संस्थानिकांच्या राजकारणात निष्ठा वगैरेला किंमत असते. अलीकडच्या लोकशाही
राजकारणात मात्र निष्ठेला अजिबात किंमत उरलेली नाही. ज्योतिरादित्य हे राहूल
गांधींच्या जवळचे मानले गेले होते. तरीही मध्यप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी कमलनाथ ह्यंच्यासारख्या
जुन्या खोडाची निवड करण्यात आली. दिग्विजयसिंहांनीदेखील कमलनाथांशी हातमिळवणी करून ज्योतिरादित्यांची वाट अडवली होती.
ज्योतिरादित्यांना काय लुडबूड करायची असेल ती त्यांनी दिल्लीच्या राजकारणात खुशाल
करावी, राज्यातील राजकारणाच्या भानगडीत पडू नये असा मध्यप्रदेशातल्या दोघा
नेत्यांचा कटाक्ष होता. ज्योतिरादित्यांचे वडिल माधवराव सिंदिया ह्यांच्यावर
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी ह्या दोघांचाही वरदहस्त होता. त्यांनी स्वतःही राज्याच्या
राजकारणात वावरण्याचे टाळले होते.
ज्योतिरादित्यांची राहूल गांधींशी जवळिक होती तरीही त्या जवळिकीचा फायदा
ज्योतिरादित्यांना झाला नाही. तरी त्याचे साधे कारण काँग्रेसचे नेतृत्व राहूल
गांधींना न पेलवल्यामुळे केंद्रात भाजपा आघाडी प्रचंड बहुमताने सत्तेवर आली. ह्या
परिस्थितीत भाजपात प्रवेश केल्याखेरीज देशाच्या राजकारणात ‘जनसेवा करण्याची’ संधी
ज्योतिरादित्यांना मिळण्यासारखी नव्हतीच. ‘जनसेवा करण्याची’ संधी मिळावी म्हणून तर ते भाजपात प्रवेश करते
झाले आहेत! भारताला
काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपाचे घोषित धोरण असल्यामुळे त्यांना प्रवेश देण्याच्या
बाबतीत भाजपाला अडचण अशी काहीच नाही. मध्यप्रदेशातल्या सत्तेच्या राजकारणाचा विचार
करता कमलनाथांचे सरकार टिकणार की कोसळणार ह्या प्रश्नाचे उत्तर खुद्द कमलनाथही देऊ
शकणार नाही. अर्थात भाजपाला आणि ज्योतिरादित्यांना चोख उत्तर देण्याची तयारी
कमलनाथांनी चालवली आहे. ‘तयारी’चा अर्थ आमदारांच्या वापसीसाठी थैल्या मोकळ्या
सोडणे! अर्थात ‘थैलीयुध्दा’त भाजपाही तितकाच
माहीर असल्याने मध्यप्रदेशातल्या थैलीयुध्दात कोणाला जय मिळेल हे सांगता यणे कठीण
आहे. थैलीयुध्दात मिळवलेल्या विजयामुळेच कर्नाटकात भाजपाला सत्ता मिळाली होती हे लक्षात
घेता मध्यप्रदेशातही भाजपाला थैलीयुध्दात विजय मिळेल अशी अपेक्षा आहे.
मध्यप्रदेशात काँग्रेसला फार मोठे नसले तरी काठावर बहुमत नक्कीच आहे. शंभर
दिवसांपूर्वी भाजपाला महाराष्टात बहुमत असूनही शिवसेनेला झुकवायला लावण्याच्या
प्रयत्नात सत्तेच्या राजकारणात भाजपाला अपयश आले होते. भाजपाच्या विरोधात शिवसेनेला
अगदी अनपेक्षितपणे शरद पवारांसारख्या राजकारणधुरंधर नेत्याची साथ मिळाली म्हणून शिवसेना, काँग्रेस
आणि राष्ट्रवादी ह्या त्रिवर्गाचे मिळून महाष्ट्र विकास आघाडीचे सरकार सत्तेवर
आले. मध्यप्रदेशातली राजकीय परिस्थिती मात्र वेगळी आहे. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य
आपणहून भाजपाकडे चालत आले आहेत. त्यामुळे कमलनाथांचे सरकार उलथवून टाकून तेथे
शिवराजसिंह चौहानांचे सरकार स्थापन करणे शक्य होईल असे चित्र सध्या तरी निर्माण झाले.
हे चित्र पुसून टाकण्याच कमलनाथांचा आटोकाट प्रयत्न सुरू असून त्यात त्यांना कितपत
यश मिळते ते १२ मार्चनंतर स्पष्ट होईल. कर्नाटकात विधानसभा अध्यक्षांनी जी
कायदेशीर भूमिका बजावली तशा प्रकारची कायदेशीर भूमिका मध्यप्रदेश विधानसभेचे
अध्यक्ष प्रजापतीदेखील निश्चितच बजावतील. त्यामुळे आपल्या सरकारला धोका नाही असा
कमलनाथांचा दावा कितपत खरा ठरेल हे आजघडीला सांगता येणार नाही.
राजकीयदृष्ट्या मध्यप्रदेशासारखे एक महत्त्वाचे राज्य काँग्रेसच्या हातून
निसटते की काय अशी परिस्थिती चालू घडीला तरी आहे. एक मात्र खरे की, राजकीय
वर्चस्वासाठी भाजपा आणि काँग्रेस ह्या दोन्ही पक्षात सुरू असलेली रस्सीखेच तूर्तास
तरी निकाली ठरणार नाही. कोरोना व्हायरस आणि डबघाईला आलेली देशाची आर्थिक परिस्थिती
हे दोन्ही विषय कितीही गंभीर असले तरी राजकीय रस्सीखेचीपुढे दोन्ही समस्यांचे महत्त्व
राजकारणांच्या लेखी ओसरल्यासारखेच आहेत!
रमेश झवर
No comments:
Post a Comment