कालिकत विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेसच्या जंबो विमानास शुक्रवारी संध्याकाळी ७.४० वाजता झालेल्या अपघातात दोघा वैमानिकांसह १८ प्रवासी ठार झाले. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विमान उतरण्यासाठी २ वेळा घिरट्या घालूनही ते धावपट्टीवर उतरू शकले नव्हते. तिस-यांदा जेव्हा ते उतरले तेव्हा मात्र धावपट्टीवर न थांबता वेगाने पुढे धावत दरीत ३५ फूट खाली कोसळले. विमानास अपघात होण्यापूर्वी वैमानिक दीपक साठे ह्यांचे नियंत्रणकक्षाशी जे बोलणे झाले असेल ते विमानातील रेकॉर्डिंग यंत्रणेत रेकॉर्ड झाले. ब्लॅकबॉक्सही सापडली आहे. दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की लँडिंग गियर वेळीच न उघडल्याने वैमानिकासमोर मोठीच अडचण उभी राहिली. ब्लॅकबॉक्स सापडल्यामुळे विमान अपघाताच्या कारणांवर अधिक प्रकाश पडू शकेल. तरीही कालिकत येथील करीपुर विमानतळाच्या धावपट्टीच्या वेळोवेळी होणा-या दुरूस्तीबाबत अक्षम्य हेळसांड झाल्याचे दिसून आले आहे. हे विमान टेकडीच्या पठारावर असून धावपट्टीवर पावसाळ्यात पाणी सांचते. शिवाय तेथल्या धावपट्टीवर उतणा-या विमानांमुळे धावपट्टीवर टायर्सचे तुकडेही इतस्ततः पडतात. ते तुकडे वेचून पावसाळ्यात साचणारे पाणी उपसत राहणे ही विमानतळ अधिका-याची नित्याची जबाबदारी आहे. दुर्दैवाने ही जबाबदारी चोखपणे पार पाडली गेली नाही. ह्या सा-या बाबी विमानतळांचे आडिट करणा-या केंद्रीय यंत्रणेच्या २०११ सालच्या अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात तर ह्या विमानतळास विमानतळ प्राधिकरणाने ‘कारण दाखवा’ नोटिसही बजावली होती.
बोईंग विमानाचे वैमानिक दीपक साठे एअऱ इंडियाच्या सेवेत येण्यापूर्वी हवाई दलात कुशल वैमानिक होते. १९८१ साली ते ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’चे मानकरी ठरले. मिग-२१ सारखी विमाने चालवण्याचा त्यांना चांगलाच अनुभव होता, असा निर्वाळा हवाई दलाचे भूतपूर्व उपप्रमुख भूषण गोखले ह्यांनी दिला. पावसाळ्यात धावपट्टीवर पाणी साचते तेव्हा विमान उतरवणे नेहमीच जोखमीचे असते. ते वैमानिकांची नेहमीच कसोटी पाहणारे ठरते असेही हवाई दलाचे भूतपूर्व उपप्रमुख भूषण गोखले ह्यांचे म्हणणे आहे. सामान्यतः विमान अपघाताच्या चौकशीत अहवालात चूक वैमानिकांवर ढकलणयाचा संबंधितांचा प्रयत्न असतो. म्हणून ह्या अपघाताची चौकशी कसोशीने झाली पाहिजे! अन्यथा ती चौकशी लौकरात लौकर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसमक्ष करणे औचित्यपूर्ण ठरते.
केरळमध्ये थिरूअनंतपुरम्, कोची आणि कालिकत अशी ३ आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत. तरीही केरळमध्ये आणखी एक विमातळ व्हावे अशी केरळवासियांची मागणी आहे! कालिकतला विमानतळ बांधण्यास काय टेकडीचीच जागा मिळाली? अलीकडे कुठेही विमानतळ बांधण्याचे तंत्र विकसित झाले आहे हे खरे. विमानतळाचा हव्यासही ठीक आहे. परंतु ज्या ठिकाणी नैसर्गिक परिस्थिती अनुकूल असेल तरच तेथे विमानतळ बांधण्यास परवानगी देणे शहाणपणाचे ठरते हे मान्य करायला हवे.
No comments:
Post a Comment