Wednesday, March 25, 2020

संचारबंद जनजीवन


एका हातात लाठी तर आणि दुसरा हात अभयदानासाठी वर!  
कालपासून जारी करण्यात आलेल्या संचारबंदीनंतरचे हे चित्र देशभरात दिसत आहे. ढुंगणावर फटके मारल्याशिवाय टग्यांना पिटाळून लावता येणार नाही अशी पोलिसांची ठाम समजूत असेल तर ती त्यात त्यांची काही चूक नाही. आतापर्यंत जारी करण्यात आलेली संचारबंदी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची खराब झालेली परिस्थिती हाताळण्यासाठीच होती. त्यामुळे वेगळा अनुभव पोलिसांच्या गाठीशी असण्याचा प्रश्नच नाही. ह्या वेळची संचारबंदी वेगळी आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून एकमेकांपासून अंतर ठेवून व्यवहार करणे जनतेला सुकर व्हावे ह्यासाठी ह्यावेळची संचारबंदी आहे. अन्नधान्य, किराणा माल, दूध, भाजीपाला, मटण, मासळी इत्यादि जीवनावश्यक मालाचा अविरत पुरवठा करण्यास मज्ज्वाव करण्यासारखे वर्तन पोलिसांकडून अपेक्षित नाही. ह्या संदर्भात मालमाहतूक संघाचे प्रवक्ते दयानंद नाटकर ह्यंच्या माझाल्याशी फनवर बोलणे झाले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत सर्वस्वी नवाच मुद्दा उपस्थित झाला.
वाहतूकदार जीवनावश्यक मालाची वाहतूक करण्यास तयार आहेत, असे सांगून नाटकर म्हणाले, आमचे ट्रक अभे आहेत. मावाची नेआण करण्यासही आम्ही तयार आहोत. पण कोरोनाच्या प्रसारमाध्यातून झालेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या प्रचारामुळे आमचे ड्रायव्हर गावी निघून गेले. त्यांची काम करायला ना नाही. पण एका गावातून दुस-या गावाला माल नेताना महामार्गावर ड्रायव्हरना महामार्गावर जेवण मिळत नाही. साधा चहासुध्दा मिळत ननाही. संचारबंदी हुकूमामुळे महामार्गावरचे सर्व ढाबे बंद करण्यात आले आहेत. अनेकांनी ते आपणहून बंद केले! ड्रायव्हर्सना कोरोनाची भीती नाही असे नाही मिळाला तर त्यांना रोजार हवाच आहे. काही निर्धारित पेट्रोल पंपावर त्यांच्यासाठी जेवण-विश्रांतीची सोय करण्याची पेट्रेल पंपचालकास सक्ती करणे संबंधित विभागाच्या पोलिस अधिका-यांना शक्य आहे. अशा सोयी करून दिल्यास राज्यातीलच काय, पण आंतरराज्य ट्रक वाहतूकही सुरू होऊ शकेल! जीवनावश्यक मालाबरोबर निर्यात माल न्हावाशेवा बंदरात पोहचवण्यासही वाहतूकदार तयार होतील. आयात-निर्यात माल ही रेसीप्रोकल तत्त्वावर चालतो. आपण आज निर्यात बंद केली तर त्या देशाकडून होणारीही आयातही बंद पडण्याचा धोका आहे. संचारबंदीमुळे व्यावहारिक प्रश्न सुटू शकत नाही.उलट ते जिकीरीचे झाले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन ह्यांनी माझ्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमका हाच मुद्दा मांडला होता. संचारबंदी अव्यवहार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते, त्यांचे हे मत केवळ मोदी सरकारवर टीका करायची म्हणून नाही. वाहतूकदार दयानंद नाटकर ह्यांनी निदर्शनास आणलेली नेमकी अडचण महाजनांचे मत किती अचूक आहे हेच दर्शवते. श्री. महाजन हे काही काळ महाराष्ट्र इकॉनॉमिक कॉऊन्सिलचे अध्यक्ष होते. प्रवक्ते म्हणून का होईना महाजनांसारख्या अनुभवी माणसांचा वावर राज्याच्या राजकारणात आहे हे सुदैव!
कोरोना विषाणू भारतापर्यंत पोहचण्याची शक्यता राहूल गांधी ह्यांनी व्यक्त केली होता. तसे त्यांनी व्टिटही केले होते. पण राहूल गांधी ह्यांची पप्पू अशी खिल्ली संघपरिवारातल्या लोकांनी उडवण्यास सुरूवात झाल्याने त्यांच्या सुचनेकडे पंतप्रधानांनी चक्क दुर्लक्ष केले. व्देषाचा विषाणू कोरोना विषाणूपेक्षा किती भयंकर असतो हेच ह्या व्टिट प्रकरणाच्या निमित्ताने दिसून आले. राजकीय विरोधकांना सन्माने वागवायचे ही आपल्या देशाची परंपरा. कोरोना विषाणूच्या सावल्या अधिक काळसर होण्याची शक्यता लक्षात घेता सर्वपक्षीय राजकारणाच्या परंपरेला उजाळा दिला पाहिजे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: