Tuesday, August 4, 2020

काँग्रेसमधली धुसपूस


सत्तेची लालसा आणि फटाफूट हा काँग्रेसचा इतिहास आहे. तरीही तीनचार अपवाद वगळता सर्व प्रकारच्या संकटांवर मात करण्यात काँग्रेसला आतापर्यंत यश मिळत गेले. फुटून वेगळे झालेल्या अनेकांनी वेगळा पक्ष स्थापन केला. असंतोष ओसरल्यावर वेगळा पक्ष स्थापन करणारे पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले तर काहींनी त्यांचे पक्ष अन्य पक्षात विलीन केले. साठच्या दशकात काँग्रेसमध्ये उभी फूट पडली होती. परंतु अल्पकाळात इंदिरा काँग्रेसला अभूतपूर्व यश मिळाले, संघटना काँग्रेस अस्तंगत झाली. दुसरे संकट २०१४ साली आले. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळवलेल्या यशाने काँग्रेसचा सत्तेचा इतिहास पुसला गेला. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये राहून गांधींचे सहकारी म्हणून पुढे आलेल्या ज्योतिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट ह्या दोघांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे काँग्रेस पक्षात नव्याने धुसपूस सुरू झाली असून काँग्रेस पक्षाला व्हेंटिलेट लावण्याची पाळी येते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. आधी कर्नाटक आणि नंतर मध्यप्रदेशमधील काँग्रेस सरकारे येनकेण प्रकारेण पाडण्याचा यशस्वी प्रयत्न भाजपाने केला. पण त्याबद्दल भाजपावर गैरमार्गाचा आरोप करण्यापेक्षा काँग्रेसचे नेते भाजपाच्या तंत्राला बळी का पडले ह्याचा  विचार काँग्रेसने करायला हवा होता. दुर्दैवाने आत्मपरीक्षण करण्यास काँग्रेस अजूनही तयार नाही. कर्नाटकमधले सरकार पाडण्यात भाजपाला यश मिळाले हे समजण्यासारखे आहे. विशेषतः भाजपा हा कर्नाटक विधानसभेत सर्वात मोठा पक्ष होता. मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे अस्वस्थ असलेल्या ज्योतिरादित्य सिंधियांना सामावून घेणे कमलनाथना अगदीच अशक्य होते अशातला भाग नाही. परंतु राहूल गांधींच्या मित्राची बूज राखावी असे काही कमलनाथना वाटले नाही. एका अर्थाने मध्यप्रदेशातले काँग्रेस सरकार पडण्यासा कमलनाथ स्वतः जबाबदार आहेत. आता सचिन पायलटांच्या बंडामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत ह्यांच्या सरकारपुढे संकट उभे राहिले आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि बंडखोर नेते सचिन पायलट ह्या दोघांत समेट घडवून आणण्याचा काँग्रेसश्रेष्ठींनी प्रयत्न केला नाही असे नाही. परंतु काँग्रेसमधील हटवादी जुन्या नेत्यांपुढे तरूण नेत्यांचे काही चालले नाही असा निष्कर्ष काढणे भाग आहे. उलट, राजस्थानमधील राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेसमध्ये नव्या-जुन्यातील सुप्त संघर्ष उसळी मारून वर आला. अर्थात ह्याला संघर्ष म्हणता येईल की नाही ह्याबद्दल वेगळा दृष्टिकोन असू शकतो. मात्र तो दृष्टीटीकोन  समर्थनीय ठरणार नाही.  ह्या सुप्त संघर्षाला धुसपूस असे मात्र निश्चित म्हणाता येईल. अर्थात १४ ऑगस्ट रोजी सुरू होणा-या राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनात काय घडते ह्यावरच काँग्रेसमधल्या असलाच तर त्या          संघर्षाला निर्णायक वळण लागण्याचा संभव आहे. धुसपूस संपुष्टात आणून निर्णायक वळण लावण्याची धमक काँग्रेस नेत्यात उरलेली नाही!काँग्रेसच्या पक्षान्तर्गत राजकारणाचे निरीक्षण केल्यानंतर काँग्रेसला नवसंजीवनी देण्यीच गरज राहूल गांधींना वाटत होती. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाच्या काळात राहूल गांधींनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले होते. त्यादृष्टीने अनेक तरुणांचा एक गटच त्यांनी तयार करत आणला. ह्या काळात मनमोहनसिंगांनी देऊ केलेले मंत्रिपद राहूल गांधींनी स्वीकारले असते तर कदाचित त्यांच्या राजकारणाला अनुभवाची जोड मिळाली असती. काँग्रेसचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर मोदींसारख्या प्रभावशाली नेत्याशी दोन हात करण्याच्या दृष्टीने राहूल गांधी सुरूवातीला खूपच कमी पडले. देशभरात काँग्रेस कार्यकर्त्यांची फौज त्यांच्या पाठीशी उभी राहिली नाही. ह्याउलट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी फौज १९९० पासूनच भाजपाच्या मदतीला उभी झाली होती. मोदींच्या सत्ता काळात तर ह्या फौजेचा उत्साह खूपच वाढला. दरम्यानच्या काळात मोदी सरकारवर खरमरीत टीका करण्याच्या बाबतीत राहूल गांधींनी खूप प्रगती केली. पण तरीही त्यांच्या मागे काँग्रेस नेते उभे राहिले नाहीत. राहूल गांधींचे मित्र म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस सोडून भाजपात जाऊ लागल्याने जुन्या काँग्रेस नेत्यांच्या हाती कोलित आल्यासारखे झाले.आज घडीला काँग्रेसची अवस्था एके काळच्या समाजवादी पक्षासारखी झाली आहे! बिहार आणि कर्नाटकात जनता पक्षाच्या नावाने जो काही थोडाफार समाजवादी पक्ष शिल्लक राहिला तो वगळता समाजवादी पक्षाचे अस्तित्व संपले आहे. काँग्रेसची ही अवस्था गेल्या काही वर्षात अशीच झाली आहे. ह्या अवस्थेची सुरूवात १९९० पासूनच झाली आहे असे म्हटले तरी चालेल. मंत्री आणि आमदार असलेले नेते सोडले तर काँग्रेस  कार्यकर्ता असा कोणीच उरला नाही. ठेकेदारांच्या दलालांची 'काँग्रेस कार्यकर्ता' अशी ओळख निर्माण झाली ती ह्याच काळात! काँग्रेच्या ह्या विशिष्ट अवस्थेमुळे २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसचा निभाव लागणे शक्यच नव्हते. पर्याय म्हणून देश काँग्रेसकडे पाहायला तयार नाही. विशेष म्हणजे काँग्रेस नेतृत्वाला आणि अन्य बुजूर्ग नेत्यांना  त्याची खंत नाही. निवडणुकीच्या राजकारणात यश मिळण्यासाठी केवळ भरपूर पैसा हवा असतो असे नाही. पैसा तर हवाच, त्याहीपेक्षा  किलिंग इन्स्टिंक मह्त्वाची असते. तीच आज काँग्रेसमध्ये कोणात उरलेली नाही.मोदी सरकारला उत्तम पर्याय ठररण्याची इच्छाशक्ती काँग्रेस पक्ष गमावून बसला आहे. राजस्थानातील राजकारणाच्या निमित्त्ताने काँग्रेसमधील धुसपूस सुरू होणे हे काँग्रेसला कोरोना झाल्याचेच लक्षण आहे. ह्या वास्तवावर काँग्रेस मात करणार का?

रमेश झवर

ज्येष्ठ पत्रकार



No comments: