Tuesday, April 20, 2021

निगरगट्ट नेते

उत्तर भारताले नेते किती निगरगट्ट आहेत हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन गोयल ह्या दोघांच्या उदाहरणावरून कालच दिसले. अगदी सुरवातीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांची छत्रछाया लाभलेली असल्याने ते कितीही बेताल वागले किंवा बोलले तरी तिकडे दुर्लक्ष करायचे असे बहुधा पंतप्रधानांनी ठरवले असावे. पूर्वी स्मृती इराणींना मनुष्यबळ विकास खाते दिल्याने त्यांचे प्रमाणाबाहेर स्तोम माजले होते. तोच प्रकार डॉ. हर्षवर्धन गोयल आणि योगी आदित्यनाथ ह्यांच्या बाबतीतही आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी लखनौ, वाराणशी, प्रयागराज, कानपूर आणि गोरखपूर ह्या ५ शहरात ताबडतोब टाळेळेबंदी जाहीर करा, असा निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. नुसताच निकाल दिला असे नाही तर सार्वजनिक हिताच्या याचिकेच्या सुनावणीप्रसंगी न्यामूर्ती सिद्धार्थ वर्मा आणि अजितकुमार ह्या न्यायमूर्तीव्दयांनी काढलेल्या उद्घारामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ह्यांच्या उरल्यासुरल्या अब्रूचेही हरण झाले.

उत्तर प्रदेशात रविवारी दिवसभरात ३० हजारांहून अधिक कोरोना रूग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोना उपचार केंद्रांतली उपचाराची अवस्था आणि विरगीकरणाची गैरव्यवस्था  ह्या संदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाप्रमाणेच तेलगंणा उच्च न्यायालयानेही ४८ तासांच्या आत कोरोना संदर्भात तेलंगण सरकारला रात्रीची संचारबंदी जारी करण्याचा आदेश दिला. परंतु तेलंगण सरकारने न्यायाधीशांच्या आदेशाची अमलबजावणी करण्याच्या संदर्भात वेडावाकडा युक्तिवाद केला नाही. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे स्वतःला न्यायमूर्तींपेक्षाही हुषार समजत असावेत. ह्या मोठ्या शहरात टाळेबंदी जारी करणे जवळ जवळ अशक्यप्राय असल्याचा युक्तिवाद उत्तरप्रदेशच्या वकिलांनी केला. त्यही पुढे जाऊन टाळेबंदीच्या आदेशाची अमलबजावणी करण्याबद्दल योगी आदित्यनाथांनी जाहीर असमर्थता व्यक्त केली.

 उत्तरप्रदेश सरकार कोरोना बेड्स वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा युक्तिवाद उत्तरप्रदेशाच्या  सरकारी वकिलांनी करताच न्यायमूर्तीनी त्यांना थांबवले. न्यायमूर्ती म्हणाले, निवडणुकांसाठी सरकारकडे पैसा आहे आणि सार्वजनिक आरोग्यासाठी खर्च करायला पैसा नाही हा युक्तिवाद ऐकून कोणालाही हसू येईल. ५ मोठ्या  शहरातील १० टक्के लोकांना जरी कोरोनाची लागण झाली तर ह्या लोकांवर उपचार करण्याची व्यवस्था सरकार कशी करणार? गेल्या आठवड्यापासून सतत राबत असलेल्या मेडिकल आणि सहाय्यक कर्मचा-यांनी काय करायचे?  ह्या कर्मचा-यांचा तरी  विचार करा ! सार्वजनिक कोरोना केंद्राची व्यवस्था कोलमडल्यास फक्त व्हीआयपी आणि  व्हीव्हीआयपींवरच उपचार करणार का? उत्तरप्रदेशात व्हीव्हीआयपींचा चाचणी अहवाल १२ तासात हाती पडतो, बाकी सर्वसामान्यांना चाचणी अहवाल येण्यासाठी २-३ दिवस वाट पाहावी लागते!

कोर्टाच्या ह्या अनपेक्षित सरबत्तीमुळे उत्तरप्रदेशचे वकील गांगरून गेले किंवा नाही हे कळण्याचा मार्ग नाही. परंतु योगी आदित्यनाख ह्यांच्या प्रतिक्रयेवरून तरी असे वाटते की ५ मोठ्या शहरातील कोरोना परिस्थितीशी त्यांना काही देणेघेणे नसावे. खरं तर, त्याच्या प्रतिक्रियेबद्दल कोर्टाची बेअदबी होते. त्याबद्दल न्यायालयीन बेअदबीचे प्रकरण कोर्टाने आपणहून उपस्थित करावे आणि योगी आदित्यनाथांना समन्य पाठवणे युक्त ठरेल. प्रशांत भूषणना सर्वोच्च न्यायालयाने प्रतिकात्मक दंड केला होता. तसा तो अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी आदित्यनाथनाही करावा!

केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन हेदेखील योगी आदित्यनाथांइतकेच निगरगट्ट असावे. लसीकरणाच्या संदर्भात भूतपूर्व पंतप्रधान मनमोहनसिंग ह्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांना पत्र लिहले. त्या पत्रात त्यांनी ५ महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. त्याबद्दल त्यांना साधे आभाराचे पत्र पाठवणे तर बाजूलाच राहिले आणि स्वतःला देशातील आरोग्य यंत्रणेचे सर्वेसर्वा समजणा-या हर्षवर्धनांनी मनमोहनसिंगांचे मुद्दे खोडून काढण्याचा अश्लाघ्य प्रयत्न केला. बिकट काळात सरकारी अर्थव्यवस्थेचा मोहरा फिरवून देशाला नवी धोरणात्मक दिशा देणारा नेता ह्या नात्याने मनमोहनसिंगांना भारताच्या अर्थकारणात मोठे स्थान प्राप्त झाले होते. दोन वेळा पंतप्रधानपद भुषवून देशाचे तारू योग्य दिशेने नेणारा नेता म्हणूनही त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे. परंतु  डॉ. हर्षवर्धन हे स्वतःला र मोठे आरोग्यमंत्री समजून चालतात. ते मनमोहनसिंगांना केवळ काँग्रेस पक्षाचे नेते समजून चालतात! म्हणून त्यांनी मनमोहनसिंगांच्या पत्राचा प्रतिवाद केला. काँग्रेसबद्दलची व्देषभावना भाजपा सरकारमधील  एकाही नेत्यांच्या डोक्यातून अजूनही गेलेली नाही एवढाच ह्यचा अर्थ ! मनमोहनसिंगांच्या टिकेमुळे हर्षवर्धन  अस्वस्थ  झालेले असतील. अर्थात निगरगट्टपणाच्या बाबतीत ते योगी आदित्यनाथांपेक्षा काकणभरही कमी नाहीत हेच खरे!

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: