इंदिराजींच्या हत्त्येनंतर राजीव गांधींना पंतप्रधानपद मिळाले. त्यामुळे पंतप्रधानपद
मिळण्याची प्रणवदांना मनोमन वाटणारी इच्छा मावळली. अर्थात ती नंतरही कधी पुरी
झाली नाही! राजीव गांधींच्या
काळात काँग्रेसला त्यांनी रामराम ठोकून १९८७ साली ‘राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस’ची स्थापना केली. सौम्यप्रकृती
प्रणवदांची विशाल बुध्दिमत्ता ही त्यांच्या स्वभावाची बैठक होती! धकाधकीच्या राजकारणात रट्टेघट्टे द्यावे-घ्यावे
लागतात. परंतु रट्टेघट्टे देणेघेणे त्यांच्या स्वभावातच नव्हते. खटाटोपांचेही
त्यांना वावडे होते. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला! १९८९ साली त्यांनी
राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस मूळ काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा पर्याय त्यांनी सहज
स्वीकारला. पंतप्रधान झाल्यानंतर नरसिंह राव आणि मनमोहनसिंग ह्यांच्या काळात
प्रणवदांकडे परराष्ट्र, संरक्षण, अर्थ अशी महत्त्वपूर्ण खाती सोपवण्यात आली. ती
त्यांनी समर्थपणे हाताळली. त्यात ते रमलेही! साहजिक राष्ट्रपतीपदासारखा सन्मान त्यांच्याकडे
चालत येणे क्रमप्रापात होते.
प्रणवदा राष्ट्रपतीपद भूषवत असतानाच्या काळातच काँग्रेसची सत्ता गेली आणि
भाजपाची सत्ता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नवे सरकार आले तरी सरकार आणि
त्यांच्यात तणातणीचा प्रसंग आला नाही. कारण, विलोभनीय आणि परिपक्वता हा प्रणवदांचा
स्वभाव. त्यांच्यावर फारशी वैयक्तिक टीकाही झाली नाही. राष्ट्रपतीपद हे पक्षातीत
आहे ह्याचे देशाला आणि जगाला प्रत्यंतर आले ते प्रणवदांमुळे. राष्ट्रपतीपदाची शान वाढली अशीच ग्वाही
राष्ट्रपतीभवन सदैव देत राहील! राष्ट्रपदीपदावरून निवृत्त झाल्यानंतर ‘रेशीम बागे’कडून मिळालेले
व्याख्यानाचे निमंत्रण प्रणवदांनी सहज स्वीकारले. नागपूरला जाऊन राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या सभेत त्यांनी व्याख्यानही दिले. त्या व्याख्यानाच्या
निमित्त्ताने त्यांच्या स्वभावातल्या
सहष्णुतेचा परिचय देशाला नक्कीच झाला!
दिल्लीत नॉर्थ ब्लॉकमध्ये रमलेले प्रणवदा गावच्या ‘पूजामहोत्सवा’त तितकेच रममाण होत
असत. महाराष्ट्रात जसा
घरोघरी गणपतीची स्थापना होते तशी बंगालमध्ये नवरात्री घरोघर दूर्गेची स्थापना आणि पूजा
होते! नवरात्रीच्या
दिवसात ते हमखास गावी जात. तिथल्या पूजेत रममाण होत. त्यांचे ‘दूर्गापूजा प्रेम’ कधीच मलूल झाले नाही.
मुलानातवंडांसमवेत ते उत्साहाने पूजाअर्चेत भाग घेत! घरातल्या
पूजेचे ते जवळपास पौरोहित्यच करत असे म्हणा ना! राजकारणाच्या पडत्या काळात नाटकात रामकृष्ण
परमहंसाची भूमिकाही त्यांनी केली. त्यांच्या सुसंस्कृत स्वभावाचे रहस्य त्यांनी
केलेल्या रामकृष्ण परमहंसांच्या भूमिकेत दडलेले असावे! यंदा दूर्गा
महोत्सव १७ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. प्रणदांच्या अनुपस्थितीमुळे गावातल्या
घरची दूर्गापूजा त्यांच्या कुटुंबातील मंडळींना निश्चितपणे सुनी सुनी वाटणार! लोकनेता म्हणून
प्रणवदा ह्यांनी अशी खोटी शेखी मिरवली नाही. ते लोकनेते नव्हतेच. लोकनेता ह्या
पदवीपेक्षा सुसंस्कृत राजकारणाचा दीपस्तंभ अशीच त्यांची ओळख भारतीय जनमानसात
चिरंतन राहील! हा दीपस्तंभ
मालवला आहे.
रमेश झवर
ज्येष्ठ पत्रकार
No comments:
Post a Comment