Monday, April 5, 2021

खलनायिका

मराठी बोलपटाला पन्नास वर्षे झाली होती. त्यानिमित्त प्रत्यक्ष मुलाखतींवर आधारित कार्यक्रम आकाशवाणीवर करायंच पुरुषोत्तम दारव्हेकरांनी ठरवलं होतं. मी कामगारसभेचे अधिकारी हेमंत कारंडे ह्यांच्याकडे बसलो होतो. इतक्यात दारव्हेकर कारंडेंच्या खोलीत आले. कारंडेंनी माझी दारव्हेकरांशी औपचारिक ओळख करून दिली. ते लगेच म्हणाले, बरे झाले तुम्ही इथेच आलेला आहात. मला सिनेमा कलावंतांच्या मुलाखती घेणारा पत्रकार हवा आहे. तुम्ही घेणार का मुलाखती? नांदगावकर स्क्रीप्ट लिहणार आहेत!
मी सिनेपत्रकार नाही.मी
म्हणूनच तुम्हाला सांगतोय्. सिनेपत्रकार लांबण लावत बसतील. मला ते नकोय्.  दारव्हेकर
मी त्यांना होकार दिला. ऑफिसला आल्यावर नांदगावकरांना फोन केला. नांदगावकरांनी मला काही मुद्दे सुचवले. काही जणांची नावे आणि टेलिफोनही दिले. त्यात शशिकलाचाही नंबर होता. मी शशिकलाला ऑफिसमधून फोन केला. कुणीतरी फोन उचलला. माझा आवाज ऐकून लगेच फोन खाली ठेवून दिला.  बहुधा माझा आवाज अपरिचित असल्याने फोन बंद केला असावा. दार्व्हेकरांनी मला प्रसारण तारखेच्या खूप आधी काम सांगितले असल्याने मी निश्चिंत होतो. माझी चिंता वेगळीच होती. सुप्रसिध्द नाटककार आणि दिग्दर्शकाच्या हाताखाली काम करण्याचे मला टेन्शन आले होते. माझ्याकडून यत्किंचितही गफलत खपवून घेतली जाणार नाही हे मी ओळखून होतो. तेच माझ्या टेन्शनचे खरे कारण होते. नांदगावकरांचे मला इतके टेन्शन नव्हते. मराठात ते माझे सहकारी होते. सहका-याला सांभाळून घेणारा असा नांदगावकरांचा लौकिक होता. माझ्या कामाचे ते अधुनमधून कौतुकही करत. सोपारकर, पुष्पा त्रिलोकेकर, नांदगावकरांच्या लहानशा गटात मी लोकप्रिय होतोच.
दोन आठवडे झाले तरी माझ्याकडून एकही मुलाखत दारव्हेकरांकडे पोहचली नाही. शेवटी त्यांनी वैतागून मला पत्र लिहलं. तुम्हाला मुलाखती आणणं जमत नसेल तर तंस सांगा. मी स्टुडिओत संवाद लिहववून घेऊन रेकॉर्डिंग करून घेईन. मी तातडीने त्यांना भेटायला गेलो आणि ३ दिवसात तुम्हाला मुलाखतींचं रेकॉर्डिंग देतो असं सांगितलं तेव्हा कुठे ते शांत झाले. तीन दिवसात द्या मात्र, त्यांनी मला पुन्हा एकदा तंबी दिली.
नांदगावकरांनी दिलेल्या यादीतल्या प्रत्येकाला फोन करण्याचा मी सपाटा लावला. परंतु सिनेसृष्टीत माझे नाव माहित नसल्याने मला मुलाखतीला वेळ देण्यास कुणी तयार झाला नाही. ह्या फोनाफोनीत एक अठवडा निघून गेला! त्यामुळे माझे टेन्शन वाढू लागले. शेवटी नांदगावकरांना मी शरण गेलो. नांदगावकर म्हणाले, झवर काळजी करू नको. आपल्या हातात अजून भरपूर वेळ आहे!’ शेवटी नांदगावकरांना मी विनंती केली. मला शशिकलाची तरी भेट ठरवून द्या. वेळ असेल तर माझ्याबरोबर या, असंही मी त्यांना विनवलं.  त्यांनी माझ्यासमोर शशिकलाला फोन लावला. झवर म्हणून माझे सहकारी आहेत. उद्या ते तुमच्याकडे येतील. त्या काय म्हणाल्या हे मला ऐकू आले नाही. मला दुस-या दिवशी त्यांनी दुपारी  चार वाजता बोलावलं. असं सांगून नांदगावकरांनी त्यांचा बांद्रयाचा पत्ता दिला. उद्या मला वेळ नाही तुमच्याबरोबर यायला असं सांगून त्यांनी मला निरोप दिला.
दुस-या दिवशी चार वाजता मी शशिकलाच्या घरी हजर झालो. त्यांनी माझं हसून स्वागत केलं. तरीही माझ्या मनावर एक प्रकारचं दडपण होतंच. एवढ्या मोठ्या प्रथितयश अभिनेत्रीशी काय बोलावं हा माझ्यापुढे प्रश्न होता. शेवटी मी तिला धिम्या आवजात सांगितलं, मराठी बोलपटास ५० वर्षे झाली त्या निमित्त ऑल इंडिया रेडियोवर अर्ध्या तासाचा कार्यक्रम करायचाय्! नांदगावकर त्याचं स्क्रीप्ट लिहणार आहेत. माझं काम ऑन द स्पॉट मुलाखती घेऊन दारव्हेकरमास्तरांना सुपूर्द करायच्या असं ठरलंय्. ही प्रस्तावना मला मुद्दाम करणं गरजेचे होतं. आदल्याच दिवशी राज कपूरकडून मी नकार घेतला होता. अर्थात तो सरळ नकार नव्हता. राज कपूरच्या सेक्रेटरीने मला सांगितलं, साहेब मुलाखत द्यायला तयार आहेत. पण ते आकाशवाणीच्या स्टुडिओत मात्र येणार नाहीत. तुम्ही अँबॅसॅडर हॉटेललात सूट बुक करत असाल तर ते तिथे येतील. त्यांचा प्रस्ताव मला परवडणारा नव्हता! त्यामुळे त्यांचा हा अप्रत्यक्ष नकार आहे असं समजून मी त्यांचा फोन बंद केला. राज कपूरच का? तर त्याचं कारण असं की त्यांच्या सिनेमात ललिता पवार हमखास भूमिका करायच्या. एम आर आचरेकरांचे सेट्स हेही राज कपूरचं ठरलेलं असायचं. त्यामुळे मराठी सिनेमाबद्दल निश्चितच त्यांची मते महत्त्वाची असू शकतील असा माझा कयास होता.
शशिकला मराठी अभिनेत्री असल्या तरी हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका जास्त गाजल्या. सुजातापासून त्यांची सुरूवात झाली होती. मी त्यांना विचारलं, मराठी चित्रपट हिंदीइतके का गाजत नाही? तेच अभिनेते जेव्हा हिंदीत काम करतात तेव्हा त्यांचे चित्रपट गाजतात. परंतु मराठी सिनेमाला २५ आठवडे पुरे करायची मारामार पडते. त्यावर त्यांनी मजेशीर उत्तर दिले. त्या म्हणाल्या, मराठी चित्रपट अजून सोज्वळ वातावरणातून बाहेर पडलेले नाहीत. ह्या उलट हिंदी पटकथालेखक खुलकेपटकथा  लिहतात. त्यामुळे प्रेक्षक हिंदी सिनेमा डोक्यावर घेतात. मराठीतही थोर दिग्दर्शक, पटकथा लेखक आहेत नाही असे नाही. पण त्यांच्या संवादांवर नाटकांचीच छाप आहे.
हिंदीचं आपण समजू शकतो. पण तमिळ, तेलगू चित्रपटांचीही आपण बरोबरी करू शकत नाही. असं कां?’
दाक्षिणात्य चित्रपटातला हिंसाचार, नायिकेची डान्स, गाणी प्रेक्षकांना आवडतात. सळसळणारे सापही त्यांच्या कथानकात पाहायला मिळतात...मराठी सिनेमा अजून सोज्वळतेतून बाहेर पडायला तयार नाही. ना गहि-या भावभावनांना मराठी चित्रपटात स्थान! नायक नायिंकांच्या संवादात चहाटळपणा आला तर मराठी प्रेक्षक चुकूनही खपवून घेणार नाहीत....
मला असलेला मुद्दा मिळाल्याबरोबर मी मुलाखत आवरती घेतली. त्यावर त्या उठल्या. मला म्हणाल्या थोडं थांबा. त्या आत गेल्या दोन वेगवेगळ्या प्रकारचे फरसाण भरलेल्या प्लेट्स घेऊन आल्या. चहा घेणार का सरबत वगैरे हाही प्रश्न आला. चहा चालेल असं मी म्हणताच कामवाल्या बाईला चहा करायला सांगून त्या लगेच बाहेर आल्या. ती संधी साधून माझी ऑफ द रेकॉर्ड मुलाखत सुरू झाली. तुमची खलवायिकेची कामंच मला जास्त आवडतात. त्यावर त्या मंद हसल्या. तुम्ही खलनायिकेच्या भूमिकेत कसं काया शिरतात, असा प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या, त्यासाठी मला फारंस काही करावं लागत नाही. सेटवर गेले की दिग्दर्शक मला त्या वेळच्या प्रसंगाचा  रोल समजावून सांगतात. अन् मी सुरू करते. बाकीचं सगळं आपसूक होतं! चहा आणि गप्पा सुरू असताना त्यांनी मला विचारलं, तुम्ही फ्री लान्सिंग करता का?
मी मानेने नकार दिला. नंतर म्हटलं, मी लोकसत्तेत न्यूजडेस्कला उपसंपादक आहे.
त्यांनी पुन्हा मंद स्मित केलं. त्यांनी माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल आणखी काही प्रश्न विचारले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांना न्यूज डेस्कच्या कामाबद्दल अफाट कुतूहल आहे. न्यूजडेस्कचे काम फारच रूक्ष असतं. मुख्य म्हणजे त्या कामाला ग्लॅमर नाही. फार काय, न्यूज डेस्कवर काम करणा-याला कुणी पत्रकारदेखील समजत नाही!  त्यावर मात्र त्या खळाळून हसल्या.
आज शशिकला गेल्याची बातमी आली तेव्हा मला हे सगळं आठवलं. त्यांचं नाव जवळकर आहे आणि त्यांचा जन्म १९३२ चा आहे हेही मला पहिल्यांदा कळलं. मी पत्रकार होतो हे आजही कुणाला खरं वाटत नाही. मात्र मी पत्रकार असल्याची गाजलेली खलनायिका असलेल्या शशिकलाला २ मिनटात खात्री पटली!  


रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार

No comments: