहे. ह्या सा-यामुळे बँकांच्या भरघोस पिकाची नासाडी अटळ आहे.

रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Friday, March 6, 2020

राज्याचा महासंकल्प


उपमुख्यमंत्री असलेले वित्तमंत्री अजितदादा पवार ह्यांनी २०२०-२०२१ वर्षांचा ९५१०.७१ कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याच्या खालावलेल्या परिस्थितीच्या पार्शवभूमीवर त्यांनी सादर केलेला त्यांचा असा हा पहिलावहिला अर्थसंकल्प! त्यांचा अर्थसंकल्प पहिला असला तरी दमदारही आहे. शेतक-याना कर्जमुक्त करण्याच्या दृष्टीने उध्दव ठाकरे सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दमदार पाऊल टाकले आहे. मंत्री ह्या नात्याने अजितदादांनी पूर्वीच्या काळात अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. अर्थसंकल्पीय तरतुदी अपु-या असल्याची तक्रार प्रत्येक मंत्री करत असतो.  अजितदादांनीही त्या केल्या असतील. अर्थसंकल्पीय तरतुदींचा यथायोग्य वापर करून कोंड्याचा मांडा करण्याची करामत अजितदादांना खूप वेळा करावी लागली असेल! ह्यावेळी ते स्वतः प्रथमच तरतूदकर्ते झाले आहेत. अर्थसंकल्प सादर करताना केंद्राकडून येणे असलेली ८४५३ कोटी रुपयांची बाकी आणि जानेवारी २०२० पर्यंत ४ लाख ३३ हजार कोटी रुपयांचे कर्ज हे दोन महत्त्वपूर्ण आकडे त्यांच्या डोळ्यांसमोर नक्कीच नाचले असतील.
महाराष्ट्रासमोराल समस्या स्रवांना तोंडपाठ आहेत. बेकारी भरमसाठ वाढलेली. सहकारी बँका, विशेषतः अर्बन बँका अडचणीत. आरोग्य सेवा आणि त्याअनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालयांचृप्रवेश समस्या आणि मेडिकल विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिकाधिक किचकट होत चाललेले आहेत! सुदैवाने कृषी क्षेत्राने ब-यापैकी राज्याला हात दिला. मात्र, उद्योग क्षेत्राबरोबर सेवाक्षेत्राने राज्याला चांगलाच हात दाखवला. ह्या वाईट पार्श्वभूमीवर अव्वल दर्जा असलेले महाराष्ट्र राज्य मागे पडते की काय अशी भीती निश्चितपणे वाटू लागली होती. ह्या परिस्थितीतून मुख्यमंत्री आणि वित्तमंत्री ह्या दोघांनी वेळेवेळी चर्चा करून कौशल्यपूर्वक मार्ग काढला. अर्थसंकल्पातल्या आकडेवारीत त्याचे प्रतिबंब उमटले आहे.  
आरोग्यासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद ह्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ५ हजार कोटींपैकी २५०० कोटी रुपये असून डायलिसिस केंद्र आणि जिल्हा रूग्णालयांच्या रखडलेल्या बांधकामांसाठी आहेत. इस्पितळांतील उपचार पध्दती अद्यावत असायलाच हवी. पण त्यासाठी पूर्वी इमारती धड असल्या पाहिजेत. तिकडे सरकारने लक्ष दिले आहे. पायाभूत सुविधात वाढ हा मोठाच प्रश्न आहे. देशातल्या एकूण मालवाहतुकीपैकी ४० टक्के मालवाहतूक मुंबईत ( दोन बंदरांमुळे ) केंद्रित झालेली आहे. महाराष्ट्रातली ट्रकची संख्या उगाच वाढलेली नाही. केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी ह्यांनी राष्ट्रीय महामार्ग निर्मितीचा धडाका लावला. महाराष्ट्राला त्याचा खूप फायदा झाला. त्याबद्दल अजितदादांनी त्यांच्या भाषणात गडकरींचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. मूल्यवर्धक कराच्या खालोखाल वाहतूक खाते आघाडीवर आहे हे लक्षात घेऊन अर्थमंत्र्यांनी पायाभूत सेवांवर अर्थसंकल्पात योग्य तो भर दिला. अर्थात वाहतूक व्यवसायाचे पूर्ण समाधान होईल अशी स्थिती अजूनही नाही.
शेती हा आतापर्यंतच्या बहुतेक सरकारांचा विक पाँईंट. देशातल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यातही बहुसंख्य लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. थकबाकीदार शेतक-यांप्रमाणे थोडेफार कर्ज फेडणा-या शेतक-यांच्या खात्यातही दोन लाख रुपये जमा करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि अजितदादा पवार ह्यांनी घेतल्यामुळे       ब-यापैकी कर्जफेड करणा-या शेतक-यांच्या पोटात दुखायचे थांबेल अशी आशा करायला हरकत नाही. शेतक-यांना कर्जाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी सरकारने आतापर्यंत ९ हजार कोटी रुपये खर्च केले. ह्या कामासाठी अधिक पैसा लागण्याची शक्यता लक्षात घेऊन २०२०-२०२१ वर्षासाठी २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प फडणवीस सरकारने केला होता होता खरा. त्या संकल्पाला उद्धव ठाकरे ह्यांनी धक्का लावता नाही. करण्यासाठी शेतक-यांना निव्वळ आधार भाव देऊन चालणार नाही. बियाणे, कृषि सल्ला पीकनियोजन, पीकविमा, वीजपुरवठा इत्यादि शेतीशी संबंधित बारीकसारिक प्रश्नातही लक्ष घालणे आवश्यक होते. ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या लक्ष घालण्याचा दृष्टिकोण अर्थसंकल्पात निश्चितपणे दिसला.
ग्रामीण भागातल्या एसटीच्या बसमधून प्रवास करणे ही एक शिक्षा आहे. त्या बसेस बदलण्यासाठी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद करण्यात आली. पर्यावरण बदल, प्लॅस्टिक कचरा, वाहतुकीची साधने इत्यादि नागरी भागातील समस्यांचे स्वरूप दिवसेंदिवस उग्र होत चालले आहे. गाळाने आणि कच-याने भरलेल्या मंबईतल्या नद्या ही एक समस्या होऊन बसली आहे. त्या नद्या स्वच्छ आणि वाहत्या करून पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मुंबई-पुणे ह्या दोन महानगरातील वाहतुकीच्या समस्यात लक्ष घालून आंशिक का होईना तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्या प्रतिकात्मक असल्या तरी दिलासादायक आहेत.
ट्रिलियन-मिलयनच्या बाता मारण्याचा मोह सरकारने आवरला हे फार चांगले झाले. ह्याचा अर्थ राज्याच्या अर्थसंकल्पात वाढ झाली नाही असा नाही. महाराष्ट्राच्या यंदाच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षांच्या तुलनेने १०.२ टक्के वाढ झाली असून राज्याचा खर्च एकूण अर्थसंकल्प ३४५६९६६ कोटी रुपयांच्या घरात गेला तर जमा रक्कम ३४७४५६.८९ कोटींवर गेली आहे. ह्याचाच अर्थ एकूण तूट ९५१०.७१ कोटी रुपयांची आहे. अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार महसुली खर्च आणि उत्पन्न वाढतेच असे नाही. खर्च उत्पन्नापेक्षा थोडा अधिक होण्याचा संभव आहेच. अर्थसंकल्प हा विकासाभिमुख असला पाहिजे अशी अपेक्षा आहे. अजितदादांनी ती अपेक्षा पूर्ण केली आहे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

Wednesday, March 4, 2020

करोना आपत्ती

न्यूयॉर्कमध्ये इस्पितळांची जुनी गोष्ट अनेकांच्या स्मरणात असेल. न्यूयॉर्कमध्ये इस्पितळात मरण पावणा-यांच्या संख्येत अचानक वाढ झाली. झाले! वर्तमानपत्रांना आयताच विषय मिळाला. न्यूयॉर्कमधील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर इस्पितळांच्या गैरव्यवस्थापनाच्या बातम्या झळकू लागल्या. एका वर्तमानपत्राने तर सार्वजनिक इस्पितळात झालेल्या मरण पावणा-यांच्या संख्येत कशी वाढ झाली ह्याचा पाहणी अहवालच प्रसिध्द केला. अहवालाच्या बातमीमुळे न्यूयॉर्कवासियांत एकच खळबळ माजली. दुस-या दिवशी मार्क व्टेनने त्या वर्तमानपत्राला अतिशय गंभीर पत्र लिहून पाठवले. त्या पत्रात मार्क व्टेनने लिहतो, मी स्वतः एकूणच मृत्यू प्रकरणांची पाहणी केली. माझ्या पाहणीचा निष्कर्ष असा की ह्या काळात इस्पितळात मरण पावणा-यांच्या संख्येपेक्षा आपल्या घरी मरण पावणा-यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले! रोजच्या रोज करोना विषाणूच्या बातम्या वाचून हसावे की रडावे असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला असेल. मुंबई शेअर बाजारात गेल्या आठवड्यात फार मोठी पडझड झाली. करोना विषाणूचा जगभर प्रसार झाल्याने झाल्याने जागतिक व्यापार संकटात सापडला असून संकट गहिरे आहे. त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला. मुंबई शेअर बाजार कोसळण्याचे जे कारण शेअर दलालांकडून सागण्यात आले त्यानुसार  करोना हेच शेअर बाजार कोसळण्याचे कारण आहे. अर्थात करोनाच्या जोडीला जीडीपीचा आकडा घटल्याची स्वतंत्र बातम्याही वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या. करोना विषाणूचाच प्रताप असल्याचा हा पुरावा संबंधितांनी लगेच पुढे ठेवला. धन्य ते शेअर दलाल!
करोना विषाणूची लागण झाल्यामुळे जगात सुमारे ३००० माणसे मृत्यूमुखी पडली. भारतातही नवी दिल्ली, नोईडा आणि जयपूर ह्या शहरात करोननाचे ६ रूग्ण आढळून आले. इटाली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानहून येणा-या प्रवाशांना भारतात तूर्त प्रवेश नाकारायचा निर्णयही घेम्यात आला. एअर इंडियांच्या काही देशांच्या फे-या बंद केल्या जाण्याचीही शक्यता आहे. दोन शाळा बंद ठेवण्याचा हुकूम तर ह्यापूर्वीच सुटला आहे. करोना विषाणूमुळे उद्भवणारी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारने पुष्कळ उपाययोजना योजल्या आहेत. करोना विषाणूचा फैलाव होऊ नये ह्यासाठी सरकारने योग्य ती दक्षता घेतली पाहिजे ह्याबद्दल सरकारचे कौतुक केलेच पाहिजे.
प्रतिबंधत्मक उपाय योजना करण्याचा सरकारने कितीही प्रयत्न केला तरी व्यापारउद्योग जगाचा त्यावर सरकारवर फारसा विश्वास नाही. वस्तुतः उत्पादन आणि निर्यात ह्या दोन महत्त्वाच्या बाबींवर मात्र करोनाचा विषाणू फैलवाचा झालाच. गेल्या ४-५ तिमाहीपासून जीडीडीपीची घसरण सुरू झाली तेव्हा मालाला उठाव नाही म्हणून बँक कर्जाला उठाव नाही असा युक्तिवाद व्यापारी-उद्योग जगाकडून करण्यात आला होता. अर्थनिरक्षर सरकारनेही तो लगेच मान्य केला आणि कॉर्पोरेट क्षेत्राला कर सवलतीही जाहीर केल्या! आता आर्थिक दुःस्थितीचे नवे कारण करोना विषाणूचा फैलाव हेच असल्याचा लंगडा युक्तीवाद व्यापारीउद्योग जगाने सुरू केला आहे. मोदी सरकारविरूध्द व्यापारउद्योग जगाची खरी तक्रार तक्रार अव्वाच्या सव्वा जीएसटीचे दर ही आहे. परंतु सरकारला खरे खरे काय ते स्पष्टपणे सांगून टाकतील ते व्यापारी कसले? आणि उद्योगपती तरी कसले? अर्थात मोदी सरकारकडे स्पष्टोक्ती करून उपयोग नाही हे व्यापारीवर्गास जाणून असल्याने करोना विषाणूच्या फैलावाची भीती आता त्यांनी पुढे केली आहे!
एकशेचाळीस कोटी लोकसंख्येच्या देशात खूप लोक शाकाहारी आहेत. जेवणापूर्वी हातपाय स्व्च्छ धुणारा वर्गही भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. माणसे गरीब असली त्यांची दानत खणखणीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात टाळ्यांचा कडकडाट करणारा वर्गही हाच! सरकारच्या धोरणांमुळे नेमका हाच वर्ग महागाईच्या खाईत ढकलला गेला. अजूनही मलेरिया, डेग्यू, खोकला, टीबी आणि कॅन्सर ह्यासारख्या रोगांना हीच माणसे बळी पडतात. वर्तमानपत्रांत करोनाविषयक वृत्तपत्रात आणि न्यजचॅनेल्समध्ये रोज जे प्रसारित होते त्यात त्यातला सत्यांश आणि तथ्यांश किती हे ओळखण्याची सामान्य माणसाची कुवत नाही. चीन हे करोनाचे उगम स्थान आहे एवढेच त्यांना ठाऊक! ढोबळमानाने ते बरोबरही आहे. करोनाच्या भीतीचे उगमस्थान चीनपेक्षा मिडियाच्या बातम्यात अधिक आहे हे थोडा विचार केला तर लक्षात यायला वेळ लागणार नाही.
अमेरिकेने चीनी मालावर भरमसाठ कर लादायला सुरूवात केल्यानंतर दोन्ही देशात व्यापारयुध्द सुरू झाले. चीनऐवजी भारतासह अन्य आशियाई देशांकडून माल खरेदी करण्याच्या दृष्टीने अमेरिकेन पावले टाकताच चीनमध्ये करोना विषाणूचे भूत उभे राहिले. त्याची बातमी द्यायला पाश्चात्य मिडियाला सांगावे लागले नाही. पाश्चात्य मिडियाने लागलीच करोनाचा विषय उचलला. रोज करोनाच्या बातम्या देण्याचा मिडियाने सपाटा लावला. भारतीय मिडिया जात्याच मेंढीपड वृत्तीचा असल्याने भारतीय मिडियातही करोना विषाणूची जोरदार बातम्या सुरू झाल्या. कोरना विषाणूला भारताबाहेर रोखण्याचे काम हवाई आणि आरोग्य ह्या दोन खात्यांनी लगेच हातात घेतले. वास्तविक कॅन्सर, डेंग्यू, डायबिटीस, रक्तदाब, श्वसनसंस्थेचे विकार ह्यासारख्या कितीतरी खतरनाक आजारांचा भारतात उच्छाद सुरू आहे. भारत ही तर डायबिटीसची राजधानी झाल्यात जमा आहे. त्या खालोखाल सांधेदुखीच्या आजाराने दर ५ माणसांमागे एक स्त्रीपुरूष पीडित असल्याचे सहज नजर टाकली तरी लक्षात येईल. पण सरकारचे मात्र तिकडे लक्ष नाही. करोना आपत्तीवरच सरकारचे लक्ष केंद्रित झालेले दिसते.
रमेश झवर