करोनाचा धोका ओळखून मिळतील त्या इमारतीत रातोरात
इस्पितळे सुरू करण्याचे सोडून परदेशातून भारतात येऊ इच्छिणा-या अनेकांचे व्हिसा रद्द करण्यात आले
तर अमेरिकेत युरोपच्या प्रवासावर आणि युरोपीय प्रवासावर निर्बंध आणण्यात आले. भारतात
अनेक विमान कंपन्यांच्या विमानसेवा थांबवण्यात आल्या तर अमेरिकेत अनेक शहरात रेड
अलर्ट घोषित करण्यत आला. भारतात आलेल्या प्रवाशांचे ‘क्वारंटीईन’ करत बसण्यापेक्षा विमान उड्डाणास आणि
उतरण्यास बंदी घातली की काम सोपे झाले असा विचार करून मोदी सरकारने तातडीने बंदी
केली. चीनमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये करोना विषाणूचा प्रादूर्भाव होताच चारपाच
खास इस्पितळे उभारून चीन मोकळा झाला! आपल्याकडे मात्र लोकांना मन की बात आणि
गोमुत्रोपचार पध्दती आणि हातपाय स्वच्छ धुण्याविषयी पोपटपंची ऐकावीच लागणार. असो. मुख्य मुद्दा असा की करोना विषाणू फक्त मुंबई
शेअर बाजाराला धडक देऊनच थांबतो की आपली अर्थव्यवस्था खिळखिळी करून देशाला बेरोजगारी
आणि मंदीच्या खाईत ढकलून मगच पोबारा करतो हे कोण सांगणार? अन्य
देशांच्या तुलनेने भारतात करोना विषाणूचा फैलाव कमी आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची
बाब! अर्थात केरळमध्ये एक बळी करोनाने घेतलाच.
महाराष्ट्रातही पाऊल टाकले आहे.
गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करण्याचे
भले आश्वासन दिले असेल, पण
अजूनही फारच कमी युनिट कार्यान्वित झाले आहेत.
तरीही भारत ही आजघडीला परदेशी मालाची मोढी उतारपेठ आहेच. एकीकडे दिवंगत अर्थमंत्री
अरूण जेटलींनी जीएसटीच्या माध्यामातून औद्योगिक मालावर जबर करभार लादण्याचा धडाका लावला
तर दुसरीकडे रिझर्व्ह बँकेला व्याजदरात कपात करायला लावली!
स्पेक्ट्रमचे दर अव्वाच्यासव्वा वाढवून टेलिकॉम कंपन्यांचे पेकाट मोडून टाकले.
बँकांचे व्याजदर कमी करण्यात येऊनही कर्जाला उठाव नाही, मालाला उठाव नाही अशी
स्थिती निर्माण झाली. त्याचा व्हायचा तो परिणाम दिसलाच. जीडीपीची घसरण सुरू झाली. तो
आता ३-४ टक्कंयावर आला तरी खूप झाले! शेतक-यांचे उत्पन्न
दुप्पट करतो असे केंद्र सरकारने वारंवार सांगितले. प्रत्यक्षात काय झाले ते फक्त शेतक-यांनाच माहित आहे. राजाने आणि पावसाने
झोडपले तर गरीब शेतकरी तक्रार कुणाकडे करणार? दरम्यान अमेझॉनसारख्या ऑनलाईन विक्री करणा-या
कंपन्यांची आणि लहान व्यापा-यांना झोपवणारी मॉल संस्कृती मात्र उदयास आली. बरे,
मॉलवाले त्यांना मालाचा पुरवठा करणा-या व्यापा-यांच्या हातावर लगेच पैसे ठेवतील का? नाही. त्यांना दीड महिन्यांची बोली करून प्रत्यक्षात ३ महिन्यांनी पैसे
चुकते केले जातात ही वस्तुस्थिती. ग्राहकांकडून डेबिट कार्ड किंवा क्रेडिट
कार्डाद्वारे लगेच पैसे घेतले जातात! देशाच्या डिजिटल प्रगतीचे
हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. कामगार, छोटे दुकानदार, कसेबसे तग धरून उभे आहेत!
करोनामुळे देशाची दुःस्थिती आणखी वाढण्याचा
संभव अधिक! देशाच्या स्थितीचे सत्ताधा-यांचे तसेच विरोधकांचे आकलन आणि सामान्य माणसाचे
आकलन ह्यात जमीनअस्मानचा फरक आहे! जनतेबद्दल कोणालाच
करूणा वाटत नाही. देशातल्या राजकारण्यांत चर्चा सुरू आहे ती नागरिकत्व दुरूस्ती
कायद्याची, लोकसंख्या रजिस्टरची, राममंदिर कसे बांधले जाईल ह्याची! करोना विषाणूपासून लोकांचा जीव वाचवण्याच्या बाबतीत सरकार यशस्वी होईलही,
मात्र देशातील जनतेला त्रस्त करून सोडण्याच्या बाबतीत करोना विषाणूला अजिबात करूणा
वाटण्याचा सुतराम संभव नाही. कारण, सृष्टीतला तो सूक्ष्म चीव असला तरी करूणाहीन
आहे! उन्हाळा सुरू झाला की कदाचित तो निघूनही जाईल. जाताना
स्मृती ठेवून जाईल!
रमेश झवर
ज्येश्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment