आचार्य अत्रे ह्यांची आज १३ ऑगस्ट २०२० रोजी १२२ वी
जन्मतिथी! हा दिवस माझ्या लक्षात राहण्याला वैयक्तिक कारण आहे. १३ जून १९६८ रोजी ‘मराठा’ ह्या ऐतिहासिक
वर्तमानपत्रात माझी पत्रकारितेची उमेदवारी सुरू झाली. आणि बरोबर १ वर्षांनंतर
म्हणजे १३ जून १९६९ रोजी आचार्य अत्रे ह्यांनी ह्या जगाचा अखेर निरोप घेतला.
वर्षाभरात आचार्य अत्र्यांच्या पत्रकारितेचा मला अगदी जवळून परिचय झाला. संयुक्त
महाराष्ट्राच्या चळवळीत महाराष्ट्रभरातून पाठिंबा उभा करण्यासाठी त्यांनी ‘मराठा’ सुरू केला होता.
त्यांच्यासमोर 'ज्ञानप्रकाश'कार काकासाहेब
लिमये आणि 'संदेश'कार अच्युतराव
कोल्हटकार ह्यांचा आदर्श होता. तरीही 'मराठा' सुरू झाला त्या काळात अच्युतरावांचा आणि काकासाहेब
लिमयांचा काळ खूप मागे पडला ह्याची आचार्य अत्र्यांना पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच
‘मराठा’ला जास्तीत जास्त
आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
‘मराठा’ हे चळवळीचे
वर्तमानपत्र झाले तरी ते जास्तीतजास्त परिपूर्ण वर्तमानपत्र काढण्यासाठी न्यूज
एजन्सीची सेवा, कुशल पत्रकार, कसलेले वार्ताहर, अद्यावत
यंत्रसामुग्री आणि वर्तमानपत्राचे वितरण करण्याची तसेच जाहिराती मिळवण्याची
व्यवस्था उभी करणे गरजेचे असते ह्याचे त्यांना भान होते. ती उभी करण्याच्या कामी
त्यांचे जावई व्यंकटेश पै ह्यांनी त्यांना साह्य केले. मराठा सुरू करण्यापूर्वी ‘नवयुग’ साप्ताहिक
चालवण्याचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. 'नवयुग'च्या साहित्यविषयक मजकुराची जबाबदारी शिरीष पै, शांता शेळके, अनंत काणेकर पाहात
असले तरी राजकीय लेख वा बातमीपत्रांची जबाबदारी ते स्वतः पाहात.
'नवयुग'साठी नाशिक येथे
नेहरूंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचा वृत्तांत देण्यासाठी ते
जातीने नाशिकला गेले होते. काँग्रेस अधिवेशनाचा त्यांनी लिहलेला वृत्तांत हा लेख
म्हणून उत्कृष्ट तर होताच, शिवाय मुरब्बी पत्रकाराच्या लेखणीची सारी
वैशिष्ट्ये काँग्रेस अधिवेशनाच्या वृत्तांतात उतरली होती. कदाचित त्यांच्यासमोर
अच्युतराव कोल्हटकरांचे उदाहरण असावे. काँग्रेस नेत्यांच्या चर्चेत नेमके काय
बोलणे झाले ह्याचा अंदाज बांधत बसण्यापेक्षा तेथे खास वार्ताहर पाठवण्याचा उपक्रम
अच्युतराव कोल्हटकरांनी सुरू केला होता. काही वेळा ते स्वतःही जायचे. नागपूर येथे
भरलेले काँग्रेस अधिवेशन ‘कव्हर’ करण्यासाठी अच्युतराव कोल्हटकरांनी ‘संदेश’चे प्रकाशन
छापखान्यासह नागूरला हलवले होते!
आधी ज्योती स्टुडियोत सुरू झालेल्या मराठाला मुंबई महापालिकेने वरळीत
जागा दिली. वरळीतल्या जागेवर इमारत बांधण्यासाठी मराठाला मदतीचा ओघ सुरू झाला.
मदतीत सामान्य मराठी माणसांनी आपला वाटा उचलला. अक्षरशः १ रुपयापासून शंभर-दोनशे
रूपयांपर्यंतच्या सामान्य माणसांनी मनीऑर्डरी पाठवल्या. ‘मराठा’च्या दैनंदिन
प्रकाशनाची जबाबदारी आचार्य अत्र्यांचे जावई व्यंकटेश पै ह्यांच्यावर सोपवण्यात
आली होती. ते 'मराठा'चे प्रकाशन करणा-या
महाराष्ट्र प्रकाशन ह्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर होते. दिल्लीत भरलेल्या
यंत्रसामुग्रीच्या प्रदर्शनातून रोटरी मशीन विकत घेतल्यास त्यावर आयातशुल्क द्यावे
लागत नाही अशी माहिती अत्र्यांना समजताच त्यांनी कॉ. डांगेंच्या मदतीने रोटरी मशीन
मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. पुढची सगळी ‘फॉलोअप’ स्वरूपाची कामे व्यंकटेश पैं ह्यांनी केली.
त्याखेरीज 'फ्रीप्रेस'मध्ये लायनो मशीन
येताच पैंनी ‘मराठा’साठी एक लायनो
मशीनही खरेदी केले.
आधी त्या काळात अनेक मोठ्या वृत्तपत्रात पीटीआय आणि यू एन आय ह्या दोन्ही
वृत्तसंस्थांची सेवा परवडत नव्हती. आचार्य अत्र्यांच्या सूचनेनुसार मराठासाठी
व्यंकटेश पै ह्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर ह्या नात्याने दोन्ही वृत्तसेवांची वर्गणी
भरली. हिंदुस्थान समाचारची हँड डिलिव्हरी सेवाही मराठाने घेतली. हेतू एकच आपले
वर्तमानपत्र कुठल्याही बाबतीत मागे पडता नये. बातम्या कशा प्रकारे द्यायच्या हे
ठरवण्याचे स्वातंत्र्य पत्रकारांना असले तरी त्यांना स्वतःला मूळ बातमीची
वस्तुनिष्ठता माहित हवीच असा अत्र्यांचा आग्रह होता. तो बरोबर होता हे कोणीही
मान्य करील. ते स्वतः लौकर उठून 'टाईम्स ऑफ इंडिया' आणि 'नवाकाळ' ही वर्तमानपत्रे बारकाईने वाचत. त्यांचा एकच हेतू
होता, 'मराठा'त कुठली महत्त्वाची
बातमी ‘मिस’ होता कामा नये.
अर्थात 'मराठा'च्या पृष्ठसंख्येवर
मर्यादा असल्याने बातम्यांचा संक्षेप करून देणे आवश्यक होते.
बातम्यांचा संक्षेप करण्याचे अत्र्यांकडे असलेले कौशल्य निव्वळ अफाट
होते. सुप्रीम कोर्टात सुरू झालेल्या पाटील-फर्नांडिस अपीलाच्या सुनावणीच्या
बातम्यांचे भाषान्तर करताना मला आचार्य अत्र्यांच्या संक्षेपीकरण आणि भाषान्तर
कौशल्याची साक्षात प्रचिती आली. मराठा’तल्या बातम्या हा सामान्य न्हाव्याला, टांगावाल्यांनाही
कळल्या पाहिजे अशी प्रतिज्ञा करूनच ते बातम्या लिहीत. नाटकांच्या संवादाला टाळी
पडली नाही तर सारे काही फुकट आहे असे नाटककार ह्या नात्याने त्यांचे मत होते. हेच
तत्त्व त्यांनी वृत्तलेखनातही निराळ्या पध्दतीने पाळले. सा-या उपसंपादकांना आणि
वार्ताहरांना पाळायला लावले.
आचार्य अत्र्यांचे राजकारण आणि पत्रकारिता हा त्यांच्या काळात नेहमीच
टीकाविषय झाला. परंतु रागलोभ व्यक्त करताना कुठल्याच प्रकारे संयम न पाळण्याचा आणि
जे मनात असेल ते खुल्लमखुल्ला बोलण्याचा जुन्या पिढीतल्या मराठी माणसांचा स्वभाव
होता. आचार्य अत्रेही त्याला अपवाद नव्हते. त्यांच्या ह्या स्वभावामुळेच ‘जहरलाला नेहरू’ ‘विनोबा की वानरोबा’, ‘एसेमना जोड्याने
मारा’, ‘राम बोलो भई राम
गेला बीके बोमन बेहराम’ ह्यासारखी शीर्षके त्यांना सुचत. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला
पाठिंबा मिळवण्यासाठी आचार्य अत्र्यांनी विनोबांची भेट घेतली. परंतु संयुक्त
महाराष्ट्राला विनोबांनी निःसंदिग्ध पाठिंबा दिला नाही. त्याचा राग आल्यानंतर
लिहलेल्या अग्रलेखाला ‘विनोबा की वानरोबा’ असे शीर्षक त्यांनी दिले. निव्वळ पक्षीय
स्वार्थासाठी संयुक्त समाजवादी पक्ष समितीतून बाहेर पडला तेव्हा एसेमना जोड्याने
मारा अशी हेडलाईन आचार्य अत्र्यांनी दिली. मात्र, हेडिंग देताना कुटिलबुध्दी, द्वेषभावना,ना दुष्ट मनोवृत्ती, खोडसाळपणा, मत्सर भावनांचा
लवलेशही त्यांच्या स्वभावात नव्हता. त्यांचे हे स्वभाववैशिष्टय सामान्य वाचकांच्या
लक्षात आलेले होते. परंतु साहित्यिक, राजकारणी, विचारवंत वगैरेंच्या मात्र ते मुळीच लक्षात आले
नाही. आचार्य अत्र्यांच्या शिवराळपणावर बोटे ठेवण्यात त्यांनी नेहमीच धन्यता
मानली.
कम्युनिस्टांचा पाठिंबा घेतल्याबद्दलही आचार्य अत्र्यांवर खूप टीका झाली.
त्या टीकेला उत्तर देताना आचार्य अत्र्यांनी लिहले, आगीमुळे हात पोळतात. पण त्या आगीचा उपयोग स्वयंपाक
करण्यासाठीही करता येतो, त्यांचा हा युक्तिवाद बिनतोड होता! संयुक्त महाराष्ट्राच्या राजकारणासाठी
त्यांना कम्युनिस्टांची मदत हवी होती ती त्यांनी बिनदिक्कतपणे घेतली. प्रबोधनकार
ठाकरे ह्यांच्याशी त्यांचे जवळचे संबंध होते. 'मराठा'चे मास्टहेड बाळासाहेब ठाकरेंनी करून दिले! मराठी
माणसांच्या हितासाठी शिवसेना संघटना स्थापन करण्याची कल्पना आचार्य अत्र्यांनी
प्रबोधनकारांकडे मांडली. पुढे बाळासाहेबांनी ती प्रत्यक्षात उतरवली. पुढे
कम्युनिस्टांशी सख्य ह्या मुद्द्यावरून आचार्य अत्रे आणि शिवसेना प्रमुख
ह्यांच्यात तीव्र मतभेद झाले. त्या मतभेदातूनच शिवसेना मराठाच्या विरोधात उभी
ठाकली.
संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मुख्यमंत्री यशवंतराव
ह्यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा रोख बदलून त्यांच्या धोरणावर टीका करायला
आचार्य अत्र्यांनी सुरूवात केली. त्यांचा नेहरू विरोध तर साफ मावळला. नेहरूंच्या
निधनानंतर नेहरूंचा मुक्तकंठाने गौरव करणारे अग्रलेख त्यांनी रोज बारा दिवसापर्यंत
लिहले. हा अग्रलेखांचा एक नवाच उच्चांक होता. नेहरूंच्या निधनाला अत्र्यांनी
सूर्यास्ताची उपमा दिली. आजही सूर्यास्त हे त्यांचा नेहरूंवरील अग्रलेख संग्रहाचे
पुस्तक आवर्जून वाचले जाते. 'मराठा'तले सारे अग्रलेख आचार्य अत्रेच लिहतात असा एक गोड
गैरसमज महाराष्ट्रात होता. हा निव्वळ गैरसमज होता. 'मराठा'त अग्रलेख लिहण्यासाठी विनायक भावे आणि र. गो.
सरदेसाई हया दोघांची सहसंपादक म्हणून नेमणूक करण्यात आली होता. अत्र्यांना लिहायचे
नसेल तेव्हा भावे किंवा सरदेसाई अग्रलेख लिहीत. अर्थात लिहण्यापूर्वी आचार्य
अत्र्यांशी चर्चा करण्याचा त्यांचा प्रघात होता. संपादकांशी चर्चा केली तरी तो
फक्त शिरस्त्याचा भाग होता. त्यांच्या लेखनात संपादक ह्या नात्याने आचार्य
अत्र्यांनी हस्तक्षेप मात्र कधीच केला नाही. लोकमान्य पोनय्या नावाचे पोलिटिकल
कार्टूनिस्टही मराठाच्या स्टाफवर होते. विनायक भावे ह्यांच्याशी चर्चा करून ते
व्यंगचित्र काढत.
'मराठा'च्या रविवार
पुरवणीचे काम शिरीषताईंकडे होते. रविवार पुरवणीचे धोरण शिरीषताई स्वतः ठरवत. वसंत
सोपारकर हे रविवार आवृत्तीचे प्रमुख होते. शिरीषताईंनी त्यांनाही भरपूर
स्वातंत्र्य दिले होते. नवोदित लेखकांच्या लहानमोठ्या लेखांना प्रसिद्धी देण्याची
शिरीषताईंनी सोपारकरांना संमती दिली होती. आचार्य अत्र्यांनी लिहून पाठवलेले लेख
आणि शिरीषताईंनी दिलेले लेख वगळता ह्या खुल्या संमतीचा सोपारकरांनीही मनसोक्त वापर
केला. पैसाहेबांच्या परवानगीने सोपारकर आणि सुधीर नांदगावकर ह्या दोघांनी मिळून
स्वतःचे चित्रपट साप्ताहिकही चालवत! जाहिरात व्यवस्थापक सुरेश सावंत किंवा वितरण
व्यवस्थापक दामू पुरंदरे ह्यांना परस्पर बातम्या देण्याचा अधिकार नव्हता.
‘झुंजार पत्रकार’ हृया एकच
विशेषणामुळे आचार्य अत्र्यांकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधले गेले. तसे आचार्य अत्रे
हे प्रोफेशनल पत्रकार होते ह्याकडे मात्र कोणाचे लक्ष गेले नाही. ते झुंजार
पत्रकार तर होतेच. परंतु नेमक्या ह्याच कारणाने कर्तबगारी असूनही काँग्रैस सरकारने
त्यंना द्मपुरस्कार दिला नाही. संयुक्त महाराष्ट्र समिती हा प्रमुख विरोधी पक्ष
असूनही विधानसभेत विरोधी पक्षाचे नेतेपदही त्यांना मिळाले नाही खरे तर हा एक
प्रकारे त्यांच्यावर राजकीय अन्याय होता. आचार्य अत्रे हे प्रोफेशनल पत्रकार होते
इकडेही महाराष्ट्राने साफ दुर्लक्ष केले. त्यांच्या हयातीतच त्यांच्यासंबंधीचे
खरेखोटे किस्से सांगण्याची लाटच आली. त्यांच्या मृत्यूनंतर तर किस्से सांगण्याच्या
लाटेला उधाण आले. मराठातून बाहेर पडलेल्या पत्रकारात अहमअहमिका सुरू झाली.
त्यामुळे लोकांची करमणूक झाली तरी आचार्य अत्र्यांच्या पत्रकारितेत ध्येयवाद आणि
प्रोफेशनल पत्रकारितेचा अपूर्व संगम झाला होता इकडे महाराष्ट्राचे दुर्लक्ष व्हावे
हा दैवदुर्विलास आहे!
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment