Friday, April 16, 2021

कोरोना कुंभात आहुती !

कोरानाची साथ केव्हा जाईल? ती आली तशी जाईल की जोरदार प्रयत्नान्ती ती जाईल? ह्या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचे ठाम उत्तर कोणी देऊ शकेल असे वाटत नाही. मार्च २०२० मध्ये जेव्हा कोरोनाची साथ आली तेव्हा ती साथ युरोपीय देश आणि अमेरिका ह्यांच्या तुलनेने भारतात ती  लौकर आटोक्यात आली.  नव्हे, ती घालवण्याच्या बाबतीत सर्वोच्च आरोग्य यंत्रणेने हुषारी दाखवली म्हणून ती लौकर आटोक्यात आली! करोना योध्यांचे कौतुक करण्यासाठी जनतेला थाळ्या वाजवण्याचा आवाहनही नेत्याने केले होते. ह्या वर्षी  दुसरी कोरोना लाट आली आहे. त्यात देशभर कारोनाग्रस्तांची आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या रोज वाढत आहे. त्यामुळे रेमेडिवीरसारखी औषधे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्सची आणि मुख्य म्हणजे उपचार करणा-या डॉक्टरांची कमतरता भासत आहे! फार काय, गुजरातसारख्या राज्यात मृतांना जाळण्यासाठी  स्मशानभूमीत चौथरेदेखील कमी पडत आहेत. कोरोना प्रतिबंधक लशीच्या  टंचाईबरोबर लशीच्या कुप्या वाया गेल्याच्याही बातम्या आहेत. ह्याही परिस्थितीत उत्सवप्रिय सरकारने लस टोचण्याचा महोत्सव भरवला!

केंद्राच्या उत्साहाप्रमाणे राज्यातही हाच उत्साह दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या उरलेल्या फे-या अशी मागणी तृणमूलच्या ममता बॅनर्जींनी केली. परंतु निवडणूक यंत्रणेने तिकडे अजून तरी लक्ष दिलेले दिसत नाही. कोरोनाचे भयंकर वास्तव बाजूला सारून आखाडाप्रेमी उत्तराखंड सरकारने दर बारा वर्षांप्रमाणे नित्य येणारा कुंभमेळा भरू देण्यास विरोध केला नाही! शाही स्नानाच्या दिवशी गंगेत डुबकी लावल्यामुळे  एकाच दिवसात  कोरोनाबाधितांची संख्या ११ हजारांवर गेली. कुंभात दुस-या क्रमांकाचे स्थान असलेल्या निर्वाणी अखाड्याचे प्रमुख महंत कपिलदेव दास ह्यांचे कोरोनामुळे निधन झाले. ५ एप्रिल ते १४ एप्रिल ह्या कालावधीत ६८ ज्येष्ठ साधूंची कोरोना कुंडात आहूती पडली. एकूण किती माणसे कोरोना कुंडात बळी पडली ह्याचा आकडा अधिकृतरीत्या सांगता येणार नाही. कारण हरिव्दारमध्ये किती आले आणि परत किती गेले ह्याची मुळी अधिकृतरीत्या तरी नोंदच ठेवण्यात आलेली नाही. त्यात देशभरातून कुंभमेळ्याला हजेरी लावणारे किती आणि जवळपासचे लोक किती हे सांगता येत नाही. आपल्याकडे प्लेगच्या साथी येऊन गेल्या. त्या साथीत किती माणसे मेली ह्याचा अंदाजे आकडा जसा सांगितला गेला तसाच कुंभनेळाव्यात बाधित किती आणि मृत किती ह्याचा आकडा अंदाजेच सांगावा लागणार. कोण देवाघरी गेला हे त्यांच्या घरच्या लोकांना कळेल तेव्हा कळेल.

भारतात आजवर किती साथी आल्या आणि किती साथी गेल्या ह्याची गणना कोण करणार! एक मात्र खरे की साथीचे रोग भारताला नवे नाहीत. मोगलकाळात १६१६ साली भारतात पहिल्यांदा प्लेगची साथ आली. ती साथ जवळ जवळ ८ वर्षे टिकली. १७०३-१७०४ साली दक्षिणेत प्लेगची साथ आली. १८१२ साली कच्छ आणि गुजरातेत प्लेगची साथ आली. १८९६ साली मुंबई-पुण्यात प्लेगची साथ आली. त्याखेरीज ब्रिटिश काळात  देवी, प्लेग, टीबी, फ्लू इत्यादी साथी आल्या. नंतरच्या काळात लसीकरण सुरू झाले. अगदी अलीकडे आलेल्या साथीत एडस्, स्वाईन फ्लू, चिकनगुनिया इत्यादी रोग आले. हा इतिहास मात्र ताजा आहे.  ब्रिटिश काळात हत्तीरोग, काला आजार इत्यादीत भारतातली किती माणसे मृत्यूमुखी पडली ह्याचा आकडा देता येणार नाही. कारण मृत्यू म्हणजे मृत्यू अशी आपल्याकडे संकल्पना आहे! माणूस कशाने मेला हे त्याच्या नातावाईकाने सांगितले तेवढेच कळते आणि तेथेच तो विषय संपतो. मृत्यू म्हणजे आत्म्याचे शरीरान्तर. माणूस कपडे बदलतो तद्वत आत्मा शराररूपी वस्त्र बदलतो! लौकिकात मात्र बारा दिवस  आल्यागेल्यांना जेवण आणि तेरावा दिवस मिष्ठान्न भोजनाचा!  हिंदू धर्माची ही शिकवण कुंभमेळा चालकांनी अंगी भिनवल्याने प्रशासनाला वाटते तशी भीती  कुंभचालकांना कोरोनाची भीती नाही. महंत कपिलदेव मृत्यू पावल्यानंतर आणि मुख्य म्हणजे त्यांचे शाही स्नानही आटोपल्याने कोरोना कुंभ संपल्याची घोषणाही ह्या अखाड्याने केली. अजून बाकींच्याच्या स्नानाचे दिवस बाकी असल्याने कुंभ मेळा सुरू आहे.

मृत्यूचे तत्त्वज्ञानाचे उदात्तीकरण सर्व धर्मात करण्यात आले आहे. इस्लाम धर्मात कयामत का दिन’  वगैरे संकल्पना  तर आपल्याकडे गरूड पुराण हे मृत्यू ह्या एकाच विषयाला वाहिलेले आहे. त्या पुराणात कुंभपाक नरकाचे अंगावर काटा आणणारे वर्णन आले आहे. दुसरे मार्केंडेय मुनींनी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्याबरोबर होडीतून कसा प्रवास केला आणि तो करत असताना  काही जणांना जलप्रलयातून कसे वाचवले ह्याचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे. प्रलय काळाच्या आणि युगपरिवर्तनाच्या गोष्टींनी भागवत खच्चून भरले आहे.

पुढेमागे कोरोना कुंभाच्या हाहःकारावरही एखादे पुराण रचले जाईल! किंबहुना हा ताजा इतिहास मिडिया चॅनेलनी ह्यापूर्वीच कॅमेराबध्द केला आहे. त्या पुराणात विरोधी पक्षप्रमुखांना दैत्याची उपमा दिली की झाले! अर्णबच्या रिपब्लिकन किंवा एनडी टीव्ही ह्यासारख्या प्रत्येक टीव्ही चॅनेल्सची स्वतंत्र बखर कदाचित प्रकाशित होईलही. अर्थात त्याच्या कॉपीज् मर्यादित ठेवण्यात येतील! फक्त संबंधितांना १०-२० हजार रूपये मोजून त्या उपलब्ध होतील. फेसबुकने अनेक पोस्टच्या मेमरीज साठवलेल्या आहेत. फेसबुकला मोठी रक्कम अदा करून त्या मिळवता येतात.

कोरोना केव्हा जाणार ह्या प्रश्नाचे उत्तर एकचः कोरोना प्रतिबंधक उपाययोजना शंभऱ टक्के यशस्वी झाली की ती साथ जाणार! ज्याप्रमाणे फ्लू, चिकनगुनिया वगैरे एक रोग म्हणून शिल्लक आहेत. कोरोना उर्फ कोविड-१९ ह्या नावाचा एक रोग एक रोग शिल्लक राहील. त्याखेरीज सरकारी अहवालात, लेखकांनी लिहीलेल्या पुस्तकात कोविड-१९ नावाचा रोग शिल्लक राहील. तूर्त तरी वाट बघण्यापलीकडे जनतेच्या हातात काही नाही. कोरोनाबाधितांचे आणि कोरोनामृत्यूचे आकडे मिडियाने मोजून प्रसिध्द करावेत आणि जिवंत राहिलेल्यांना लोकांनी ते एकमेकांना सांगत राहावेत! ते मोजत बसण्यापलीकडे सामान्यांच्या हातात काही नाही हे लक्षात ठेवलेले बरे.

कारण विरोधी पक्षाच्या मते सरकार खरी आकडेवारी आणि माहिती कधीच जाहीर करत नाही तर सत्तेवर असलेल्यांच्या मते विरोधी पक्ष राजकारण करत आहेत. तेव्हा, किती काळ कोरोना भारतात ठाण मांडून बसेल ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात हांशील नाही. सरकार क्या  नही कर रही है! आप देख नहीं रहो  क्या!  मास्क आखें ढकने के लिये नहीं है. नाक और मुंहपर पहनोअसे किंचित् राजकारणी अंधभक्त इतरांना संधी मिळेल तेव्हा सुनावत राहतील. आणि हो! दरम्यानच्या काळात दो गज अंतर है जरूरी ही घोषणा मात्र प्रत्येकाने जरूर पाठ करावी. कोव्हॅक्सीन, कोवीशील्ड, स्पुटनिक वगैरे लशींची नावेही जमलं तर पाठ करा नाहीतर किमान लक्षात तरी ठेवा. निदान कोरोना कुंडात आहूती तरी पडणार नाही.

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: