केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ह्यांनी
कोरोना साथ आटोक्यात ठेवण्याच्या राज्य सरकारच्या आटोकाट प्रयत्नांबद्दल आणि
धडाकेबाज लसीकरणाबद्दल तोडलेले अकलेचे तारे पाहिल्यावर केंद्रीय आरोग्य मंत्र्याला
पाचपोच उरलेला नाही! डॉ. हर्षवर्धन स्वतः डॉक्टर आहेत. त्यांना थोडीही अक्क्ल असती
तर त्यांनी वाराणसी, अलाहाबाद, आणि हरिव्दार येथे सुरू झालेल्या
कुंभ मेळ्यालाही परवानगी दिली नसती. वारी हा मराठी माणसांचा श्वास आहे हे
मुख्यमंत्र्यांना माहित असूनही त्यांनी पंढरपूर येथे होणा-या आषाढी –कार्तिकी आणि माघी-चैत्री वारीला
परवानगी नाकारली; इतकेच नव्हे तर पंढरपुरात
संचारबंदी जारी केली होती. शिर्डी आणि गजाननमहाराज संस्थान ह्या दोहोंनीही
परंपरेने चालत आलेले उत्सव- सोहळे कोरामुळे बंद केले. फक्त देवळांच्या नित्य पूजा
सोडून कोणत्याही कार्यक्रमाला राज्य सरकारने परवानगी दिली नाही. कोरोना संक्रमण
रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रशासनाने कशी पावले टाकली ह्याचे आरोग्य
मंत्री हर्षवर्धन ह्यांना घेणेदेणे नाही. डॉ. हर्षवर्धन त्यांचे सहकारी माहिती
मंत्री प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे राज्याचे
भाजपा नेते हे राजकारणाने पेटलेले आहेत. त्याचे खरे दुखणे वेगळेच आहे. भाजपाकडे
संख्याधिक्य असूनही महाराष्ट्र राज्य त्यांच्या हातातून निसटले हे त्यांच्या
दुःखाचे कारण आहे. अर्थात जनता हे समजू शकते. कोरोनाची साथ आटोक्यात
आणण्यासाठी राज्याला हवी असलेली वैद्यकीय उपकरणे आणि लशींचा पुरेसा पुरवठ्याच
अडथळे उत्पन्न करण्यापर्यंत त्यांची मजल जावी हे जनतेला समजू शकणार नाही.
राज्य आरोग्य सेवेचे मुख्य सल्लागार डॉ. सुभाष साळंखे ह्यांनी डॉ.
हर्षवर्धन ह्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. डॉ. साळुंखे ह्यांनीही
जागतिक आरोग्य संघटनेत काम केले असून त्यांची योग्यता डॉ. हर्षवर्धन
ह्यांच्यापेक्षा काकणभर सरस आहे. दिल्लीतील ओमप्रकाश गोयल ह्यांचे चिरंजीव असलेले
डॉ. हर्षवर्धन गोयल ह्यांनी भले जागतिक आरोग्य संघटनेत काम केले असेल, डोके आणि मानेच्या शस्त्रक्रियेत
ते प्रवीण असतीलही; पण साथीच्या रोगाबद्दल त्यांचे
ज्ञान यथातथाच आहे. ते संघ स्वयंसेवक आहेत दिल्ली निवासीही आहेत. त्यामुळे वयाच्या
पन्नाशीत त्यांना मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला! अनुभवाचा विचार केला तर डॉ. सुभाष
साळुंखे ह्यांचा वैद्यकीय प्रशासनाचा अनुभव दांडगाच म्हणावा लागेल. ते नुसते
मेडिकल तज्ज्ञ नाहीत. आळंदीच्या किसनमहाराजांचे ते सुजाण शिष्य असून आळंदीला जायची
एकही संधी ते कधी सोडत नाहीत. म्हणूनच मराठी मातीशी त्यांची नाळ कायम जुळलेली
आहे. हे मुद्दाम लिहण्याचे कारण आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन ह्यांनी कोरोनाविषयक
कामगिरीबद्दल राज्य सरकारवर ठपका ठेवताच डॉ. साळुंखे ह्यांनी हर्षवर्धनना तोडीस
तोड उत्तर दिले. त्यांनी दिलेल्या समर्पक उत्तराची दखल घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र पेटला म्हणून टाळ्या वाजवू नका, निवडणूक असलेल्या ५ राज्यातही
करोना पेटणार आहे, असा स्पष्ट इशारा डॉ. सुभाष
साळुंखे ह्यांनी डॉ. हर्षवर्धनना म्हणजे पर्यायाने केंद्र सरकारला दिला आहे. ‘केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन
ह्यांना मी १९९५ पासून ओळखतो, असे सांगून डॉ साळुंखे म्हणाले. ‘पोलिओ निर्मूलनासाठी हर्षवर्धननी चांगले काम केले होते. जागतिक
आरोग्य संघटनेतही त्यांनी माझ्याबरोबर काम केले आहे. त्यांना देशातील आरोग्य
व्यवस्थेची पूर्ण जाण असतानाही त्यांनी जी महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेवर टीका
केली ती दुर्दैवी आहे. डॉ. साळंखे स्पष्टपणे म्हणतात, डॉ. हर्षवर्धननी केलेली टीका
निव्वळ राजकीय हेतूने केली आहे. हे विधान करताना आपण अतिशय जबाबदारीपूर्वक
करत असल्याचे डॉ. साळुंखे ह्यांनी सांगितले.
फडणविसांचे सरकार उध्दव ठाकरेंनी शरद पवारांच्या मदतीने पाडले
ह्याचा राग गृहमंत्री अमित शहा ह्यांच्या डोक्यात फिट बसला असून संधी मिळेल तेव्हा ठाकरे सरकारविरूध्द ते फडणविसांना
हाताशी धरून आडून आडून कारवाया करत आहेत. आधी सुशांतसिंग ह्यांचा संशयास्पद मृत्यू, कंगनाची अनधिकृत बांधकामे
पाडण्याचे प्रकरण, भाजपाचे चॅनेल चालक अर्णब
गोस्वामींचे प्रकरण, राज्यपालनियुक्त आमदारांचा मुद्दाम
रखडवण्याचा निर्णय, आणि आता वाझे प्रकरण,परमबीरसिंगाचे प्रकरण इत्यादी
प्रकरणी महाराष्ट्र सरकारला जास्तीत जास्त त्रास देण्याचा खटाटोप गेली वर्षदीड
वर्ष सुरू आहेत. त्या प्रकणात फारसे यश येण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे की काय
केंद्राने कोरोना संकट हाताळण्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचे
तंत्र सुरू केले आहे.
केंद्राच्या कारवायामुंळे राज्य सरकारवर ओरखडे उठल्याशिवाय राहणार
नाही हे स्पष्ट आहे. महाविकास आघाडीविरूद्ध केंद्राने खुशाल राजकारण करावे; पण राज्यातील १२ कोटी जनतेच्या
आरोग्याशी खेळ करू नये.
आजवर एक सुरेश प्रभू वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी
कोणाचेही मंत्रिपद काढून घेतले नाही. तेव्हा, हर्षवर्धन ह्यांचे आरोग्य खाते पंतप्रधान नरेंद्र मोदी मुळीच
बदलणार नाही हे स्पष्ट आहे. परंतु हर्षवर्धन आणि कंपनीला एका शाश्वत सत्याचा
विसर पडला आहे. ते सत्य म्हणजे काळ कोणालाही क्षमा करत नाही! ते डोळ्यांसमोर ठेवले
नाही तर त्याचा फटका त्यांच्या मंत्रिपदाला आणि मोदी सरकारला बसल्याशिवाय
राहणार नाही. सत्तेचा उन्माद केव्हा न केव्हा उतरतोच हे केंद्राने वेळीच लक्षात
घेतलेले बरे!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment