Saturday, March 21, 2020

कोरोना लढाईतले वज्रास्त्र

कोरोना विषाणूची लागण झालेल्या संशयित रूग्णावर तूर्त तरी गोळ्या-इंजेक्शनसारखा हमखास गुण येणारा उपचार नाही. सध्या जे उपचार सुरू आहेत त्यांचे स्वरूप दमा, न्यूमोनिया, घशाचे इन्फेक्शन वगैरेवर केल्या जाणा-या उपचारांसारखे आहेत. जवळपास ती औषधे दिली जातात. पेशंट गंभीर झाला तर त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्याचा आणि मृत्यूच्या प्रांतात त्याचा प्रवेश होणार नाही ह्यादृष्टीने त्याचा प्राण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. संभाव्य कोरोना विषाणूबाधित व्यक्तीला १४ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा उपाय केला जातो. त्याच्यापासून इतरांना प्रादूर्भाव होऊ नये हा महत्त्वाचा उद्देश असतो. लक्षणे कमी झाली की एकमेकांशी अंतर राखून सावधगिरीपूर्वक व्यवहार करण्याच्या सूचना देऊन त्याला क्वारंटाईनमुक्त केले जाते. पण ही झाली प्रतिबंधात्मक उपाययोजना!  सध्या कोरोना विषाणूची साथ जगभर फैलावत चालली आहे. दरम्यान कोरोना विषाणूच्या हल्ल्यातून पेशंटला लौकरात लौकर म्हणजे ५-६ दिवसात आराम मिळवून देणारी औषधे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्या औषधांच्या झपाट्याने उत्पादन सुरू झाल्याखेरीज कोरोना विषाणूची साथ आटोक्यात येणार नाही असे सध्याचे चित्र आहे. म्हणूनच औषधोत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेले जगभरातले अनेक संशोधक कामाला लागले आहेत. संशोधनात कृत्रिम बुध्दीमत्ता साठवलेल्या आयबीएमनिर्मित महासंगणकाची मदत घेतली जात आहे. संशोधकांना आतापर्यंत तुलनेने ब-यापैकी यश आले आहे. औषधांच्या चाचण्यादेखील सुरू झाल्या आहेत. शुअरशॉट औषधांचे उत्पादन सुरू करण्याचे पेटंट प्राप्त करून घेण्याची संधी आपल्यालाच मिळावी ह्यासाठी अनेक नामवंत औषध कंपन्यांची त्या संशोधनावर नजर आहे.
सध्या अँटीव्हायरल आणि अंटीइन्फ्लेटरी औषधांवर डॉक्टर मंडळींची भिस्त हे. त्यातली बरीचशी औषधे फ्लयू, मलेरिया, न्यूमोनिया. डेग्यू –ह्युमॅटाईड अर्थरायटीस ह्या रोगांवर डॉक्टर मंडळी वापरत आली आहेत. ह्या रोगांची लक्षणे आणि कोरोना विषाणूबाधित रूग्णांचीही लक्षणे वरवर का होईना सारखी आहेत. कोरोना विषाणू-१९ ची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधे शोधत असतानाच मुळात कोरोना विषाणू बाधाच होणार नाही अशी लस शोधून काढण्याचाही संशोधकांचा प्रयत्न सुरू आहे.
कोरोना विषाणू बाधित रुग्णावर अँटीव्हायरल, अँटीबॉडीज वा व्हॅक्सिन आणि अँटी इन्फ्लेटरीज अशी त्तिहेरी उपाय करून रोग बरा करण्याचे लक्ष्य बाळगले जाते. अँटीव्हायरल औषधात माणसाच्या शरारीतील पेशींवर हल्ला करून विषाणूंच्या जेनामच निर्मिती करून विषाणूंच्या आपोआप होणा-या वाढीला आळा घालण्याच्या दृष्टीने रासायनिक घटक असतात. अँटीबॉडीज औषधे जरा वेगळ्या प्रकारची असतात. विषाणूची ताकद असलेले प्रोटिनचे केंद्र नष्ट करण्याचा प्रयत्न ती औषधे करतात. विषाणूंची ताकद एकदाची नष्ट झाले की विषाणू नाश पावतात. अँटीइन्फ्लेमेटरी औषधांचे कार्य वेगळ्या प्रकारचे असते. माणसाच्या शरीरातली प्रतिकारशक्ती प्रभावी करण्याचा जोरकस प्रयत्न अँटी इन्फ्लेमेटरी औषधे करतात. त्यामुळे कमजोर मोल्युक्युल्सचा नायनाट होतो आणि रोग्यास बरे वाटू लागते. ही तिहेरी उपचार पध्दत एकाच गोळीत किंवा इंजेक्शनमध्ये समाविष्ट करता येणार नाही. कदाचित दोनतीन गोळ्यांच्या काँबिनेशन्सचा वापर करून औषधोपचार करणे वर्षभरात डॉक्टर मंडळींना शक्य व्हावे असा प्रयत्न आहे.  बहुसंख्य विषाणूंचे एक वैशिष्ट्य असे की ते आरएनए, प्रोटिन्स आणि लिपिड ह्या तीन घटकांपासून तयार झालेले असते. दुस-याची ताकद हिसकावून घेतल्यामुळे हे विषाणू जिवंत राहतात. माणसाच्या शरीरातल्या पेशींवर हल्ला करूनच त्यांना ताकद मिळत असते!
औषधे येतील तेव्हा येतील तूर्त तरी कोरोना विषाणूचा प्रसार होणार नाही म्हणून उपाययोजना करणेच आपल्या हातात आहे. उन्हाळा आला की कोरोना विषाणू आपोआप निघून जातील, गोमूत्र प्राशन केल्यास विषाणू मरून जातील ( आणि माणूस जगणार! ) वगैरे बकवास सध्या जोरात सुरू झाली आहे. त्यांची मानसिकता आणि पण देवी कोपली वगैरे कारणे सांगणा-या जुन्या काळातल्या मानसिकता ह्यात तत्त्वतः फारसा फरक नाही हे लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या रुग्णावर एखादा उपाय लागू होणे वेगळे आणि संशोधनावर भर देणारे सामूहिक मानवी प्रयत्न यशस्वी होणे वेगळे.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र, शेण ही ढाल-तलवार तर प्रयोगशाळेत चाचणी घेऊन संशोधित केलेले औषध हे कोरोनावर वज्रास्त्र आहे!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार

No comments: