आतापर्यंत चीनमधून आलेल्या Covid-19 विषाणूच्या नावाचा उच्चार मी
चुकीचा करत होतो. चुकीचा लिहीत होतो. आतापासून कोरोना विषाणू असा बरोबर (हाही
उच्चार बरोबर आहे की नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.) उच्चार करत आहे. लिहतानाही
मी कोरोना असेच लिहीत आहे. लिहीत राहीन. कोरोनाची साथ आली असली तरी त्या साथीचा
अवस्था प्राथमिक आहे. ह्या अवस्थेचा अर्थ असा की परदेशातून आलेल्या भारतीय किंवा
विदेशी प्रवाशांच्या संपर्कामुळे कोरोना विषाणूची बाधा झालेल्याची भारतातली संख्या
इटाली आणि चीन ह्या देशातल्या संख्येच्या तुलनेने खूपच कमी आहे. महाराष्ट्रात ती
शंभरच्या घरात गेली आहे. अर्थात ह्या संख्येबद्दल मतभिन्नता आहे.
कोरोनाबद्दल लोकसमजुती विलक्षण
आहेत. लसूण खाल्ल्याने किंवा गोमुत्रप्राशनाने कोरोना तुमच्या वटेला जाणार नाही.
हा एक गोड गैरसमज आहे. तसेच कोरोना विषाणूच्या बाधेने माणूस मरतोच असेही नाही. करोनाचा
फैलाव सध्या तरी संसर्गाने झाल्याचे दिसून आहे. कोरोना विषाणूपासून वाचायचे असेल
तर वैयक्तिक स्वच्छतेवर मात्र भर देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी जाण्याचे टाळले
पाहिजे. मुख्य म्हणजे ज्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असेल त्यांनी डॉक्टरी
उपायावरच भर दिला पाहिजे. त्यांनी क्वारंटाईन वार्डमध्ये दाखला करण्यास सुचवले
असेल तर त्याबरहुकूम वार्डमध्ये दाखल झाले पाहिजे. विनाकारण डॉक्टरशी हुज्जत घालून
नये. कोरोनाबद्दलची निव्वळ माहिती वाचून कोणी तज्ज्ञ होऊ शकत नाही. डॉक्टरांचे निदान
मह्त्वाचे असते. कारण ते अनुभवावर आधारित असते. रोगाच्या विविध अवस्थांचे त्यांचे
ज्ञान अद्यावत असते.
अमेरिकेत तर अध्यक्ष ट्रंप हे स्वतः
कोरोना विषाणूची चाचणी करून घेण्यास तयार झाले आहेत. कोरोना विषाणूची बाधा झालेल्यांना
मदत करण्यासाठी ५० अब्ज डॉलर्सचा निधी काँग्रेसने मंजूर केला आहे. विद्यार्थ्यांनी
घेतलेल्या कर्जावरील व्याज न घेण्याचे बँकांनी ठरवले आहे. तसेच देशात उर्जेचा साठा
करण्यचे धोरण आखले असून पेट्रोलियमचा साठा जास्तीत जास्त बाळगण्यास सुरूवात केली
आहे. आपल्याकडे मात्र पेट्रोलियमवर करवाढ करण्यात आली. मोबाईलवरचा कर १८ टक्के
करण्यात आला! अमेरिकेत छोटे व्यापारी आणि उद्योजक ह्यांच्याकडून कर वसूल करू
नये अशी मागणी डेमॉक्रॅट पक्षाने केली आहे.
कोरोना विषआणूग्रस्तांची चाचणी
करण्याच्या सोयी अपु-या आहेत अशा बातम्या न्यूयॉर्क टाईम्सने दिल्या आहेत.
अमेरिकेतल्या सध्याच्या यंज्ञत्रणेमार्फत फक्त ५००० कोरोना विषाणू रूग्णांची
चांचणी पार पडली. अमेरिकेतल्यापेक्षा दक्षिण कोरियात चाचणी केंद्रांची संख्या अधिक
आहेत असे तेथील वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. सध्या अमेरिकेत असलेले टेस्ट कीट्स
अपुरे आहेत असेही वृत्तपत्रांचे म्हणणे आहे. आपल्याकडे टेस्ट आणि त्यानंतर रूग्णांची
क्वारंटाईन वार्डमध्ये रवानगी मात्र वेगाने सुरू आहे. अर्थात मास्क आणि स्वच्छता
रूमालांची विक्री अत्यावश्यक जिनसाखाली आणण्याचा हुकूम सरकारने जारी केला असला तरी
दोन्ही वस्तुंचा काळा बाजार सुरू झाल्याच्या बातम्या आहेत.
त्यातल्या त्यात समाधानाची बाब
म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार प्राथमिक अवस्थेत असून अधिक प्रसार होण्यापासून
रोखण्यात संबंधित यंत्रणेला यश मिळाले आहे. अमेरिका आणि भारत ह्या दोन्ही देशात
सध्या कोरोनाइतकीच व्यापारउद्योगांबद्दल काळजी वाढली आहे. दोन्ही देशात भांडवल
बाजार कोसळला. युरोपमध्ये जाण्यायेण्याच्या प्रवासास ट्रंप सरकारने बंदी
घातल्यामुळे वॉलस्ट्रीट कोसळले असे तेथील मार्केट तज्ज्ञांना वाटते. अमेरिकेतला
बाजार कोसळ्याने मुंबई शेअर बाजार कोसळला. भांडवल बाजाराचे कोसळणे ह्याचा अर्थ
देशाची अर्थव्यवस्था कोसळणे. एक काळ असा होता की मुंबई शेअर बाजाराच्या चढउतारचा
देशाच्या अर्थकारणावर परिणाम होण्याचे कारण नाही असे अर्थमंत्र्यांचे मत होते. शेअर
बाजाराच्या उलाढालुद्दल अर्थमंत्र्यांचे स्वतःचे असे काही वेगळे मतच नाही.
कोरोना पुराणाच्या आजचा अध्याय
एवढाच आहे! महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली. कोरोनाग्रस्तांवर आवश्य उपचार करण्याच्या दृष्टीने मुंबईतले
कस्तुरबा इस्पितळ अतिशय योग्य. पण त्यापूर्वी कस्तुरबा इस्पितळाच स्च्छ करण्याची निश्चित
गरज आहे. जिल्ह्यांच्या ठिकाणी असलेली इस्पितळे स्वच्छ केली पाहिजे. प्रसंगी खासगी
इस्पितळांचीही मदत घेतली पाहिजे. सुदैवाने कोरोनाचा प्रसार वाढण्यापूर्वीच
महाविकास आघाडी सरकारने मॉल. चित्रपटगृहे. क्लब, तरणतलाव इत्यादी गर्दीची ठिकाणे
बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अमलबजावणी सुरू झाली.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment