Wednesday, March 4, 2020

करोना आपत्ती

न्यूयॉर्कमध्ये इस्पितळांची जुनी गोष्ट अनेकांच्या स्मरणात असेल. न्यूयॉर्कमध्ये इस्पितळात मरण पावणा-यांच्या संख्येत अचानक वाढ झाली. झाले! वर्तमानपत्रांना आयताच विषय मिळाला. न्यूयॉर्कमधील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर इस्पितळांच्या गैरव्यवस्थापनाच्या बातम्या झळकू लागल्या. एका वर्तमानपत्राने तर सार्वजनिक इस्पितळात झालेल्या मरण पावणा-यांच्या संख्येत कशी वाढ झाली ह्याचा पाहणी अहवालच प्रसिध्द केला. अहवालाच्या बातमीमुळे न्यूयॉर्कवासियांत एकच खळबळ माजली. दुस-या दिवशी मार्क व्टेनने त्या वर्तमानपत्राला अतिशय गंभीर पत्र लिहून पाठवले. त्या पत्रात मार्क व्टेनने लिहतो, मी स्वतः एकूणच मृत्यू प्रकरणांची पाहणी केली. माझ्या पाहणीचा निष्कर्ष असा की ह्या काळात इस्पितळात मरण पावणा-यांच्या संख्येपेक्षा आपल्या घरी मरण पावणा-यांची संख्या अधिक असल्याचे आढळून आले! रोजच्या रोज करोना विषाणूच्या बातम्या वाचून हसावे की रडावे असा प्रश्न सुजाण नागरिकांना पडला असेल. मुंबई शेअर बाजारात गेल्या आठवड्यात फार मोठी पडझड झाली. करोना विषाणूचा जगभर प्रसार झाल्याने झाल्याने जागतिक व्यापार संकटात सापडला असून संकट गहिरे आहे. त्याचा परिणाम मुंबई शेअर बाजारावर झाला. मुंबई शेअर बाजार कोसळण्याचे जे कारण शेअर दलालांकडून सागण्यात आले त्यानुसार  करोना हेच शेअर बाजार कोसळण्याचे कारण आहे. अर्थात करोनाच्या जोडीला जीडीपीचा आकडा घटल्याची स्वतंत्र बातम्याही वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या. करोना विषाणूचाच प्रताप असल्याचा हा पुरावा संबंधितांनी लगेच पुढे ठेवला. धन्य ते शेअर दलाल!
करोना विषाणूची लागण झाल्यामुळे जगात सुमारे ३००० माणसे मृत्यूमुखी पडली. भारतातही नवी दिल्ली, नोईडा आणि जयपूर ह्या शहरात करोननाचे ६ रूग्ण आढळून आले. इटाली, इराण, दक्षिण कोरिया आणि जपानहून येणा-या प्रवाशांना भारतात तूर्त प्रवेश नाकारायचा निर्णयही घेम्यात आला. एअर इंडियांच्या काही देशांच्या फे-या बंद केल्या जाण्याचीही शक्यता आहे. दोन शाळा बंद ठेवण्याचा हुकूम तर ह्यापूर्वीच सुटला आहे. करोना विषाणूमुळे उद्भवणारी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सरकारने पुष्कळ उपाययोजना योजल्या आहेत. करोना विषाणूचा फैलाव होऊ नये ह्यासाठी सरकारने योग्य ती दक्षता घेतली पाहिजे ह्याबद्दल सरकारचे कौतुक केलेच पाहिजे.
प्रतिबंधत्मक उपाय योजना करण्याचा सरकारने कितीही प्रयत्न केला तरी व्यापारउद्योग जगाचा त्यावर सरकारवर फारसा विश्वास नाही. वस्तुतः उत्पादन आणि निर्यात ह्या दोन महत्त्वाच्या बाबींवर मात्र करोनाचा विषाणू फैलवाचा झालाच. गेल्या ४-५ तिमाहीपासून जीडीडीपीची घसरण सुरू झाली तेव्हा मालाला उठाव नाही म्हणून बँक कर्जाला उठाव नाही असा युक्तिवाद व्यापारी-उद्योग जगाकडून करण्यात आला होता. अर्थनिरक्षर सरकारनेही तो लगेच मान्य केला आणि कॉर्पोरेट क्षेत्राला कर सवलतीही जाहीर केल्या! आता आर्थिक दुःस्थितीचे नवे कारण करोना विषाणूचा फैलाव हेच असल्याचा लंगडा युक्तीवाद व्यापारीउद्योग जगाने सुरू केला आहे. मोदी सरकारविरूध्द व्यापारउद्योग जगाची खरी तक्रार तक्रार अव्वाच्या सव्वा जीएसटीचे दर ही आहे. परंतु सरकारला खरे खरे काय ते स्पष्टपणे सांगून टाकतील ते व्यापारी कसले? आणि उद्योगपती तरी कसले? अर्थात मोदी सरकारकडे स्पष्टोक्ती करून उपयोग नाही हे व्यापारीवर्गास जाणून असल्याने करोना विषाणूच्या फैलावाची भीती आता त्यांनी पुढे केली आहे!
एकशेचाळीस कोटी लोकसंख्येच्या देशात खूप लोक शाकाहारी आहेत. जेवणापूर्वी हातपाय स्व्च्छ धुणारा वर्गही भारतात मोठ्या प्रमाणावर आहे. माणसे गरीब असली त्यांची दानत खणखणीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात टाळ्यांचा कडकडाट करणारा वर्गही हाच! सरकारच्या धोरणांमुळे नेमका हाच वर्ग महागाईच्या खाईत ढकलला गेला. अजूनही मलेरिया, डेग्यू, खोकला, टीबी आणि कॅन्सर ह्यासारख्या रोगांना हीच माणसे बळी पडतात. वर्तमानपत्रांत करोनाविषयक वृत्तपत्रात आणि न्यजचॅनेल्समध्ये रोज जे प्रसारित होते त्यात त्यातला सत्यांश आणि तथ्यांश किती हे ओळखण्याची सामान्य माणसाची कुवत नाही. चीन हे करोनाचे उगम स्थान आहे एवढेच त्यांना ठाऊक! ढोबळमानाने ते बरोबरही आहे. करोनाच्या भीतीचे उगमस्थान चीनपेक्षा मिडियाच्या बातम्यात अधिक आहे हे थोडा विचार केला तर लक्षात यायला वेळ लागणार नाही.
अमेरिकेने चीनी मालावर भरमसाठ कर लादायला सुरूवात केल्यानंतर दोन्ही देशात व्यापारयुध्द सुरू झाले. चीनऐवजी भारतासह अन्य आशियाई देशांकडून माल खरेदी करण्याच्या दृष्टीने अमेरिकेन पावले टाकताच चीनमध्ये करोना विषाणूचे भूत उभे राहिले. त्याची बातमी द्यायला पाश्चात्य मिडियाला सांगावे लागले नाही. पाश्चात्य मिडियाने लागलीच करोनाचा विषय उचलला. रोज करोनाच्या बातम्या देण्याचा मिडियाने सपाटा लावला. भारतीय मिडिया जात्याच मेंढीपड वृत्तीचा असल्याने भारतीय मिडियातही करोना विषाणूची जोरदार बातम्या सुरू झाल्या. कोरना विषाणूला भारताबाहेर रोखण्याचे काम हवाई आणि आरोग्य ह्या दोन खात्यांनी लगेच हातात घेतले. वास्तविक कॅन्सर, डेंग्यू, डायबिटीस, रक्तदाब, श्वसनसंस्थेचे विकार ह्यासारख्या कितीतरी खतरनाक आजारांचा भारतात उच्छाद सुरू आहे. भारत ही तर डायबिटीसची राजधानी झाल्यात जमा आहे. त्या खालोखाल सांधेदुखीच्या आजाराने दर ५ माणसांमागे एक स्त्रीपुरूष पीडित असल्याचे सहज नजर टाकली तरी लक्षात येईल. पण सरकारचे मात्र तिकडे लक्ष नाही. करोना आपत्तीवरच सरकारचे लक्ष केंद्रित झालेले दिसते.
रमेश झवर  

No comments: